महादेवाची पूजा म्हटली की, आपल्याला बेलाची पाने आठवतात. बेलाची पाने फक्त पूजेसाठी उपयोगाची नाहीत; तर त्या पानांमध्ये आणि वृक्षामध्ये आरोग्याचा मोठा खजिना आहे. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेल्या बेलाच्या पानात, मुळात आणि फळात अफाट औषधी शक्ती दडलेली आहे. आयुर्वेदातील अनेक महत्त्वाच्या औषधांमध्ये मुख्य घटक असलेला बेल हा पोटाचे जुने आजार, मधुमेह आणि सांधेदुखीवर रामबाण ठरतो. आता आधुनिक विज्ञानानेही बेलाच्या कॅन्सरविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. कडक उन्हाळा आणि कोरड्या हवामानातही हिरवागार राहणार्या या महावृक्षाचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
वैदिक परंपरेत ज्या वृक्षाला साक्षात महादेवाचे आणि कल्याणाचे स्वरूप मानले जाते; तो अत्यंत पवित्र आणि बहुगुणी वृक्ष म्हणजे बेल किंवा बिल्व. याव्यतिरिक्त बेलफळाला ‘श्रीफळ’ असेही म्हटले जात असल्याने आणि श्रीसुक्तात त्याच्या उल्लेख असल्याने बेल हे सर्वसंपन्नतेचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीदेवीच्या तपश्चर्येतून या वृक्षाची निर्मिती झाली; अशीही एक कथा पुराणांत आढळते. बेलाच्या वृक्षाखाली बसून केलेले ध्यान आणि मंत्रजप अत्यंत वेगाने सिद्ध होतो; अशी भाविकांची आणि साधकांची दृढ श्रद्धा आहे. आकाशातील सत्तावीस नक्षत्रांपैकी चौदावे अत्यंत तेजस्वी आणि नवनिर्मितीचे प्रतीक असणारे नक्षत्र म्हणजे ‘चित्रा’ नक्षत्र. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून ‘बिल्व’ असा अत्यंत स्पष्ट उल्लेख आलेला आहे.
शिवपुराणानुसार; बेलाच्या मुळाशी साक्षात ब्रह्मदेव, खोडात भगवान विष्णू आणि शाखा तसेच पानांमध्ये भगवान शिवशंकर वास करतात. बेलाचे त्रिदल (तीन पाने) हे सत्त्व, रज आणि तम या मानवी जीवनातील तीन गुणांचे, तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या हे भगवान शिवाच्या तीन नेत्रांचे (सूर्य, चंद्र आणि अग्नी) रूपक आहे.
चित्रा नक्षत्राची देवता त्वष्टा किंवा विश्वकर्मा (देवांचे शिल्पकार) आहे आणि या नक्षत्राचे प्रतीक एक अत्यंत चमकदार मोती किंवा लखलखते रत्न आहे. ज्याप्रमाणे विश्वकर्मा आपल्या अलौकिक कलेतून नवनिर्मिती करतात आणि एखाद्या सामान्य रत्नाला पैलू पाडून त्याला असामान्य तेज प्राप्त करून देतात; तसाच हा बेल वृक्ष मानवी शरीरातील अनेक गुंतागुंतीच्या व्याधी दूर करून शरीराला आणि मनाला एक नवीन ऊर्जा, चैतन्य आणि तेज प्रदान करतो.
स्वरूप
बेल हा एक मध्यम आकाराचा, अत्यंत काटक आणि पानझडी वृक्ष आहे. याचे खोड खडबडीत आणि फिकट राखाडी रंगाचे असते. फांद्यांवर अतिशय तीक्ष्ण आणि मजबूत काटे असतात; जे या वृक्षाचे नैसर्गिक संरक्षण करतात. या वृक्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची पाने. बेलाची पाने नेहमी तीनच्या समूहात (त्रिपर्ण) एकाच देठावर येतात. याला उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिरवट-पांढर्या रंगाची आणि अत्यंत मंद, मनमोहक सुगंध असणारी फुले येतात. बेलाचे फळ गोलाकार, अतिशय कठीण कवचाचे असते. कच्च्या फळाचा रंग राखाडी-हिरवा असतो; तर फळ पिकल्यावर ते पिवळसर-सोनेरी रंगाचे अत्यंत आकर्षक दिसते. फळाच्या आत अत्यंत गोड, चिकट, लालसर-पिवळा आणि सुगंधी गर असतो, ज्यामध्ये अनेक बिया असतात.
आयुर्वेदीय दृष्टीकोन
आयुर्वेदात बेलाची मुळे, साल, पाने, फुले आणि फळे या सर्वांचा औषधी उपयोग अत्यंत बारकाईने आणि सविस्तर सांगितला आहे. आयुर्वेदातील अत्यंत प्रसिद्ध आणि बहुगुणी ’दशमूळ’ (दहा वनस्पतींच्या मुळांचा समूह) या फॉर्म्युलामध्ये बिल्व हा ’बृहत् पंचमूळ’ (पाच मोठ्या वृक्षांची मुळे) या गटातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख घटक आहे. वातव्याधींवर दशमूळ अमृतासमान मानले जाते.
