विश्वास अभंग आहे...

    03-Jul-2026
Total Views |

Ram Mandir 
या देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थळी-अयोध्येत त्यांचे मंदिर उभे राहावे यासाठी देशभरातल्या करोडो हिंदू भाविकांनी थोडीथोडकी नव्हे तर पाचशे वर्षे संघर्ष केला. नव्वदच्या दशकात संघ परिवारातील ’विश्व हिंदू परिषदे’च्या पुढाकाराने साधुसंतांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाने या लढ्याला अधिक संघटित आणि अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. ’मंदिर वही बनायेंगे’ ही सर्वसामान्य हिंदू भाविकांनी दिलेली केवळ आंदोलनापुरती घोषणा नव्हती, तर तो प्राणपणाने केलेला निर्धार होता. लढा जसा तीव्र होत गेला तसे निर्धाराचे रूपांतर सामूहिक ध्यासात झाले. हिंदूंना प्राणाहून प्रिय असलेल्या रामललाचे मंदिर त्याच्या जन्मस्थानी पुन्हा एकदा उभारण्याचा तो ध्यास होता. त्याच ध्यासापोटी आंदोलकांनी बाबरी मशिदीचा दावा खोडून काढत निकराने न्यायालयीन लढा दिला. त्याच दरम्यान, भविष्यात तयार होणार्‍या मंदिराच्या पायाभरणीसाठी घराघरातून रामनामाचा जप लिहिलेल्या लाखो वह्या अयोध्येत येऊन दाखल झाल्या. रामनाम कोरलेल्या विटांचे गावोगावी भक्तिभावाने पूजन होऊन त्याही मंदिरनिर्मितीत वापरल्या गेल्या.
 
अखेर मोदी सरकारच्या कार्यकाळात न्यायालयीन लढ्याचा निकाल आंदोलकांच्या बाजूने लागला आणि मंदीर उभारणीतील अडथळा दूर होऊन प्रभू श्रीरामांना साजेसे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहिले. या मंदीर उभारणीसाठीही घराघरांमधून अल्पस्वल्प का होईना देणगी अतिशय आनंदाने दिली गेली. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तर भारतात घराघरात दिवाळी साजरी झाली. ’बजाओ ढोल स्वागत के, मेरे घर राम आए है’ या त्यावेळी अतिशय गाजलेल्या गीतात ही भावना नेमकेपणाने शब्दांकित केली आहे. हा दोन वर्षांपूर्वीचा आनंददायी इतिहास आपल्या सगळ्यांच्या मनात ताजा आहे. त्याच्या स्मृती विलक्षण प्रेरक आहेत.

वास्तविक राम मंदिराइतकीच अतिशय भव्य आणि शिल्पसमृद्ध अशी विविध देवदेवतांची मंदिरे भारतात अनेक प्रांतात आहेत. यातली बहुतांश मंदिरे ही त्या त्या प्रांतातल्या राजे-महाराजांनी, वा त्यांच्या राण्यांनी वा राजाच्या पदरी असलेल्या अधिकार्‍यांनी वा समाजातल्या धनिकांनी उभारली आहेत. मात्र, राम मंदिर हे बहुदा एकमेव असे मंदिर आहे, ज्याच्या उभारणीत देशातल्या करोडो हिंदूंचा प्रत्यक्ष सहभाग आहे. त्या अर्थाने ते लोकसहभागातून उभे राहिलेले मंदिर आहे. हे त्याचे वेगळेपण आणि वैशिष्ट्यही!

अशा या मंदिरात झालेली अपहाराची घटना म्हणूनच अस्वस्थ करणारी आहे. भक्तांनी रामचरणी अर्पण केलेल्या निधीचा, सोने-चांदीच्या मूल्यवान वस्तूंचा तेथील कर्मचार्‍यांनी आणखी काही जणांच्या मदतीने दिवसाढवळ्या केलेला हा अपहार आहे. या विषयीच्या काही तटस्थपणे दिलेल्या बातम्या तर काही संघाविषयीच्या पूर्वग्रहातून अतिरंजितपणे दिल्या गेलेल्या बातम्या व विश्लेषणे आपण प्रसारमाध्यमांतून पाहतो आहोत, वाचतो आहोत. तरीही संघरचनेवरचा आणि प्रभू श्रीरामावरचा आपला विश्वास अतूट आहे. हेच आपले मोठे बळ आहे.

