लावण्याच्या निमित्ताने..

विवेक मराठी    02-Feb-2022   
Total Views |
तामिळनाडूतील शालेेय विद्यार्थिनीने धर्मपरिवर्तनाच्या दबावाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. त्या निमित्ताने मराठवाड्यातील नव्याने उगवलेली आणि संभ्रमित करणार्या नावांची प्रार्थनास्थळे, सेवा कार्याच्या आवरणाखालील धर्मांतरण, जातीय लाभ मिळविण्यासाठी केले जाणारे छद्म धर्मांतरण यांकडे लक्ष वेधणारा लेख.

praying girl 

गेल्या आठवड्यात तामिळनाडूत लावण्या या किशोरीने आत्महत्या केली. शाळेत धर्मपरिवर्तनासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकला जायचा. तिची अवहेलना केली जायची. या त्रासाला कंटाळून अखेर या बालिकेने दुर्दैवी रितीने स्वत:लाच संपविले. तामिळनाडूत आणि देशभरात निषेधाचे काही मोजके सूर उमटले, परंतु मुख्य प्रवाहातील माध्यमांना या घटनेची दखल घ्यावीशी वाटली नाही.
 
बळजबरीने, प्रलोभनाने धर्मांतर घडवून आणणे हा आपल्या देशाला पोखरत चाललेला रोग आहे. मराठवाड्यात आणि खानदेशातही या रोगाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. 2015मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एका दुर्गम गावातील अनुसूचित जमातीतील एक कन्या ‘चांगल्या शिक्षणाच्या’ नावाखाली सुदूर पुद्दुचेरीत नेली. तिचा तिकडे संशयास्पद मृत्यू झाला. त्यावर मोठा मोर्चा निघाला, पण प्रकरणाची खोलवर चौकशी झाली नाही. मराठवाड्यात अनेक शहरांत एका विशिष्ट धर्माच्या ‘तेलपाणी’ बाबांचे किस्से कुप्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी दर गुरुवारी मराठवाड्यातून मनमाडला जाणार्या पॅसेंजर रेल्वेत अशा बाबाकडे जाणारी आजारी गोरगरीब लोकांची गर्दी असायची. संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतही असेच पुष्कळ किस्से आहेत. एरव्ही हिंदूंच्या श्रद्धांवर, त्यातल्या अगदी निरुपद्रवी परंपरांवरदेखील कडाडून तुटून पडणार्या समस्त अंधश्रद्धाविरोधी व स्वयंघोषित पुरोगामी मंडळींनी कधी या तेल, पाणी आणि प्रार्थना यांच्या मिश्रणाने कितीही गंभीर रोग बरे केल्याच्या दाव्यांबद्दल आंदोलन केल्याची बातमी कुठल्याही वृत्तपत्राच्या अगदी कोपर्यातही कुठे वाचण्यात आली नाही!
 
संभाजीनगर शहरातील नव्याने वसलेल्या उपेक्षित वस्त्यांत अनेक ‘प्रार्थनास्थळे’ अचानक सुरू होतात. शहरातील वस्त्यांची जातवार रचना पाहता या ‘पंथाचा’ एकही अनुयायी वस्तीत किंवा अगदी परिसरातही नसताना ही प्रार्थनास्थळे उभी राहतात. स्थानिक लोकांना संभ्रम निर्माण व्हावा यासाठी या ‘प्रार्थनास्थळांची’ नावेदेखील ‘पाटील ुु’, ‘शास्त्री ुु’ अशी दिलेली असतात! या वस्त्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. तिथे पगारी धर्मप्रचारक विविध आमिषे दाखवून धर्मांतरणाचे प्रयत्न करतात आणि पाहता पाहता ‘साप्ताहिक प्रार्थनेला’ गर्दी जमायला लागते! महानगरातील ही कार्यपद्धती मराठवड्यातील खेड्यांत थोडी बदलली जाते. काही वर्षांपूर्वी जिंतूर तालुक्यातील गावांत प्रार्थनेने कुठलाही आजार त्वरित दुरुस्त करणारी मंडळी सक्रिय झालेली होती. वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध नसणे आणि आजारांबद्दलचे अज्ञान याचा गैरफायदा घेत विशिष्ट प्रार्थनेचा आणि मग पंथात येण्याचा आग्रह धरला जातो. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरातही असे प्रयत्न अधूनमधून होत असतात. मराठवाड्याचा आणि कर्नाटकाचा उत्तर भाग यातील सीमाभागात या कारवाया मध्येच उफाळून येतात.
शिक्षण आणि आरोग्य यासारखे सर्वदूर आवश्यकता असणारे विषय धर्मांतरासाठी वापरले जातात, हे आपले दुर्दैव आहे. सेवा कार्याचे आवरण घेत धर्मांतरण हा भारतात कित्येक पिढ्यांपासून चालविलेला विषय आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद हे एकदा बिहारमधील एका मेळाव्यात गेले होते. ‘देशाबाहेरून आलेल्या’ मंडळींनी इथे गरजू लोकांसाठी सेवा कामे सुरू केली, याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले, पण त्याच वेळी “तुम्ही यातून लोकांचे धर्मपरिवर्तन करता हे काही बरोबर नाही. लोकांना त्यांच्या मूळापासून तोडणे गैर आहे” या शब्दांत कानउघडणीदेखील केली. त्यांच्या या बोलण्यानंतर सेवा आणि धर्मांतर याबद्दल नेहमीच चर्चेत राहिलेल्या आणि नंतर जगप्रसिद्ध झालेल्या व्यक्तीने नि:संदिग्धपणे “लोकांचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी नाही, तर मग कशासाठी सेवा करायची?” असे उत्तर दिल्याचा किस्सा सुप्रसिद्ध आहे.
 

