मित्रमिश्रांचा ‘राजनीतिप्रकाश’ हिंदवी स्वराज्यापूर्वीचा स्वातंत्र्य विचार

विवेक मराठी    11-Aug-2026   
Total Views |
 
‘राजनीतिप्रकाश’ हा शरणागताचा ग्रंथ नाही. आग्र्यामध्ये बसलेल्या मुघल बादशाहच्या वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत हा ग्रंथ निरंकुश, स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदू राज्याच्या व्यवस्थेची मांडणी करतो. स्थानिक हिंदू राजा, मुघलांविरुद्ध उठून आपले स्वतंत्र शासन स्थापन करतो त्याचीच सर्वोच्च ऐहिक सत्ता मानून, हा ग्रंथ पूर्ण स्वातंत्र्याची सैद्धांतिक मांडणी करतो. जिथे हिंदू शासकांना आपल्याच राज्यावर शासन करण्यासाठी मुघल बादशाहकडून परवानगी घ्यावी लागत असे, तिथे स्वतंत्र हिंदू राजा आणि त्याचे हिंदू राज्य हा विचारच क्रांतिकारी ठरतो.
भारतीय उपखंडाच्या इतिहासातील सतरावे शतक म्हणजे प्रचंड उलाढालींचा काळ. गेल्या काही लेखांत आपण याच काळातील स्वतंत्र हिंदू विचारांचा माग घेत आलो आहोत. सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकांत जहांगीरच्या नेतृत्वाखाली मुघल साम्राज्याच्या अवाढव्य राज्यव्यवस्थेने संपूर्ण उत्तर भारतावर पूर्ण वर्चस्व स्थापित केले होते. आणि आपण पाहिले याच काळात देशी हिंदू न्याय व समाजविचार क्षेत्रात शांत पण भव्य वैचारिक पुनरुज्जीवन सुरू झाले होते.
 
 
सतराव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत या पुनरुज्जीवनाच्या केंद्रस्थानी ’मित्रमिश्र’ या विद्वानाने लिहिलेल्या ज्ञानकोशीय ’वीरमित्रोदय’ या ग्रंथाचा राजकीय खंड ’राजनीतिप्रकाश’ दिसतो.
 
 
ओरछाचा शक्तिशाली बुंदेल शासक आणि मुघल तख्तावर आपल्या राजकारणाने प्रचंड छाप पडणारा स्वातंत्र्याची उर्मी बाळगणारा मांडलिक वीर सिंह देव (1605-1627) याच्या मित्राने म्हणजेच मित्रमिश्र याने रचलेला हा ग्रंथ. स्वतंत्र हिंदू संस्कृती आणि राज्यविचार यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे असताना हिंदू राज्याच्या सार्वभौमत्वाची द्वाही फिरवणारा हा ग्रंथ पुढे होऊ घातलेल्या ’श्रीशिवराज्याभिषेकप्रयोग’ या ग्रंथराजाची नांदी ठरवा असाच आहे.
 
 
पूर्ण परकीय अधिपत्याखाली, त्याला विरोधी स्वतंत्र राज्याची निर्मिती केवळ रणांगणावर साध्य होऊ शकत नाही हे वीर सिंह देव आणि मित्रमिश्र जाणून होते. या सार्वभौमत्वाची उभारणी स्वतंत्र राज्याचा विचार मांडून कायद्याच्या किंवा विधीच्या क्षेत्रात करणे आवश्यक होते. ’राजनीतिप्रकाश’ने नेमके हेच केले. पारंपारिक धर्मशास्त्राचा वापर साचलेल्या भूतकालीन व्यवस्थेसाठी न करता, स्वदेशी राजकीय स्वातंत्र्याची संकल्पना उभी करण्यासाठी या विद्वानाने केला. आत्यंतिक क्रूर पारतंत्र्याच्या काळात मित्रमिश्रांनी स्वतंत्र हिंदू राज्याच्या संरचनात्मक, विधीविषयक आणि तात्त्विक पायाचे संहितीकरण केले.
 
