मराठवाड्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा

विवेक मराठी    20-Oct-2021   
Total Views |
@डॉ. प्रसन्न पाटील

असई लढाई ही आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य अधोरेखित करणारी आहे. भारतीयांच्या दृष्टीने या लढाईचे महत्त्व म्हणजे मराठे ही लढाई प्रादेशिक वर्चस्वासाठी नाही, तर परकीयांचे वर्चस्व व मुजोरी उखडून फेकण्यासाठी लढत होते. मराठवाड्यात इतिहासाच्या अशा अनेक पाऊलखुणा आहेत, पण कधी इतिहासाच्या पुस्तकांतून सर्वसामान्यांपर्यंत ही सगळी माहिती जात नाही.

marathwad_3  H
23 सप्टेंबर 1803ची दुपार. जालना जिल्ह्यातील पूर्णापूर (जाफ्राबाद) तालुक्यातील असई गावाचा परिसर. एका बाजूला केळणा, तर दुसर्‍या बाजूला जुई नदी भरून वाहताहेत. असईच्या पुढे या दोन्ही नद्यांचा संगम. मागे दोआबात घनघोर लढाई चाललेली. इंग्रज आणि मराठे यांच्यातील हे युद्ध ‘असईची लढाई’ नावाने ओळखले जाते.
 
मुंबई ते कोलकाता आणि दक्षिण ते नेपाळ असा सगळा भारत ताब्यात घेण्यात इंग्रजांना केवळ मराठ्यांची राज्ये अडथळा उरली होती. त्यातही एकेकाचा पाडाव करत जात असताना शिंद्यांना व भोसल्यांना दक्षिणेतील प्रदेश सोडून जाण्याचा इशारा इंग्रजांनी दिला. पण त्याला न जुमानता दौलतराव शिंदे आणि नागपूरकर भोसले यांच्या नेतृत्वाखालील विशाल सैन्य भोकरदन ते असई या सुमारे 15 कि.मी. परिसरात तळ ठोकून बसले होते. त्यांच्यासोबत उत्तरेतील अनेक सरदार होते. त्यात बेगम समरू ही भारतातील पहिली कॅथॉलिक संस्थानिकदेखील होती. ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व आर्थर वेलस्ली करत होता. 48000 मराठा सैन्य आणि 10000 अँग्लो-इंडियन सैन्य अशी काहीशी विषम संख्याबळातील लढाई. पण आर्थर वेलस्लीने धाडसी निर्णय घेत केळणा नदी भर पुरात ओलांडली व मराठा सैन्यावर हल्ला गेला. मराठ्यांनी तीव्र प्रतिकार केला. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले. जवळजवळ 6000 सैनिक मारले गेले. पॅट्रिक मॅक्सवेल हा प्रमुख इंग्रज अधिकारीदेखील मराठ्यांकडून मारला गेला. पण शेवटी चिवट प्रतिकार मोडून काढत इंग्रजांच्या फौजा जिंकल्या. भारताच्या इतिहासातील दुसरे मराठा-इंग्रज युद्ध म्हणून ओळखले जाणारे हे युद्ध इंग्रजांनी जिंकले, त्याचे दूरगामी परिणाम इंग्रजांची सत्ता मजबूत होण्यावर झाले. दौलतराव शिंद्यांच्या सैन्यातदेखील अनेक युरोपीय अधिकारी होते. त्यांची फितुरी, विशेषत: बेगम समरूच्या सैन्याची फितुरी हे मराठ्यांच्या या पराभवाचे एक कारण होते. अन्यथा संख्याबळ आणि शौर्य यात मराठे कितीतरी वरचढ होते. आर्थर वेलस्लीला ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा मान मिळाला. पुढे त्याने युरोपातील लढायांत नेपोलियनचा पराभव केला आणि तो दोनदा इंग्लंडचा पंतप्रधानदेखील झाला. ‘नेपोलियनला हरवण्यापेक्षाही माझ्या दृष्टीने असईच्या लढाईत मराठ्यांना हरवणे ही माझी अधिक मोलाची कामगिरी होती’ असे तो म्हणत असे. यावरूनच या लढाईचे महत्त्व आणि या लढाईत आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य याचा अंदाज येऊ शकतो. भारतीयांच्या दृष्टीने या लढाईचे महत्त्व म्हणजे मराठे ही लढाई प्रादेशिक वर्चस्वासाठी नाही, तर परकीयांचे वर्चस्व व मुजोरी उखडून फेकण्यासाठी लढत होते. स्वातंत्र्यलढ्यातील अगदी सुरुवातीच्या काळातील मध्य भारतातील हे फुंकलेले रणशिंग होते. परकीयांची सत्ता आणि गुलामी याविरुद्ध आपल्या पूर्वजांनी नेटाने लढा दिला. त्या लढ्यांपैकी हा एक महत्त्वाचा लढा!

