तथागतांच्या शिष्या

विवेक मराठी    13-May-2022   
Total Views |
प्रत्यक्ष धम्मसाधनेत आणि ज्ञान उपासनेत कोणताही भेदभाव न बाळगता स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन भगवान गौतम बुद्धांनी स्त्रियांसाठी साधनेचा, मोक्षाचा मार्ग खुला केला. हा मार्ग स्त्रीला पुरुषाइतकाच सहज-सुलभ आहे व त्यामध्ये स्त्रीत्व-पुरुषत्व असा काहीही भेद नाही, हे आपल्या आचारातून दाखवून दिले. माता गौतमी हिने आनंदाच्या साह्याने संघात मिळवलेला प्रवेश हा भारतीय स्त्रियांच्या इतिहासात निश्चितच सुवर्णक्षण होता.

buddha
भारतात बुद्धपूर्व काळात वैचारिक घुसळण मोठ्या प्रमाणात सुरू होती. उपनिषदांनी सुरू केलेल्या वैचारिक क्रांतीच्या वृक्षाला फळे लागू लागली. उपनिषदकारांनी वेदांमधील बाजूला पडलेल्या प्रश्नांवर काम करणे सुरू केले. मात्र हा ज्ञानमार्ग अवलंबणारे संख्येने तितकेसे जास्त नव्हते. त्याऐवजी पारंपरिक यज्ञमार्गाला अनुसरणारे लोकच अधिक प्रमाणात होते. संसारातील सुखोपभोग, यज्ञाने देवतांना संतुष्ट करणे, भरपूर काम करणे, स्वर्गप्राप्ती, आनंद, आयुष्याची कामना करणे, दुधातुपाने समृद्ध असणे या वैदिक काळातील समृद्धीच्या कल्पनांचे कर्मकांडात रूपांतर झाले होते. एकेकाळी स्त्री-पुरुष समानता मांडणारी समाजरचना आता पुरुषसत्ताक झाली होती. इतिहासाच्या दृष्टीने या कालखंडाला ‘उत्तर वैदिक कालखंड’ असे म्हटले जाते.
 
या बौद्धिक कोलाहलात आत्मा, ब्रह्म, जग सांत की अनंत यासारख्या चर्चांमध्ये गुंतून गेलेल्या थोर लोकांशिवाय मोठ्या प्रमाणावर असलेल्या बहुजन समाजाला हे अध्यात्ममार्ग आपल्यासाठी नाहीतच की काय असे वाटावे, अशी परिस्थिती होती. स्त्रियांची अवस्था तर त्याहूनही बिकट होती.

अशा परिस्थितीमध्ये गौतम बुद्धांंनी दु:खनिवृत्तीसाठी सोपा, सरल, लोकांना समजेल असा मार्ग शोधून काढला आणि त्या मार्गावर त्यांना अनुसरणारे कितीतरी लोक जोडले जाऊ लागले. हा मार्ग सुरुवातीला पुरुषांसाठीच खुला ठेवण्यात आलेला होता. स्वत: गौतम बुद्ध स्त्री-पुरुष अशा भेदाच्या पलीकडे गेलेले असले, तरी सामाजिक स्थिती ते जाणत होते. अशा परिस्थितीमध्ये पुरुषसत्ताक मन:स्थिती असलेल्या समाजात, स्त्रियांना मोक्षमार्ग उपलब्ध करून देणे हे कार्य सोपे नाही, याचे त्यांना भान होते.

परंतु त्यांची मावशी, जिने आईच्या माघारी सिद्धार्थ गौतमाचे पालन-पोषण केले होते, त्या महाप्रजापती गौतमी यांनी भगवान बुद्धांना स्त्रियांना संघात प्रवेश द्यावा अशी गळ घातली. तरीही त्यांनी ही विनंती तीन वेळा नाकारली. मात्र अखेरीस जेव्हा कशायवस्त्र घालून मुंडन केलेल्या आपल्या मातृतुल्य मावशीला त्यांनी बघितले, त्यानंतर काही अटी घालून त्यांनी स्त्रिया संघात येऊ शकतील, दीक्षित होऊ शकतील - प्रवज्जा घेऊ शकतील हे मान्य केले.