 
’राजनीतिप्रकाश’चे क्रांतिकारी स्वरूप समजून घेण्यासाठी, ग्रंथ निर्मिती ज्या वातावरणात झाली तिचे परीक्षण करणे आवश्यक ठरते. वीर सिंह देव हा शूर शासक; पण मुघल साम्राज्याचा मांडलिक होता. दरबारी राजकारणात त्याचे मोठे वजन होते. दरबारी राजकारणाचे पारडे फिरवण्याचा त्याचा वकूब. याची सर्वात मोठी पातळयंत्री कामगिरी म्हणजे शहजादा सलीमच्या (भविष्यातील बादशाह जहांगीर) पुढील राजकारणासाठी त्याने बादशाह अकबराच्या खास ’अबुल फजल’ची थंड डोक्याने हत्या घडवून आणली. संपूर्ण मुघल सत्ता या हत्येने हादरली होती.
 



vivek
वीर सिंह देव 
 
वीर सिंह देवाने मुघल दरबारातील आपल्या प्रभावाच्या जोरावर अफाट संपत्ती आणि राजकीय प्रभाव कमावला होता. याचा उपयोग करून ओरछामध्ये हिंदू संस्कृतीचा स्वतंत्र व अभेद्य दुर्ग निर्माण करणे ही त्याची मनीषा. त्याने भव्य मंदिरे, गगनचुंबी रजपुती-बुंदेली शैलीतील इमारती बांधल्या. राज्यात अनेक हिंदू विद्वानांना आश्रय दिला. ग्वाल्हेरचा प्रकांड पंडित मित्रमिश्र त्याचा मित्र. स्वतंत्र राज्यासाठी स्वतंत्र राज्यग्रंथ निर्माण करण्याची जबाबदारी राजाने आपल्या मित्रावर सोपवली.
 
 
यातून निर्माण झालेला ‘राजनीतिप्रकाश’ हा शरणागताचा ग्रंथ नाही. आग्र्यामध्ये बसलेल्या मुघल बादशाहच्या वास्तवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत हा ग्रंथ निरंकुश, स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदू राज्याच्या व्यवस्थेची मांडणी करतो. स्थानिक हिंदू राजा, मुघलांविरुद्ध उठून आपले स्वतंत्र शासन स्थापन करतो त्याचीच सर्वोच्च ऐहिक सत्ता मानून, हा ग्रंथ पूर्ण स्वातंत्र्याची सैद्धांतिक मांडणी करतो. जिथे हिंदू शासकांना आपल्याच राज्यावर शासन करण्यासाठी मुघल बादशाहकडून परवानगी घ्यावी लागत असे, तिथे स्वतंत्र हिंदू राजा आणि त्याचे हिंदू राज्य हा विचारच क्रांतिकारी ठरतो.
 
 
मुघलांच्याआधीच, चंडेश्वरासारख्या हिंदू विद्वानांनी राजेपदाला दैवी अधिकारापासून विभक्त केले होते. ’सार्वभौमत्व’ प्रजेला सुरक्षित ठेवण्याच्या व्यावहारिक क्षमतेवर आधारित असल्याची मांडणी हिंदू विचारांत झाली होती. पुढे सतराव्या शतकात, मुघलांच्या युद्धयंत्रणेला यशस्वी आव्हान देण्याइतके प्रादेशिक राजपूत आणि बुंदेल राजांकडे लष्करी बळ येताच ते स्वतंत्र शासन स्थापण्यासाठी धडपडू लागले.
 
 
अशाच आपल्या मित्रासाठी मित्रमिश्रानी स्वातंत्र्याकांक्षी राजाला परिपूर्ण तात्त्विक सर्वोच्च स्थान प्रदान केले. स्वातंत्र्यासाठी लढणारा राजा मर्त्य प्रशासक नसून लोकदेवता आहे असे तो म्हणतो. मित्रमिश्र सांगतो,
 
 
अष्टानां लोकपालानां वपुर्धारयते नृपः ।
इन्द्रानिलयमार्काणामग्नेर्वरुणस्य च ॥
चन्द्रवित्तेशयोश्चैव मात्रा निर्हृत्य शाश्वतीः ।
यस्मादेष सुरेन्द्राणां मात्राभ्यो निर्मितो नृपः ॥
 
 
म्हणजेच, राजा जगातील आठ दिशांचा लोकपाल रक्षक देवतांचे रूप धारण करतो. राजाला देवांच्या प्रभूंच्या - इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, चंद्र आणि कुबेर - शाश्वत रूपामधून निर्मित अंश घेऊन निर्माण केले असल्याने, तो दैवी वैभवात सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. (याचाच अर्थ आपला राजा दिल्लीपतीपेक्षाही श्रेष्ठ आहे.)
 
