शीख परंपरेतील भगत रविदासजी

विवेक मराठी    21-Jul-2026   
Total Views |
 

ravidas
मध्ययुगीन भारतातील जुलमी राजवट आणि कर्मठ जातिव्यवस्थेच्या अंधकारात संत रविदासांनी समतेचा आणि निर्गुण भक्तीचा प्रकाश पसरवला. त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातील ‘बे गमपुरा’ ही शोषणमुक्त, दुःखमुक्त आणि जातीविहीन आदर्श राज्याची संकल्पना मानवी हक्कांचा पाया ठरली. या विचारांचे साधर्म्य ओळखून शीख परंपरेने त्यांच्या 41 सबदांना ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’ या सर्वोच्च ग्रंथात सामावून घेत त्यांना गुरुसमान दर्जा दिला. आजच्या आधुनिक काळातही संत रविदास (भगत रविदास जी) आणि शीख परंपरेचा हा वैचारिक संगम संपूर्ण मानवजातीला समतेचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे.
मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरांचा काळ. तेराव्या शतकानंतर आपल्या देशावर परचक्र पूर्णपणे स्थिरावले. हिंदू शासनव्यवस्थेचे समाजावरील छत्र नाहीसे झाले होते, आणि हिंदूंचा सामाजिक आत्मविश्वासच डळमळीत झाला होता.
 
 
पंधराव्या आणि सोळाव्या शतकात भारतीय समाज एका बाजूला परकीय आक्रमण, जुलमी शासन आणि दुसर्‍या बाजूला कर्मठ जातिव्यवस्था, अंधश्रद्धा व कर्मकांडे अशा दुहेरी बेडीत अडकला होता. अशा कालखंडात ’भक्ती परंपरेने’ने भारतीय समाजमनात वैचारिक आणि आध्यात्मिक बदल घडवून आणला. नैराश्याच्या गर्तेत जाणार्‍या समाजमनात आत्मशोधाचा दीप भक्ती परंपरेने लावला. या परंपरेतील अत्यंत तेजस्वी, समाजाभिमुखी संत मेरुमणी म्हणजे संत रविदास. अंधार्‍या मध्ययुगातील त्यांचे कार्य उत्तरेत सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचा पाया घालणारे ठरले. मध्ययुगात हिंदूंच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थानात महत्त्वाची भूमिका बजावणारा संप्रदाय म्हणजे ‘शीख’. त्याच शीख परंपरेत संत रविदासांना अत्यंत सन्मानाने ’भगत रविदासजी’ म्हणून ओळखले जाते.
 
 
उत्तरेत (काशीमध्ये) संत रविदास समतेचा आणि निर्गुण भक्तीचा जो विचार मांडत होते; तोच विचार त्याच कालखंडात पंजाबमध्ये गुरू नानक देव मांडत होते. या दोन्ही विचारवंतांच्या तत्त्वज्ञानात प्रचंड साधर्म्य होते. त्यातून शीख धर्माने संत रविदासांच्या निर्मितीला केवळ स्वीकारलेच नाही तर, आपल्या सर्वोच्च धर्मग्रंथात, ’श्री गुरू ग्रंथसाहिब’मध्ये सामावून घेऊन त्यांना ’गुरू’समान दर्जा दिला.
 
 
संत रविदासांचा जन्म दलित चमार(चर्मकार) कुटुंबात झाला. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत त्यांना शिक्षणाचा, ईश्वरोपासनेचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारला गेला. मात्र, स्वयंप्रज्ञेने, निस्सीम भक्तीने आणि अद्वैताच्या मूलगामी ज्ञानाने त्यांनी अध्यात्मातील सर्वोच्च शिखर गाठले.
 
 
शीख इतिहासातील प्राचीन ’जनमसाख्यां’मध्ये गुरू नानक देव यांच्या ’उदासी’ म्हणजेच आध्यात्मिक प्रवासाचे सविस्तर वर्णन आढळते. गुरू नानक देव आपल्या प्रवासादरम्यान काशीमध्ये (वाराणसी) आले असता तेथे अनेक विद्वानांच्या, संतांच्या, पंडितांच्या भेटी त्यांनी घेतल्या. ऐतिहासिक नोंदींनुसार, या भेटीत संत कबीर आणि संत रविदास या दोघांशीही गुरू नानक देवजींनी अध्यात्म, अनन्यशरणत्व आणि निर्गुणभक्ती यांवर संवाद साधला.
 
