DJ ban
डीजेबंदीला आपले पूर्ण समर्थन असले तरी, हिंदू म्हणून एकत्र आणण्याचे सामर्थ्य असलेला सार्वजनिक गणेशोत्सव हवा आहे हे भान जागृत ठेवावे. बापट नास्तिक आहेत, यात आस्तिक हिंदूने आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र, त्यांची center left विचारसरणी, त्यांचे मित्रमंडळ याकडे दुर्लक्ष करू नये. डीजे बंदीचा मुद्दा मांडतामांडता त्यांनी आपल्या आस्तिक्यावर घाला घालू नये यासाठी दक्ष असावे.
मार्च महिन्यात एका शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात जायचा योग आला. हे खेडे एका महानगराच्या जवळच असलेले. (इथे त्या महानगराचे वा त्या खेड्याचे नाव गौण आहे.) स्नेहसंमेलनाला मुलांची उपस्थिती जेमतेम दोनशेच्या घरात आणि त्यांचे शंभरेक पालक. शाळेच्या मोठ्या पटांगणाचा पाव कोपराही त्या संख्येने व्यापला नव्हता. तरीही स्नेहसंमेलनासाठी डीजेच्या भिंती तिथे उभ्या केलेल्या होत्या. परिणामी, पुढचे दोन तास चालू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्याऐवजी डोके बधीर, कान बहिरे आणि छाती धडधडू लागली. शेजारी बसलेल्या व्यक्तीशीदेखील एक वाक्यही संवाद होईना. शेवटी असह्य झाल्यावर संस्थाचालकांना म्हटले,“खूप त्रास होतो आहे याचा....याऐवजी साधा माईक आणि लाउडस्पीकर पुरेसा आहे, असं वाटत नाही का?” यावर, ’इथल्या लोकांना डीजेशिवाय कार्यक्रम झाल्यासारखाच वाटत नाही,’ असे म्हणत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली. मग जे चालू होते ते सहन करणे एवढेच हातात उरले.
ही अवस्था जर जेमतेम दोन तासांतल्या आवाजाने होत असेल तर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत आणि आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीत जो असह्य, कर्णकटू ढणढणाट चालू असतो त्याने सर्वसामान्य नागरिकांची, आजारी व्यक्तींची आणि ज्येष्ठ मंडळींची काय दुरवस्था होत असेल हे लक्षात येते. पुणे शहरात आणि अन्य महानगरांमधूनही डीजे आणि लेझरचे वर्षागणिक वाढते पेव अनेकांना अनेक वर्षे खटकत होतेच. सर्वांनी एकत्र येऊन त्या संदर्भात दाद मागणेही अत्यावश्यक झाले होते. याबद्दलची नाराजी सर्वसामान्यांच्यामध्ये साचली होती. पण याविरोधात एकत्र येऊन फार काही झाले नाही. तिला वाट मिळाली ती पुणे मनपाच्या या विषयासंदर्भात झालेल्या सभेत विद्यानंद बापट यांनी ठासून मुद्दा मांडल्यामुळे. त्यावरून गदारोळ झाला. मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भडकून त्यांच्यावर धावून गेले. शेवटी त्यांंना पोलीस संरक्षणात सभेतून बाहेर काढण्यात आले; मात्र त्यांचा मुद्दा सर्वसामान्यांनी उचलून धरला आणि त्याहूनही अधिक समाजमाध्यमांनी आणि वृत्तवाहिन्यांनी तो लावून धरला. त्यातून वातावरण तापत गेले. त्यातच एका राजकीय नेत्याने त्यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे माध्यमांना सत्ताधार्यांच्या विरोधात वातावरण भडकवायला आयतेच कोलीत मिळाले. त्या गोंधळात, डीजे आणि लेझरचा मुद्दा एकत्रितपणे लावून धरणे आणि त्याची तड लावणे या दिशेने विषय थोडाफार पुढे गेला तरी, माध्यमांनी बापटांचे महिमामंडन करायला सुरुवात केली.
