विशाखा नक्षत्राचा पूजनीय वृक्ष ‘विकङ्कट’ हा केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नसून आरोग्यासाठीही उत्तम संजीवनी आहे. वैदिक परंपरेत अग्निस्वरूपी मानलेल्या या वृक्षाचे सर्व भाग औषधी आहेत. यकृताचे रक्षण आणि शरीरातील वाढत्या साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे गुण या वृक्षात आढळतात. निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपल्या शरीरासाठी वरदानासारखाच आहे.
सत्तावीस नक्षत्रांपैकी सोळावे अत्यंत तेजस्वी, महत्त्वाकांक्षी आणि ध्येयवादी नक्षत्र म्हणजे विशाखा नक्षत्र. विशाखा नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून वैदिक साहित्यात आणि ज्योतिषशास्त्रात ’विकङ्कट’ या अत्यंत दुर्मीळ आणि पवित्र वृक्षाचा उल्लेख आलेला आहे.
विशाखा नक्षत्राची देवता ’इंद्राग्नी’ आहे; म्हणजेच इंद्र (पाऊस आणि वैभवाची देवता) आणि अग्नी (ऊर्जा आणि शुद्धीकरणाची देवता) या दोन अत्यंत शक्तिशाली देवतांचा हा संगम आहे. या नक्षत्राचे प्रतीक एक सुशोभित प्रवेशद्वार किंवा कुंभाराचे चाक आहे; जे निर्मिती आणि यशाकडे जाणारा मार्ग दर्शवते. ज्याप्रमाणे अग्नी सर्व गोष्टींना शुद्ध करतो आणि इंद्र नवीन निर्मितीला बळ देतो; तसाच हा विकङ्कट वृक्ष मानवी शरीरातील विषारी घटक जाळून टाकतो आणि अंतर्गत अवयवांना; विशेषतः यकृताला एक नवीन ऊर्जा आणि शुद्धता प्रदान करतो.
भारतीय वैदिक परंपरेत आणि यज्ञसंस्कृतीत विकङ्कट वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आणि सर्वोच्च पावित्र्य बहाल करण्यात आले आहे. याला संस्कृतमध्ये ’स्रुचावृक्ष’ म्हटले जाते; कारण यज्ञात ‘ध्रुवा’ निर्माण करण्यास हा वृक्ष वापरला जातो. आज्य (तूप) धारण करण्यासाठी; जुहू (स्रुच)मध्ये तूप भरण्यास साहाय्यक म्हणून आणि काही यज्ञकर्मांमध्ये विशिष्ट आहुतींसाठी ध्रुवेचा उपयोग होतो. विशेषतः ’आपस्तंब श्रौतसूत्र’, ’बौधायन श्रौतसूत्र’ आणि ’कात्यायन श्रौतसूत्र’ यांच्या परंपरेशी ही मांडणी सुसंगत आहे.
शतपथ ब्राह्मण आणि इतर वैदिक ग्रंथांनुसार; जेव्हा प्रजापतीने यज्ञाची निर्मिती केली, तेव्हा यज्ञातील अग्नीचे तेज सहन करण्याची क्षमता केवळ विकङ्कट वृक्षालाच प्राप्त झाली. यामुळेच हा वृक्ष अग्नीचे साक्षात स्वरूप मानला जातो. या लाकडातून दिलेली आहुती थेट देवतांपर्यंत पोहोचते आणि ती अत्यंत फलदायी ठरते, अशी वैदिक श्रद्धा आहे. त्यामुळेच विशाखा नक्षत्राचे आणि या वृक्षाचे नाते हे थेट इंद्राग्नीशी जोडलेले आहे.विकङ्कट वनस्पतीशास्त्रातील सालिकेसी (Salicaceae) कुळातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे.
’विकङ्कट’ हा एक मध्यम आकाराचा, अत्यंत काटक आणि काटेरी पानझडी वृक्ष आहे. याचे खोड खडबडीत असते आणि फांद्यांवर अतिशय तीक्ष्ण, लांब काटे असतात. या वृक्षाची पाने साधारणपणे अंडाकृती आणि काठाने दातेरी असतात. वसंत ऋतूत याला लहान, पिवळसर-हिरवी फुले येतात. या वृक्षाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची फळे. विकङ्कटाची फळे गोलाकार, जांभळट-लाल किंवा गडद लाल रंगाची असतात. ही फळे चवीला आंबट-गोड आणि अत्यंत रुचकर असतात, जी ग्रामीण भागात अत्यंत आवडीने खाल्ली जातात.