 
रविदासांच्या साहित्यानुसार या ऐतिहासिक भेटीत त्यांच्यात ईश्वर, मानवी समाज, मुक्ती आणि भक्ती या विषयांवर सखोल चर्चा झाली. याच भेटीदरम्यान गुरू नानकांनी संत रविदासांच्या रचना (सबद) स्वतः आपल्या पोथीत लिहून घेतल्या, असे मानले जाते. पुढे हीच पोथी गुरू अंगद देव, गुरू अमरदास आणि गुरू रामदास यांच्यामार्फत पाचवे गुरू, गुरू अर्जन देव यांच्याकडे हस्तांतरित झाली. भारताच्या धार्मिक इतिहासात दोन महान संत-विचारवंतांचा प्रत्यक्ष वैचारिक संगम ही एक अद्वितीय घटना मानली जाते.
 

ravidas 
 
इ.स. 1604 मध्ये शीख धर्माचे पाचवे गुरू, गुरू अर्जन देव यांनी अमृतसर येथे ’आदिग्रंथ’ संकलित केला. यात त्यांनी अतिशय चोखंदळपणे भारतातील 15 महान संतांच्या (भक्तांच्या) रचनांचा यात समावेश केला. याच ग्रंथराजास पुढे गुरू गोविंद सिंग यांनी ’श्री गुरू ग्रंथसाहिब’ म्हणून शाश्वत गुरुत्वाचा दर्जा दिला.
 
 
या पवित्र ग्रंथात संत रविदासांचे 41 सबद (पदे) समाविष्ट आहेत. हे सबद एकूण 16 विविध रागांमध्ये गायले जातात. शीख मार्गात ’गुरुबाणी’ (शीख गुरूंचे शब्द) आणि ’भगतबाणी’ (संत रविदासांसारख्या संतांचे शब्द) यात कोणताही भेद केला जात नाही.
मात्र, संत रविदासांचे महत्त्व केवळ या 41 सबदांपुरते मर्यादित नाही. अनेक शीख गुरूंनी आणि महात्म्यांनी आपल्या साहित्यात संत रविदासांचा अत्यंत आदराने उल्लेख केलेला दिसून येतो.
 
 
शिखांचे चौथे गुरू, गुरू रामदास यांनी संत रविदासांच्या महानतेची आणि समाजात त्यांनी घडवून आणलेल्या बदलाची ऐतिहासिक नोंद गुरुबाणीत करून ठेवली आहे. राग सुहीमध्ये गुरू रामदास जी म्हणतात :
 
रविदासु चमारु उसतति करे हरि कीरति निमख इक गाइ॥
 
पतित जाति उतमु भइआ चारि वरन पए पगी आइ॥2॥
 
अर्थ : रविदास चमार प्रत्येक क्षणी ईश्वराची स्तुती आणि कीर्तन करत असे. ईश्वराच्या सच्च्या भक्तीमुळे समाजाच्या दृष्टीने ’पतित’ समजली जाणारी जात ’उत्तम’ झाली आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चारही वर्णांचे लोक त्यांच्या चरणी येऊन नतमस्तक झाले.
 
 
तसेच, भाई गुरदास हेही शीख इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव. ते ’आदिग्रंथा’चे (गुरू ग्रंथ साहिबाचे) मूळ लेखनिक होते. त्यांच्या साहित्याला शीख मार्गाची ’गुरु-किल्ली’ मानले जाते. त्यांनी आपल्या ’वार’ या काव्यात (वार 10, पउडी 17) संत रविदासांचे वर्णन असे केले आहे,
 
 
भगतु भगतु जगि वजिआ चहु चका दे विचि चमारे॥
...नीचहु ऊच करै मेरा गोबिंदु काढे निगुरे ते निसतारे॥
 
 
चमार कुळात जन्म घेऊनही त्यांची ख्याती चारी दिशांना महानतम भक्त म्हणून पसरली. माझा ईश्वर अधम जातीतील मनुष्यालाही सर्वोच्च शिखरावर पोहोचवतो आणि जगाने नाकारलेल्यांचा उद्धार करतो.
 
 
हे संत रविदासंच्या महात्म्याचे बाह्य पुरावे म्हणता येतील; परंतु आपल्या 41 सबद रचनांमध्ये विशद त्यांचे तत्त्वज्ञान शीख मार्गासाठीचे भगत रविदासांचे अनन्यसाधारण व सार्वकालिक महत्त्व अधोरेखित करते तेही आपण पाहू.
 