बेलाचा रस कषाय (तुरट) आणि तिक्त (कडू) आहे. याचे गुण लघु (हलका) आणि रूक्ष (कोरडा) आहेत. बेलाची मुळे आणि पाने वीर्याने उष्ण (गरम) असतात. आयुर्वेद सांगतो की, कच्चे बेलफळ ग्राही (मल बांधून ठेवणारा), दीपन आणि पाचन आहे; तर पिकलेले फळ पचायला जड, मधुर आणि किंचित सारक (पोट साफ करणारा) असते. बेल हा प्रामुख्याने कफ आणि वात दोषांचे शमन करणारा श्रेष्ठ वृक्ष आहे.
आरोग्यासाठी सविस्तर उपयोग
1. पोटाचे विकार, ग्रहणी आणि जुनाट अतिसार : आयुर्वेदात कच्च्या बेलाचे फळ (बिल्व मज्जा) हे आतड्यांच्या आजारांवर, विशेषतः ग्रहणी विकारावर जगातले सर्वश्रेष्ठ औषध मानले जाते. वारंवार जुलाब होणे, रक्ती आव पडणे, शौचास चिकट होणे आणि पोटात मुरडा येणे यावर कच्च्या बेलाचा गर, बेलाचा मुरांबा (बिल्वावलेह) अत्यंत गुणकारी ठरतो. याचा तुरट रस आतड्यांची अतिरिक्त हालचाल नियंत्रित करतो आणि मलाला योग्य आकार देऊन बांधून ठेवतो.
2. कर्णविकार आणि बहिरेपणा : आयुर्वेदात कानाच्या आजारांवर बेलाचा अत्यंत कल्पक वापर सांगितला आहे. कानात सतत आवाज येणे (टिनिटस), कमी ऐकू येणे या समस्यांवर बेलाच्या मुळांपासून आणि पानांपासून सिद्ध केलेले ’बिल्व तैल’ कानात टाकण्यासाठी (कर्णपूरण) वापरले जाते. याच्या उष्ण आणि वातनाशक गुणामुळे कानाचे मज्जातंतू बळकट होतात.
3. मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रण : बेलाची कोवळी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी निसर्गाचे एक मोठे वरदान आहेत. बेलाच्या पानांचा ताजा रस किंवा पानांचे चूर्ण नियमितपणे वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास रक्तातील साखरेची वाढलेली पातळी वेगाने नियंत्रित राहण्यास मदत होते. हे थेट स्वादुपिंडाला उत्तेजित करून इन्सुलिनचे प्रमाण सुधारण्याचे कार्य करते.
4. ताप, सूज आणि वेदना शमन : शरीरात कुठेही सूज आली असेल किंवा वात वाढून सांधेदुखीचा तीव्र त्रास असेल; तर बेलाच्या पानांचा लेप कोमट करून सुजेवर लावला जातो. तसेच, वातदोषाने होणार्या वेदनांवर आणि विशेषतः तापावर (ज्वर) बेलाच्या मुळांचा काढा (दशमुलाच्या स्वरूपात) दिल्यास घाम येऊन ताप त्वरित उतरतो आणि रुग्णाला आराम मिळतो. जुनाट तापात बेलाची पाने अत्यंत उपयुक्त आहेत.
5. हृदयविकार आणि उष्णता निवारण : उत्तर भारतात पिकलेल्या बेलाच्या फळाचे सरबत (ज्याला बेलपना म्हणतात) उन्हाळ्यात आवर्जून प्यायले जाते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, उष्माघात टळतो, अंगाची लाहीलाही थांबते आणि हृदयाच्या स्नायूंना विलक्षण ताकद मिळते.
संशोधन काय सांगते?
वनस्पती शास्त्र, फायटोकेमिस्ट्री आणि फार्माकोलॉजीने एगल मार्मेलोसवर अतिशय सखोल संशोधन केले असून आयुर्वेदातील हजारो वर्षांच्या सिद्धांतांना भक्कम वैज्ञानिक पुष्टी दिली आहे.
1. अतिसारनाशक (अँटी-डायरिअल) आणि जंतुनाशक : आधुनिक अभ्यासानुसार, बेलाच्या कच्च्या फळामध्ये टॅनिन, मार्मेलोसिन आणि विविध दुर्मीळ अल्कलॉइड्स असतात. हे सक्रिय घटक Shigella आणि E.coliसारख्या जिवाणूंची वाढ पूर्णपणे रोखतात; जे अन्नातून होणार्या विषबाधेला आणि रक्ती आवेला मुख्यत्वे कारणीभूत असतात. हे संशोधन आतड्यांच्या संसर्गावर बेलाचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे सिद्ध करते.
