Phadke Sri Ganapati Mandir in Girgaon
श्रीगणेश हे आपणा सर्वांचं आराध्य दैवत. 137 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेलं फडकेवाडीतील फडके गणपती मंदिर हे गिरगावातील केवळ एक धार्मिक केंद्र नाही. तर गणेशाची कला-संस्कृती-ज्ञान रक्षक, जीवनसंरक्षक, विघ्नविनाशक अशा विविध रुपांचं स्मरण करून त्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची परिपूर्ती करणारं केंद्र झालं आहे. ‘जनसेवा हीच जनार्दनसेवा’ हे ब्रीद जपत आपलं सामाजिक दायित्व पूर्ण करत आहे.
विघ्नांचा विनाशकर्ता, बुद्धिचा अधिपती आणि कलांचा संरक्षक असा हा गणपती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासह देशविदेशात भक्तजनांची मांदियाळी असणारा देव. गिरगावात या आराध्य देवतेचं ‘फडके श्रीगणपती मंदिर’ आहे. 137 वर्षांहून अधिक काळ हे अत्यंत टुमदार आणि पारंपरिक धाटणीचं अत्यंत दिमाखात उभं असलेलं मंदिर गिरगावची शोभा वाढवत राहिलं आहे. विविध नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रमांसह अनेक सामाजिक, आरोग्यविषयक, शिक्षणविषयक उपक्रमांच्या माध्यमातून ‘जनसेवा हीच जनार्दनसेवा’ हे आपलं ब्रीदवाक्य मंदिराने सार्थ ठरवलं आहे. फडके श्रीगणपती मंदिराच्या ‘धी यशोदाबाई गोविंद गंगाधर चॅरिटेबल ट्रस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी यांनी ट्रस्टच्या विविध उपक्रमांविषयी विस्तृत माहिती दिली.
फडके गणपती मंदिर हे इतिहास घडविणारं मंदिर म्हणून उल्लेखनीय आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील आवास येथून गोविंद गंगाधर फडके सपत्नीक मुंबईत रहायला आले. इ.स. 1867मध्ये त्यांनी विठ्ठलभाई पटेल रोडवरील एक सुंदर जागा विकत घेतली. गोविंदरावांच्या पत्नी यशोदाबाई याही अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. या दाम्पत्याच्या जीवनात एक मोठी उणीव होती. ती म्हणजे त्यांना अपत्य नव्हतं. पुढे गोविंदरावांचं निधन झालं. आपली संपत्ती देवाच्या चरणी अर्पण करून धार्मिक कार्यासाठी वापरावी, अशी त्यांची ठाम इच्छा होती. याच इच्छेनुसार यशोदाबाईंनी ‘गजानन चिरंजीव जाहला’ या भावनेतून गणपती मंदिर उभारण्याचा संकल्प केला. गोविंदरावांनी विकत घेतलेल्या जागेवर यशोदाबाईंनी एक मोठी बाग तयार केली. त्या बागेला त्यांनी ‘गोविंदबाग’ असं नाव दिलं आणि त्या परिसराला ‘फडकेवाडी’ असं नाव मिळालं. यशोदाबाईंच्या संकल्पानुसार गणेश मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आणि सुमारे इ.स. 1890 च्या आसपास मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. आज या मंदिराला 137 वर्षं पूर्ण झाली असून विविध धार्मिक उपक्रमांसह अनेकानेक समाजोपयोगी उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून चालवले जातात. फडके श्रीगणपती मंदिराच्या ट्रस्टसाठी ‘जनसेवा हीच जनार्दनसेवा’ आणि ‘ज्ञानमंदिर ते समाजमंदिर’ अशी कार्याची व्याप्ती असल्याचं हेमंत जोशी आवर्जून नमूद करतात.
