वादाच्या भोवर्‍यात अडकलेली ‘मनुस्मृती’

विवेक मराठी    24-Sep-2026   
Total Views |

manu
हिंदू धर्मशास्त्र आणि समाजसंस्कृतीचा विचार करताना ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ कायमच वाद आणि चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. प्राचीन काळातील धर्मशास्त्रज्ञ, स्मृतिकार आणि मध्ययुगीन निबंधकारांपासून ते आधुनिक काळातील महापुरुषांपर्यंत-भारतीय प्रज्ञावंतांनी या ग्रंथाला वेळोवेळी कसे बौद्धिक आणि व्यावहारिक आव्हान दिले, याचा इतिहास थक्क करणारा आहे. ‘मनुस्मृती’कार मनूचे नियम म्हणजे अंतिम शब्द आणि ते बदलता येत नाहीत, हा समज खरोखरच हिंदू परंपरेला मान्य होता का? याचा घेतलेला हा वेध.
यद् वै मनुरब्रवीत् तत् भेषजम्
 
’कृष्ण यजुर्वेद’अंतर्गत तैत्तिरीय संहिता ’2.2.10.2’ येथे आढळणारा हा मनूचा प्रथम उल्लेख.
 
अर्थात, ’मनूने जे काही सांगितले आहे, ते औषधासमान (कल्याणकारी) आहे’, असे सांगतो. पण ’कृष्ण यजुर्वेदा’तील हा मनू वेगळा आणि स्मृतिकार मनू पूर्ण वेगळा. फक्त नामसाधर्म्यामुळे हा स्मृतिकार मनू पूर्ण हिंदू परंपरेला डोईजड झाला आहे. स्मृतिकार मनूचा काळ साधारण सनपूर्व दुसरे शतक ते सन दुसरे शतक असा मानला जातो. कृष्ण यजुर्वेदाची तैत्तिरीय संहिता त्याहून जुनी आहे, हे निश्चित. या वेदाचा काळ कोणता या प्रश्नात तूर्तास आपण नको जाऊया.
 
 
पण, फक्त नामसाधर्म्यामुळे प्राचीन हिंदू धर्मशास्त्रीय परंपरेत मनूच्या शब्दाला सर्वोच्च प्रामाण्य लाभले. समाजजीवनाची घडी बसवताना किंवा त्यावर भाष्य करताना ’मनुस्मृती’ आद्य आणि प्रमाण ग्रंथ मानला जाऊ लागला; परंतु, हिंदू ज्ञानपरंपरेचे आणि धर्मशास्त्राचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही परंपरा कधीही साचलेल्या डबक्यासारखी ताठर राहिली नाही. ती प्रवाही होती. कालानुरूप बदलणारे समाजवास्तव, मानवी मूल्ये आणि व्यावहारिक गरजा यांना सामावून घेण्यासाठी प्राचीन हिंदू प्रज्ञावंतांनी, स्मृतिकारांनी आणि निबंधकारांनी वेळोवेळी मनुस्मृतीच्या कालबाह्य, कठोर, प्रतिगामी आणि अमानवीय नियमांना वैचारिक आणि कायदेशीर आव्हान दिले. कित्येकदा मनुस्मृतीला पूर्ण नाकारलेदेखील!
 
 
सुधारणेसाठीच झालेला हा विरोध पाश्चात्य पद्धतीच्या उघड बंडासारखा मात्र नव्हता. भारतीय तर्कशास्त्र, मीमांसा आणि अन्वयार्थाच्या अतिशय सूक्ष्म आणि प्रगल्भ विचारांच्या माध्यमातून सातत्याने हा बौद्धिक उठाव होत आला आहे. मनुस्मृतीला पूर्णपणे नाकारण्याची, तिला कालबाह्य ठरवण्याची आणि तिच्या जागी नवे उदारमत व कालसापेक्ष धर्म प्रस्थापित करण्याची प्रदीर्घ परंपरा हिंदू धर्मशास्त्राच्या इतिहासात दिसून येते. आपल्या या लेखात आपण प्राचीन ’स्मृतिकार’, ’भाष्यकार’ आणि ’चतुर्वर्ग चिंतामणी’सारख्या निबंध ग्रंथांनी आपल्या पुनर्मांडणीच्या माध्यमातून मनूच्या विचारधारेला कसे नाकारले, याचा मागोवा घेऊया.
 