आयुर्वेदीय दृष्टीकोन
आयुर्वेदात विकङ्कट वृक्षाची फळे, पाने, साल आणि मुळे या सर्वांचा औषधी उपयोग अत्यंत बारकाईने सांगितला आहे. आयुर्वेदातील अनेक निघंटूंमध्ये विकङ्कटाचे गुणधर्म सविस्तर वर्णन केले आहेत.
विकङ्कट फळांचा रस मधुर (गोड) आणि आम्ल (आंबट) असतो. याची साल आणि पाने मात्र कषाय (तुरट) आणि तिक्त (कडू) रसाची असतात. याचे गुण लघू (पचायला हलका) आणि रूक्ष (कोरडा) आहेत. हे वीर्याने शीत (थंड) आहे. आयुर्वेद सांगतो की, विकङ्कट हा प्रामुख्याने पित्त आणि कफ दोषांचे शमन करणारा अत्यंत प्रभावी वृक्ष आहे. विशेषतः शरीरातील वाढलेली उष्णता आणि रक्तातील दोष दूर करण्यासाठी हा वृक्ष उत्तम कार्य करतो.
आरोग्यासाठी सविस्तर उपयोग
1. यकृत आणि प्लीहा : आयुर्वेदात विकङ्कट साल आणि फळे ही यकृताच्या आणि प्लीहेच्या आजारांवर अत्यंत गुणकारी मानली जातात. कावीळ, यकृताला आलेली सूज किंवा प्लीहा वाढणे यावर विकङ्कट सालीचा काढा अमृतासमान कार्य करतो. हा काढा यकृतातील साठलेला विषारी कफ आणि पित्त बाहेर काढून यकृताची कार्यक्षमता वाढवतो.
2. पचनसंस्था आणि गट मायक्रोबायोम : विकङ्कटाची आंबट-गोड फळे पचनशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत उत्तम आहेत. या फळांच्या सेवनाने आतड्यातील पाचक स्राव वाढतात. आधुनिक परिभाषेत सांगायचे तर; या फळांमधील नैसर्गिक फायबर आणि आंबटपणा आतड्यातील गट मायक्रोबायोमला चालना देतो. यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर होतात.
3. रक्तदोष आणि त्वचाविकार : विकङ्कटाची पाने आणि मुळांचा काढा हा उत्तम रक्तशोधक (रक्त शुद्ध करणारा) आहे. अंगावर खाज येणे, नायटा, खरूज किंवा रक्तातील उष्णतेमुळे येणारे फोड यांवर विकङ्कटाच्या पानांचा लेप लावल्यास आणि पोटातून काढा घेतल्यास रक्तदोष वेगाने नष्ट होतात आणि त्वचेला नैसर्गिक कांती प्राप्त होते.
4. स्त्रियांचे विकार आणि अतिरक्तस्रावः मासिक पाळीत अंगावरून खूप जास्त रक्त जाणे किंवा रक्ती मूळव्याध असणे, यावर विकङ्कटाच्या सालीचा तुरट रस अत्यंत प्रभावी ठरतो. हा रस रक्तवाहिन्यांचे आकुंचन करतो (स्तंभक गुण) आणि शरीरातील अतिरिक्त रक्तस्राव त्वरित थांबवतो.
5. सांधेदुखी आणि वातव्याधी ः विकङ्कटाच्या पानांचा लेप सूज कमी करण्यासाठी उत्तम मानला जातो. सांधेदुखीमध्ये किंवा मार लागून सूज आल्यास याची पाने गरम करून सुजेवर बांधली जातात. यामुळे वेदना कमी होऊन सांध्यांची हालचाल सुधारते.
संशोधन काय सांगते?
आधुनिक वैद्यकशास्त्र, फायटोकेमिस्ट्री आणि फार्माकोलॉजीने फ्लाकोर्टिया इंडिका (विकङ्कट)वर अतिशय सखोल संशोधन केले असून आयुर्वेदातील सिद्धांतांना भक्कम वैज्ञानिक पुष्टी दिली आहे.
