
's Chatron Ki Goonj event
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या नावाखाली घाईघाईत तळलेले ‘छात्रों की गुंज’ हे कडबोळे राहुल गांधी यांच्या उथळपणामुळे पूर्णपणे फसले आहे. मात्र एक नक्की आहे की, ‘पप्पू’ प्रतिमेमागे एक देशघातकी चेहरा असल्याचे उघड होते. तसेच परदेशी दौर्यांदरम्यान हटकून भारतविरोधी शक्तींनाच भेटण्याची त्यांची पद्धत पाहता त्यांचा एकूण रोख स्पष्ट होतो. वरवर पाहता एका सुमार नेत्याच्या या मर्कटचेष्टा वाटल्या तरी यामागे एक षडयंत्र आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे प्रतिमावर्धन करण्याचा आणखी एक सोपस्कार नुकताच पुण्यात पार पडला. त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणातील पराभवांनी शतक गाठल्याचे सर्वपरिचित आहे. मात्र त्यांचे प्रतिमावर्धन करण्याचे किती प्रयत्न झाले याची गणतीच नाही. निवडणूक प्रचारादरम्यान विश्वेश्वरैया यांच्या नावाचा उल्लेख करताना ते अडखळले हा खरे तर टिंगलीचा मुद्दा नव्हता. विश्वेश्वरैया कोण हेच माहीत नसणे ही त्यांची खरी अडचण होती. ‘भारत माहीत नसणे’ या त्यांच्या खर्या अडचणीवर त्यांना आजही मात करता आलेली नाही. त्यामुळे कधी ‘दत्तात्रय गोत्री जानवेधारी’ अशी त्यांची ओळख करून दिली गेली; तर कधी ते लिंगायत संप्रदायाची दीक्षा घेताना दिसले. अशा शब्दश: मर्कटउड्यांमुळे ते कशाबद्दलच गंभीर नसल्याचे दिसते. वारंवार होणार्या सार्वजनिक फजितीमुळे कशातलेच काही माहीत नसलेला भारतीय राजकारणातला ‘पप्पू’ अशी त्यांची प्रतिमा बनण्यास ते स्वत:च जबाबदार होते. मात्र काँग्रेसकडून हिंदू दहशतवादाचे भूत उभे केले गेल्यानंतर ‘लष्करे तैयबापेक्षा हिंदू दहशतवाद हा आमच्यासमोरील मोठा धोका आहे’ असे त्यांनी अमेरिकी राजदूताला सांगितल्याचे समोर आल्यानंतर त्या ‘पप्पू’ प्रतिमेमागे एक देशघातकी चेहरा असल्याचे उघड झाले. त्यानंतर परदेशी दौर्यांदरम्यान हटकून भारतविरोधी शक्तींनाच भेटण्याची त्यांची पद्धत पाहता त्यांचा एकूण रोख स्पष्ट झाला.
ज्या भारतीय राजकारण्यांकडून कोणत्याही वैचारिक हाताळणीची अपेक्षा ठेवता येत नाही, अशांमध्ये राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी संवादाद्वारे महिलांच्या प्रश्नाचा आढावा घेण्याचे जे सोंग घेतले, ते त्यांना झेपणे शक्य नव्हते. आणि तसेच घडले.
कार्यक्रमाचे स्वरूप: ‘संवाद’ की ‘नौटंकी’?
राहुल गांधी यांनी पुण्यातील ‘छात्रों की गुंंज’ या कार्यक्रमातून ‘पिंजरा तोडा (Break the Cage) आणि ‘पितृसत्ताक व्यवस्था तोडा (Smash Patriarchy)’ असे आवाहन करत महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा आव आणला.