2. मधुमेहविरोधी (अँटी-डायबेटिक) : अनेक क्लिनिकल प्रयोगांमध्ये असे सप्रमाण दिसून आले आहे की, बेलाच्या पानांमधील Aegeline आणि इतर फायटोकेमिकल्स रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी करतात. सर्वात आश्चर्याची आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे; बेलाचा अर्क स्वादुपिंडातील खराब झालेल्या किंवा मृतप्राय ’बीटा पेशींचे’ (ज्या शरीरात इन्सुलिन बनवतात) पुनरुज्जीवन करण्यास मदत करतो. आधुनिक मधुमेहाच्या उपचारात हे एक अत्यंत मोठे आणि क्रांतिकारी पाऊल मानले जाते.
3. रेडिओप्रोटेक्टिव्ह आणि कर्करोगविरोधी (अँटी-कॅन्सर) : कर्करोगाच्या उपचारात दिल्या जाणार्या तीव्र रेडिएशनमुळे (किरणोत्सर्ग) रुग्णाच्या शरीरातील निरोगी पेशींचे जे भयंकर नुकसान होते; त्यापासून रक्षण करण्याची विलक्षण आणि दुर्मीळ क्षमता बेलाच्या अर्कात असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. तसेच, यातील घटक ट्युमरच्या पेशींची वाढ रोखण्यातही अत्यंत प्रभावी आढळले आहेत. आमच्यासारखे वैद्य या गुणधर्माचा कॅन्सर उपचारांत सुयोग्य उपयोग करत असतात.
4. पोटातील अल्सर आणि अॅसिडिटी : बेलाच्या फळाचा अर्क पोटाच्या आतील म्युकसचा (चिकट आवरणाचा) थर जाड आणि मजबूत करतो. यामुळे अतिरिक्त गॅस्ट्रिक अॅसिडच्या स्रावाला आळा बसतो. परिणामी; अॅस्पिरिनसारख्या औषधांच्या अतिसेवनामुळे होणारे पोटातील अल्सर लवकर भरून येतात.
5. इसेन्शियल ऑइलवर : बेलाच्या पानातील तेलामध्ये अत्यंत प्रबळ अँटी-फंगल (बुरशीनाशक) आणि ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळले आहेत. त्वचेवरील भयंकर फंगल इन्फेक्शन आणि श्वसनमार्गातील जंतूंचा नाश करण्यासाठी हे तेल आधुनिक औषधनिर्मितीमध्ये वापरले जात आहे.
बेल हा निसर्गातील अत्यंत काटक आणि तीव्र दुष्काळ सहन करणारा महावृक्ष आहे. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता असते; हवामान कोरडे असते आणि जमीन खडकाळ असते; तिथेही बेल अतिशय सहजपणे तग धरून राहतो आणि हिरवागार राहतो. त्यामुळे दुष्काळी आणि निमओसाड भागात वृक्षारोपणासाठी बेल हा एक सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. बेलाची खोलवर जाणारी मुळे जमिनीची धूप थांबवतात आणि मातीचा कस टिकवून ठेवतात. भारतीय परंपरेतील ’देवराई’ या संकल्पनेत बेलाला अत्यंत मानाचे स्थान आहे. उन्हाळ्यात जेव्हा जंगलातील इतर झाडांना फळे नसतात आणि अन्न दुर्मीळ असते, तेव्हा बेलाची कठीण फळे निसर्गात उपलब्ध असतात, जी जंगलातील काही विशिष्ट प्राणी फोडून खातात आणि आपले पोषण करतात.
चित्रा नक्षत्राची देवता विश्वकर्मा ही नवनिर्मिती, कला आणि कौशल्याची देवता आहे. बेल वृक्ष मानवाला हाच महान संदेश देतो की; सभोवतालची परिस्थिती कितीही खडकाळ, प्रतिकूल आणि कठीण असली तरी स्वतःच्या आत एक सात्त्विक आणि आरोग्यदायी गाभा निर्माण करण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. बेलाची काटेरी फांदी आणि कठीण कवचाची फळे आपल्याला बाह्य संकटांपासून स्वतःचे रक्षण करायला शिकवतात; तर फळाच्या आतला गोड गर आपल्याला आतून अत्यंत उपयुक्त आणि सर्वांसाठी मधुर राहायला शिकवतो.
चित्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत तेजस्वी, कलाकुसरीची आवड असणार्या, व्यक्तिमत्त्वाने आकर्षक आणि कठीण प्रसंगातही नवनिर्मितीची अफाट क्षमता असणार्या असतात. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आणि नैसर्गिक, आरोग्यदायी जीवनशैलीची इच्छा असणार्या प्रत्येकाने आपल्या परिसरात; शेताच्या बांधावर, बागेत किंवा मोकळ्या जागेत बेलाचे किमान एक झाड नक्की लावावे. वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या आवारात किंवा अंगणात लावणे अत्यंत शुभ आणि मंगलदायी मानले जाते.
हा वृक्ष केवळ परिसरातील नकारात्मक ऊर्जा आणि जंतू नष्ट करणार नाही; तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे एक अभेद्य आणि चिरंतन कवच प्रदान करेल. निसर्गाच्या या साक्षात शिवस्वरूपाची जोपासना करणे, हेच खर्या अर्थाने मानवी जीवनाचे एक मोठे सार्थक आहे.
लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.