 
संत रविदासांच्या साहित्यातील अतिशय महत्त्वाची आणि आदर्शवादी राज्यशास्त्राच्या कसोटीवर उतरणारी संकल्पना म्हणजे ’बे गमपुरा’. पाश्चिमात्य विचारवंत थॉमस मोर याने 1516मध्ये ’युटोपिया’ या ग्रंथातून आदर्श, दुःखमुक्त राज्याची संकल्पना मांडली. मात्र, त्याहूनही कैक दशकांआधी संत रविदासांनी परिपूर्ण, शोषणमुक्त आणि न्याय्य राज्याची कल्पना केल्याचे दिसते.
राग ’गौरी’मध्ये संत रविदासांनी या ’बे गमपुरा’ शहराचे वर्णन खालील शब्दांत केले आहे:
 
बेगम पुरा सहर को नाउ॥ दूखु अंदोहु नही तिहि ठाउ॥
नां तसवीस खिराजु न मालु॥ खउफु न खता न तरसु जवालु॥1॥
 
’बे गमपुरा’ म्हणजेच दुःख नसलेले शहर (येथे सर्व स्थिती अतिशय वेगळी आहे). या ठिकाणी कोणतेही दुःख, मानसिक क्लेश(अंदोहु) किंवा चिंता नाही. तिथे संपत्तीची कोणतीही चिंता (तसवीस) नाही आणि जनतेवर अन्यायकारक कर खिराज (मुघलांकडून गैर-मुस्लीम समाजावर लादला गेलेला कर. कृषी आणि इतर उत्पन्नाच्या 1/3 ते 1/2 भाग खिराज/खरज भरावा लागे) लादला जात नाही. तिथे कोणालाही कोणतीही भीती (खउफु) नाही, चूक होण्याची धास्ती नाही आणि कोणाचेही पतन (जवाल) होण्याचीही भीती नाही. बेगमपुरा ही संकल्पनाच क्रांतिकारी होती. अध्यात्मातून नागरी समाजासाठीची आदर्श स्थिती कशाप्रकारे आकारली जाऊ शकते याचे हे अद्वितीय उदाहरण ठरते.
 

ravidas 
 
’बे गमपुरा’ ही आदर्श सामाजिक आणि नागरी स्थिती. तीपर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीपासून समुदायापर्यंत बदलाचे तत्त्वज्ञान संत रविदास सबद रचनांमध्ये मांडतात. संत रविदासांचे सबद मानवी जीवन, अहंकार, कर्मकांडांना विरोध आणि निर्गुण भक्ती यांवर अत्यंत सखोल भाष्य करतात. यातील काही प्रमुख सबद आपण पाहू,
 
 
शीख मार्ग पूर्णपणे एकेश्वरवादी. ’निर्गुण’ (निराकार) ईश्वराची संकल्पना मानणारा (’एक ओंकार’). संत रविदासांनी ईश्वर आणि मानव यांच्यात कोणताही भेद नसल्याचे अद्वैत राग सिरी मध्ये मांडले आहे:
 
तोही मोही मोही तोही अंतरु कैसा॥
कनक कटिक जल तरंग जैसा॥1॥
 
 
हे ईश्वरा, तुझ्यात आणि माझ्यात, माझ्यात आणि तुझ्यात आता कोणताही फरक (अंतर) उरलेला नाही. जसा सोने (कनक) आणि सोन्याचा दागिना (कटिक) यात तत्त्वतः काहीच फरक नसतो, जसा अथांग महासागर आणि त्याची लाट (जल तरंग) हे शेवटी जलच असते, तसाच ईश्वर आणि भक्त हे एकरूपच आहेत. हा विचार गुरुबाणीतील प्रभ की जोति सगल घट सोहै (ईश्वराचा प्रकाश सर्वांमध्ये आहे) या विचाराशी जाऊन एकरूप होतो.
 
 
शीख धर्मात ’नाम जपो’ हे सर्वात प्रमुख तत्त्व आहे. या सबदात तेच अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.
 