praying girl 
 
भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला स्वत: हव्या त्या पंथविचारांचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कायद्याने प्रौढ व्यक्ती स्वखुशीने याबद्दल निवड करूच शकतो. मात्र प्रलोभन, कोंडी किंवा दडपशाहीच्या मार्गाने आपला पंथविचार दुसर्यावर लादणे ही अनैतिक गोष्ट आहे. त्यातून दूरगामी सांस्कृतिक बदल घडवून आणले जातात. प्रश्न केवळ उपासनापद्धतीचा नाही. अशा अनैतिक धर्मांतरणातून देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचे अनेकानेक प्रयत्नदेखील झाले, हा इतिहास आहे. 1954मध्ये मध्य प्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारने नेमलेल्या ‘न्या. नियोगी आयोगाचा’ अहवाल जेव्हा प्रसिद्ध झाला, तेव्हा भारतातील ‘फसवणुकीने धर्मांतराच्या’ धंद्यामध्ये एकच खळबळ माजली होती. पण त्यानंतरही पुढे सातत्याने या घटना वाढतच राहिल्या, कारण या कामासाठी अमर्याद निधी मिळत गेला आणि बौद्धिक-राजकीय विमर्श नेहमीच त्याच्या पाठीशी हेतुत: उभा केला गेला.
मराठवाड्यातील अनुसूचित जातींतील काही जातींना लक्ष्य करून धर्मांतराचे प्रयत्न केले जातात. यात आता भर पडली आहे ती ‘क्रिप्टो’ किंवा ‘छद्म’ पद्धतीची. नाव-आडनाव किंवा कागदोपत्री जात-धर्म न बदलता उपासनापद्धती बदलून ‘कळपात’ ओढण्याची ही पद्धत. हिंदूंतील अनुसूचित जातींसाठीचे आरक्षण धर्मांतर करूनही कायम राहावे यासाठीची मोठी चळवळ भारतात झाली. परंतु धर्मावर आधारित आरक्षण राज्यघटनेस मान्य नाही. त्यामुळे मागच्या दाराने, रंगनाथ मिश्र आयोग नेमून ही असांविधानिक गोष्ट यूपीए सरकारने जवळजवळ घडवूनच आणली होती. आपल्या समाजातील जागृत मंडळींच्या विरोधाने ती गोष्ट टळली. मात्र यावर पर्याय म्हणून क्रिप्टो पद्धतीने धर्मांतराची गती वाढवलेली मराठवाड्यात तरी दिसते. धुळे-नंदुरबार परिसरातील वनवासी बांधवांना, संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत अनुसूचित जातींना, तर लातूर-धाराशीव जिल्ह्यांत भटक्या विमुक्त जमातींना लक्ष्य करून धर्मांतर करण्याचे चालविलेले प्रयत्न त्या त्या समाजघटकांतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या चिंतेचा विषय आहेत.
 
यातील अनैतिक आणि लबाडीच्या मार्गांबद्दल आवाज उठविला की मराठवाड्यात कार्यकर्त्यांवर ‘घरवापसी’चे कथित कार्यक्रम केल्याचा आरोप करत माध्यमांतून मोठी कोल्हेकुई केली जाते. पण स्वयंप्रेरणेतून परत आपल्या मूळ उपासनापद्धतीत परत येऊ पाहणार्यांना या ढोंगी उदारमतवादी पंथांतील धर्मगुरूंनी उभारलेले अडथळे आणि दिलेला त्रास याची उदाहरणेही मराठवाड्यात काही कमी नाहीत. 2005मध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात स्वयंस्फूर्तीने ‘नवा पंथ’ सोडून बौद्ध धम्म दीक्षा घेणार्या बांधवांना अडविण्यासाठी अनेक प्रलोभने दाखविण्यात आली आणि अडथळे आणले गेले होते.
‘अनैतिक आणि लबाडीने धर्मांतरण’ विषयाची खुली चर्चा झाली आणि या प्रकारांना आळा बसला, तर ‘लावण्या’चे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
डॉ. प्रसन्न पाटील 9822435539

डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आहेत.