आंदोलनाआडून पेट(व)लेले गृहयुद्ध

विवेक मराठी    23-Jul-2026   
Total Views |
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा सातत्यपूर्ण आग्रह या पलीकडे शिक्षणव्यवस्थेत सुधार करण्यासाठी ठोस उपाययोजना आंदोलकांकडे नव्हत्या. त्यांच्या तथाकथित मागण्यांकडे नजर टाकली तर लक्षात येते की विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी म्हणून सुरू झालेले आंदोलन हा एक देखावा होता. त्यामुळेच शिक्षणव्यवस्थेशी, बेरोजगारीशी संबंधित मुद्दे बाजूला पडून वेगळेच मुद्दे पुढे आले. आता त्याच्यावर भारतातील आणि भारताबाहेरील देशविरोधी शक्तींनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. आणि कॉक्रोच पार्टीचा संस्थापक असलेला अभिजीत दिपके या सगळ्यांच्या हातातले बाहुले बनला आहे.
CJP
 
 
नीट परीक्षेमधील पेपरफुटी उघडकीस आली त्यावेळी या विषयावरून समाजात अस्वस्थता असतानाच; सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान बनावट पदवीच्या आधारे वकीली व्यवसायात प्रवेश केलेल्या तरुणांना उद्देशून झुरळ आणि परजीवी अशी टिप्पणी केली. वास्तविक एका विशिष्ट वर्गाला उद्देशून केलेली ही टिप्पणी होती, ती समाजातल्या सर्व स्तरातल्या युवकांना लागू होत नव्हती. तसे स्पष्टीकरणही सूर्य कांत यांच्याकडून तातडीने देण्यात आले. तरीही अमेरिकेत बस्तान बसलेल्या अभिजीत दिपकेने हा उडता तीर अंगावर घेतला. ‘ही टिप्पणी म्हणजे भारतातल्या समस्त तरूणाईचा अपमान आहे‘, असे सांगत आणि नुकत्याच घडलेल्या नीट पेपरफुटीचे कारण पुढे करत त्याने जेन झीमध्ये लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘कोक्रोच जनता पार्टी’ या नावाने अकाऊंट सुरू केला. काही वर्षांपूर्वी आपमध्ये केजरीवालांसाठी समाजमाध्यमे सांभाळण्याचा अनुभव घेतलेल्या दिपकेला इन्स्टाग्राम या माध्यमाची ताकद ठाऊक होती. आणि युवावर्गावर या माध्यमाचा असलेला प्रभावही. या आभासी मंचावर स्थापन झालेल्या आणि उपहासात्मक नाव धारण केलेल्या पार्टीला एका दिवसातच दोन कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळाले. ही संख्या केवळ अनैसर्गिकच नव्हे तर अविश्वसनीयही होती. खरे तर तीच धोक्याची पहिली घंटा होती.
 
 
केवळ एका टिप्पणीवरून आभासी मंचावर स्थापन झालेल्या एका पक्षाला इतके फॉलोअर्स मिळाले, ज्या पक्षाला पक्की वैचारिक बैठक नाही की प्रगल्भ नेतृत्व नाही. ही केवळ भारतीय तरुणांची संख्या आहे की त्यात अन्य परकीय देशविघातक शक्तीही सहभागी आहेत अशी शंका यायला वाव होता. यात पाकिस्तानी हँडलर्सही होते हे नंतर जाणकारांच्या आणि सरकारच्या लक्षात आले.
 
 
फॉलोअर्सचा आकडा अविश्वसनीय असला तरी इथला युवादेखील कॉक्रोच पार्टीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला ही गोष्ट मान्य करायलाच हवी...मात्र याचा अर्थ हे सगळेच जण फार विचार करून सहभागी झाले होते असा नाही. थेट संवाद दुर्मीळ झालेल्या आजच्या काळात आभासी संवादाचे हे माध्यम आजच्या तरूणाईला जास्त जवळचे वाटते असा याचा अर्थ. शिवाय, या तरुणांना भेडसावणार्‍या बेरोजगारीच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी ही डिजिटल चळवळ चालू झाली असल्यानेही अनेक जण त्यात सहभागी झाले. त्याच दरम्यान घडलेल्या नीट पेपरफुटीमुळे शिक्षणक्षेत्रातल्या अव्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी देखील ही चळवळ आहे असे सांगण्यात आले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्याची जबाबदारी पत्करून राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरू लागली.
 