साधुसंतांच्या नेतृत्वाखाली विहिंपच्या पुढाकाराने सकल हिंदू समाजाने यशस्वी लढा देत उभारलेल्या राम मंदिराच्या न्यासाची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली. या न्यासावर चंपतराय, स्वामी गोविंददेवगिरी यांच्यासह संघ तसेच संघ परिवाराच्या माध्यमातून राष्ट्रसेवेसाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले जुनेजाणते बुजुर्ग लोक आहेत. या अपहारानंतरही न्यासावरचा सर्वसामान्यांचा विश्वास अढळ असला तरी, या अपहाराचे निमित्त करून संघद्वेषी प्रसारमाध्यमे जे कथ्य तयार करू इच्छित आहेत त्याचे दु:ख आहे. एखाद्या मोठ्या मंदिरात देणग्यांची वा देवाला अर्पण केलेल्या वस्तूंची होणारी चोरी ही घटना नवीन नाही. सहज ‘गूगल’ केले तरी भारतभरातल्या मोठ्या मंदिरातल्या अशा अनेक बातम्या आपल्याला वाचायला मिळतील.

राम मंदिरात नेमलेल्या कर्मचार्‍यांवर विश्वस्तांनी दाखवलेल्या विश्वासाचा त्यांनी घात केला आहे. अजाणतेपणाने वा कदाचित नेमणुकीपूर्वी नीट चौकशी न झाल्याने हा असंगाशी संग असा प्रसंग ओढवला आहे. मात्र, आता कारवाईला सुरुवात झाली आहे. आणि त्याचे तपशील सर्वांसमोर ठेवले जात आहेत. ज्या आठ जणांवर प्राथमिक संशय आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालू झाली आहे. योगी सरकारने तातडीने विशेष तपास पथक स्थापन करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप सिद्ध होतील त्यांना कठोर शासन व्हावे ही अपेक्षा तसेच या तपासकार्यात पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे विहिंपतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तरीही या प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू करून तथाकथित माध्यमसम्राट संघाविषयी समाजमन गढूळ करण्याचा अथक प्रयत्न करत आहेत. त्यांचा विशेष रोख आहे तो चंपतराय यांच्यावर. कारण ते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस आहेत.

ते संघसमर्पित, राष्ट्रसमर्पित कार्यकर्ता आहेत. दीर्घकाळ चाललेल्या रामजन्मभूमी खटल्यात विहिंपचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येक सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले आहेत. ‘रामलल्लाचे रेकॉर्ड कीपर’,‘अयोध्येचा एनसायक्लोपीडिया”म्हणून त्यांना ओळखले जाते ते या योगदानामुळेच. त्यांच्या चारित्र्यावर व शुद्ध व्यवहारावर शंका घेण्याचे काही कारणच नाही. मात्र मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचार्‍यांवर अपेक्षित नियंत्रण यात विश्वस्त कमी पडले का, याचा शोध यानिमित्ताने घ्यावा लागेल. मंदिर व्यवस्थापन त्यातही दैनंदिन कारभार नियंत्रणात ज्या तांत्रिक त्रुटी राहून गेल्या आहेत त्यावर काम केले जाईल याची ग्वाही विहिंप व संघाने दिलेली आहे. तसे होईल याची खात्री रामभक्तांना असली तरी ते लवकरात लवकर घडावे ही अपेक्षा आहे. कारण सर्वसामान्य रामभक्तांच्या मनात संघ वा विहिंपविषयी कोणतेही किल्मीष नसले तरी या घटनेचा राजकीय लाभ उठवण्यासाठी उतावीळ झालेल्यांना चाप बसायला हवा असे मात्र वाटते. ज्या काँग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारून तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले आहे, त्याच पक्षाच्या श्रेष्ठींना आज अयोध्येत रामदर्शनाला जायचे आहे. तर, एका हाताची बोटे पुरतील इतकेच नेते शिल्लक राहिलेली महाराष्ट्रातील उद्धवसेना राममंदिराच्या घटनेवरून आंदोलनाचा इशारा देते आहे. अशा मंडळींच्या हातात आयते कोलीत मिळाले याचे दु:ख आहे.

रामावरचा, न्यासाच्या विश्वस्तांवरचा आणि संबंधित संघटनांवरचा विश्वास अबाधित आहे; हे आजही तिथे रामदर्शनासाठी होणारी गर्दी सांगतेच आहे.