अमेरिकेमध्ये स्त्रीवादाची (फेमिनिझम) टोकाच्या व्यक्तिकेंद्रित पायावर मांडणी झाली. महिलांवर पुरूषांकडून विविध मार्गांनी आणि विविध स्तरांवर होणारा अन्याय दूर करण्याच्या नादात महिला आणि पुरूष यांची प्रत्येक बाबतीत बरोबरी करण्याच्या अट्टाहासामुळे तिकडे कुटुंबसंस्थेचे महत्त्व संपले. महिलांचे भले करणे या उदात्त हेतूऐवजी त्या ‘स्वतंत्र’ झाल्या तर आपल्या उत्पादनांचा खप वाढवता येईल, असे तद्दन व्यावसायिक म्हणजे बाजारू कारण त्यामागे होते. तेच वारे अमेरिकेतून युरोप आणि अन्य जगभरात फिरले. आपल्याकडेदेखील परंपरागतपणे महिलांवर अन्याय होत गेला, हे कोणी नाकारू शकत नाही. वास्तविक हा अन्याय दूर करण्यासाठीचा उपाय म्हणून स्त्री आणि पुरूष यांच्यात कोणालाही कमीपणा न देता एकमेकांना पूरक ठरण्यावर भर दिला जायला हवा होता. निव्वळ व्यावसायिक कारणांमुळे पुढे रेटल्या गेलेल्या या चळवळीला नैतिक मुलामा देण्याचे प्रयत्न झाल्यामुळे आणि त्यात तारतम्याचा भाव नसल्यामुळे पश्चिमेतला स्त्रीवाद भरकटत गेल्याचे तेथील समाजशास्त्रज्ञ आता मान्य करतात. राहुल गांधींमध्ये भारतीयत्वाचा संपूर्ण अभाव तर आहेच; मात्र पाश्चिमात्य स्त्रीवादाचे अंधानुकरण करण्याच्या नादात ‘स्मॅश पॅट्रियार्की’ यासारखी डायलॉगबाजी आता निरर्थक ठरते हे समजण्याची कुवत त्यांच्यामध्ये नाही.
स्त्रीवादी चळवळीचा उद्देश हरवल्याची जाणीव खरे तर तिकडे नव्वदीच्या दशकामध्ये निर्माण झाली. आणि तरीही जवळजवळ तीस-पस्तीस वर्षांनी तशीच तद्दन पोकळ मांडणी येथे करण्यामागील त्यांचा दुष्ट हेतू उघड झाल्याखेरीज राहत नाही.
संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रतिकूल आर्थिक-सामाजिक स्तरांमधून आलेल्या भारतीय महिला आज विविध क्षेत्रांमध्ये करत असलेल्या देदीप्यमान कामगिरीचा एकदाही उल्लेख केला नाही. कारण तसे केले असते तर त्यांना मनुस्मृती वगैरेवरून दुष्प्रचार करता आला नसता. महिलांबाबतचा भेदभाव हा न संपणारा विषय असला तरी संपूर्ण कुटुंबाचा विचार करताना आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा ‘त्याग’ हा पुरूष आणि स्त्रिया या दोघांच्याही बाबतीत भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, हे सांगण्यास राहुल गांधी यांच्यासारख्या अभारतीय वृत्तीच्या व्यक्तीची जीभ रेटू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आई-बहिण-पत्नी असे काहीही असला तरी तुम्ही मुळात एक स्वतंत्र व्यक्ती आहात हे विसरू नका अशी मोघम आणि उथळ बडबड करण्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. तोकडे कपडे परिधान करून भावाला राखी बांधतानाची जाहिरात हा लेख लिहित असतानाच पाहण्यात आली. या जाहिरातीमधील अभिनेत्री ईदच्या शुभेच्छा मात्र अंगभर पोषाखात देते. कोणते कपडे घालावेत हे ठरवण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, हीच टेप नेहमी वाजवणार्या अनेकांना या निर्लज्ज जाहिरातीमुळे धक्का बसला. मात्र भारतीय संस्कृतीशी फटकून वागणार्यालाच नव्हे, तर विकृतीकडे नेणार्या या जाहिरातीचे राहुल गांधी यांनी मात्र ‘पेहरावाचे स्वातंत्र्य’ या नावाखाली समर्थन केले. त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान त्यांनी मुस्लीम महिलांच्या बुरखा-अबाया परिधानाचेदेखील नेमके याच पद्धतीने समर्थन केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी एकूणच तारतम्य गमावलेले आहे आणि हिंदूविरोधी भूमिका घेण्यात ते उघडउघड निवडकपणा करू शकतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पुन्हा मनुस्मृती