1. आधुनिक अभ्यासानुसार; विकङ्कटाच्या पानांमध्ये आणि सालीमध्ये फ्लॅकोर्टीन आणि टॅनिनसारखे अत्यंत दुर्मीळ सक्रिय घटक असतात. क्लिनिकल प्रयोगांमध्ये असे सप्रमाण सिद्ध झाले आहे की; रासायनिक औषधांच्या अतिसेवनामुळे (जसे पॅरासिटामोल टॉक्सिसिटी) यकृताच्या पेशींचे जे भयंकर नुकसान होते, ते रोखण्याची आणि पेशींचे पुनरुज्जीवन करण्याची विलक्षण क्षमता या अर्कात आहे. हे रक्तातील बिघडलेले एन्झाइम्स वेगाने सामान्य पातळीवर आणते.
2. विकङ्कटाच्या फळांमध्ये आणि पानांमध्ये फिनोलिक संयुगे आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस प्रचंड वेगाने कमी करतात. पेशींचे म्हातारपण रोखण्यासाठी आणि अंतर्गत सूज कमी करण्यासाठी हा अर्क अत्यंत प्रभावी ठरला आहे.
3. याच्या पानांच्या अर्कात ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळले आहेत, जे पोटातील आणि त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. विशेषतः श्वसनमार्गातील जंतूंचा नाश करण्यासाठी याचा उपयोग आधुनिक संशोधनात सिद्ध झाला आहे.
4. चौथे संशोधन विकङ्कटाच्या मधुमेहविरोधी (अँटी-डायबेटिक) क्षमतेवर सुरू आहे. काही अलीकडच्या अभ्यासांनुसार; विकङ्कटाचा अर्क रक्तातील साखरेचे पचन नियंत्रित करून मधुमेहाच्या व्यवस्थापनात मदत करू शकतो. हा अर्क इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतो, ज्यामुळे पेशींमध्ये ग्लुकोजचे शोषण चांगल्या प्रकारे होते.
विकङ्कट हा अत्यंत खडकाळ आणि कमी पाण्याच्या प्रदेशातही तग धरणारा वृक्ष आहे. निसर्गात हा वृक्ष एका नैसर्गिक कुंपणाचे काम करतो. याच्या तीक्ष्ण काट्यांमुळे हा वृक्ष शेताच्या बांधावर लावल्यास जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होते. उन्हाळ्यात जेव्हा इतर झाडांना फळे नसतात, तेव्हा विकङ्कटाची फळे जंगलातील पक्षी, माकडे आणि इतर प्राण्यांसाठी अन्नाचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत बनतात. हा वृक्ष जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि परिसरातील जमिनीची धूप थांबवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतो.
विशाखा नक्षत्राची देवता इंद्राग्नी ही ऊर्जा, ध्येय आणि शुद्धीकरणाची देवता आहे. विकङ्कट वृक्ष मानवाला हाच महान संदेश देतो की, ज्याप्रमाणे हा वृक्ष स्वतः काटेरी असूनही अत्यंत गोड फळे आणि यज्ञासाठी सर्वात पवित्र लाकूड देतो, त्याचप्रमाणे माणसानेही बाह्य संकटांना धैर्याने सामोरे जात आतून कायम उपयुक्त, पवित्र आणि ध्येयवादी राहावे.
विशाखा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत महत्त्वाकांक्षी, ऊर्जावान, स्वतंत्र विचारांच्या आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेणार्या असतात. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आणि नैसर्गिक आरोग्याची इच्छा असणार्या प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर, बागेत किंवा मोकळ्या जागेत विकङ्कटाचे किमान एक झाड नक्की लावावे. हा वृक्ष केवळ परिसराचे रक्षण करणार नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यकृताच्या आरोग्याचे, अखंड ऊर्जेचे आणि निर्भयतेचे एक अभेद्य कवच प्रदान करेल. निसर्गाच्या या साक्षात अग्नीस्वरूपाची जोपासना करणे; हेच खर्या अर्थाने मानवी जीवनाचे एक मोठे सार्थक आहे.
- लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.