 
मनुस्मृतीला नाकारण्याची पहिली विधीपूर्ण बीजे आपल्याला ’याज्ञवल्क्य स्मृती’मध्ये (सन पहिले ते तिसरे शतक) सापडतात. मनूनेच स्वतःस सर्वोच्च मानले होते; पण जसा काळ पुढे जाऊ लागला तसे नवीन धर्मविचार अस्तित्वात येऊ लागले. अशा वेळी, मनुस्मृती आणि इतर पुढील स्मृती यांत वाद निर्माण झाल्यास काय करावे? यावर याज्ञवल्क्यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी श्लोक आपल्या स्मृतीत दिला आहे. यामुळे मनुस्मृती अंतिम ठरण्याच्या अधिकाराला कायमचा तडा गेला.
 
स्मृत्योर्विरोधे न्यायस्तु बलवान् व्यवहारतः।
अर्थशास्त्राद् बलवद् धर्मशास्त्रमिति स्थितिः॥
(याज्ञवल्क्य स्मृती 2.21)
 
धर्मशास्त्र अर्थशास्त्राहून बलवान आहे ही सद्यस्थिती आहे आणि दोन स्मृतींमध्ये (उदा. मनुस्मृती आणि इतर कोणतीही स्मृती) विरोधाभास निर्माण होतो, तेव्हा फक्त ’न्याय’ (सारासार-विचार) प्रत्यक्ष व्यवहाराच्या आधारे अधिक बलवान ठरतो.
 
 
या श्लोकाने न्यायाधीशांना मनुस्मृतीचे अंधानुकरण करण्यापासून रोखले. मनूचा एखादा कायदा किंवा विधी अमानवीय किंवा अतार्किक असल्यास तो बाजूला सारून ’न्याय आणि तर्काच्या’ आधारे दुसरा निर्णय घेण्यास आणि तो लागू करण्याचा अधिकार याज्ञवल्क्यांनी प्रस्थापित केला.
 
याज्ञवल्क्यांच्या पुढे जात मनुस्मृतीला सर्वांत मोठा आणि पद्धतशीर धक्का बाराव्या-तेराव्या शतकातील निबंधकारांनी दिला.विशेषतः देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्यातील महान पंडित आणि मंत्री हेमाद्री यांनी मानव-धर्मशास्त्र पूर्ण नाकारल्याचे दिसते. हेमाद्रीने ’चतुर्वर्ग चिंतामणी’ नामक धर्मशास्त्रावरील विशाल, प्रमाणभूत आणि विश्वकोशीय स्वरूपाचा निबंधग्रंथ रचला. या ग्रंथाच्या ’परिशेष खंड’ आणि ’कालनिर्णय’ भागात हेमाद्रीने ’कलिवर्ज्य’ (कलियुगात वर्ज्य असलेल्या गोष्टी) हा सिद्धांत अतिशय ठळकपणे मांडला. मनूने आपल्या युगात सांगितलेल्या अनेक प्रथा, नियम (जे आता अमानवीय किंवा कालबाह्य ठरले आहेत) त्यांना कलियुगात ’निषिद्ध’ ठरवत हेमाद्रीने पुराणांचे, इतर शास्त्र ग्रंथांचे दाखले देत नवा हिंदू समाज-धर्म मांडला.
 
 
उदाहरणार्थ, मनुस्मृतीने काही विशिष्ट परिस्थितीत ’नियोग’ प्रथा (विधवेकडून संततीप्राप्ती होण्यासाठी दिराशी संबंध ठेवण्यास सांगणारी प्रथा), ब्राह्मणांसाठी हवे तेव्हा संन्यास घेणे, गोवध करणे आदी ग्राह्य धरले होते आणि ’उद्धार विभाग’मध्ये फक्त सर्वांत मोठ्या मुलाला संपत्तीचा सर्वांत मोठा हिस्सा देणे अशा प्रथांना मान्यता दिली होती. पण ’चतुर्वर्ग चिंतामणी’ आणि ’स्मृतिचंद्रिका’ या ग्रंथांनी मनूच्या या सर्व नियमांवर, प्रथांवर कायमची फुली मारली.
 