या अटींबाबत अनेकदा गौतम बुद्धांवर असमान वागणुकीचा ठपका ठेवला जातो, कारण यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुष भिख्खूंना अधिक मान दिलेला आहे. मात्र अशा प्रकारचा आरोप करणारे एक गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित करतात, ते म्हणजे या बाह्य अटी जरी असमानता दर्शवणार्‍या असल्या, तरी प्रत्यक्ष साधनेमध्ये गौतम बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्रियांना कमी लेखले नाही. जी साधना पुरुष साधक करत असत, जे उपोसथ पुरुष साधकांसाठी असे, तेच स्त्री साधकालाही उपलब्ध होते. प्रत्येक स्त्री बोधी प्राप्त करू शकत होती. प्रत्येक स्त्री धम्माचा उपदेश करू शकत होती. गाथा रचू शकत होती आणि निर्वाण प्राप्त करू शकत होती.

बोधिप्राप्तीसाठी धम्मामध्ये दिलेली ही पूर्ण समानता, संपूर्ण बौद्धिक स्वातंत्र्य हे त्या काळातील खरे तर खूप मोठे आश्चर्य होते! कारण तत्कालीन समाजरचनेनुसार स्त्रीचा दर्जा सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांपेक्षा खालचा मानला जात होता. मात्र धम्मासारख्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये स्त्रीला आपली बौद्धिक कुवत सिद्ध करण्याची संधी गौतम बुद्धांनी दिली. हे क्रांतिकारक पाऊल होते.
 
या क्रांतीची सुरुवात त्यांच्या बोधिप्राप्तीपूर्वीच्या एका घटनेपासून होते. जातक अठ्ठकथेच्या निदानकथेमध्ये सुजाताची कथा आहे! या कथेत अनेक रूपके आहेत. सुजाता ही भगवान गौतम बुद्धांची पहिली शुभचिंतक आहे. तपश्चर्या करून आपले शरीर अत्यंत कृश झाल्यानंतर, त्याने बोधिप्राप्ती होत नाही हे भगवान बुद्धांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आहार घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यामुळे हा पथभ्रष्ट झाला म्हणून त्यांचे पाच सोबती त्यांना सोडून गेले. अशा वेळी एका वटवृक्षाच्या सावलीत बसले असताना आपला पुत्रप्राप्तीचा नवस फेडण्यासाठी सुजाता ही श्रीमंत घरातील स्त्री सुवर्णपात्रात पायस म्हणजे खीर घेऊन आली. तिने वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमांना ती खीर अर्पण केली. पिंडपात स्वीकारण्यासाठी गौतमांकडे काष्ठ पात्र अथवा मृत्तिका पात्र नव्हते. तिने हात पुढे केलेल्या बुद्धांच्या हातात ते सुवर्णपात्र ठेवले व म्हणाली, “आर्य, हे मी तुम्हाला दिले आहे, आपण याचे सेवन करून मला कृतार्थ करावे. माझे मनोरथ या वटवृक्षाने पूर्ण केले, तसे तुमचेही पूर्ण होवोत.” आणि ती पात्रात थोडाही जीव न अडकवता निघून गेली. नंतर पायस सेवन केल्यावर ते पात्र बुद्धांनी नदीत सोडले व मनात म्हटले की मला बोधिप्राप्ती होणार असेल, तर हे पात्र नदीप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल. तसेच घडले! निर्मोही सुजाताचे शुभचिंतन खरे ठरले.


buddha
बुद्धांना बोधिप्राप्ती झाल्यानंतर जेव्हापासून त्यांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिला, तेव्हापासून कितीतरी स्त्रियांनी साधना करून आपली योग्यता सिद्ध केली. इसवीसनपूर्व सहाव्या शतकापासून इसवीसनाच्या पहिल्या शतकापर्यंत कितीतरी स्त्रियांनी बोधी प्राप्त केली. थेरी गाथा रचून इतिहास घडवला. धम्मावर प्रवचने केली. विविध विषयांवर त्या बोलू शकल्या. त्यांच्या साहित्याला त्रिपिटकात मानाचे स्थान मिळाले. आपली गुणवत्ता त्यांनी विविध मार्गांनी सिद्ध केली.

यातल्या किसा गौतमीची कथा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.किसा म्हणजे कृश असलेली गौतमी आपल्या अपत्याच्या मृत्यूनंतर शोकाने वेडी झाली. या किसा गौतमीला बुद्धाने “जेथे मृत्यू झालेला नाही, अशा घरातून मोहर्‍या आण” असे म्हटले. असे एकही घर नाही हे तिच्या लक्षात आल्यावर तिने शोक टाकून दिला आणि ती भिक्षुणी झाली. तिने रचलेली गाथा पुढीलप्रमाणे आहे -

न गामधम्मो नो निगमस्स धम्मो
 
न चापियं एककुलस्स् धम्मो
सव्व लोकस्स सदेवकस्स
एसेव धम्मो यदिद अनिच्चता ति.
भावार्थ - अनित्यता हा ग्राम, नगर, कुल, देव, मनुष्य या सर्वांचाच सामान्य धर्म आहे.