बहुआयामी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय हुंडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ’नि-क्षय भारत’(NI-Kshay Bharat) हा टीबीच्या निवारणार्थ सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत ट्रस्ट टीबी रुग्णांकरिता अन्नदान उपक्रमात सहयोग देते. बाळाराम स्ट्रीट येथे महानगरपालिका रुग्णालयाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ए, बी, सी आणि डी या प्रभागांमधील टीबीच्या रुग्णांकरिता मोफत आरोग्योपचार पुरवले जातात. या रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता (इम्युनिटी) अत्यंत खालावलेली असते. त्या दृष्टीने पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. दरवर्षी 24 मार्च अर्थात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त या दिवशी रुग्णांना मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून पोषक अन्न दिले जाते. या दिवसाव्यतिरिक्तही या रुग्णालयात टीबी रुग्ण उपचार घेत असल्यास त्याला पोषक अन्नदान केलं जातं. हा उपक्रम मागील पाच वर्षं सुरू असून सुमारे 400 रुग्णांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. महापालिकेने या उपक्रमाची दखल घेतली आहेच. त्याचबरोबरीने केंद्रीय स्तरावरही ‘नि-क्षय भारत’ या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल विशेष सहभागिता प्रमाणपत्र ट्रस्टला प्रदान करण्यात आलं आहे.
ट्रस्टच्या माध्यमातून गर्भाशय कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग, मुख कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांना केशरी व पिवळी शिधापत्रिका असल्यास, रोटरी क्लबच्या साहाय्याने मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून अवघ्या 25 हजारांमध्ये शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात येते. ज्या रक्तदाब असणार्यांना व मधुमेहींना नियमित दैनंदिन तपासणीची गरज असते अशा स्थानिक गरजू रुग्णांना बीपी मशीन व ग्लुको मीटर ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येतात. आजवर 200 जणांना अशी मशिन्स देण्यात आली आहेत, फक्त त्यासाठी दैनंदिन तपासणीची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांचं पत्र दाखवणं आवश्यक आहे. रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन परतल्यावर औषधं, योग्य आहार याची आवश्यकता असते. अशांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर वैद्यकीय साहाय्य केलं जातं. हजारो रुग्णांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. मंदिरामध्ये दिलेल्या प्रत्येक देणगीची पावती दिली जाते. तर काहीजणांचं मत असतं की, दान दिलेलं एका हाताचं दुसर्या हाताला कळू नये. त्यामुळे ते दक्षिणापेटीत पैसे टाकण्यास प्राधान्य देतात. अशांसाठी मंदिरात वैद्यकीय हुंडी(दक्षिणा पेटी) ठेवण्यात आली आहे. या हुंडीत भक्तांनी टाकलेले पैसे एकत्र करून ट्रस्टच्या विविध वैद्यकीय उपक्रमांसाठी वापरले जातात.

गरजू विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शैक्षणिक सेवा
अकरावी उत्तीर्ण आणि पुढील इयत्तांसाठी विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्हतापात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी नोंदणी व कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते व रक्कमही त्याच प्रकारे खात्यात जमा होते. जेणेकरून विद्यार्थ्यांचा जाण्यायेण्याचा वेळ व खर्च दोन्ही वाचेल. यासाठी लिंग, ज्ञाती, धर्म, समुदाय असा कोणताही भेदभाव केला जात नाही. फक्त विद्यार्थी आणि विद्याभ्यास या तत्त्वांवर ही शिष्यवृत्ती दिली जाते. याच पद्धतीने शाळांमध्ये सर्वाधिक उपस्थिती असणार्या मुलांना ‘सर्वोच्च उपस्थिती’ बक्षिसाने गौरवण्यात येतं. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत नियमितपणे जाण्याची सवय लागली. आजवर शेकडो विद्यार्थ्यांना सर्वोच्च उपस्थितीचं बक्षीस मिळालं आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ‘पाठ्यपुस्तक योजने’अंतर्गत दरवर्षी एक शाळा निश्चित केली जाते. विशेषतः गरजू मुलांचा अंतर्भाव असणार्या शाळेची निवड करून, तेथील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच, वह्या, दप्तर, पाण्याची स्टिलची बाटली, कंपासपेटी, वर्षभरासाठी लागणारी पेनं आणि सनातन धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ असणारी श्रीमद्भगवतगीता अशा वस्तूंचं वितरण केलं जातं. मागील पाच वर्षांपासून पाठ्यपुस्तक संच वितरणाचा हा उपक्रम सुरू आहे.
