कोरोना संकटाशी झुंजणारा मराठवाडा

विवेक मराठी    05-Apr-2021   
Total Views |

@डॉ. प्रसन्न पाटील

सरकारी आणि खाजगी दोन्ही आरोग्य विषयातील सुधारणा हा एक स्वतंत्र चर्चेचा चिंतनाचा, तसेच आवश्यक असा विषय आहे. पण सद्यःस्थितीत मात्र मराठवाड्याला कोरोनाच्या घट्ट होत चाललेल्या विळख्यातून वाचवायचे असेल, तर या व्यवस्थांवर आरोप-प्रत्यारोप करून काहीच साध्य होणार नाही. त्यांना सहकार्य करणे, प्रोत्साहन देणे आणि आपली जबाबदारी ओळखून परस्पर समन्वयाने वागणे यातूनच हे शक्य होईल!


corona_3  H x W

कोरोनाच्या उद्रेकाला वर्ष झाले. मधल्या काळात जरा दबलेली साथ या महिन्यात पुन्हा वेगाने उसळी मारून वर आलेली आहे. संभाजीनगर, नांदेड, जालना, परभणी या शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान सुरू केले आहे. संसर्गित रुग्णांचे वेगाने वाढणारे आकडे आणि त्याचबरोबर रुग्णांची खाटा मिळवण्यासाठीची धावपळ यांच्या कहाण्या पुन्हा प्रसिद्ध व्हायला लागल्या आहेत. परवाच संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आपत्कालीन विभागातील एका खाटेवर तीन तीन रुग्णांना बसवून ऑक्सिजन लावलेला आहे आणि काही रुग्ण तिथेच जमिनीवर बसले आहेत असे छायाचित्र माध्यमांवर व्हायरल झाले आणि आरोग्य व्यवस्थेची दारुण अवस्था म्हणून अनेकांनी त्यावर दिवसभरात टिप्पणीदेखील केली. मराठवाड्यात संभाजीनगर, जालना नांदेड यांना उद्रेकाच्या दुसर्या लाटेचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तिन्ही शहरांत कमीअधिक प्रमाणात असेच चित्र सध्या दिसते आहे. एकट्या संभाजीनगर शहरात मार्चमध्ये नव्याने संक्रमित रुग्ण वीस हजाराहून जास्त आहेत. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण असह्य आहे. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरसोयी यावर लगेच प्रतिक्रिया येतात, पण भूतो..’ अशा या महामारीत या व्यवस्थेने जे काम केले आहे, त्याची तपशिलात माहिती फारच थोड्या लोकांना जाणून घ्यायची इच्छा असते!

 


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

एप्रिल 2020पासून मराठवाड्यात लॉकडाउन, स्थलांतरितांचे पायी चालत जाणारे तांडे, मदतकार्यांची महाशृंखला सगळे दिसले. जालना-संभाजीनगर रेल्वे मार्गावर पायी चालत जाताना बेसावध झोपलेले 16 मजूर मे 2020मध्ये रेल्वेखाली चिरडून हकनाक बळी गेले आणि कोरोनाच्या आरोग्यापलीकडच्या परिणामांचे भीषणत्व देशभर ठळकपणे दिसले. या काळात कडक लॉकडाउन, प्रचंड भीती आणि ताण यामध्ये सरकारी, खाजगी डॉक्टर, परिचारक ते थेट आशावर्कर, आरोग्य सेविका-सेवक, अंगणवाडी ताई यापैकी कोणीही आपली जबाबदारी झटकून घरी बसले नाही. या वर्षी महामारी जरा कमी होतेय असे वाटले आणि लोकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली. त्या काळात मराठवाड्यात इथले वैशिष्ट्य असलेले मोठे विवाहसोहळे आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली. कोविडच्या केसेस परत वाढल्या आणि आता संभाजीनगर, नांदेड आणि परभणी हे मराठवाड्यातील तीन जिल्हे पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये गेलेले आहेत.

या दुसर्या रुग्णसंख्यावृद्धीच्या काळात अनेक जणांनी शासकीय आणि खाजगी या दोन्ही व्यवस्थांविषयी ओरड करायला सुरुवात केली आहे. विशेषत: सरकारी आरोग्य सेवांचा दर्जा आणि खाजगीमध्ये आकारले जाणारे शुल्क याविषयी मराठवाड्यात माध्यमे समाजमाध्यमे यातून बरेच काही लिहून येत आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगात समाज म्हणून आपली सिद्धता किती आहे याची कसोटी लागते. आरोग्य व्यवस्था आणि डॉक्टर-कर्मचारी यांना बोल लावताना समाजातील इतर घटकांनीदेखील आपली कर्तव्ये आणि कोविडसंदर्भातील बंधनांचे पालन किती कसोशीने केले आहे, याचाही विचार व्हावा.


corona_1  H x W

संभाजीनगरच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांना या विषयावर बोलते केले. एखाद-दुसरा डॉक्टर अथवा दवाखाना क्वचित गैरप्रकार करताना आढळलाही असेल; पण यावरून सरसकट सर्व खाजगी वैद्यकीय व्यवस्था लुटारू आहे, त्यांना लोकांच्या आरोग्याचे काही पडलेले नाही अशा प्रकारची प्रतिमा समाजमाध्यमांनी तसेच प्रशासनानेही निर्माण केल्यामुळे या व्यवस्थेवर अवास्तव निर्बंध लादण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून सर्व प्रकारचे प्रयत्न खाजगी वैद्यकीय क्षेत्राने केलेले आहेत.

