वटवृक्ष आणि पिंपळाच्या विस्तीर्ण कुळातला ‘प्लक्ष’ म्हणजेच पायरी हा निसर्गाचा एक दुर्लक्षित ठेवा आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आयुर्वेदातील प्रसिद्ध ‘पंचवल्कल’ सूत्राचा एक सुवर्णतारा आहे. आपल्या शीतल सावलीने सजीव सृष्टीला एकत्र आणणारा हा महावृक्ष केवळ पर्यावरणाचा रक्षक नाही, तर आरोग्याचा आणि परोपकाराचा एक अद्भुत वारसा आहे.
निसर्गाच्या कुशीत असे अनेक वृक्ष आहेत जे वटवृक्ष आणि पिंपळासारखेच विशाल आहेत; परंतु ते मानवी नजरेतून थोडे दुर्लक्षित राहिले आहेत. भारतीय संस्कृती, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या वृक्षांना ’महावृक्ष’ मानले जाते, त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शीतल वृक्ष म्हणजे ’पायरी’ किंवा ’पिंपर्णी’. यालाच मराठीत पायरीदेखील म्हणतात. मात्र हा आंब्यातील पायरी नाही. वाचकांचा गोंधळ होऊ नये म्हणून हे आधीच स्पष्ट करणे आवश्यक आहे.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला हा वृक्ष संस्कृतमध्ये ’प्लक्ष’ या नावाने ओळखला जातो. या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची देवता ’अर्यमा’ (मित्रत्व, करार आणि विवाहाचा देव) आहे. ज्याप्रमाणे अर्यमा देवता समाजाला आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते, तसाच हा प्लक्ष वृक्ष आपल्या विशाल सावलीने सजीव सृष्टीला एकत्र आणतो आणि उष्णतेपासून संरक्षण देतो.
आयुर्वेदात ’क्षीरीवृक्ष’ (ज्यांच्या खोडाला छेद दिल्यास दुधासारखा चीक येतो) अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. त्या क्षीरीवृक्षांच्या समूहाला ’पंचवल्कल’ (पाच महावृक्षांची साल) म्हटले जाते. या पंचवल्कलांमध्ये ’वड’, ’पिंपळ’, ’उंबर’ आणि ’पारस-पिंपळ’ यांसोबत पाचवा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष ’प्लक्ष’ हाच आहे! ’पंचवल्कल’ हा आयुर्वेदातील त्वचारोग आणि जखमा भरून काढण्यासाठीचा सर्वात मोठा आणि यशस्वी फॉर्म्युला आहे.
प्लक्ष हा मध्यम ते अतिशय उंच आणि डेरेदार वाढणारा पानझडी वृक्ष आहे. याचे खोड गुळगुळीत आणि फिकट पांढरट-राखाडी रंगाचे असते. वडाप्रमाणेच यालाही पारंब्या येतात; पण त्या वडाएवढ्या जमिनीपर्यंत पोहोचून नवीन खोड बनवत नाहीत; तर त्या बहुतांश वेळा मूळ खोडाभोवतीच गुंडाळल्या जातात.
वसंत ऋतूत (फेब्रुवारी ते मार्च) याची जुनी पाने गळून पडतात आणि एकाच वेळी अतिशय सुंदर, नाजूक, तांबूस-गुलाबी रंगाची नवीन पालवी संपूर्ण झाडावर येते; जी पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. काही दिवसांनी ही पाने गडद हिरवीगार होतात. याला फुले येत नाहीत, तर फांद्यांना पांढरट-लालसर रंगाची लहान फळे (अंजीर वर्गातील टेंबुर्णे) लगडतात; जी पक्ष्यांचे अत्यंत आवडते खाद्य असते.
आयुर्वेदीय दृष्टीकोन
पायरीची साल (त्वक), पाने, फळे आणि चीक (क्षीर) या सर्वांचा औषधी उपयोग आयुर्वेदात अत्यंत प्रभावीपणे सांगितला आहे.
* रस : कषाय (तुरट) आणि मधुर (गोड)
* गुण : गुरू (पचायला जड), रूक्ष (कोरडा)
* वीर्य : शीत (अत्यंत थंड)
* विपाक : कटू
दोषघ्नता : हा वृक्ष प्रामुख्याने पित्त आणि कफ दोषांचे शमन करणारा आहे. याचा ’तुरट’ रस आणि ’थंड’ गुण रक्त वाहणे थांबवण्यासाठी (रक्तस्तंभक) आणि अंगातील दाह (जळजळ) कमी करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो.