आपल्या ’कलिवर्ज्य’ श्लोकात हेमाद्री म्हणतो,
असवर्णासु कन्यासु न विवाहश्च सर्वजातिभिः ।
देवराच्च सुतोत्पत्तिर्दत्तकन्या प्रदीयते ॥
... एतानि लोकगुप्त्यर्थं कलेरादौ महात्मभिः ।
निवर्तितानि कर्माणि व्यवस्थापूर्वकं बुधैः ॥
 
हाच श्लोक आदित्य आणि बृहन्नारदीय पुराणातही आढळतो. आणि इतरही अनेक निबंध ग्रंथांत दिसतो.
 
 
याचा अर्थ, आपल्या वर्णातील नसलेल्या म्हणजे असवर्ण (इतर वर्णाच्या) कन्येशी विवाह न करणे, दिराकडून संतती प्राप्त करणे (म्हणजे लादलेला ), विधिवत कन्यादान झाल्यावरही कन्या परत (धन आदी लोभाने) दुसर्‍याला देणे, इत्यादी प्रथा ’लोकांच्या (समाजाच्या) रक्षणासाठी’ (लोकगुप्त्यर्थं) आणि समाजाची व्यवस्थात्मक घडी नीट बसवण्यासाठी कलियुगाच्या सुरुवातीलाच महात्म्यांनी आणि विद्वानांनी व्यवस्थापूर्वकरित्या कायमच्या बंद केल्या आहेत.
 
 
’चतुर्वर्ग चिंतामणी’ने मनूचे अनेक कायदे ’कलिवर्ज्य’ ठरवून रद्दबातल केले. उदा. मनुस्मृती (9.112)नुसार मोठ्या मुलाला संपत्तीचा जास्तीचा वाटा (ज्येष्ठांश) मिळायचा; परंतु हेमाद्री आणि देवणभट्ट (स्मृतिचंद्रिका) यांनी हाच नियम कलिवर्ज्य ठरवला आणि सर्व भावंडाना ’समान वाटा’ देण्याचा आधुनिक कायदा हिंदू समाजात प्रस्थापित केला.
 
 
इ.स.च्या तिसर्‍या ते पाचव्या शतकाच्या दरम्यान रचल्या गेलेल्या ’नारद स्मृती’ने मनुस्मृतीच्याच नव्हे तर तत्कालीन धर्मशास्त्राच्याच ताठरतेला थेट आव्हान उभे केले. मनुस्मृतीसारखे धर्मशास्त्र आणि प्रत्यक्ष राज्यशासन यांच्यात संघर्ष होईल, तेव्हा कोणाचे ऐकावे? यावर नारदांनी धर्मशास्त्राचे वर्चस्व नाकारून प्रज्ञावान राजालासर्वोच्च अधिकार दिले.
 
धर्मश्च व्यवहारश्च चरित्रं राजशासनम्।
चतुष्पाद्व्यवहारोऽयमुत्तरः पूर्वबाधकः॥
(नारद स्मृती, व्यवहारमातृका 1.10)
न्यायनिवाड्याचे चार पाय (आधार) आहेत :
1. धर्म (शास्त्र/स्मृती), 2. व्यवहार (न्यायालयीन प्रक्रिया), 3. चरित्र आणि 4. राजशासन.
या चौघांमध्ये, प्रत्येक पुढचा घटक आधीच्या घटकाला बाधित करणारा आहे. म्हणजेच, राजाचा आदेश धर्मशास्त्राला खोडून काढू शकतो.
 
 
तसेच, ’बृहस्पती स्मृती’ने मनुस्मृतीसारख्या प्राचीन ग्रंथांच्या आंधळ्या अनुकरणावर प्रहार केला. बृहस्पतींनी स्पष्ट केले की, केवळ ग्रंथात (स्मृतीत) लिहिले आहे म्हणून अंधपणे निर्णय घेऊ नये.
 
बृहस्पती म्हणतात,
केवलं शास्त्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णयः।
युक्तिहीने विचारे तु धर्महानिः प्रजायते॥
(बृहस्पती स्मृती)
केवळ शास्त्राचा (धर्मग्रंथांचा) आधार घेऊन निर्णय देऊ नये. कारण तर्क आणि युक्तीविना विचार केला, तर त्यातून धर्माची आणि न्यायाची हानीच होते. बृहस्पतींनी आपल्या स्मृतीच्या माध्यमातून मनुस्मृतीची कृषी-आधारित व्यवस्था नाकारून व्यापारी श्रेणी आणि करारांचे प्रगत नियम मांडले.
 