तत्कालीन समाजाने संत रविदासांना त्यांच्या जातीवरून अत्यंत हीन वागणूक दिल्याचे आपल्याला ज्ञात आहे. मात्र, ईश्वराच्या दरबारात माणसाची जात नव्हे तर भक्तीच श्रेष्ठ ठरते, हे त्यांनी राग मारू मध्ये स्पष्ट केले,
 
मेरी जाति कमीनी पांति कमीनी ओछा जनमु हमारा॥
 
तुम सरनागति राजा राम चंद कहि रविदास चमारा॥6॥
 
या जगाच्या दृष्टीने माझी जात क्षुद्र (कमीनी) आहे, माझे कुळ (पांती) खालचे आहे आणि माझा जन्मही कनिष्ठ कुटुंबात (ओछा जनम) झाला आहे; पण, हे ईश्वरा (राजा रामचंद्रा), हा रविदास चमार जगाची पर्वा न करता केवळ तुझ्या शरणी आला आहे.
माणूस आपल्या भौतिक संपत्तीचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार करतो, पण शेवटी शरीर हे मातीचे आहे, याची जाणीव करून देताना संत रविदास राग आसा मध्ये म्हणतात,
 
 
माटी को पुतरा कैसे नचतु है॥ देखै देखै सुनै बोलै दउरिओ फिरतु है॥1॥ रहाउ ॥
जब कछु पावै तब गरबु करतु है॥ माइआ गई तब रोवनु लगतु है॥2॥
 
हा मातीचा पुतळा (मनुष्य) कसा नाचत आहे बघा! तो पाहतो, ऐकतो, बोलतो आणि स्वतःच्याच नादात इकडे-तिकडे धावत फिरतो. त्याला थोडीशी संपत्ती किंवा सत्ता मिळताच खूप गर्व (गरबु/अहंकार) करतो; पण, जेव्हा ही माया (संपत्ती) निघून जाते, तेव्हा मात्र तो लहान मुलासारखा रडायला लागतो.
 
शीख मार्गात ’हउमै’ (अहंकार) हा ईश्वराच्या प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा मानला गेला आहे. भक्त आणि ईश्वराचे नाते हे कोणत्याही भयाच्या आधारावर नसून शुद्ध प्रेमाच्या आधारावर असावे. राग ’सोरठ’मधील ही रचना निसर्गातील प्रतीकांचा वापर करून भक्तीचे अत्यंत सुंदर चित्र उभे करते,
 
जउ तुम गिरिवर तउ हम मोरा॥ जउ तुम चंद तउ हम भए है चकोरा॥1॥
 
माधवे तुम न तोरहु तउ हम नही तोरहि॥ तुम सिउ तोरि कवन सिउ जोरहि॥2॥
 
हे ईश्वरा, जर तू एखादा सुंदर पर्वत (गिरिवर) असशील, तर मी त्या पर्वतावर आनंदाने नाचणारा मोर आहे. जर तू चंद्र असशील, तर मी त्या चंद्राकडे एकटक पाहणारा चकोर आहे. हे माधवा, जर तू हे प्रेमाचे नाते तोडले नाहीस, तर मीही ते कधीच तोडणार नाही. कारण तुझ्याशी नाते तोडून या जगात दुसरे कोणाशी मी नाते जोडणार? अशा ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी ब्राह्मण किंवा उच्च कुळात जन्म घेणे आवश्यक नाही, हे सांगताना संत रविदास राग ’मारू’मध्ये आपल्या समकालीन संतांचा दाखला देतात :
 
नामदेउ कबीरु तिलोचनु सधना सैनु तरै॥
 
कहि रविदासु सुनहु रे संतहु हरि जीउ ते सभै सरै॥2॥
 
 
संत नामदेव (शिंपी), संत कबीर (विणकर), संत त्रिलोचन (वैश्य), संत सधना (खाटीक) आणि संत सेना (न्हावी) यांसारखे सामान्य आणि वंचित पार्श्वभूमीतून आलेले सर्व भक्त ईश्वराच्या खर्‍या भक्तीने या भवसागरातून तरून गेले. रविदास म्हणतात, ”हे संतांनों ऐका! त्या ईश्वराच्या कृपेने सर्वांचा उद्धार शक्य आहे.”
 
 
माणूस आपल्या इंद्रियांच्या अधीन होऊन कसा स्वतःचा विनाश ओढवून घेतो, हे समजावून सांगण्यासाठी संत रविदासांनी राग आसा मध्ये उत्कृष्ट रूपक वापरले आहे,
 