भारतामध्ये आज मनुस्मृती कोणीही वाचलेली नसते. आज आक्षेपार्ह वाटेल अशी; आणि त्याचबरोबर त्यापेक्षा कितीतरी अधिक आजही उदात्त ठरेल अशी मांडणी त्यात आहे. मानवी समाजनियम कसे बदलत गेले, याचा आढावा मनुस्मृतीसारख्या विविध प्राचीन दस्तऐवजांमधून घेता येतो. त्यातील आज निश्चितपणे आक्षेपार्ह असलेल्या मजकुराचे कोणीही समर्थन करत नाही. आज कोणी मुलींबाबत भेदभाव करत असेल तर त्यास हजारो वर्षे पूर्वी लिहिली गेलेली मनुस्मृती किंवा वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या स्मृती जबाबदार नव्हेत, हे लक्षात घ्यायला हवे. कारण युरोप असो की अमेरिका, पारंपरिकपणे महिलांवर अन्याय करणारी तिकडची पद्धत मनुस्मृतीमुळे प्रचलित होती असे म्हणता येईल का? यातले काहीही समजण्याची क्षमता नसलेले अभारतीय विचारसरणी असलेले राहुल गांधी त्यावरून दुष्प्रचार करू पाहतात, यात खरे तर आश्चर्य नाही. मनुस्मृतीमधील महिलांबाबतच्या केवळ भेदभावाचा उल्लेख करताना, त्याच मनुस्मृतीमध्ये असलेल्या महिलांबाबतच्या उदात्त वचनांचा साधा उल्लेखही राहुल गांधी यांनी केला नाही. यावरून त्यांची हिडिस वृत्ती स्पष्ट होते.
भारतीयत्व आणि हिंदू धर्म यांच्याबाबत व्यभिचारी वक्तव्ये किंवा कृती करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हे. ‘भारत जोडो’ म्हणत प्रत्यक्षात त्यांनी ‘भारत तोडो’ अभियान कसे चालवले होते याची झलक त्या संपूर्ण यात्रेदरम्यान दिसली होती. यात्रेच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये एक ख्रिस्ती धर्मोपदेशक राहुल गांधी यांना ख्रिस्ताचे माहात्म्य सांगताना अकारण हिंदू देवतांची नालस्ती करू लागला होता. राहुल गांधी यांनी त्याला एकाही शब्दाने त्याबाबत हटकले नव्हते. लोकसभेमध्ये महादेव अणि अन्य धार्मिक प्रतिमा फडकवत झालेला त्यांच्या उठवळपणाचा तमाशा संपूर्ण देशाने पाहिला होता. मनुस्मृतीचा संबंध आजच्या भारतीय जनता पक्षाशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांशी जोडण्याचे धारिष्ट्य त्यांच्या या दुष्प्रचारी प्रवृत्तीमधून येते. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते असूनही उघडपणे असा बेजबाबदारपणा आणि सवंगपणा करण्यामागील त्यांचा हेतू सहज लक्षात येऊ शकतो. एकीकडे असे म्हणायचे की आपण येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही आणि दुसरीकडे अशी हिंदूविरोधी वक्तव्ये करायची ही त्यांची पद्धत फारच डोळ्यावर येणारी होती. एकीकडे मनुस्मृतीवरून दुष्प्रचार करायचा आणि दुसरीकडे त्यांना भेटायला आलेल्या मुस्लीम महिलांनी परिधान केलेल्या अबायाकडे साफ दुर्लक्ष करत इस्लाममध्ये महिलांबाबत होणार्या हलाला, खतना, ट्रिपल तलाक किंवा बहुपत्नीत्व अशा अमानवी पद्धतींचा साधा उल्लेखदेखील करायचा नाही, चर्चकडून होणार्या महिलांच्या आणि पुरूषांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर विषयाला हात घालायचा नाही, असा त्यांचा दुटप्पीपणा त्यामागचा हेतू अपवित्र असल्याशिवाय घडू शकेल का?