 
मित्रमिश्र म्हणतो की, खरा सार्वभौम राजा वैश्विक रचनेद्वारे निर्माण होतो, इस्लामी बादशाहच्या हुकुमाद्वारे (फरमान) नाही. मुघल शासकाकडे घोडदळ आणि तोफखाना असू शकतो, परंतु ‘राजनीतिप्रकाश’च्या दृष्टीने बादशाहकडे सार्वभौमत्वासाठी आवश्यक असलेल्या ’लोक-पाल’पदाच्या पावित्र्याचा अभाव आहे. खरे स्वातंत्र्य आणि अधिकार केवळ लोकांचा पालनहार, गोप्ता अशा राजाकडेच असते.
 
 
’राजनीतिप्रकाश’चा सर्वात धाडसी आणि विस्तृत भाग म्हणजे हिंदू राज्याभिषेकाचे सखोल संहितीकरण होय. गागाभट्टांनी जे केले त्याही आधी मित्रमिश्राने हे साध्य केले. ज्या राजकीय वातावरणात प्रत्यक्ष स्वातंत्र्य अत्यंत मर्यादित होते, तिथे मित्रमिश्रांनी राज्याभिषेकाच्या लोकाभिमुख विधीला राजकीय वैधतेचा अंतिम आणि अनन्य स्त्रोत म्हणून घोषित केले. हिंदू राजा स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतो या सत्याची ही पहिली द्वाही.
 
 
हा ग्रंथ पवित्र जलांचे संकलन, राज्याभिषेक मंडपाची उभारणी, पठण केले जाणारे विशिष्ट मंत्र, आणि राज्याच्या मंत्र्यांच्या गुंतागुंतीच्या वैधानिक भूमिकांचे अत्यंत बारकाईने वर्णन करतो. राज्याभिषेक म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांडाचा देखावा नसून राज्य-उभारणीची सखोल कृती असल्याचे यात दिसते.
 

vivek 
 
मुघल प्रशासकीय प्रणालीने तोवर हिंदू राजांना त्यांनी दाखविलेली राजकीय निष्ठा, खंडणी (पेशकश) आणि लष्करी सेवा (मनसबदारी) यांच्या आधारावर मान्यता दिली होती. मित्रमिश्रांचा ग्रंथ या चौकटीकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. त्याच्या मते एखादा माणूस पारतंत्र्याचे जू झुगारून राजा होऊ शकतो, आणि त्याचा प्रदेश हिंदू राज्याभिषेकाच्या किमयेतूनही स्वतंत्र राज्य ठरू शकतो; आपल्या स्वतंत्र व्यवस्था अमलात आणू शकतो.
 
 
राज्याभिषेकाच्या विधीने हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. तर ’व्यवहारप्रकाश’मधील दिवाणी आणि फौजदारी कायद्यांचे म्हणजेच धर्मशास्त्राच्या भाषेतील हिंदू व्यवहाराचे संहितीकरण हिंदू व्यवस्थेच्या संरक्षक भिंती म्हणून काम करू लागले.
मुघल काळात, इस्लामी कायदेशास्त्र (फिकह) मुघल साम्राज्याची सर्वसमावेशक कायदेशीर चौकट म्हणून काम करत होते. विशेषतः मुघल राज्याच्या सुरक्षिततेच्या आणि सर्वोच्च शाही प्रशासनाच्या बाबतीत फिकह अंतिम शब्द मानला जात असे. याविरुद्ध आपल्या राज्याचे व्यवहार क्षेत्रातील स्वावलंबन निर्माण करणे हा मित्रमिश्राचा हेतू होता. विरमित्रोदय मधील व्यवहारप्रकाश किंवा व्यवहाराध्याय पूर्णपणे स्वयंपूर्ण कायदे व्यवस्था मांडतो.
 