बाराव्या शतकात ’विज्ञानेश्वर’ या महान निबंधकाराने ’याज्ञवल्क्य स्मृती’वर ’मिताक्षरा’ नावाचा ग्रंथ लिहिला. विज्ञानेश्वरांनीही अतिशय शिताफीने मनुस्मृतीला दुय्यम स्थान दिले.
 
उदाहरणार्थ, मनूचा स्त्री-शूद्रांना संपत्ती नाकारणारा खालील श्लोक,
भार्या पुत्रश्च दासश्च त्रय एवाधनाः स्मृताः।
यत्ते समधिगच्छन्ति यस्यैते तस्य तद्धनम्॥
(मनुस्मृती 8.416)
म्हणजेच, पत्नी, मुलगा आणि दास हे मुळातच संपत्तीहीन (अधन) मानले गेले आहेत. ते जे काही कमावतात, ती संपत्ती त्यांची नसून, ज्याच्या मालकीचे ते आहेत (पती/मालक), त्याचीच ती असते.
 
या अतार्किक नियमाला छेद देत, विज्ञानेश्वर म्हणतो -
पितृमातृपतिभ्रातृदत्तमध्यग्न्युपागतम्।
आधिवेदनिकाद्यं च स्त्रीधनं परिकीर्तितम्॥
(मिताक्षरा 2.143)
म्हणजेच, माता, पिता, पती आणि भाऊ यांनी दिलेले, तसेच विवाहाच्या वेळी अग्नीसमोर मिळालेले आणि पतीने दुसरा विवाह करताना तडजोड म्हणून पहिल्या पत्नीस दिलेले (आधिवेदनिक) आणि इतर सर्व मार्गांनी अर्जित केलेले धन ’स्त्रीधन’ मानले जाते. विज्ञानेश्वरांनी मनूचा नियम ’पूर्व मीमांसा’ पद्धतीचा वापर करून पूर्णपणे फेटाळला. मिताक्षरेत त्यांनी ’स्त्रीधन’ संकल्पना अत्यंत व्यापक केली. स्त्रीला वारसाहक्काने, बक्षीस म्हणून किंवा स्वत:च्या कष्टाने मिळालेली कोणतीही संपत्ती ही तिची स्वतःची पूर्ण मालकीची असते. विज्ञानेश्वरांनी मनूच्या वरील श्लोकाला ’नियम’ न मानता केवळ ’अर्थवाद’ (स्तुती/निंदापर अतिशयोक्ती) ठरवून त्याची धार बोथट करून टाकली.
 
 
मनूच्या परंपरेला वैचारिक विरोध करण्याची ही साखळी बंगाल आणि मिथिला प्रांतात अधिक टोकदार झाली. बंगालमध्ये जीमूतवाहनाने ’दायभाग’ या ग्रंथाची रचना केली. मनूपासून चालत आलेल्या ’जन्मास्वत्ववादाला’ (जन्माने संपत्तीवर अधिकार मिळणे) जीमूतवाहनाने नाकारले. त्यांनी ’उपरमस्वत्ववाद’ (आधीच्या मालकाच्या मृत्यूनंतरच हयात कुटुंबीयांना समान अधिकार मिळणे) हा नियम मांडला. यामुळे निपुत्रिक विधवा आणि कन्या यांना संपत्तीत अत्यंत भक्कम वारसाहक्क प्राप्त झाला. असा वारसाहक्क मनूला अमान्य होता. पुढे, चौदाव्या शतकात मिथिला प्रांतात होऊन गेलेल्या राणी ’लक्ष्मीदेवी ठक्कुराणी’ म्हणजे धर्मशास्त्राच्या इतिहासातील दुर्मीळ महिला निबंधकार! (आपल्या इतिहासातील पहिली फेमिनिस्ट म्हणता येईल!) तिने’विवादचंद्र’नामक निबंध-ग्रंथ रचला. लक्ष्मीदेवींनी ’विवादचंद्र’मध्ये जुन्या स्मृतींचा अन्वयार्थ लावून, मनूने नाकारलेले स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य प्रस्थापित केले. एका स्त्रीने स्वतः धर्मशास्त्राच्या आधारे मनूच्या पितृसत्ताक नियमांना दिलेले हे ऐतिहासिक वैधानिक उत्तर ठरते.
 