बौद्ध साहित्यात ‘मार’ नावाची एक संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. हा मार म्हणजे काम लोकांचा अधिपती होय. हा नेहमी ध्यान आणि वैराग्याच्या वेळी उपस्थित होतो आणि आपल्याबरोबर सहस्र कन्या आणि पुत्रांचे सैन्यही घेऊन येतो, असे म्हटले जाते. भगवान गौतम बुद्धांनीदेखील या माराशी युद्ध करून त्याचा पराजय केल्याचे अनेक सुत्त आहेत.

संयुक्तनिकायामध्ये सोमा भिक्खुणीची कथा येते. ही भिक्खुणी श्रावस्थीमध्ये ध्यान करण्यासाठी बसलेली असताना मार आला आणि तिच्या मनात शिरून म्हणाला, “अगं सोमा! जे स्थान ऋषिमुनींनाही मिळत नाही, ते तुझ्यासारख्या दोन बोटांइतकी बुद्धी असलेल्या स्त्रीला कसे मिळेल? त्यापेक्षा सोडून दे हे सारे काही.”

आपल्याला ज्ञानापासून दूर करण्याचा माराचा उद्देश तिने ओळखला. आपल्याला न्यूनगंड यावा म्हणून, भाताच्या शिताची परीक्षा करताना आपण दोन बोटे वापरतो, तितकीच बाईला बुद्धी असते, असे तो मुद्दाम म्हणत आहे हे तिने जाणले. मग तिने एक गाथा म्हटली. ती गाथा म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये जागृत झालेल्या लिंगभेदविरहित विचाराचे उच्चतम उदाहरण आहे. स्त्री म्हणून स्वत:ला सोमा कुठेच कमी लेखत नाही, किंबहुना ही जाणीव शुद्ध ज्ञानात नसतेच, हे तिने ठामपणे सांगितले.

गाथेत सोमा म्हणते, ‘अरे मारा! चित्त सुस्थितीत असताना, ज्ञान उपलब्ध झालेले असताना आणि धम्माची सम्यक ओळख झालेली असताना स्त्रीत्व काय करेल? ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ’मी स्त्री आहे पुरुष आहे किंवा विशेष आणखी कोणी आहे’ अशा काही भावना असतील, त्यांनाच उद्देशून तुझे म्हणणे योग्य ठरेल. माझ्यासाठी तर तुझ्या म्हणण्याचे काही औचित्य उरलेले नाही. हे तू लक्षात घे आणि येथून दूर हो पाहू.’

मगधाचा राजा बिंबिसार याच्या सुस्वरूप राणीची - खेमाची तर आणखीनच वेगळी कहाणी आहे! तिला आपल्या रूपाचा खूप गर्व होता आणि पतीला वाटायचे की एकदातरी तिने गौतम बुद्धांचे दर्शन घ्यावे. पण तिला आपल्या सौंदर्याचा आणि वैभवाचा गर्व होता. आपण ज्याला मोठे विहार आणि वने दान केली आहेत, त्याच्याकडे कशाला जायचे, असे तिला वाटत असे. परंतु एकदा भिक्षूंना चिवरदान करण्यासाठ खेमा एका विहारात गेली. त्या वेळी तिला आपल्यासमोर आणि आपल्यामागे तरुण रुग्ण आणि वृद्ध अशी तिची स्वत:चीच रूपे दिसू लागली. हे सारे पाहिल्यावर तिने गर्वाचा त्याग करून तथागतांकडून धम्मदीक्षा घेतली.

खेमा नावाची आणखी एक बुद्धिमान अशी भिक्खुणी होऊन गेली. राजा प्रसेनजित आणि तिच्या मनुष्यजन्म व अवस्था, अव्याकृत या संबंधीच्या संवादाचे व प्रश्नोत्तरांचे वृत्त संयुक्त निकायात येते.

कजंगलिका नावाच्या भिक्षुणीला काही उपसकांनी तथागतांच्या उपदेशाचे सार विचारले. तिने सविस्तरपणे कथन केले. नंतर ती नम्रपणे म्हणाली की “आपण माझ्या साराला अंतिम न मानता तथागतांकडून परीक्षण करून घ्यावे.” नंतर या उपसकांनी गौतम बुद्धांना हा प्रसंग सांगितला असता ते म्हणाले, “भिख्खुनी कजंगलिका महाप्रज्ञ आहेत. मीही तेच सांगितले असते.” विनयपिटकात हा संवाद आहे.

