मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे प्रतीक लक्ष्मणराव जोशी

विवेक मराठी    31-Jul-2026   
Total Views |

joshi
लक्ष्मणराव म्हणजेच ल.त्र्यं. जोशी हे मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे प्रतीक होते. विकसनशील पत्रकारितेसोबत ध्येयवादिता हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. जिथे खंबीर व्हायचे तिथे कोणत्याही परिणामांना घाबरायचे नाही पण मूळ तत्वांना चुकून जरी धक्का बसला तर त्याबद्दल मात्र विनयाने वागायचे, आदरपूर्वक वागायचे ही त्यांची भूमिका होती. ही पत्रकारितेसाठी आदर्श ठरणारी आहे.
जवळजवळ सात दशके महाराष्ट्रातील मराठी पत्रकारिता गाजविणारे, ध्येयदर्शी पत्रकार लक्ष्मणराव जोशी (ल.त्र्यं. जोशी) यांच्या निधनामुळे एक संदर्भकोशच काळाच्या पडद्याआड गेला आहे. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांनी नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
 
 
लक्ष्मणराव मूळचे पाथर्डी या गावचे. त्यांचे वडील हे एका लहानश्या खेड्यात भिक्षुकी करत असत. त्यामुळे अठरा विश्व दारिद्रय काय असते याचा परिचय लक्ष्मणराव यांना जन्मापासूनच झाला आणि त्यावर मात करत त्यांनी आपले स्वतःचे आयुष्य घडविले. पाथर्डी, तेल्हारा करत ते अकोल्यामध्ये आले आणि तेथील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. यासोबतच त्यांनी मातृभूमी या दैनिकात पत्रकारितेचे प्रारंभिक धडे गिरवणे सुरू केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गारुड त्यांच्या मनावर बालपणापासूनच होते. म्हणून संघ प्रशिक्षणाची दोन वर्षे त्यांनी पूर्ण केली. स्वयंसेवक, गटनायक, एक शिक्षक, मुख्य शिक्षक, कार्यवाह अशा विविध जबाबदार्‍या सांभाळत ते संघातही कार्यरत राहिले. पुढे संघाच्या व्यवस्थेप्रमाणेच ते नागपूर तरुण भारतमध्ये आले. तोवर त्यांनी नागपूर शहर बघितलेही नव्हते. नागपूरच्या बर्डी येथील संगम चाळीत तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे घर होते त्या घरातच ते प्रदीर्घ काळ राहत होते. तरुण भारतात उपसंपादक, वार्ताहर पदापासून त्यांनी कामाला प्रारंभ केला आणि जवळजवळ दहा वर्षे ते मुख्य संपादक होते.
 
 
पत्रकारितेत आपल्या कमतरता, मर्यादा यांची जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच होती आणि त्यावर मात करत त्यांनी आपले स्वत:चे स्थान पत्रकार विश्वात निर्माण केले.
 
 
देशात विकसनशील पत्रकारिता प्रायोगिक अवस्थेत असताना त्यांनी त्याविषयी विशेष अध्ययन केले आणि त्यातून त्यांनी ‘पेंच प्रकल्पाचा बदलता चेहरामोहरा’ ही मालिका प्रदीर्घ काळ चालवली. एखाद्या प्रकल्पाच्या प्रारंभ बिंदूपासून तो प्रकल्प पूर्णत्वाला जाईपर्यंत त्याचा आढावा सर्व टप्प्यांवर घेतला गेला आहे असा पेंच प्रकल्प हा नागपुरातील, विदर्भातील नव्हे तर देशातील एकमेव प्रकल्प होता. या संदर्भात त्यांचा इतका सखोल अभ्यास होता की, ते महाराष्ट्रातील जलतज्ज्ञही मानले जात. पाटबंधारे खात्यासंबंधी यांना विशेषच प्रेम होते आणि ते प्रेम बातमीतून ते वारंवार स्पष्ट करत.
 
 
फक्त विकसनशील पत्रकारिता नाही तर ध्येयवादिता हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नागपूरला मनोरमा कांबळे बलात्कार आणि खून प्रकरण झाले त्यावेळी कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्यांनी त्या संदर्भातली मोहीम पद्धतशीरपणे राबविली. त्यामध्ये बबन वाळके या त्यांच्या सहकार्‍याचाही मोठा वाटा होता. या संदर्भात एका राजकीय नेत्यांनी न्यायपालिकेवर आरोप करणारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या परिषदेचे वृत्तांत सर्वच वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याविरुद्ध पुढे न्यायालय अवमान याचिका सुरू झाली आणि पत्रकार परिषद घेणार्‍यांपासून सर्वांनी माफीनामे सादर केले. सर्व वृत्तपत्रांचे संपादकही त्यात होतेच. पण लक्ष्मणराव हे एकमेव संपादक असे होते ज्यांनी,‘मी लिहिले ते सत्य आहे’, हे सांगत न्यायालयाची माफी मागण्यास नकार दिला. परिणामतः त्यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा भोगल्यावर संध्याकाळी ते कोर्टाच्या बाहेर पडले त्यावेळी मोठ्या संख्येत दलित बांधव त्यांच्या स्वागताला जमले होते आणि त्यांनी मिरवणुकीने लक्ष्मणराव यांना तरुण भारताच्या कार्यालयात आणले. पुढे खासदार, आमदार झालेले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे त्यात आघाडीवर होते. न्यायालय अवमान प्रकरणी सत्य हा बचावाचा मार्ग नाही अशी भूमिका घेत न्यायालयाने महाराष्ट्रात फक्त दोघा जणांना सत्य लिहिण्याबद्दल शिक्षा केली त्यात लक्ष्मणरावांचा समावेश होता. मात्र असे असले तरी प्रस्थापित व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात आकस होता असे अजिबात नाही. उलट एकदा तरुण भारताच्या लिखाणातून सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकलेला प्रसंग प्रसिद्ध झाला त्यावेळी त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव मांडण्याची सूचना देण्यात आली होती. त्या संदर्भात त्यांनी पाठविलेले पत्र हे संसदीय इतिहासातील एक अप्रतिम पत्र होते. विधानसभा अध्यक्ष शंकराव जगताप यांनी नमूद केले की वास्तविक हक्कभंग ठराव मी दालनातच नामंजूर केला आहे असे मी सांगू शकलो असतो. पण महाराष्ट्रातील एका संपादकांनी इतके विनयपूर्वक आणि संविधानिक संस्थेबद्दल अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडणारे पत्र मला पाठविले आहे ते आपल्या सगळ्यांसमोर वाचून दाखवण्याचा मोह मला टाळता येत नाही.
 
