अखंडित सावधपण जपावे

विवेक मराठी    27-Aug-2026   
Total Views |
 

vivek 
‘जिवा’ या दागिन्यांच्या  ब्रँडच्या बाजूने बोलणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासहित अनेक तथाकथित पुरोगामी हिंदू असतानाही, त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमांमधून हिंदूंनी एकत्रितपणे आणि एकेकट्यानेही आवाज उठवला. परिणामी, या ब्रँडने माफी मागत ही जाहिरात मागे घेतली. 
हिंदू समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. वर्षभरात येणारे सण वा अन्य धार्मिक परंपरा पाळण्याच्या निमित्ताने कुटुंब वा समूह एकत्र येण्यातून मिळणारा आनंद ऊर्जादायी तर असतोच पण माणसामाणसांमधले बंध तो अधिक दृढ करतो. म्हणूनच हिंदूंसाठी या सर्व सणपरंपरांचे मोल अनन्यसाधारण आहे. समाजातील प्रत्येक कुटुंब पारंपरिक सण-उत्सव आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे साजरे करत असल्याने, त्याचा परिणाम देशाच्या अर्थजगतावरही होत असतो. या सणांच्या अवतीभवती बाजारातही नवचैतन्य उसळते ते यामुळेच.
 
 
हिंदू सण व परंपरा कन्झ्युमर मार्केटचे म्हणजे ग्राहक बाजारपेठेचा मुख्य कणा आहेत. गेल्या दीड दशकात इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या प्रतिदिनी वाढत असलेल्या प्रभावामुळे बाजारपेठेच्या या उलाढालीत अतिप्रचंड वाढ झालेली दिसते आहे. थेट खरेदी तसेच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट्ससारख्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरबसल्या होत असलेल्या खरेदीमुळे आर्थिक उलाढालीचे आकडे हजारो कोटींच्या घरात गेले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र-दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या प्रमुख सणांना तर हे दोन्ही प्रकारचे बाजार ओसंडून वाहत असतातच पण श्रावणापासून सुरू होणार्‍या अनेक लहानमोठ्या सणांना देखील नवीन खरेदी करण्याकडे आजच्या हिंदू ग्राहकांचा कल वाढला आहे. ही मानसिकता लक्षात घेऊनच विविध उत्पादने आपापल्या उत्पादनांच्या अतिशय आकर्षक, मनावर परिणाम करणार्‍या जाहिराती करत असतात. आणि त्यांचा भडिमार केवळ छापील प्रसारमाध्यमांतून नव्हे तर विविध दूरचित्रवाहिन्या, लोकप्रिय असलेली समाजमाध्यमे यावरून अहोरात्र होत असतो.
 
 
आपण या सणांच्या कालावधीत आणखी एक गोष्ट अनुभवतो आहोत. ती म्हणजे, हिंदू ग्राहक मिळवतानाच अनेक प्रतिष्ठित ब्रँड्सनी अगदी बिनदिक्कतपणे हिंदू परंपरा आणि मूल्यांची जाणीवपूर्वक केलेली कुचेष्टा वा त्यांना पूर्णपणे बेदखल करण्याचे दाखवलेले औद्धत्य. आपल्या उत्पादनाने भुरळ घातली तर असल्या ‘क्षुल्लक’ गोष्टींकडे हिंदू ग्राहक दुर्लक्ष करेल असा या ब्रँड्सना फाजील विश्वास आहे. म्हणूनच उत्पादनांच्या जाहिरातींवर करोडो रूपये खर्च करत हिंदू परंपरा आणि मूल्ये पायदळी तुडवण्याचे साहस ते करत आहेत.
 
 
या जाहिराती ‘स्लो पॉयझन’चे काम करतात. त्यांचे छोटेसे पण आकर्षक कथाबीज असलेले उत्कृष्ट चित्रिकरण, उत्पादनाचे सादरीकरण याचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की त्यातून हिंदू म्हणून काही महत्त्वाची प्रतीके वगळली आहेत, हे सर्वसामान्यांच्या पटकन लक्षात येत नाही हे या ब्रँड्सना पक्के ठाऊक आहेे. म्हणूनच 2020 पासून त्यांचे धारिष्ट्य अधिक वाढले. 2020मध्ये तनिष्क या दागिन्यांच्या ब्रँडने त्यांच्या एका जाहिरातीत हिंदू सून आणि मुस्लीम सासू दाखवत सुनेच्या ‘गोदभराई’चा प्रसंग चित्रित केला. हा प्रसंग म्हणजे लव जिहाद या तथ्याला उघडपणे दिलेला छेद होता. या विरोधात काम करणार्‍या हिंदू संघटनांनी त्यावेळी आवाज उठवला. पण त्या प्रमाणात हिंदू ग्राहकांचे विरोधाचे बळ एकवटले नाही. नंतर 2021 मध्ये फॅब इंडियाने, ‘जश्न ए दिवाली’ म्हणत उर्दू शब्दांचा भडिमार असलेली जाहिरात केली. या विरोधातही टीकेचा धुरळा उडाला तरी, फॅबची बाजू घेऊन भांडणारेही स्वत:ला पुरोगामी समजणारे हिंदूूच होते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण त्याने काळ कसा सोकावला हे अशा जाहिरातींनी आणि त्याला समर्थन देणार्‍या पुरोगामी डाव्या हिंदूंनी दाखवून दिले. मग सर्फ एक्सेलची होळीची जाहिरात आली. त्यात मुस्लीम मुलाला रंगांपासून वाचवणारी त्याची हिंदू मैत्रीण दाखवण्यात आली. सब्यसाचीने केलेली मंगळसूत्राची अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह जाहिरात याच काळातली.
 