 
नीटसारखी अतिशय महत्त्वाची, जिच्याशी लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य निगडित आहे अशा परीक्षेचा पेपर फुटणे हे दुर्दैवी आणि लाजिरवाणेही. (गेल्या 70/75 वर्षांत किती वेळा वेगवेगळ्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटले अशी चर्चा करणेही इथे अस्थानी व अप्रस्तुत.) दिवसरात्र एक करून अभ्यासाला जुंपलेल्या विद्यार्थ्यांची अशा घटनेने काय अवस्था होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! दरम्यान हा आघात सहन न झालेल्या 12 विद्यार्थ्यांनी मृत्युला कवटाळले ही तर अतिशय वेदनादायी गोष्ट. एकूणच शिक्षणव्यवस्थेत किती अमूलाग्र सुधारणा, ती ही तातडीने करणे गरजेचे आहे याची ही घटना निदर्शक आहे. सरकारने ही पेपरफुटी गांभीर्याने घेत आणि झाल्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारत परीक्षा पुढे ढकलली. महिन्याभरातच अतिशय कडेकोट बंदोबस्तात पुन:परीक्षा होऊन त्याचा निकालही लागला.
 
 
मात्र हे सगळे घडत होते त्याच वेळी ‘कॉक्रोच जनता पार्टी‘चे आंदोलन आभासी मंचावरून वास्तवात सुरू झाले आणि अल्पावधीतच त्याने अराजकाचे रूप धारण केले. केवळ अराजकच नव्हे तर आता ते गृहयुद्धाच्या दिशेने चालले आहे.
 
 
शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने दिलेला हक्क मान्य करत अभिजीत दिपकेला भारतात प्रवेश करताक्षणी त्यासाठी परवानगीही देण्यात आली होती. मात्र अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा पूर्वानुभव आणि पूर्वतयारी नसल्याने अभिजीतसह त्याचे साथीदार गोंधळले. जेव्हा सोनम वांगचुक त्यांच्या अन्य मागण्यांबरोबरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत आंदोलनस्थळी उपोषणाला बसले तेव्हा या आंदोलनात धुगधुगी आली. आणि आयती मिळालेली संधी साधत त्यात घुसलेल्या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि मोदी हटाव या विचाराने पछाडलेले विरोधक त्यात घुसल्याने अल्पावधीतच त्याचा वडवानल झाला. तिथूनच या आंदोलनाचा प्रवास अराजकाकडे सुरू झाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा सातत्यपूर्ण आग्रह या पलीकडे शिक्षणव्यवस्थेत सुधार करण्यासाठी ठोस उपाययोजना आंदोलकांकडे नव्हत्या. त्यांच्या तथाकथित मागण्यांकडे नजर टाकली तर लक्षात येते की विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी म्हणून सुरू झालेले आंदोलन हा एक देखावा होता. त्यामुळेच शिक्षणव्यवस्थेशी, बेरोजगारीशी संबंधित मुद्दे बाजूला पडून वेगळेच मुद्दे पुढे आले. आता त्याच्यावर भारतातील आणि भारताबाहेरील देशविरोधी शक्तींनी पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. आणि कॉक्रोच पार्टीचा संस्थापक असलेला अभिजीत दिपके या सगळ्यांच्या हातातले बाहुले बनला आहे.
 
 
हे जरी वास्तव असले तरी याचा अर्थ निश्चितच असा होत नाही की भारतातील तरुणाईसमोर काही प्रश्न नाहीत वा शिक्षणव्यवस्थेत सगळे आलबेल आहे. एकीकडे आपले कुमार व तरुण अंतराळ क्षेत्रापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय, अभिमानास्पद कामगिरी बजावत असतानाच समाजातल्या खूप मोठ्या तरुण वर्गासमोर रोजच्या जगण्याशी निगडित समस्या आहेत. भारतीय विचारांवर आधारित आणि आजच्या आव्हानांशी लढायला सक्षम करणारी शिक्षणव्यवस्था विकसित करणे हे ही व्हायला हवे आहे. या दोन्ही विषयांत सरकारला तातडीने आणि नियोजनबद्ध काम करणे गरजेचे आहे.
 
 
विरोधकांच्या बहकाव्यात येणार्‍या, आभासी माध्यमांच्या अधीन झालेल्या तरुणाईच्या आयुष्यात सुयोग्य मार्गदर्शकाचा अभाव आहे. त्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेणारा, त्यांना योग्य मार्गावर ठेवणारा मार्गदर्शक त्यांना हवा आहे. ही पोकळी भरून काढायला हवी. तसे न झाल्यास देशविघातक शक्ती या तरुणाईबरोबरच देश उद्ध्वस्त करायला टपून बसल्या आहेत.