दिनांक 26 ऑगस्ट 2026 या दिवशी डॉ.पांडुरंग रामचंद्र किनरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 वर्षे होते. संघसंस्थापक परम पूजनीय डॉक्टर हेडगेवार म्हणत असत की, ‘संघाचा कार्यकर्ता कार्यावर निष्ठा असलेला, समर्पित वृत्तीचा तर हवाच, पण तो चतुरसुद्धा असलाच पाहिजे.’ डॉ.किनरे हा या सगळ्या गुणांचा आणि चतुरपणाचा समावेश असलेला यशस्वी कार्यकर्ता होता.
पांडुरंग राजाराम किनरे हा मुलगा अगदी लहान वयापासून, संघाच्या भाषेत शिशु असल्यापासून, शाखेत जाणारा स्वयंसेवक. वडील म्हणजे राजारामपंत हे राजापूर शहरातले एक वकील आणि संघ स्वयंसेवकसुद्धा. त्यामुळे घरात संघकार्याचे बाळकडूच.
कोकणात ’बाबी’ हे लाडके संबोधन मुलगा किंवा मुलगी कुणाहीसाठी वापरले जाते. बाबी किनरे हा राजापूरच्या संघशाखेतला एक चमकदार बाल स्वयंसेवक होता.
बाबी मॅट्रिकच्या वर्षात असताना राजापूर शहरात एक महत्त्वाची घटना घडली. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, मुसलमानांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत, एका धोंड्यावर हिरवे फडके टाकून, रस्ता अडवून नमाज पढायला सुरुवात केली. हळूहळू तिथे दर्गा उभा राहणार आणि याचा जास्तीत जास्त त्रास गावातल्या हिंदू महिलांना होणार, अशी स्पष्ट लक्षणे दिसू लागली. तेव्हा बाबीने पुढाकार घेतला. त्या काळी गावात जेवढी महिला मंडळे होती, त्या सगळ्यांना एकत्र आणून त्याने नगराध्यक्षांना घेराव घातला. हे आंदोलन यशस्वी झाले. हिरव्या फडक्यासकट धोंडा हलवण्यात आला.
ज्या काळात मुंबईच्या कामगार क्षेत्रातसुद्धा ’घेराव’ हा आंदोलनाचा प्रकार सुरू झालेला नव्हता, त्या काळात बाबी किनरे या मॅट्रिकमधल्या पोराने, कोकणातल्या राजापूरसारख्या तालुक्याच्या गावात घेराव आंदोलन यशस्वी करून दाखवले. बाबी भावी आयुष्यात कामगार क्षेत्राकडे वळणार, याचे हे जणू दैवी संकेत होते.
ते अचूकपणे ओळखले संघ प्रचारक माननीय शिवराय तेलंग यांनी. 1950 ते 1955 या काळात मा. शिवरायजी कोकणात जिल्हा प्रचारक होते. पुढे तेही मुंबईत आले आणि बाबी किनरेदेखील मॅट्रिक पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आला. वरळी परिसरात त्याचे विद्यार्थी जीवन सुरू झाले. वरळी हा कनिष्ठ मध्यमवर्गीय, कामगार, दलित, मच्छिमार अशा संमिश्र लोकवस्तीचा भाग होता. साम्यवाद्यांच्या परिभाषेत समाजातल्या ’नाही रे’ वर्गाचेच नागरीक इथे होते. सहाजिकच इथल्या संघशाखेवर येणारी मुले याच समाजातून येणारी होती. या समाजावर एकीकडे कॉम्रेड, डांगे, कॉम्रेड रणदिवे, साथी एस.एम. जोशी इत्यादींचा प्रभाव होता; तर दुसरीकडे मा. बाबासाहेब आंबेडकरांचाही होता, आणि त्याच वेळी पूज्य गाडगेबाबांचा सुद्धा होता. या सर्वांशी समरस होत, सर्वांची सुखदुःख समजून घेत वरळीमध्ये बाबी किनरे या तरुणाने ’भाग कार्यवाह’ म्हणून मोठे संघ काम उभे केले.
पुढे आयुर्वेदिय वैद्यक पदवी घेत डॉक्टर किनरे माहीम भागात निवासाला गेले. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ’रिक्रूटमेंट’ आणि ’प्लेसमेंट’ या संज्ञांना खूप महत्त्व आहे. आपल्या व्यवसायाला आवश्यक अशा सक्षम व्यक्तीची निवड करणे, भरती करून घेणे आणि त्या व्यक्तीला योग्य अशी कामगिरी देणे म्हणजे ’रिक्रूटमेंट आणि प्लेसमेंट’ हे ज्याला उत्तम रीतीने जमते तो खरा मॅनेजर-व्यवस्थापक. संघाच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य हे की, व्यवस्थापनशास्त्राचे कोणतेही अॅकेडमिक शिक्षण न घेता, संघ अधिकारी, संघ प्रचारक हे उत्कृष्ट व्यवस्थापक बनतात. डॉ. पांडुरंग किनरे हे व्यवसायाने डॉक्टर बनले असले, तरी ते उत्तम कामगार नेते बनू शकतील, हे हेरून त्यांना ’भारतीय मजदूर संघ’ या संघप्रणित ’ट्रेड युनियन’ संघटनेकडे वळवले, ते पुन्हा मा. शिवराय तेलंग यांनीच.