महाराष्ट्रात अनेक वेदपाठशाळा आहेत. तिथे विविध वयोगटांचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अशा विद्यार्थ्यांना ट्रस्टद्वारे वेदविद्या शिष्यवृत्ती दिली जाते. वेदपाठशाळांमध्ये सनातन परंपरांचा व वेदांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कराड, नृसिंहवाडी, सासवड, सावंतवाडी, वायंगणी, धाराशिव, नाशिक, रायगड अशा अनेक ठिकाणच्या वेदपाठशाळांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्या वेदपाठशाळा गोरक्षण, गोसंवर्धनासाठी काम करतात त्यांनाही अर्थसाहाय्य केलं जातं. आजवर सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना या सर्व उपक्रमांचा लाभ झाला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी दहावीची परीक्षा देणार्या 250-300 विद्यार्थ्यांना परीक्षा किट देण्यात येते. शाळांना शासनाच्या परीक्षांबाबतीत ज्या सूचना येतात, त्याला अनुसरून हे किट तयार केले जातात.
बाल निरीक्षण गृहातील मुलांसाठी ‘उडान’ उपक्रम
डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहातील (पूर्वीचं बाल सुधार गृह) मुलांसाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘उडान’ हा आगळावेगळा उपक्रम मागील पाच वर्षांपासून राबवला जात आहे. ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो, त्याप्रमाणे या मुलांनीही आपला काळा भूतकाळ झटकून नव्याने सकारात्मक आयुष्य सुरू करावं, समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं या उद्देशाने ‘उडान’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ट्रस्टने नेमलेल्या शिक्षिका दर आठवड्याला या बाल निरीक्षण गृहात जातात. त्या मुलांशी संवाद साधणं, त्यांना शिकवणं, मुलांच्या तीव्र भावना संवादातून निष्प्रभ करणं, त्यांच्यासाठी विविध उपक्रम आखणं-राबवणं अशा बहुआयामी जबाबदार्या या शिक्षिका पूर्ण करतात. या उपक्रमाचं यशस्वी सेलिब्रेशन म्हणून ट्रस्टशी संबंधित अनेक व्यक्ती डोंगरी येथे जाऊन या मुलांसोबत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात. मागील पाचेक वर्षांत हजारो मुलांना या ‘उडान’ उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली असून डोंगरी कारागृहाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष ट्रॉफी देऊन ट्रस्टला गौरवण्यात आलं आहे.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा
श्रीगणपती मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये अन्नदान सेवा दिली जाते. कोविडच्या काळात अनेक कार्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळे डबे बंद झाले. त्यामुळे मुंबईतील डबेवाल्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. या डबेवाल्यांना साहाय्य म्हणून ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदान वाटप करण्यात आलं. विशेष शाळेमधील मध्यमवयीन (40-45 वर्षांच्या) गरजू विद्यार्थ्यांना, रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात येतं. अशा विविध उपक्रमांतर्गत तीन ते साडेतीन हजार परिवारांना अन्नदानाची मदत ट्रस्टच्या माध्यमातून झाली आहे. कोविडच्या काळात पोलीस हे जनजागृतीचंही काम करत होते. यासाठी पोलिसांना आवश्यक ते सहकार्यही देण्यात आलं. गिरगावकरांना, मुंबईकरांना पोलिसांची मदत नेहमीच होत असते. पोलिसांचं हे सामाजिक योगदान लक्षात घेऊन विठ्ठलभाई पटेल मार्गावरील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय शिबिराचंही आयोजन करण्यात आलं. ‘कलासंजीवन गोविंदा पथक’ हे दिव्यांग मुलांचं गोविंदा पथक आहे. दहीहंडीच्या वेळेस या पथकाच्या गोविंदांच्या इन्शुरन्सची जबाबदारी ट्रस्टच्या माध्यमातून उचलली जाते. आजवर ट्रस्टने 200हून अधिक दिव्यांगांना स्टिकचं वितरणही केलं आहे व हा त्यांचा नियमित उपक्रम आहे. विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे या काठीमध्ये एलईडी दिवे आणि सेन्सर आहे. त्यामुळे काठीसमोर कोणतीही गोष्ट आल्यास सेन्सरला कळतं व घंटी वाजते. ज्यामुळे आपल्यासमोर काहीतरी आहे व आपण धडकू वा पडू शकतो हे दिव्यांगांना आधीच लक्षात येतं. ते वेळीच सावध होतात, त्यामुळे अपघाताची शक्यता नष्ट होते. फडकेवाडीतच फडके श्रीगणपती मंदिराचं यशोमंगल सभागृह असून अत्यंत वाजवी दरात ते उपलब्ध करून देण्यात येते.