 
जिथे खंबीर व्हायचे तिथे कोणत्याही परिणामांना घाबरायचे नाही पण मूळ तत्वांना चुकून जरी धक्का बसला तर त्याबद्दल मात्र विनयाने वागायचे, आदरपूर्वक वागायचे ही त्यांची भूमिका होती.
 
 
लक्ष्मणराव जोशी यांनी ग्रामीण भागातील अनेक युवकांना पत्रकारितेत प्रवेश दिला आणि त्यांची पत्रकारिता फुलवली. संदर्भाची विपुलता, संपर्कासाठी सर्वांना सहज उपलब्धता, सातत्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखन हे त्यांच्या लेखणीचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. ते पत्रकाराला फक्त आपल्या संस्थेत आणत होते असे नाही तर त्याचे पत्रकारितेतले जीवन नव्हे तर बाकी सर्व जीवन घडविण्याची जबाबदारी आपलीच आहे असे मानूून त्याच्या सर्व योगक्षेमाचीही काळजी घेत असत.
 
 
त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य होते. त्यांची संपूर्ण पत्रकारिता पूर्ण करून ते निवृत्त झाले तो काळ हाताने बातम्या लिहिण्याचा होता. निवृत्त झाल्यावर त्यांनी आलेल्या नवीन तंत्रावर वर्चस्व प्रस्थापित केले. आपला स्वतःचा ठसा निर्माण केला होता. संगणक हाताळणे, स्वतःचा मजकूर स्वतः कंपोज करणे, स्वतःचे पेजेस स्वतः बनविणे, इंटरनेटचा वापर करत इंटरनेटवरून माहिती घेणे आणि आवश्यक तेथे आपला मजकूर पाठविणे यातील तज्ज्ञता त्यांच्याजवळ होती. फेसबुक, एक्स या सगळ्या माध्यमांचा ते प्रभावीपणे वापर करीत असत.
 
 
पत्रकारितेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. याशिवाय पांचजन्य या हिंदी दैनिकाचा पुरस्कारही त्यांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भव्य समारंभात प्राप्त झाला होता. वयोमानाप्रमाणे पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावर त्यांची सेकंड इनिंग सुरू झाली आणि महाराष्ट्र आणि गोव्यातील सहा वृत्तपत्रात ते संपादक झाले. यातील दोन वृत्तपत्रे तर त्यांनी त्यांच्या जन्मापासूनच फुलवली होती. हे सर्व करत असताना सार्वजनिक जीवनामध्ये आपली भूमिका पार पाडण्यात ते सदैव आघाडीवर राहतात
 
 
 
वनवासी कल्याण आश्रमाचा परिचय जनतेला करून देणारा वनयोगी हा ग्रंथ त्यांनी साकार केला होता. वनयोगी या शब्दांनी त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे बाळासाहेब देशपांडे यांचा परिचय करून दिला होता.
 
 
पत्रकारितेत असताना ते स्वतः वृत्त संकलनाच्या निमित्ताने आसाम, पंजाब वगैरे भागात गेले होते. आसामच्या विद्यार्थी आंदोलनाचे त्यांनी केलेले वृत्तांकन त्यावेळी खूप गाजले होते आणि यामुळेच स्वतः संपादक झाल्यावर त्यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या पत्रकारांना वृत्त संकलनासाठी पाठविले. भाजपा, काँग्रेस या पक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आपला प्रतिनिधी पाठविणे तसेच कुठल्याही आंदोलनात व आपत्तीच्या ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठविणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पटना भूकंप, लातूर भूकंप, ओरिसातील वादळ, शेतकरी संघटनेची आंदोलने, राम जन्मभूमी आंदोलन या सर्व ठिकाणी आपला प्रतिनिधी जाऊन आपल्याकडे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कशी मिळेल याची दक्षता ते घेत असत.
राजकारणात अत्यंत जागरूक राहून आपल्या संबंधातील नेत्यांना जागरूक करणे, सावध करणे, त्यांच्या निर्णयाबद्दल आपले आकलन त्यांना कळविणे हे आपले कर्तव्य आहे यावर त्यांची श्रद्धा होती. एक परिपूर्ण आयुष्य जगून वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.