मजदूर संघाच्या ’राष्ट्रीय कामगार युनियन’ या संघटनेत सामान्य कार्यकर्त्यापासून वरिष्ठ पदांपर्यंत अनेक जबाबदार्या डॉ. किनरे यांनी समर्थपणे पार पाडल्या. साम्यवादी भाई आणि समाजवादी साथी मंडळी सतत कामगारांना भडकवत ठेवायची. त्याच वेळी संघ प्रेरणेतून काम करणारे लोक कसा विचार करत होते, याचे एक उदाहरण पाहा. 1969-70 सालीच डॉ. किनरे यांच्या लक्षात आले की, मुंबईतल्या कापड उद्योगात खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सतत वाढत आहेत. सत्ताधारी काँग्रेस सरकार आणि साम्यवादी, समाजवादी ट्रेड युनियन नेते या कुणालाच समस्येच्या मुळाशी जायचेच नाही. याची अपरिहार्य परिणती म्हणजे पुढच्या दहा-एक वर्षात मुंबईतला कापड उद्योग मरणार.
खूप प्रवास, खूप अभ्यास करून, खूप मुलाखती घेऊन डॉ. किनरे आणि तत्कालिन भारतीय जनसंघाचे एक नेते डॉ. वसंत कुमार पंडित यांनी एक योजना बनवली. मुंबईतल्या सर्व कापड गिरण्यांचे टप्याटप्प्याने कोकणात स्थलांतर कसे करता येईल आणि कामगार, उद्योगपती नि शासन अशा सर्वच घटकांसाठी ही योजना कशी व्यावहारिक फायद्याची ठरेल, हे सर्व नीट ठरवण्यात आले. मुंबईच्या कापड उद्योगाचे एक अग्रणी उद्योगपती अरविंद मफतलाल हे ही योजना वाचून खूपच प्रभावित झाले. पण...
...पण राजकारण आडवे आले. मराठवाडा विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, सबब सध्या महाराष्ट्र शासन ही योजना कार्यान्वित करू शकत नाही, असे कारण पुढे करून तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ही योजना डावलली. पुढे 10 वर्षांनी म्हणजे 1982 साली दत्ता सामंतांच्या संपाचे निमित्त करून उद्योगपती आणि शासन यांनी मुंबईचा कापड उद्योग मारला. किमान अडीच लाख कामगार देशोधडीला लागले.
परंतु डॉ. किनरे यांनी कामगार नेता म्हणून यशस्वी केलेला मोठा लढा म्हणजे 1980 सालचा मुंबईच्या ’इंडियन एक्स्प्रेस’चा संप. 1975 ते 1977 या इंदिरा गांधींच्या कुप्रसिद्ध आणीबाणी पर्वात इंडियन एक्स्प्रेसचे मालक रामनाथ गोयंका यांनी इंदिरा गांधींना ठाम विरोध केला. शिवाय आपली सर्व शक्ती जयप्रकाश नारायण यांच्या मागे उभी केली.
पण 1980 साली इंदिरा गांधी पुन्हा सत्ताधारी झाल्या. त्यांनी आपले आवडते नेते बॅरिस्टर अंतुले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बॅरिस्टर रजनी पटेल हेदेखील एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व होते. इंदिरा गांधी, अंतुले आणि रजनी पटेल यांनी दत्ता सामंत या नेत्याकरवी इंडियन एक्स्प्रेसमध्ये संप घडवून रामनाथ गोयंकांवर सूड उगवण्याचा प्रयत्न चालवला. या राजकारणी लढाईत कामगार उगाचच मरू लागले. रामनाथ गोयंका एक वेळ दिवाळे काढतील, पण झुकणार नाहीत, हे लक्षात आल्यावर दत्ता सामंतांनी कामगारांना वार्यावर सोडून दिले.
तेव्हा डॉ. किनर्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मजदूर संघ पुढे आला. त्यांनी मालक आणि कामगार दोघांचेही मानापमान सांभाळून सन्माननीय तोडगा काढला नि कंपनी पुन्हा सुरू केली.
अशा रोमहर्षक लढायांच्या आणि विजयांच्या कितीतरी हकिकती सांगता येतील, पुढे वयोमानपरत्वे डॉ. किनरे निवृत्त झाले आणि कुटुंब मोठे झाल्यामुळे त्यांनी माहीमहून ठाण्याला स्थलांतर केले.
1998 साली त्यांच्या वयाला साठ वर्षे झाल्याच्या निमित्ताने मी त्यांची एक मुलाखत घेतली होती. तेव्हा, आपल्या जीवनातील आनंदाचा प्रसंग कोणता, या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले होते की, 14 जानेवारी 1959 या संक्रांतीच्या दिवशी प्रचारक मा. शिवराय तेलंग यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली की, मी सरसंघचालक प.पू. श्रीगुरुजी यांना खारच्या रामकृष्ण मठात घेऊन जायचे. त्याप्रमाणे मी केले. पू.श्रीगुरुजी श्रीरामकृष्ण परमहंसाच्या प्रतिमेसमोर ध्यानस्थ बसले. पू.श्रीगुरुजींचा तो तेज:पुंज चेहरा, ध्यानमग्न अवस्थेतले त्यांच्या चेहर्यावरचे ते अवर्णनीय भाव हे दृश्य आज मी कितीही वेळा आठवले तरी मला तितकाच आनंद होतो. ती माझ्या मर्मबंधातली ठेव आहे.
सेवानिवृत्तीनंतर माझ्यासारख्या सामान्य स्वयंसेवकांसाठी डॉ. न राहता, घरगुती दाजी बनलेल्या डॉ. पांडुरंग राजाराम किनरे या ज्येष्ठ स्वयंसेवक बंधूच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!