सप्तशक्ती - जागतिक आव्हाने पेलण्यासाठी

विवेक मराठी    21-Aug-2026   
Total Views |
पंतप्रधान मोदींनी ’शक्ती की सप्तधारा’ म्हणजे विकासाच्या ज्या सात दिशांचा उल्लेख केला आहे त्यात, उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आणि नवीनता, पायाभूत सुविधा, संरक्षण सामग्री उत्पादन, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसेच भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेली सौम्य संपदा अर्थात सॉफ्ट पॉवर...या सातही दिशांनी एकाच वेळी व एकत्रितपणे, परस्परांशी मेळ साधत पुढे जाण्याची गरज अधोरेखित केली. या सगळ्यांनी मिळून ’आत्मनिर्भर भारत’ आणि समर्थ-सक्षम भारत तयार होणार आहे. त्यातूनच भारत जगासाठी अपरिहार्य होईल, याची जाणीव भारतीय नागरिकांना करून दिली आहे.

modi
 
गेली 13 वर्षे, देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशासाठी दिशादर्शक भाषणे करत आहेत. यंदाचे भाषण या ऊर्जादायी परंपरेचा पुढचा टप्पा होता. ज्या विकसित भारताचे, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पंतप्रधानांनी भारतीय नागरिकांसमोर ठेवले आहे, ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठीच्या दिशा कोणत्या आहेत याचे सुस्पष्ट दर्शन त्यातून घडते आहे.
 
त्याचबरोबर आणखी एक तितकीच महत्त्वाची पार्श्वभूमी यंदाच्या मांडणीला आहे. ती आहे जागतिक पातळीवरील घडामोडींची...समस्यांची.
 
 
जगभरात व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. विकसित आणि विकसनशील देश दोघांनाही याची झळ बसते आहे. मुक्त व्यापारपेठेचा पुरस्कार करणारी जागतिक महासत्ता अमेरिका, त्यातून निर्माण झालेले धोके ओळखत, टेरिफचे अस्त्र वापरून छोट्या, विकसनशील देशांना आणि त्याच्या अन्य स्पर्धक विकसित देशांना नामोहरम करण्याच्या मागे लागली आहे. त्यातून भारतासमोरही अडचणी उभ्या झाल्या आहेत. सरकार त्याच्या पातळीवर मुकाबला करतेच आहे; पण तेवढेच पुरेसे असणार नाही. महासत्तेने उभ्या केलेल्या आव्हानांनी नामोहरम न होता, आपल्या प्रगतीची वाट निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाला-दिशादर्शनाला हाही महत्त्वाचा संदर्भ होता. ’विकसित भारत 2047’ या उद्दिष्टासाठी जसे हे भाषण दिशादर्शन करते, त्याहूनही अधिक आज उभ्या ठाकलेल्या जागतिक संघर्षात भारताला ठामपणे उभे करण्यासाठी भारतीयांसमोर ठेवलेला तो रोडमॅप आहे. हे लक्षात घेऊन या भाषणाचा अभ्यास केला पाहिजे.
 
 
आणखी 20 वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी असेल. तेव्हा समोर असलेल्या सर्व समस्यांना सक्षमपणे तोंड देत आपल्याला उभे राहायचे आहे. आजची युद्धे बदलली आहेत, युद्धाचे विषय बदलले आहेत आणि ते लढण्याचे मार्गही. चालू असलेल्या व्यापार युद्धाने त्याचे सूचन केले आहे.
 
या सगळ्यासाठी तयार होणे म्हणजे ’विकसित भारत 2047’ या संकल्पनेला मूर्त रूपात आणणे. म्हणूनच हे केवळ सत्ताधार्‍यांसाठीचे उद्दिष्ट नाही तर ते सर्व भारतीयांसाठी ठेवलेले उद्दिष्ट आहे. ते सहजसोपे नाही. त्याच्या पूर्तीसाठी कोणताही शॉर्टकट नाही. ते गाठण्यासाठी प्रयत्नात सातत्य हवे, त्यासाठी विचारपूर्वक नियोजन आणि कालबद्ध कार्यक्रम हवा. स्वतःच्या क्षमता वाढवत, त्या देशाच्या कारणी लावत सर्वांनाच आपापल्या कार्यक्षेत्रात दीर्घ काळ प्रयत्नरत रहावे लागेल, याची खूणगाठ मनाशी पक्की हवी. थोडक्यात, ’विकसित भारत 2047’ हा जगन्नाथाचा रथ आहे. तो ओढण्यासाठी सर्वांचे हात लागायला हवेत, याचेच सूचन पंतप्रधानांच्या मांडणीत आहे.
 
 
’विकसित भारत 2047’ असे म्हटले तर अनेकांना हे फार दूरचे उद्दिष्ट वाटू शकते. मात्र विकसित देशांच्या पंगतीत मानाने जाऊन बसण्यासाठी आपल्याकडे पुढची जेमतेम 20 वर्षे वा दोन दशके आहेत, असा विचार केला तर आपल्या प्रयत्नांना गती येईल. ’विकसित भारत’ म्हणजे केवळ आर्थिक सुबत्ता नव्हे, तर जगासाठी अपरिहार्य होणे. आपले भक्कम स्थान निर्माण करायला आपली बलस्थाने माहीत असायला हवीत आणि आपली मर्मस्थानेही. यावर आधारित वाटचालीची ब्ल्यू प्रिंट असेल तर विकासाचे चक्र अपेक्षित गतीने फिरत राहील. पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात ज्या सप्तधारांविषयी सविस्तर मांडणी केली आहे, त्यात आपण कुठे बसतो याचा विचार, प्रत्येक भारतीयाने करायला हवा. त्यासाठी स्वतःला सिद्ध करायला हवे.
 
 
पंतप्रधान मोदींनी ’शक्ती की सप्तधारा’ म्हणजे विकासाच्या ज्या सात दिशांचा उल्लेख केला आहे त्यात, उत्पादन, कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आणि नवीनता, पायाभूत सुविधा, संरक्षण सामग्री उत्पादन, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसेच भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेली सौम्य संपदा अर्थात सॉफ्ट पॉवर...या सातही दिशांनी एकाच वेळी व एकत्रितपणे, परस्परांशी मेळ साधत पुढे जाण्याची गरज अधोरेखित केली. या सगळ्यांनी मिळून ’आत्मनिर्भर भारत’ आणि समर्थ-सक्षम भारत तयार होणार आहे. त्यातूनच भारत जगासाठी अपरिहार्य होईल, याची जाणीव भारतीय नागरिकांना करून दिली आहे.
 
अर्थात, हे सगळे एक-दोन वर्षात होणार नाही. त्यासाठी दीर्घ काळ आणि सातत्यपूर्ण व नेमके प्रयत्न लागतील. त्याच्या जोडीने लागेल ते, धोरणसातत्य व राजकीय स्थैर्य. त्यातूनच आपले सामूहिक उद्दिष्ट साकार होईल आणि जागतिक समस्यांशी समर्थपणे मुकाबला करण्यास सिद्ध होऊ.
 
 
’बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनि राहो’ असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटते. अगदी मनापासून वाटते. मात्र ती स्थिती आपसूक येत नसते. त्यासाठी,’शिवाजी जन्मावा, पण दुसर्‍याच्या घरात’ ही पूर्वापार रुजलेली मानसिकता त्यागावी लागेल आणि, ’या उठा करू हो शर्थ’ हा मंत्र सतत जपावा लागेल. तो कृतीत उतरवावा लागेल.