निवडक श्रोतृवर्ग आणि शिक्षण माफियांचे
अशैक्षणिक समाजघातकी उद्योग
म्हटले तसे राहुल गांधी यांच्याकडून काही वैचारिक मांडणीची अपेक्षाच नसल्यामुळे अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या दुष्प्रचारी वक्तव्यांची हुर्यो केली जाऊ नये याकरता निवडक श्रोतुवृंद जमवणे भाग पडते. ती व्यवस्था काँग्रेसी शिक्षणसम्राटांच्या पुण्यातील आणि आसपासच्या संस्थांमधील मुली जमवून करण्यात आली. या विद्यार्थिनींच्या घेतलेल्या अनेक व्हिडिओंमधून हे वास्तव उघड झाले.
एकवेळ असा ‘सुरक्षित’ श्रोतुवृंद जमवायलाही हरकत नाही असे म्हणता येईल. कारण आजच्या युगात कार्यक्रम समाजमाध्यमांद्वारेदेखील तारला जातो. मात्र तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे कोणते ‘विचारवैभव’ मांडता हे महत्त्वाचे ठरते. मुळात गांधी कुटुंबाचेच महिलांबाबतचे वर्तन कसे आहे हे या संदर्भात तपासून पाहणे गरजेचे आहे. अशी असंख्य उदाहरणे मिळतील. उत्तर प्रदेशमधील अदिती सिंग आणि तिचे पंजाबमधील आमदार पती अंगद सिंग सैनी हे दोघेही काँग्रेसचे. मात्र अदिती सिंग यांनी 2021मध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाब निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी हवी असल्यास अदिती सिंग यांच्याबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबाबत समाजमाध्यमांमध्ये वावगे लिहिण्याची अट खुद्द प्रियंका गांधी यांनी सैनी यांना घातली होती. एका महिलेबाबत आपण तसे करणार नाही असे ठामपणे सांगितल्यामुळे आपल्याला काँग्रेसकडून उमेदवारी नाकारली गेली असे सैनी यांनी त्यावेळी सांगितले होते. गांधी घराण्याचीच महिलांबाबतची भावना अशी असल्यामुळे राहुल गांधी यांनी महिलांबाबत काहीही म्हटले तरी ते गंभीरपणे घ्यावे असे अजिबात नाही. त्यांनी व्यासपीठावर बोलावलेल्या मुलींपैकी एकीने तिला पुरूषांकडून आलेल्या विपरित अनुभवांबाबत सांगितले. खुद्द काँग्रेसच महिलांबाबत कशी खुनशीपणाने वागते हे या उदाहरणावरून पाहता येईल.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर 1982मध्ये आपली सून मनेका गांधी यांना दोन वर्षाच्या तापाने फणफणलेल्या नातवासह चालती हो! या शब्दात घराबाहेर काढले होते. शाहबानो प्रकरणी काँग्रेसने कट्टर मुस्लिमांच्या दबावामुळे मुस्लीम महिलांना त्यांचा नैसर्गिक हक्क नाकारण्याचा निर्लज्जपणा केला होता. राहुल गांधी यांनी महिलांच्या आवाजाबाबत कळवळा आणणे हे केवळ पोकळ बुडबुडे ठरतात असे नाही; तर ती महिलांची क्रूर चेष्टा ठरते हे दाखवण्यासाठी एवढे मागे जाण्याची गरज नाही.कर्नाटकमध्ये शाळकरी मुलींना गणवेशाचा भाग म्हणून बुरखा वापरण्याची परवानगी मागण्यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा होता. देशपातळीवर आज काँग्रेस उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या जंगलराज पक्षांबरोबर आहे, त्यांच्या लेखी एकूणच महिलांची असलेली किंमत जगजाहीर आहे. शिक्षक आणि महिला हे समाजाच्या सज्जनशक्तीमागचे प्रमुख घटक समजले जातात. त्यामुळे ‘मुलांनी शिव्या दिल्या तर त्या चालतात; मात्र मुलींनी शिव्या दिल्या तर पंतप्रधान मोदींना तो ‘कल्चरल शॉक’ वाटतो’, हे राहुल गांधी यांचे विधान अतिशय धक्कादायक आहे आणि त्यांची समाजविघातक वृत्ती कोठवर जाऊ शकते याचे निदर्शक आहे. सकारात्मकता गमावलेला देशाचा विरोधी पक्षनेता हे विष समाजात कालवत आहे. उद्या शिक्षकांनीही शिव्या देण्यास सुरूवात केली तर त्याला सांस्कृतिक धक्का समजण्याचे काय कारण आहे असे विचारण्यास राहुल गांधीरुपी ही विषवल्ली कमी करणार नाही.