धार्मिक उपक्रम
फडके श्रीगणपती मंदिर हे रिद्धिसिद्धीसह श्रीगणेश पंचायतन (मध्यभागी श्रीगणेशासह चारही बाजूंना शंकर, विष्णू, सूर्य आणि देवी) असणारं दुर्मीळ मंदिर आहे. भारतात केवळ तीनच मंदिरांमध्ये रिद्धिसिद्धीसह श्रीगणेश पंचायतन आहे, त्यातील हे एक मंदिर. या मंदिरात माघी गणेशोत्सव, पंचायतन यज्ञ, चैत्रगौरी हळदीकुंकू, गुढी पूजन, पंचांग पूजन, महाशिवरात्रीला लघुरुद्र अशा विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. या सर्व कार्यक्रमांमध्ये गिरगावकर अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. मागील 100 वर्षांहून अधिक वर्षं मंदिरात चैत्रगौरीचं हळदीकुंकू आयोजित करण्यात येत आहे. भाविकांना स्वतःच्या हस्ते गणेशपूजन करता यावं म्हणून दर संकष्टीला पंचामृती पूजनाची व्यवस्था व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्वनोंदणी करून मंदिराच्या वर असणार्या कार्यालयात संकष्टीच्या पूजा करण्याची सोय आहे व त्यासाठी आवश्यक ती सामग्री, पुरोहित ही सारी व्यवस्था केली जाते. या पूजेसाठी जात-लिंग-पंथ-वय अशी कोणतीही अट नाही. केवळ ती व्यक्ती गणेशभक्त असावी एवढीच अपेक्षा असते. 10-10 जणांच्या बॅचेसमध्ये ही पूजा केली जाते. दरवर्षी होळीच्या वेळेस पारंपरिक शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत होलिकापूजन केलं जातं व हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात. माघी गणेशोत्सवात श्रीगणेशाच्या जन्माचा सोहळा असतो. पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशास पाळण्यात घालण्यात येते. कीर्तन, प्रवचन आवर्तने असे विविध धार्मिक कार्यक्रम असतात. त्याच बरोबरीने सांस्कृतिक कार्यक्रम, वैद्यकीय शिबिर आणि पर्यावरण-अर्थ-तंत्रज्ञान-सामाजिक उपक्रमांबाबत वैचारिक व्याख्यानमालादेखील आयोजित केल्या जातात. यात आर्थिक व्यवस्थापन, युपीआय, सायबर गुन्हे, अन्न हेच औषध अशा विविधांगी विषयांचा समावेश राहिला असून समाजातील अनेक मान्यवर वक्ते या मंचावर येऊन आपले विचार मांडतात.
पूर्वीपासूनच समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती फडकेवाडी गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळावर राहिल्या आहेत. विद्यमान संचालक मंडळातही उज्ज्वला मेहेंदळे (लोकमान्य टिळकांच्या पणती), मिलिंद वझे (प्रिंटिंग व्यावसायिक), सुरेश डोंगरे (बँकिंग व्यवसायातील तज्ज्ञ), यशोधन दिवेकर (सॉलिसिटर), डॉ. विभास मोडक (ऑर्थोपेडिक सर्जन), डॉ.अश्विनी भालेराव गांधी (गायनॅकोलॉजिस्ट) या मान्यवर व्यक्ती आहेत. 137 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास लाभलेलं फडकेवाडीतील फडके गणपती मंदिर हे गिरगावातील केवळ एक धार्मिक केंद्र नाही. तर गणेशाची कला-संस्कृती-ज्ञान रक्षक, जीवनसंरक्षक, विघ्नविनाशक अशा विविध रुपांचं स्मरण करून त्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची परिपूर्ती करणारं केंद्र झालं आहे. ’जनसेवा हीच जनार्दनसेवा’ हे ब्रीद जपत आपलं सामाजिक दायित्व पूर्ण करत आहे.