विशाखा ही अंगराज्यातील कन्या. लहान वयातच गौतम बुद्धांच्या हितकर उपदेशामुळे तिचे मन धम्मानुकूल झाले होते.नंतर पुण्यवर्धन या श्रीमंत घराण्यात तिचा विवाह झाला. बौद्ध भिक्खूंविषयी तिला ममता वाटत असे. ती त्यांना अन्न-वस्त्र-औषधे सातत्याने पुरवीत असे. श्रावस्तीच्या पूर्व दिशेला असलेले मोठे उद्यान तिने संघाला दान केले होते. तिचे औदार्य, तिची श्रद्धा आणि तिचा थोरपणा यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्मप्रसारासाठी तिच्याकडून भरपूर अर्थसाह्य मिळाले. यासाठी तिने आपल्या पतीचे व सासू-सासर्‍यांचे मन धम्माला अनुकूल करण्यामध्येही यश मिळवले.

उत्पलवर्णा या भिक्षुणीने माराला दिलेले सणसणीत उत्तर तर थेरी गाथेतील विशेषच आहे. स्त्रियांच्या सौंदर्याची स्तुती केली, त्यांना शील-चारित्र्यावर डाग पडण्याची भीती घातली की त्या वळणावर येतात असा माराचा समज असतो. हा मार समाजातील बोलघेवडे सामान्य जनांचा प्रतिनिधी.

उत्पलवर्णाच्या गाथेचा र्‍हीस डेव्हिड्स यांनी सुंदर इंग्लिश अनुवाद केला आहे, तो असा -
Where there and hundred thousand seducers-e'n such as thou art.
Ne'er would a hair of me stiffen or tremble- alone what canst thou do?
For, all my mind is self controlled.
Like Spears and jav'lins are the joys of sense.
That pierce and rend the mortal frames of us,
These that thou speak'st of as the joys of life-
Joys of that ilk, to me are nothing worth.
अशा कितीतरी कथा थेरी गाथेत आढळतात. भगवान बुद्धांच्या कालखंडातील कितीतरी भिक्षुणींच्या कथा व गाथा आहेत. तिस्सा, धीरा, पुन्ना, मित्ता, भद्दा, सोना, सकुला, शीला, सुमेधा, इसीदासी, सुंदरी, रोहिणी, विजया, अनुपमा, सुजाता, पटाचारा, अभया, धम्मादिना, उत्तरा, सुमना, सुमंगलमाता, चित्ता, मेत्तिका, नंदा, मित्तकाली, दंतिका, उव्विरी, विमला, जयंती, संघा, चाला, अंबपाली, गुप्ता, शुभा, वशिष्ठी या भिक्खुणींनी मुख्य मार्गावर अध्यात्ममार्गावर बौद्धिक प्रगती साधली आणि ज्ञानावर व निर्वाणावर स्त्रीचा पुरुषाइतकाच अधिकार आहे, हे सिद्ध केले.

इसवीसनपूर्व सहाव्या शतकात सुरू झालेली ही ज्ञानगंगा कितीतरी शतके भारतामध्ये वाहत होती. संघामित्रा, उत्तरा, हेमा, अग्निमित्रा यासारख्या अनेक भिक्खुनी उत्तर कालखंडातही बौद्ध संप्रदायावर आपली छाप सोडून गेल्या आहेत.

स्त्री-पुरुष समानता वगैरेचे ढोल न वाजवता, शांतपणे सामाजिक आचारांना अटींमध्ये ठेवून, मात्र प्रत्यक्ष धम्मसाधनेत आणि ज्ञान उपासनेत कोणताही भेदभाव न बाळगता स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन भगवान गौतम बुद्धांनी स्त्रियांसाठी साधनेचा, मोक्षाचा मार्ग खुला केला. हा मार्ग स्त्रीला पुरुषाइतकाच सहज-सुलभ आहे व त्यामध्ये स्त्रीत्व-पुरुषत्व असा काहीही भेद नाही, हे आपल्या आचारातून दाखवून दिले. माता गौतमी हिने आनंदाच्या साह्याने संघात मिळवलेला प्रवेश हा भारतीय स्त्रियांच्या इतिहासात निश्चितच सुवर्णक्षण होता.