शिक्षणसम्राट संस्थाचालक आपले राजकीय लागेबांधे जपण्यासाठी आपल्या संस्थांमधील विद्यार्थ्यांना अशा तद्दन हिंदूविरोधी आणि समाजघातकी कार्यक्रमांना जाण्याची सक्ती करतात हे धोकादायक आहे याची जाणीव त्यांच्या पालकांमध्ये निर्माण व्हायला हवी. जेएनयू आणि जादवपूर विद्यापीठ ही अभारतीय आणि भारतविरोधी शक्तींची केंद्रे बनत गेल्याचे सर्वसाधारणपणे माहीत असते. परंतु शिक्षणाचा निव्वळ धंदा करून ठेवलेल्या मंडळींनी आता आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या राजकीय दावणीला बांधत त्यांना समाजघातकी वक्तव्यांच्या आहारी जाण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली आहे. यातला धोकादेखील ओळखायला हवा.
खरे दुखणे वेगळेच
आजवर दिल्ली, पंजाब आणि अगदी माफक प्रमाणात गुजरातमध्ये यश मिळवलेल्या आम आदमी पक्षाने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्यावरून उभ्या केलेल्या आंदोलनात काँग्रेसवर मात केल्याचे चित्र आहे. त्या आंदोलनात झुरळ पक्षाचा अभिजीत दिपके हा अराजकीय चेहरा आपने पुढे केला तरी ते आंदोलन त्यांचेच असल्याचे वास्तव लवकरच स्पष्ट झाले. त्या निमित्ताने देशातील विविध शहरांमध्ये केलेल्या आंदोलनांद्वारे आपचा त्या-त्या राज्यांमध्ये चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न होता. या सार्यामुळे जंतर मंतर आंदोलनाच्यावेळी काँग्रेसला आंदोलनाची वेगळी चूल मांडावी लागली होती आणि तो प्रयत्न पूर्णपणे निष्प्रभ ठरला होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या नावाखाली घाईघाईत तळलेले ‘छात्रों की गुंज’ हे कडबोळे राहुल गांधी यांच्या उथळपणामुळे पूर्णपणे फसले आहे. त्यातच आता पुढच्या वर्षी होणार्या पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आणि आप या दोन पक्षांमध्येच लढत होणार असल्यामुळे काँग्रेस आणि आपचे नेते सातत्याने पंतप्रधानांना लक्ष्य करत असले, तरी प्रत्यक्षात ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुमारावर भिस्त ठेवावी लागण्यामागची
काँग्रेसची हतबलता
मुळात नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या निमित्ताने केवळ परीक्षापद्धतीतील नव्हे; तर एकूणच शिक्षणव्यवस्थेतील दोषांचे निवारण करण्याबाबत देशव्यापी चर्चा घडवून आणण्याची संधी विरोधी पक्ष म्हणून आप आणि काँग्रेस या दोघांकडेही होती. मात्र दिपकेसारखे कर्तृत्वाच्या दृष्टीने शब्दश: झुरळ उठताबसता पंतप्रधानांना लक्ष्य करत राहिल्यामुळे त्याचा सुमारपणा आणि पोकळपणा उघड झाला. राहुल गांधीदेखील त्यास अपवाद नाहीत. आडातच काही नाही; तर पोहर्यात काय येणार, अशी त्यांची स्थिती ते पुन्हा पुन्हा सिद्ध करत असतात. देशाच्या आजवरच्या संसदीय इतिहासात थोडीही वैचारिक खोली नसलेली त्यांच्यासारखी सुमार व्यक्ती लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसली नसेल. त्यामुळे कार्यक्रमाचे नाव ‘छात्रों की गुंज’ असताना त्यात विद्यार्थी म्हणून मुलींना सामना करावा लागणार्या समस्यांचा ऊहापोह होऊ शकला नाही. उलट विद्यार्थ्यांचा वापर करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी स्वत:ची पप्पू प्रतिमा बदलण्याचे उद्योग करावे लागणे ही खरे तर राहुल गांधींसाठी नामुष्कीची बाब आहे. त्यांची प्रतिमा आता युवकांमध्ये स्वीकारार्ह झाली आहे, असे सांगणारे लेख काँग्रेस आपल्या भाटांकडून लिहून घेत आहे. केवळ घराणेशहा असल्यामुळेच काँग्रेसींना त्यांच्या प्रतिमावृद्धीसाठी इतक्या वेळा प्रयत्न करणे भाग पडते. त्यासाठी कुटुंब आणि समाजव्यवस्था मोडण्याचे विघातक कृत्य करावे लागले तरी बेहत्तर, अशी काँग्रेस अगतिक झाली आहे. कन्हैया कुमार, आताचा अभिजीत दिपके की हे सदा ’लाँचिंग’ करावे लागणारे राहुल गांधी असोत, त्यांना थेट पंतप्रधानांशी भिडवण्यामुळे आपोआपच त्यांना त्यांच्या पातळीचे महत्त्व प्राप्त होईल अशी त्यांना पुढे करणार्यांची केविलवाणी समजूत असते. अतिशय विपरित परिस्थितीशी झुंजत पुढे आलेल्या मोदींना डॉ. मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे पंतप्रधानपदाची लॉटरी लागलेली नाही; तर त्यामागे त्यांची आयुष्यभराची मेहनत आणि त्यांचे देशाप्रतीचे समर्पण ही कारणे आहेत, हे या सुमारांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींशी बरोबरी करणे सोडाच; राहुल गांधी हे कर्तृत्वाच्या दृष्टीने आणि वैचारिकदृष्ट्या त्यांच्यापेक्षा केवळ पाचच वर्षांनी मोठे असलेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या किंवा त्यांच्याच वयाचे असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पासंगालाही पुरू शकत नाहीत. आणि ही तर केवळ काही उदाहरणे आहेत. राहुल गांधी यांच्याच वयाचे असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचे कर्तृत्व त्यांनी काँग्रेस सोडल्यावरच बहरू शकले. अशा गुणवान नेत्यांच्या कर्तृत्वाला वाव न देता त्यांच्याच वयाच्या राहुल गांधी यांचे सुमार नेतृत्व देशपातळीवर लादू पाहणार्या काँग्रेसमध्ये भिनलेल्या गांधी कुटुंबाच्या गुलामीबद्दल काय बोलावे! भारतीय जनता पक्षाकडे अशा कर्तृत्ववान नेत्यांची खाण आहे आणि गांधी घराण्याखेरीज कोणालाही मोठे होऊ न देण्याचा खाक्या असलेल्या काँग्रेसमध्ये अशा नेत्यांची वानवा आहे आणि कोणी गुणवान असलेच तर त्याला संधी दिली जात नाही, हा योगायोग खचितच नाही. भाजपाच्या अशा कोणाही प्रगल्भ नेत्याला आपण तरूण आहोत असे बोलून दाखवावे लागत नाही आणि राहुल गांधी यांच्याकडे दाखवण्यासारखे कसलेही कर्तृत्व नसल्यामुळे या वयातही त्यांना तरूण नेता म्हणून पुन्हा पुन्हा ‘लाँच’ करत राहण्याखेरीज काँग्रेसकडे अन्य पर्याय नाही अशी केविलवाणी स्थिती आहे.