 
हिंदू नागरी समाजासाठी भक्कम व अभेद्य विधीसंहिता मित्रमिश्र निर्माण करतो. ’राजनीतिप्रकाश’ने इस्लामी न्यायालयांना जनतेच्या दैनंदिन जीवनात अप्रासंगिक बनविले. आता प्रत्येक वाद वीरमित्रोदयच्या मांडणीनुसार कार्यक्षम स्थानिक स्वतंत्र राजाच्या न्यायालयाद्वारे (सभा) सोडवला जाऊ शकत असे. यातून हिंदू नागरी समाज कार्यात्मकदृष्ट्या स्वतंत्र झाला; आणि परकीय कायद्याच्या हस्तक्षेपापासून संरक्षित राहिला.
 
राज्याच्या मूलभूत कर्तव्याचा दाखला देत, मित्रमिश्र राजा आणि त्याचे मुख्य न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र न्यायव्यवस्थेची नितांत आवश्यकता अधोरेखित करतो. तो म्हणतो,
 
व्यवहारान् स्वयं पश्येत्सभ्यः परिवृतोऽन्वहम् ।
अप्रमत्तो निपञ्चेत धर्मेण च धराधिपः ॥
 
म्हणजेच, पृथ्वीच्या स्वामीने (राजाने), आपल्या सल्लागारांसह (न्यायाधीशांसह) वेढलेले असताना, दररोज स्वतः खटल्यांची पाहणी करावी. कोणत्याही विचलनापासून मुक्त राहून, कठोरपणे धर्मानुसार प्रत्येक खटल्याचा निर्णय घ्यावा.
 
मोघली व्यवस्थेकडे न जाता आपल्या प्रजेचे न्यायनिवाडे स्थानिक हिंदू राजा करू शकतो असे सांगतानाच निवाडा करावा कसा याचेही मार्गदर्शन मित्रमिश्र करतो.
 
दंड शक्तीच्या क्षमतेशिवाय कोणतेही राज्य आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकत नाही. ’राजनीतिप्रकाश’मध्ये दंडाच्या (शिक्षा, किंवा राज्याची कार्यकारी सत्ता) भूमिकेची सविस्तर मांडणी केली गेली आहे.
 
अभिजात हिंदू राजकीय सिद्धांतामध्ये, दंड ही भयावह, सक्रिय शक्ती असून समाजाला ’मात्स्य न्याय’ (जिथे बलवान दुर्बळांना खाऊन टाकतात) अवस्थेत जाण्यापासून रोखते अशी मांडणी दिसते. पण परकीय राजवटीखाली, दंडाच्या संकल्पनेला अत्यंत क्रांतिकारी महत्त्व प्राप्त झाले. दंड आता अंतर्गत सार्वभौमत्वाचे प्रतीक ठरला.
 
स्वतंत्र राजाच्या स्वतःच्या प्रदेशात या राजाकडे जीवन आणि मृत्यूचा अंतिम अधिकार आहे, असे मित्रमिश्र सांगतो.
 
‘राजनीतिप्रकाश’ प्राचीन अर्थशास्त्राच्या सप्तांग सिद्धांताला नवे प्रारूप देतो. या सिद्धांतानुसार सार्वभौम राज्य सात अंगांनी बनलेले असते: स्वामिन (सार्वभौम राजा), अमात्य (मंत्री), जनपद (प्रदेश/जनता), दुर्ग, कोश (तिजोरी), दंड (सैन्य), आणि मित्र (मित्रराष्ट्र).
 
स्वतंत्र हिंदू राजाने स्वतः अभेद्य किल्ले (दुर्ग) कसे बांधावेत, स्वतंत्र तिजोरी (कोश) कशी जमा करावी आणि सत्तेचा समतोल राखण्यासाठी धोरणात्मक आघाड्यांचे व तहांचे जाळे कसे निर्माण करावे, यावर विस्तृत मार्गदर्शन मित्रमिश्र करतो.
 
