साहित्यातील समरसता भाव उलगडणारे संमेलन

विवेक मराठी    14-Jul-2022   
Total Views |
नागपूर येथे 2 व 3 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या समरसता साहित्य संमेलनाच्या केंद्रस्थानी ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’ हा विषय केंद्रस्थानी होता. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अक्षयकुमार काळे होते. या समरसता साहित्य संमेलनाचा सविस्तर वृत्तान्त.
 
 
samrasta
‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून, डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात समरसता साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित हे 19वे संमेलन आहे.
 
 
 
दिनांक 2 जुलै 2022 रोजी सकाळी 8 वाजता नागपुरातील सिव्हिल लाइन्स परिसरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजवलेल्या पालखीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ग्रंथसंपदा मानाने ठेवली होती. अण्णा भाऊ साठेंच्या जयघोषात ग्रंथदिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत पोहोचली. डॉ. विजय राठोड (नागपूर) यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदपुरे सर, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, संमेलन कार्यवाह डॉ. नाईकवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक दिंडीत सामील झाले होते. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रंगावलीचे, चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन मा. संमेलनाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. दामोदर परकाळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
 
 
व्यासपीठाला बुद्धवासी गुरुदेव सरोदे या समरसतेला समर्पित व्यक्तीचे नाव देण्यात आले होते. समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील यांनी यापूर्वीच्या संमेलनांचा आढावा घेतला. त्यानंतर माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याकडून नूतन अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. अतिशय हृद्य अशा मनोगतात पद्मश्री प्रभुणे यांनी संमेलनाच्या कार्याचा गौरव केला. संमेलनाचे उद्घाटक खासदार तरुण विजय यांनी ओजस्वी मार्गदर्शन केले.
 
 
 
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अक्षयकुमार काळे यांनी संतसाहित्यात असलेल्या समरसता मूल्याची उपस्थिती अनेक उदाहरणे देत सांगितली. तसेच अर्वाचीन कवी कुसुमाग्रज, केशवसुत, नामदेव ढसाळ यांच्या साहित्यात असलेले समरसता मूल्य प्रकाशात आणले. जात, धर्म, वंश या भेदांच्या भिंती दूर करून मानवतेच्या प्रांगणात आपल्याला आपला समाज न्यायचा आहे, त्यासाठी समरसता भाव अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे त्यांनी सांगितले. ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामधील समरसता’ या दिशेने त्यांनी उत्तम मांडणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक अलोणी व शलाका जोशी (नागपूर) यांनी केले.
 
 
2 व 3 जुलै हे दोन्ही दिवस संमेलनाला आलेल्या श्रोतृवर्गासाठी बौद्धिक मेजवानी होती. संमेलनातील चार परिसंवाद वैचारिक घुसळण करणारे होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या अभ्यासकांनी आपापल्या विषयांना न्याय दिला व ऐकणार्‍यांना विचारप्रवृत्त केले. परिसंवादाचे विषय व वक्ते यांची सूची पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की अण्णाभाऊंच्या साहित्याचा चौफेर आढावा येथे घेण्यात आला.
 
 
पहिला परिसंवाद ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’ या विषयाला समर्पित होता. परिसंवादाचे अध्यक्ष होते अमरावती येथील अभ्यासक डॉ. अरविंद देशमुख. वक्ते आणि त्यांचे विषय पुढीलप्रमाणे होते -
 
 
 
1) काव्य आणि शाहिरी : राष्ट्रीय जाणिवा - डॉ. भास्कर म्हरसाळे, नाशिक., 2) अण्णाभाऊंचे कादंबरीविश्व आणि राष्ट्रीयता - डॉ. कोमल ठाकरे, नागपूर., 3) कथावाङ्मयातील राष्ट्रीयतेची सूत्रे - श्री. शिवा कांबळे, नांदेड. गजानन होडे यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
 