 
मनूच्या कालबाह्य कायद्यांना व नियमांना बदलण्याचे काम खुद्द त्याच्याच प्रसिद्ध भाष्यकाराने, नवव्या शतकातील ’मेधातिथी’नेही केले. मनूने कनिष्ठ जातींसाठी सांगितलेल्या क्रूर शिक्षा पाहून मेधातिथीनी हे श्लोक प्रत्यक्ष विधी नसून केवळ गुन्ह्याचे गांभीर्य दर्शवणारी अतिशयोक्ती आहे, एक प्रकारे अर्थवाद आहे अशी मांडणी केली. ’प्रत्यक्ष शिक्षा गुन्हेगाराची भूत आणि भविष्यातील गुन्हे करण्याची क्षमता पाहून राजाने ठरवावी,’ असे मेधातिथी म्हणतो.
 
 
आधुनिक काळातील, प्राच्यविद्या पंडित आणि मीमांसक डॉ. गंगानाथ झायांनी मेधातिथीचे भाष्य आणि मनुस्मृती असे दोहोंचेही भाषांतर केले. डॉ. झा म्हणतात, ”मनुस्मृती एकाच काळात लिहिलेला अभेद्य ग्रंथराज नसून त्यात ’स्वार्थ’ दर्शकप्रक्षिप्त घटकही बरेच आहेत. मीमांसेच्या, विवेकाच्या आणि तर्कशास्त्राच्या नियमांशिवाय (विधी आणि अर्थवाद यातील भेद समजल्याशिवाय) मनुस्मृतीचा शब्दशः अर्थ घेणे अनैतिहासिक आणि अमानवीय आहे. आणि मनुस्मृती हा केवळ अति महिमामंडीत सैद्धांतिक ग्रंथ असावा; प्रत्यक्ष व्यवहारात कालधर्म आणि देशधर्म यांनाच प्रमाण मानले गेले असावे.”
 
प्राचीन आणि मध्ययुगीन धर्मशास्त्रज्ञांनी, स्मृतिकारांनी आणि भाष्यकारांनी (पराशर, नारद, विज्ञानेश्वर, हेमाद्री, लक्ष्मीदेवी) मनुस्मृतीच्या अमानवीय नियमांना विरोध करण्यासाठी ’मीमांसा’, ’तर्क’, ’विवेक’, ’युक्ती’ आणि ’कलिवर्ज्य’ अशा बौद्धिक आणि विधिज्ञमाध्यमांचा शिताफीने वापर केला. त्यांनी अर्थनिर्णयनातून मनुस्मृतीस कालबाह्य ठरविण्याची पद्धत स्वीकारली आणि मनुस्मृतीचे व्यावहारिक आणि कायदेशीर अधिकार पद्धतशीरपणे कमी केले. नारद, हेमाद्री, विज्ञानेश्वर, लक्ष्मीदेवी आदींनी मनूला नाकारण्यासाठी शास्त्रनिर्मितीच्या परिघात ’निबंध-भाष्यांचा’ वापर केला.
 
पराशरांनी युगांतराची घोषणा करून कलौ पाराशरः स्मृतः (कलियुगात पराशर प्रमाण आहे, मनू नाही) असे सांगत मनूला हद्दपार केले; किंवा हेमाद्रीने ’चतुर्वर्ग चिंतामणी’त मनूचे नियम’कलिवर्ज्य’ ठरवले; त्याचप्रमाणे, लोकशाहीच्या नव्या आधुनिक युगात डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती नाकारत, आधुनिक युगात मनूचे कायदे चालणार नाहीत, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारलेली भारताची ’राज्यघटना’ हीच आधुनिक भारताची नवी आणि अंतिम स्मृती असेल, असा स्पष्ट सिद्धांत दिला.
 
थोडक्यात, यद् वै मनुरब्रवीत् तत् भेषजम् या वाक्यापासून वाढलेले मनूचे प्रस्थ धर्मशास्त्रातील प्रज्ञावंतांच्या टीका, तर्क आणि नकारातून मार्गक्रमण करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीच्या कार्याने पूर्ण संपुष्टात आले.

राजस वैशंपायन

राजस वैशंपायन 
राजस वैशंपायन इतिहास, सांस्कृतिक जतन आणि प्राचीन ज्ञानप्रणाली, विशेषतः मराठी आणि संस्कृतमधील ज्ञानप्रणाली या विषयांवर काम करतात. साध्य सा. विवेकमध्ये कार्यरत आहेत..