
मुस्लीम लांगूलचालनात दंग असलेल्या काँग्रेसला बदलाचे वारे लक्षात येत नसावेत किंवा त्याचे गांभीर्य कळत नसावे. म्हणूनच मुस्लीम लीगपेक्षाही जास्त कडवेपण त्यांच्यामध्ये दिसून येते.
'बाटग्याची बांग अधिक जोरात असते,’ असे म्हणतात ते उगीच नाही.
निर्मितीची सार्ध शती पूर्ण करणारे ’वंदे मातरम्’ हे केवळ राष्ट्रीय गीत नाही तर प्रखर राष्ट्रभक्तीचा तो अविरत वाहणारा ऊर्जास्रोत आहे. बंकिमचंद्रांना एका अलौकिक क्षणी स्फुरलेले हे तेजस्वी काव्य अखिल राष्ट्रासाठी तेजस्वी गीत बनले. 1880 साली प्रकाशित झालेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत बंकिमचंद्रांनी या गीताची अशी काही गुंफण केली की, ही कादंबरी आणि हे गीत यांचे एक अद्वैत तयार झाले. 1896 साली कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत पहिल्यांदा गायले गेले. गायन केले ते रविंद्रनाथ टागोर यांनी. ज्योतीने तेजाची केलेली ही आरतीच होती!
1905 साली झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर तर या गीतातील पहिल्या दोन शब्दांना महामंत्राचे स्थान मिळाले. भारतीय स्वातंत्र्याकरता आपल्या सर्वस्वाची होळी करत, हसत हसत फासावर गेलेल्या क्रांतिकारकांसाठी हे दोन शब्द विलक्षण प्रेरणा बनून राहिले.
पुढे, स्वातंत्र्योत्तर काळात 1950 साली भारताच्या घटना समितीने या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा दिला असला. मात्र, त्या आधीच 1937 साली कोलकाता इथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या समितीने वंदे मातरम् या गीतासंदर्भात एक ठराव मंजूर केला होता. त्यानुसार, राष्ट्रीय सभा आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये या गीताची फक्त पहिली दोन कडवी गाण्याचा निर्णय घेण्यात आला. गीताची पहिली दोन कडवी ही मातृभूमीचे वर्णन करणारी आणि धर्मनिरपेक्ष आहेत, नंतरच्या कडव्यांमध्ये हिंदू देवीदेवतांचे उल्लेख आहेत असे या निर्णयाचे समर्थन करण्यात आले. आजची काँग्रेसही याच ठरावाला चिकटून राहत हीच दोन कडवी गाण्याविषयी आग्रही आहे. आज बदललेली परिस्थिती, बदललेले संदर्भ लक्षात न घेता याच मुद्द्याशी ठाम राहणे हे काँग्रेसच्या आडमुठेपणाचे द्योतक आहे आणि मुस्लीम तुष्टीकरणाचेही.
या आडमुठेपणाची अनेक उदाहरणे गेल्या वर्षभरात पाहायला मिळाली आहेत.
वंदे मातरम्च्या सार्ध शतीचे औचित्य साधत, या राष्ट्रीय गीताचा सन्मान राखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, सर्व महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि अधिकृत कार्यक्रमात या गीताचे सहाही अंतरे वाजवणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय म्हणजे या गीताचा केलेला सन्मान आहे. त्याच्या प्रतिष्ठेची पुनःस्थापना आहे.
पण काँग्रेसला हा निर्णय मान्य नाही. गीताची पहिली दोनच कडवी गाणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेचे पालन करणे, असे ते उघडपणे म्हणत असले तरी मुस्लीम तुष्टीकरण आणि मतपेढीचे संरक्षण हीच त्यामागची खरी कारणे आहेत, हे उघड गुपित आहे. देशातील बहुतेक राज्यांतून या पक्षाचा प्रभाव नष्ट होत असताना, आपली बुडती पक्षनौका सावरण्यासाठी ते 1937च्या ठरावाच्या काडीचा आधार घेत आहेत. म्हणूनच यंदाच्या 15 ऑगस्टला काँग्रेसच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात जेव्हा संपूर्ण गीत वाजवले जात असल्याचे निदर्शनास आले तेव्हा अस्वस्थ सोनिया आणि राहुलनी त्याच वेळी याबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त केली. पूर्ण गीत वाजवले जात आहे हे लक्षात आल्यावर सोनियांचा झालेला चडफडाट त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे व्यक्त होत होता. सगळ्या देशवासियांना त्यांचे हे आक्षेपार्ह वर्तन खटकले. वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याविषयी चीड, नाराजी, संताप व्यक्त होऊ लागल्याने मायलेकाने काहीतरी थातुरमातुर स्पष्टीकरण देत, गेलेली पत सावरायचा प्रयत्न केला; पण तोही यशस्वी झाला नाही. हा शासनाचा कार्यक्रम नव्हता तर पक्षाचा कार्यक्रम होता अशी एक लंगडी सबबही देण्यात आली. ज्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा आहे त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी दिलेली ही सबब निषेधार्हच होती.
यावेळी झालेल्या सार्वत्रिक निषेधानंतरही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला आणि पदाधिकार्यांना उपरती झालेली नाही. ते अजूनही दोन कडव्यांबाबत ठाम आहेत आणि तसे जाहीरपणे सांगण्याचे कोडगेपण त्यांच्यामध्ये ठासून भरलेले आहे.
अन्यथा, एका महिन्याच्या आत त्याची पुनरावृत्ती होती ना! श्रीनगरमध्ये अलीकडेच झालेल्या जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान, शासकीय निर्णयानुसार संपूर्ण वंदे मातरम् गायले गेले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि ’नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला उपस्थित होते. ते गीत पूर्ण होईपर्यंत स्तब्ध उभे होते; पण काँग्रेसने मात्र संपूर्ण वंदे मातरम् गायल्याबद्दल आक्षेप नोंदवला. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या कार्यक्रमाचा व्हिडीओ ’एक्स’ माध्यमावर शेअर करत पक्षाच्या वतीने जाहीर आक्षेप नोंदवला.
नॅशनल काँग्रेस हा इंडी आघाडीतला एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्याने आपल्या तालावर नाचले पाहिजे, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र तसे झाले नाही. ’आघाडीतला घटक पक्ष म्हणून तुम्ही आमच्यावर हुकमत गाजवू शकत नाही. संपूर्ण वंदे मातरम् गाण्यासंदर्भातली नाराजी उघडपणे समाजमाध्यमांवर व्यक्त करण्याचा काँग्रेसला हक्क असला तरी ते आमच्यावर त्यांचे मत थोपवू शकत नाहीत,’ अशा स्पष्ट शब्दांत नॅशनल काँग्रेसचे नेते बशीर अहमद यांनी काँग्रेसला सुनावले आहे.
मुस्लीम लांगूलचालनात दंग असलेल्या काँग्रेसला बदलाचे वारे लक्षात येत नसावेत किंवा त्याचे गांभीर्य कळत नसावे. म्हणूनच मुस्लीम लीगपेक्षाही जास्त कडवेपण त्यांच्यामध्ये दिसून येते.
’बाटग्याची बांग अधिक जोरात असते,’ असे म्हणतात ते उगीच नाही.