राजनीतिप्रकाशचे सर्वात महत्त्वाचे बौद्धिक योगदान म्हणजे राज्याच्या अंतिम उद्देशाची मित्रमिश्राने केलेली पुनर्व्याख्या होय.
प्राचीन अर्थशास्त्र परंपरेत, राज्याचा उद्देश कायमस्वरूपी विस्तार हा होता. राजा हा विजिगीषू असायचा. त्याचे ध्येय चक्रवर्ती (सार्वभौम सम्राट) बनण्याचे असायचे. 17व्या शतकात, मुघल सत्तेने वेढलेले असताना ओरछाच्या राजाला विश्वविजेता होण्याचा सल्ला देणे हास्यास्पद ठरले असते.
 
त्यामुळे मित्रमिश्र राज्याच्या उद्देशामध्ये सूक्ष्म पण महत्त्वाचा बदल सांगतो. राजाचे सर्वोच्च कर्तव्य आता प्रादेशिक विस्तार राहिलेले नसून, स्वतंत्र होऊन, हिंदू संस्कृतीचे जतन करणे हे आहे. कलियुगातील परचक्राच्या काळातील नैतिक आणि राजकीय अंधकारापासून ’धर्मा’चे संरक्षण करणे हा सार्वभौम राजाचा अंतिम उद्देश असे मित्रमिश्र सांगतो. राजा हा रक्षक आहे, आणि त्याचे राज्य परकीय वर्चस्वाच्या महापुरातून मार्ग काढणारे तारणहार जहाज आहे, असेही मित्रमिश्र सांगतो.
 
प्रजानां रक्षणं धर्मो राज्ञां श्रेष्ठिकरो मतः ।
रक्षणेन विना नैव स्फुरन्ति विविधाः क्रियाः ॥
 
म्हणजेच, प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे सर्वोच्च, सर्वाधिक पुण्यप्रद कर्तव्य मानले जाते. संरक्षणाशिवाय, विविध धार्मिक आणि सामाजिक विधी अजिबात पार पाडले जाऊ शकत नाहीत.
 
हा श्लोक ‘राजनीतिप्रकाश’च्या राजकीय तत्त्वज्ञानाचे सार सांगतो. उत्तरेतील मोगलाई, प्रजेवरील अनन्वित अत्याचार, इस्लामीकरण अशा परिस्थितीत ’हिंदू राज्य हिंदू सभ्यतेसाठी’ अशी मांडणी मित्रमिश्र करतो.
 
विरमित्रोदय किंवा त्यातील ‘राजनीतिप्रकाश’ हा हिंदूंच्या चिवट झुंजीचा उत्कृष्ट नमुना आहे.
 
मित्रमिश्रांकडे व त्यांचा मित्र वीर सिंह देव यांच्याकडे मुघल साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सैन्य नव्हते. तरीही परिपूर्ण, सार्वभौम आणि स्वतंत्र हिंदू राज्याची आकांक्षा ठेऊन हिंदू राज्याची संकल्पना अबाधित राहावी यासाठी दोघे आपापल्या परीने प्रयत्न करत होते.
 
आणि हे प्रयत्न व्यर्थ गेले नाहीत. काही दशकांनंतरच, राजकीय वास्तव बदलले आणि शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याविरुद्ध यशस्वी लष्करी आव्हान उभे केले. त्यावेळी त्यांना हिंदू राज्यकारभाराचा नवीन सिद्धांत शून्यापासून शोधण्याची आवश्यकता नव्हती. तात्त्विक मांडणी, राज्याभिषेकाचे विधी आणि स्वतंत्र राज्याचे शास्त्र मित्रमिश्रांसारख्या विद्वानांनी अत्यंत बारकाईने आधीच मांडून ठेवले होते. हिंदू तलवार राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रहार करण्यास सक्षम होताच स्वतंत्र हिंदू राज्याची बौद्धिक मांडणी आधीच तयार असावी हे ’राजनीतिप्रकाश’ने साध्य केले.

राजस वैशंपायन

राजस वैशंपायन 
राजस वैशंपायन इतिहास, सांस्कृतिक जतन आणि प्राचीन ज्ञानप्रणाली, विशेषतः मराठी आणि संस्कृतमधील ज्ञानप्रणाली या विषयांवर काम करतात. साध्य सा. विवेकमध्ये कार्यरत आहेत..