आरोग्यासाठी उपयोग
1. रक्तपित्त आणि रक्तस्राव ः अंगातील उष्णता वाढून नाकातून रक्त येणे (घोणा फुटणे), रक्ती मूळव्याध किंवा मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव होणे, यावर प्लक्ष वृक्षाच्या सालीचा काढा अमृतासमान कार्य करतो. याचा कषाय रस फाटलेल्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन करून त्वरित रक्त थांबवतो.
2. त्वचाविकार आणि व्रणरोपण ः जेव्हा अंगावर खाज येते, नायटा होतो किंवा जखमेत पू होतो; तेव्हा ’पंचवल्कलाच्या’ काढ्याने जखम धुण्याचा (व्रण प्रक्षालन) सल्ला वैद्य देतात. यात प्लक्षची साल अत्यंत महत्त्वाची असते. हे उत्तम ’व्रणरोपक’ आहे. जुनाट जखमा (Diabetic ulcers) भरून काढण्यासाठी याचा उपयोग अनेक वैद्य करतात.
3. स्त्री-आरोग्य आणि गर्भसंस्कार ः गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी आणि अंगावरून पांढरे जाणे (श्वेतप्रदर) या त्रासात प्लक्षाची साल आणि फळांचा उपयोग होतो. आयुर्वेदामध्ये योनीमार्गाच्या शुद्धीसाठी याच्या काढ्याचा ’धावन’ (Douche) म्हणून वापर केला जातो.
4. मुखरोग आणि हिरड्यांचे विकार ः तोंड आल्यास किंवा हिरड्यांमधून रक्त व पू येत असल्यास पायरीच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या (कवल-गंडूष) केल्याने त्वरित आराम मिळतो. यामुळे दात घट्ट होतात आणि तोंडातील उष्णता निघून जाते.
5. दाहप्रशमन ः उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असल्यास किंवा तळपायांची आग होत असल्यास पायरीच्या कोवळ्या पानांचा लेप अंगाला लावल्यास शरीराला विलक्षण थंडावा मिळतो.
संशोधन काय सांगते?
पाश्चात्य वैद्यकशास्त्र, फायटोकेमिस्ट्री आणि फार्माकोलॉजीने Ficus virens म्हणजेच प्लक्षवर सखोल संशोधन केले असून आयुर्वेदातील सिद्धांतांना वैज्ञानिक पुष्टी दिली आहे. ती खालीलप्रमाणे आहे
1. अँटी-मायक्रोबियल ः आधुनिक संशोधनानुसार प्लक्षाच्या सालीमध्ये ’फायब्रोब्लास्ट प्रोलिफेरेशन’ वाढवण्याची क्षमता असते. म्हणजेच; त्वचेवरील जखम भरून काढणार्या पेशींची निर्मिती हा अर्क वेगाने करतो. तसेच, यातील टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स ’स्टॅफिलोकोकस’ (Staphylococcus) आणि ’ई-कोलाय’ (E. coli) सारख्या भयंकर बॅक्टेरियांचा नाश करतात.
2. शक्तिशाली अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेनकिलर ः प्लक्षाच्या पानांचा आणि सालीचा अर्क शरीरातील ’सायक्लोऑक्सिजनेज’ (COX) आणि ’प्रोस्टाग्लँडिन’ (जे सूज आणि वेदना निर्माण करतात)ची निर्मिती प्रभावीपणे रोखतो. यामुळे सांधेदुखी आणि अंतर्गत सूज कमी करण्यासाठी हा एक नैसर्गिक आणि अत्यंत सुरक्षित पर्याय ठरतो.
3. गॅस्ट्रो-प्रोटेक्टिव्ह आणि अँटी-अल्सर ः पोटातील अल्सर आणि आतड्यांचा दाह यावर प्लक्षाच्या सालीचा अर्क अत्यंत प्रभावी असल्याचे प्राण्यांवरील प्रयोगांत सिद्ध झाले आहे. याचा तुरट गुण पोटाच्या आतील म्युकसचा थर मजबूत करतो आणि अतिरिक्त अॅसिडिटीमुळे होणारे नुकसान टळते.