बाल-शल्यविशारद झाल्यावर खाजगी व्यवसाय करता मुद्दाम ठरवून शासकीय सेवेत जाणारे डॉ. सुनील शिंदे (परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय) यांच्या मतेशासकीय आरोग्य यंत्रणेने पहिल्या सहा-आठ महिन्यांत या महामारीत केलेले काम अतुलनीय आहे. आता मात्र या यंत्रणांवर असह्य ताण येत आहे. परभणीसारख्या निमशहरी भागात ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, जनप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, संघटना आणि आरोग्य व्यवस्था यांचा समन्वय आणखी चांगला व्हायला हवा.”


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

 

मूळचे मराठवाड्यातील पण सध्या डोंबिवलीजवळच्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड यांनीही हीच भावना व्यक्त केली. “शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामांची तुलनाच होऊ शकत नाही. नातेवाइकांनी पाठ फिरवल्यामुळे गंभीर अवस्थेत एकट्या पडलेल्या कोरोनाग्रस्ताच्या घरून जाऊन त्याला तेथून आणण्यापासून ते त्यांच्या उपचाराची सोय करण्यापर्यंत आणि प्रसंगी अंत्यविधीची व्यवस्था लावण्यापर्यंत कामे आमच्या टीमला करावी लागली. आरोग्य व्यवस्थेला दोष देणार्यांनी त्या व्यवस्थेला पूरक कामे केली तर पुष्कळ गोष्टी सुगमतेने होतीलअसे त्यांचे मत आहे.



corona_2  H x W

संभाजीनगरच्या साई-मेडिसिटी हॉस्पिटलचे प्रमुख कोरोना व्यवस्थापनामध्ये जागृतीत सतत कार्यरत डॉ. विशाल ढाकरे यांच्या मतेजागृती आणि उपचार या दोन्ही आघाड्यांवर आणखी खूप काम करावे लागणार आहे.” डॉक्टरांनी स्वत: सेवांकुरच्या माध्यमातून पन्नासेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पहिल्या लॉकडाउनच्या काळात दीड लाख लोकांपर्यंत कोरोनाविषयक माहिती पोहोचवण्याचे काम केले. जेव्हा लोकांमध्ये प्रचंड भीती होती, तेव्हा सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेत ही मुले संभाजीनगरला गल्लोगल्ली जात, प्रबोधन करीत आणि लोकांना धीर देत.

संभाजीनगरसारखाच प्रचंड उद्रेक जिथे जाणवतो आहे ते शहर म्हणजे नांदेड. रुग्णांची संख्या आणि मृत्युदर वाढलेला आहे. नांदेडचे उरो-शल्यचिकित्सक आणि एका कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संतोष देबडवार यांच्या मतेनांदेडला लोकांचेकोविड-ॅप्रोप्रिएट बिहेव्हिअरअजिबातच दिसत नाही. अपुर्या कर्मचार्यांनिशी आम्ही अक्षरश: चोवीस तास सैनिकांप्रमाणे झुंजत आहोत. अशा वेळी शाबासकीची थाप जरी नाही मिळाली, तरी सहकार्य तरी मिळावे ही अपेक्षा!”

मराठवाड्यात 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, 5 जिल्हा रुग्णालये, 3 महिला रुग्णालये, 100 खाटांची 5 उप-जिल्हा रुग्णालये, 50 खाटांची सुविधा असलेली 12 उपजिल्हा रुग्णालये, 67 ग्रामीण रुग्णालये आणि 347 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तरीही सार्वजनिक आरोग्याच्या महत्त्वाच्या निर्देेशांकामध्ये मराठवाडा महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा मागे आहे. 2013मध्ये केळकर समितीने याची सविस्तर नोंद घेऊन ठेवली होती. बालमृत्युदर जास्त, तर मुलींच्या जन्माचा दर कमी आहे, एक लाख लोकसंख्येमागे उपलब्ध खाटांचे प्रमाण मराठवाड्यात सर्वात कमी आहे हेही त्यांनी नोंदवून ठेवले आहे. या सगळ्या व्यवस्था आज कोरोना प्रतिबंध कामाला लागलेल्या असल्या, तरी सार्वजनिक आरोग्य प्रश्नांची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे.

सरकारी आणि खाजगी दोन्ही आरोग्य विषयातील सुधारणा हा एक स्वतंत्र चर्चेचा चिंतनाचा तसेच आवश्यक असा विषय आहे. पण सद्यःस्थितीत मात्र मराठवाड्याला कोरोनाच्या घट्ट होत चाललेल्या विळख्यातून वाचवायचे असेल, तर या व्यवस्थांवर आरोप-प्रत्यारोप करून काहीच साध्य होणार नाही. त्यांना सहकार्य करणे, प्रोत्साहन देणे आणि आपली जबाबदारी ओळखून परस्पर समन्वयाने वागणे यातूनच हे शक्य होईल!

 


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik



डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आहेत.