मृग मीन भृंग पतंग कुंचर एक दोख बिनास॥
पंच दोख असाध जा महि ता की केतक आस॥1॥
 
हरीण (आवाजाच्या मोहापायी), मासा (जिभेच्या चवीपायी), भुंगा (वासाच्या मोहापायी), पतंग (प्रकाशाच्या मोहापायी) आणि हत्ती (स्पर्शाच्या मोहापायी) असे हे सर्व प्राणी केवळ ’एकाच’ इंद्रियाच्या दोषामुळे स्वतःचा विनाश ओढवून घेतात. तर मग, ज्या माणसाच्या आत हे पाचही दोष (काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार) भरलेले आहेत, त्याच्या बचावाची काय आशा बाळगता येईल?
शीख पंथाचा मूळ पाया तीन तत्त्वांवर आहे, ’किरत करो’ (प्रामाणिक श्रम करा); ’नाम जपो’ (ईश्वराचे स्मरण करा); ’वंड छको’(मिळवलेले धन इतरांसोबत वाटून घ्या). संत रविदासांचे संपूर्ण जीवन या तत्त्वांचे मूर्तिमंत उदाहरण होते. ज्या काळात संन्यासवादाचे स्तोम माजले असताना संत रविदासांनी संन्यासवाद नाकारून अध्यात्माच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही आपले पारंपरिक जोडे शिवण्याचे आणि चामडे कमवण्याचे काम ईश्वरसेवा म्हणूनच सुरू ठेवले. तत्कालीन समाजात या कामाला अत्यंत नीच मानले जात असे; पण रविदासांनी त्याच कर्माला ’पूजा’ मानले.
 
 
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, जेव्हा शीख धर्मात विषमता आणि जातिवादाने शिरकाव केला असता, (उदा. काही गुरुद्वारांमध्ये दलितांना प्रवेश नाकारणे सुरू झाले होते), शीख महंतांनी ’सिंग सभा चळवळ’ सुरू केली. या चळवळीचे प्रमुख नेते ज्ञानी दित्त सिंग आणि भाई कान्ह सिंग नाभा यांनी समाजसुधारणेसाठी ’श्री गुरू ग्रंथ साहिब’मधील संत रविदासांच्या बाणीचाच सर्वात लाघवी शस्त्र म्हणून वापर केला. त्यांनी शीख समाजाला ठणकावून सांगितले, ”ज्या ग्रंथाला आपण गुरू मानता, त्या ग्रंथात जर एका चमाराचे शब्द सर्वोच्च स्थानी विराजमान आहेत, तर शीख समाजात जातिभेद असूच कसा शकतो? संत रविदासांच्या शिकवणीनेच शीख धर्माला पुन्हा आपल्या मूळ समतावादी स्वरूपात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले.
 
 
आज जगभरात आणि विशेषतः पंजाबमध्ये ’रविदासिया’ समाजाचा एक मोठा वर्ग आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, या समाजाने शीख मार्गातील समतेच्या तत्त्वामुळे या परंपरेशी स्वतःला जोडून घेतले. दरवर्षी माघ पौर्णिमेला संत रविदास यांची जयंती जगभरातील गुरुद्वारांमध्ये अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी विशेष ’अखंड पाठ’ आणि ’नगर कीर्तन’ काढले जाते.
 
 
’श्री गुरू ग्रंथ साहिब’मधील संत रविदासांचे स्थान हे केवळ एका भक्तापुरते किंवा कवीपुरते मर्यादित नसून तत्त्ववेत्ते, प्रखर सुधारक आणि मानवी मूल्यांचे प्रणेते असे हे स्थान आहे. अद्वैत भक्ती, जातिव्यवस्थेचा प्रखर विरोध, बाह्य कर्मकांडांना नाकारून खर्‍या नामाची महती आणि ईश्वरावरील अतूट निष्ठा सांगणार्‍या संत रविदासांच्या 41 रचनांनी ’श्री गुरू ग्रंथ साहिब’च्या वैचारिक उंचीत आणि व्यापकतेत अमूल्य भर घातली.
 
 
सोळाव्या शतकात जातिव्यवस्थेने नाकारलेल्या वंचित वर्गातील या संताच्या शब्दांना गुरू अर्जन देव जी यांनी सर्वोच्च धर्मग्रंथात मानाचे पान दिले. आज एकविसाव्या शतकातही भेदभावग्रस्त जगात, संत रविदास आणि शिखांचा आदर्श नागरी जीवनाचा मूल्यात्मक विचार संपूर्ण मानवजातीसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे.

राजस वैशंपायन

राजस वैशंपायन 
राजस वैशंपायन इतिहास, सांस्कृतिक जतन आणि प्राचीन ज्ञानप्रणाली, विशेषतः मराठी आणि संस्कृतमधील ज्ञानप्रणाली या विषयांवर काम करतात. साध्य सा. विवेकमध्ये कार्यरत आहेत..