4. अँटी-ऑक्सिडंट आणि न्यूरो-प्रोटेक्टिव्ह : प्लक्षाच्या पानांमध्ये फिनोलिक संयुगे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील विषारी ’फ्री रॅडिकल्स’ नष्ट करतात, ज्यामुळे पेशींचे म्हातारपण (Cellular aging) लांबते. काही अलीकडच्या संशोधनांत असे दिसून आले आहे की; हा अर्क मेंदूच्या पेशींचे रक्षण करून डिमेंशियासारख्या आजारात स्मृती वाढवण्यास मदत करू शकतो.
5. हिपॅटोप्रोटेक्टिव ः आधुनिक फार्माकोलॉजीमध्ये प्लक्ष वृक्षाच्या पानांचा आणि सालीचा अर्क यकृताच्या आजारांवर अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रयोगांमध्ये असे सप्रमाण दिसून आले आहे की, काही रासायनिक घटकांमुळे किंवा औषधांच्या अतिसेवनामुळे (जसे की पॅरासिटामोल) यकृताला जी सूज येते किंवा त्याच्या पेशींचे जे नुकसान होते, ते रोखण्याची अद्भुत क्षमता या अर्कात आहे. यातील फायटोकेमिकल्स यकृतातील एसजीओटी (SGOT) आणि एसजीपीटी (SGPT) यांसारख्या एन्झाइमचे बिघडलेले संतुलन पुन्हा प्रस्थापित करतात. यकृताची झीज भरून काढण्यासाठी आणि त्याच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
6. ग्लुकोज नियंत्रक कार्य ः रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याच्या क्षमतेवरही प्लक्ष वृक्षावर मोठे संशोधन झाले आहे. आधुनिक Inavitro अभ्यासानुसार; या वृक्षाच्या सालीच्या आणि पानांच्या अर्कामध्ये ’अल्फा-अमायलेज’ आणि ’अल्फा-ग्लुकोसिडेज’ या पचनाशी संबंधित दोन्ही एन्झाइम्सना रोखण्याची क्षमता असते. ही एन्झाइम्स आपण खाल्लेल्या कर्बोदकांचे वेगाने साखरेत रूपांतर करतात. प्लक्षाचा अर्क ही प्रक्रिया मंद करतो, ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर एकदम वाढत नाही (Postprandial hyperglycemiaर). यामुळे ’टाईप-2’ मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्लक्षाचा अर्क अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय म्हणून काम करू शकतो; यावर अनेक क्लिनिकल रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
पर्यावरणाचा रक्षक आणि पक्ष्यांचे आश्रयस्थान
हा वृक्ष पर्यावरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. उन्हाळ्यात जेव्हा इतर झाडांची पाने गळलेली असतात आणि पाणी कमी असते, तेव्हा याला फळे येतात. त्यामुळे अनेक पक्षी (विशेषतः पोपट, साळुंकी, हरियाल), माकडे आणि खारी यांच्यासाठी हा वृक्ष अन्नाचे मुख्य आगार बनतो. याच्या विस्तीर्ण सावलीखाली परिसरातील तापमान नेहमी 4 ते 5 अंशांनी कमी राहते. याच्या मजबूत मुळांमुळे जमिनीची धूप थांबते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे दैवत ’अर्यमा’ हे मैत्री, दानशूरपणा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. प्लक्ष (पायरी) वृक्ष आपल्याला हाच संदेश देतो की; आपले जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांना सावली आणि फळे देणारे असावे. ज्याप्रमाणे हा वृक्ष इतर चार झाडांसोबत (पंचवल्कल) मिळून उत्तम औषध बनतो, तसाच मानवाने समाजात एकोप्याने राहून परोपकाराचे कार्य करावे.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी प्लक्षासारखे विशाल, शांत आणि इतरांच्या दुःखावर (दाह) फुंकर घालणारे असावे. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आणि निसर्गप्रेमींनी आपल्या परिसरात, मोठ्या उद्यानात किंवा रस्त्याच्या दुतर्फा पायरीचे (प्लक्ष) झाड नक्की लावावे. हा वृक्ष केवळ एक झाड नसून, अनेक पिढ्यांसाठी ते एक आरोग्यदायी, पर्यावरणीय आणि शीतल महाकाव्य ठरेल!
- लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.