सर्वधर्मीयांच्या विविध मिरवणुका आणि जाहीर सभा-कार्यक्रमांंमध्ये डीजे-लेझरचा चालू असलेला अतिरेकी वापर ही आज समाजाची डोकेदुखी झाली आहे. समाजाच्या वाढत्या अनारोग्याचे ते प्रतीक आहे. अतिशय भडक सांगितीक अभिव्यक्तीची, कानठळ्या बसवणार्या आवाजाची नशा समाजाला चढली आहे. ती कशामुळे चढली? त्याला कोण जबाबदार आहेत आणि यातून नेमके काय साधायचे आहे, याचा विचार करायची वेळ आली आहे; मात्र त्यासाठी नुसती डीजे-लेझरवर बंदी घालून चालणार नाही तर, गणेश मंडळांशी संवाद साधायला हवा. समाजावर होत असलेले विपरित परिणाम त्यांच्या लक्षात येत नसतील तर ते आणून द्यायला हवेत. त्यावर सामंजस्याने तोडगा काढायला हवा. तसे प्रयत्नही दुसर्या बाजूने पद्धतशीरपणे चालू झाले आहेत, हे योग्यच. तेव्हा डीजे बंदीचे समर्थन करतानाच सुबुद्ध नागरिकांनी या गटाला सक्रिय साथ द्यायला हवी.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामागचा हेतू वेगळा होता हे खरे असले तरी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही या गणेशोत्सवांनी सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा सकस मनोरंजनाचे फारसे पर्याय नव्हते आणि समाजातील मोठ्या वर्गाच्या हाती पुरेसा पैसा नव्हता तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवातल्या दर्जेदार कार्यक्रमातून समूहमनाचे भरणपोषण झाले आहे. अनेक कलावंतांना त्यांच्या उमेदीच्या काळात याच उत्सवाने पहिल्यांदा व्यासपीठ मिळवून दिले आहे. अनेक विचारवंतांनी याच व्यासपीठावरून समाजाचे प्रबोधन केले आहे. काळाच्या ओघात प्रबोधनाचे विषय बदलले तरी प्रबोधनाची गरज होतीच हेच यातून अधोरेखित होते. या उत्सवात कार्यकर्ता म्हणून सहभागी झालेल्या अनेकांमधल्या उपजत नेतृत्वगुणांना नेमका आकार येऊन त्यांनी भविष्यात विविध क्षेत्रात उत्तम नेतृत्व केल्याचीही अनेक उदाहरणे अवतीभवती आहेत.
मात्र गेल्या दोन दशकांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वेढ्यात मनोरंजनाच्या सवयी बदलल्या. प्रबोधनाचे, चर्चेचे अनेक मार्ग खुले झाले. कार्यक्रमांइतकेच गणेशोत्सवाच्या मंडपापर्यंत खेचून आणणारे प्रबोधनपर देखावेही गायब झाले. हातातल्या मोबाईलच्या सान्निध्यात प्रत्येकजण स्वत:चे मन रमवायला-रिझवायला लागला.
‘माणूस हा समाजशील प्राणी आहे’, या उक्तीवर आपला अद्यापही विश्वास असेल तर या स्थितीवर गांभीर्याने विचार करायला हवा. सार्वजनिक उत्सवात समाजमन घडविण्याची, त्याला आकार देण्याची ताकद असते हे गेल्या शतकभरात वारंवार सिद्ध झालेले असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवांना कालसुसंगत रूप देणे ही समाजाची गरज आहे. समाज जोडलेला राहण्यासाठी त्यांची गरज मान्य असेल तर त्यात डीजे, ढोल आणि अन्य वाद्ये किती प्रमाणात असावीत यावर साकल्याने विचार करायला हवा.
विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या डीजे व लेझरबंदीच्या मुद्द्यावर त्यांना जरूर समर्थन द्यावे; पण ते झापडबंदपणे नसावे. त्यांच्या भूमिकेला-मांडणीला, विशेषत: सणच बंद व्हावेत या त्यांच्या मताला विरोध असणार्यांनी त्याचा विचारांनीच प्रतिवाद करावा. त्यांनी मांडलेल्या काही आक्षेपार्ह मुद्द्यांवरही विचारांनीच लढावे. त्यांना झालेल्या मारहाणीचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. यातून मूळ विषयाला विपरित वळण लागू शकते व होऊ घातलेल्या विधायक बदलांची गती खुंटते.
डीजेबंदीला आपले पूर्ण समर्थन असले तरी, हिंदू म्हणून एकत्र आणण्याचे सामर्थ्य असलेला सार्वजनिक गणेशोत्सव हवा आहे हे भान जागृत ठेवावे. बापट नास्तिक आहेत, यात आस्तिक हिंदूने आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मात्र, त्यांची center left विचारसरणी, त्यांचे मित्रमंडळ याकडे दुर्लक्ष करू नये. डीजे बंदीचा मुद्दा मांडतामांडता त्यांनी आपल्या आस्तिक्यावर घाला घालू नये यासाठी दक्ष असावे.