 
असई गावाजवळ युद्धभूमीची सध्याची एकमेव खूण म्हणजे एका प्रचंड विशाल वटवृक्षाखाली असलेले पॅट्रिक मॅक्सवेलचे थडगे. या लढाईचा तपशील ब्रिटिश आर्मीच्या इतिहासात गौरवाने शिकवला जातो. भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटवरदेखील याची माहिती दिलेली आहे, कारण आता भारतीय सैन्याचा भाग असलेल्या, परंतु त्या काळी इंग्रज सैन्याची फलटण असलेल्या मद्रास रेजिमेंटने या लढाईत पराक्रम गाजवला होता. या रेजिमेंटने Battle of Assaye नावाने हत्तीचे स्मृतिचिन्ह दिले होते.



marathwad_2  H
 
गेल्या 23 सप्टेंबरला शिवशंभू विचार दर्शनचे कार्यकर्ते रवींद्र सासमकर आणि त्यांच्या चमूने असई ग्रामस्थांसह या लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या मराठा सैनिकांना अभिवादन करून एक चांगला पायंडा पाडला. त्यांनी या परिसरातील विविध संस्था- संघटनांना सहभागी करून घेत ह.भ.प. संतोष महाराज आढावणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘असई रणसंग्राम अभिवादन समिती’ स्थापन केली आहे. लढाईत वीरमरण आलेल्या पॅट्रिक मॅक्सवेलचे थडगे इंग्रजांनी उभारले. त्याच्या अभिवादनासाठी अधिकृतपणे ब्रिटिश अधिकारी येतात. इंग्लंडच्या इतिहासात या वीराचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो, मात्र मराठा वीरांचा असा कुठलाही उल्लेख आपल्याला आपल्या इतिहासात सापडत नाही, हे दुर्दैव! आता मुख्य रस्त्यावर असई ग्रामस्थांनी उभारलेली युद्धभूमीचा उल्लेख असलेली एक कमान सोडता अन्य काही विशेष नोंद कुठेही नाही.

marathwad_1  H
 
 
7 ऑक्टोबर 2021ला सासमकर यांच्यासह मी, कैलास राठोड आणि सुहास आजगावकर असईला गेलो, तेव्हाही मुख्य गावाला नेणारा रस्ता बंद होता, कारण गावाशेजारून वाहणारी जुई नदी दुथडी भरून वाहत होती व त्यावरचा छोटा पूल पाण्याखाली होता. शेवटी शेतांतून दीड किलोमीटर वाट काढत व एका बांधार्‍याच्या भिंतीवरून नदी ओलांडत कसेबसे आम्ही युद्धभूमी स्मारकापर्यंत पोहोचलो. या काळात अशी स्थिती, तर 1803मध्ये काय परिस्थितीत आपले पूर्वज लढले असतील, याची कल्पना करता येते! आम्ही पॅट्रिकच्या थडग्याजवळ उभे होतो, तेव्हा तिथल्या शेतात घर असलेले एक आजोबा आम्हाला भेटले. कोपरी, धोतर अशा वेशातील 88 वर्षांचे इंगळे हे स्थानिक ज्येष्ठ नागरिक निवृत्त शिक्षक आहेत. अत्यंत खणखणीत शब्दांत व बारीकसारीक तपशिलासह त्यांनी या लढाईची माहिती दिली. हातातल्या काठीने जमिनीवर नकाशा काढून दाखवत लढाईत महत्त्वाचे मोर्चे कुठे व कसे होते याचे अगदी जिवंत वर्णन केले. इंगळे आजोबांसारखा चालता-बोलता माहितीकोश आवतीभोवती असताना या लढाईच्या महितीसाठी आपल्याला विकिपीडियाचा आधार घ्यावा लागतो. मराठवाड्यात इतिहासाच्या अशा अनेक पाऊलखुणा आहेत, पण कधी इतिहासाच्या पुस्तकांतून सर्वसामान्यांपर्यंत ही सगळी माहिती जात नाही. शिवशंभू विचार दर्शनने आता युवकांना सोशल मीडियाद्वारे याबद्दलची माहिती देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘भविष्य स्वत: घडवायचे असेल तर इतिहासाचा अभ्यास करा’ असे कन्फ्युशियस सांगून गेला. भोकरदनसारख्या छोट्या शहरात राहून आपला इतिहास, त्यातल्या वीरांची गाथा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची रवींद्र सासमकरांसारख्या युवा कार्यकर्त्यांची धडपड या दृष्टीने फार मोलाची आहे.

डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आहेत.