 
हळूहळू हिंदूंच्या सणांच्या जाहिरातीतून हिंदूंची ठळक प्रतीके गायब होऊ लागली. जाहिरातीतल्या पात्रांच्या कपाळीचा टिळा वा कुंकू गायब झाले. या खोडसाळपणाचे कलेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून समर्थन करणारेही होतेच. मात्र, त्यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुएसर असलेल्या शेफाली वैद्य यांनी ठाम भूमिका घेतली. ‘जे ब्रँड्स हिंदू सणांच्या दरम्यान जाहिराती करताना जाणीवपूर्वक हिंदू प्रतीके वगळतील त्यांच्याकडून मी वस्तू खरेदी करणार नाही...मग ते ब्रँड्स हिंदूंचे असले तरीही’ असे त्यांनी जाहीर केले. ही प्रतिज्ञा त्यांनी स्वत:पुरती केली असली तरी ती जाहीरपणे केल्याने त्यातून सर्वसामान्यांमध्ये धाडस निर्माण झाले. परिणामी, व्यक्तिगत प्रतिज्ञेला जनचळवळीचे स्वरूप आले आणि मोठमोठ्या ब्रँड्सना नमते घ्यावे लागले. तात्पर्य, समाजातल्या ‘जागल्यां’नी, ज्यांना इंग्रजीत ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणतात त्यांनी जेव्हा ठाम भूमिका घेत समाजमाध्यमांमधून खोडसाळपणावर वाचा टीका केली, तगड्या ब्रँड्सच्या कुटील हेतूविरोधात जेव्हा ते दंड थोपटून उभे राहिले तेव्हा सर्वसामान्य हिंदू ग्राहकाला त्याचे गांभीर्य जाणवले. त्यातून हळूहळू मतपरिवर्तन घडत, अशा ब्रँड्सच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचे बळ मिळत गेले.
 
 
हे बळ अजून अपेक्षेइतके वाढले नसले तरी ते वाढते आहे, असे ‘जिवा’ या दागिन्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीवरून नुकत्याच झालेल्या वादावरून लक्षात येईल. यातल्या क्रिती सेनान हिची अत्यंत आक्षेपार्ह वेशभूषा, भावाला राखी बांधण्याआधी तिचे घरातल्या पाळलेल्या कुत्र्याला राखी बांधणे हे सगळेच कोणत्याही संवेदनशील हिंदूला चीड आणणारे होते. या ब्रँडच्या बाजूने बोलणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासहित अनेक तथाकथित पुरोगामी हिंदू असतानाही, त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमांमधून हिंदूंनी एकत्रितपणे आणि एकेकट्यानेही आवाज उठवला. परिणामी, या ब्रँडने माफी मागत ही जाहिरात मागे घेतली. पण माफीपत्रातही मखलाशी अशी केली की, फक्त कुत्र्याला राखी बांधल्याने काहींच्या भावना दुखावल्या गेल्याने जाहिरात मागे घेतल्याचे सांगितले. हिंदूंच्या भावना दुखावण्याचे ते एक कारण असले तरी त्याहून महत्त्वाचे कारण क्रितीचा अतिशय आक्षेपार्ह पोशाख हे होते. त्याचा मात्र माफीनाम्यात उल्लेखही नाही. (क्रिती सेनान या ब्रँडची स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, हे नोंदवण्याजोगे!) त्यामुळे ही लढाई अर्धीच जिंकली असे दिसत असले तरी तिचे महत्त्व कमी होत नाही. कारण यावेळी कोणीही एकाने पुढाकार घेतल्याने हिंदूंनी हिंमत एकवटली असे झाले नाही. निषेधाचा सूर अनेक दिशांनी एकाच वेळी आला म्हणून हे घडले.
 
असे सामूहिक ‘अखंडित सावधपण’ या पुढील काळात सदैव ठेवावे लागणार आहे