 
दुसरा परिसंवाद होता ‘अण्णा भाऊ साठे : समतेचा पथिक’ या विषयावर. अध्यक्षपदी पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे (वाशिम) होते. यात डॉ. धनंजय भिसे यांनी ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील सामाजिकता’ हा विषय मांडला. ‘अण्णाभाऊंचे साहित्य आणि गावगाडा’ यावर डॉ. अंबादास सकट (कन्नड) यांनी अनेक उदाहरणे देऊन उत्तम विषय मांडणी केली. ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्रीजीवन’ या विषयावर डॉ. उज्ज्वला हातागळे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली, तर ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील प्रादेशिकता’ हा विषय नाशिक येथील अभ्यासक हेमंत चोपडे यांनी मांडला. काशीनाथ पवार (पुणे) यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
 

samrasta
 
तिसरा परिसंवाद साहित्यात असलेल्या समरसतेच्या दृष्टीकोनाचा आढावा घेणारा होता. विषय होता ’नव्वदोत्तर साहित्यातील समरसता’. अध्यक्षपदी समसरता सहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. श्यामाताई घोणसे होत्या. अध्यक्षीय समारोपात त्यांनी अनेक प्रकारच्या काव्य-कादंबर्‍यांची उदाहरणे देऊन या विषयाचे बहुपेडी स्वरूप स्पष्ट केले. या परिसंवादात वक्ते व विषय पुढीलप्रमाणे होते -
 
 
 
1) विविध साहित्यप्रवाह आणि समरसतेची सूत्रे - डॉ. शंकर धडके, अक्कलकोट., 2) कथात्म साहित्य आणि समरसता - डॉ. परमानंद बावनकुळे चंद्रपूर., 3) काव्यप्रवाहातील समरसता दर्शन - डॉ. अरुण ठोके, नाशिक., 4) नवे साहित्य : नवे समाजभान - श्रीकांत उमरीकर, संभाजीनगर.
 
 
योगिता साळवी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
 
 
 
युवा पिढीला आपले विचार मांडता यावेत, म्हणून विद्यार्थ्यांना व्यासपीठावर चौथ्या परिसंवादात संधी देण्यात आली. विषय होता ‘अण्णाभाऊंचे साहित्यविश्व : आकलन आणि आस्वादन.’
 
 
 
डॉ. बळीराम गायकवाड या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी अण्णा भाऊ साठे यांची एक एक साहित्यकृती घेऊन त्यावर आपले आकलन मांडले. अतिशय सुरेख असा हा परिसंवाद होता. नवीन पिढी वैचारिक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहे याचा दाखला या परिसंवादात मिळाला. पुढील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला -
 
 
 
1) नारायणी शेंडे, गोंदिया - वैर (कादंबरी), 2) स्वर्णिमा कमलवार, नागपूर - बरबाद्या कंजारी (कथासंग्रह), 3) सौरभ खोत, पुणे - माझा रशियाचा प्रवास (प्रवासवर्णन), 4) अभिजित खोडके, नागपूर - माकडीचा माळ (कादंबरी), 5) भार्गवी बाबरेकर, नागपूर - चिखलातील कमळ (कादंबरी), 6) अथर्व गोगायन, बुलडाणा - इनामदार (नाटक). महेश अहिरराव (धरणगाव) यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
 
 
 
या संमेलनात एक विशेष भाषण झाले, ते रवींद्र गोळे यांचे. हे विषयनिष्ठ भाषण होते. समसरता हा विषय बोलण्याचा नसून जगण्याचा भाग आहे, हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. अण्णाभाऊ केवळ काही काळ साम्यवादी व्यासपीठावर उपस्थित होते, म्हणून त्यांना कम्युनिस्ट असे लेबल लावणे कसे गैर आहे, हे वैचारिक आणि हृद्य अशा या भाषणात रवींद्र गोळे यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अण्णाभाऊंचे साहित्य भारतीय संस्कृतीत सांगितलेले मांगल्याचे पसायदान मागणारे साहित्य आहे, त्यावरून त्यांची समीक्षा करण्यात आली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. विजय मोरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संवाद : सामाजिक सृजनाशी... या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एकाच वेळी समांतरपणे दोन प्रकारचे प्रकल्प श्रोत्यांना या मुलाखतींतून समजून घेता आले. प्रदीप वडनेरकर (यवतमाळ) हे दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारध्यांसाठी काम करतात. या कामातून शून्य पायरीवरचा समाजघटक आज मुख्य प्रवाहात कसा येत आहे, त्यांच्या जीवनात घडलेले परिवर्तन यावर अनेक घटना-प्रसंग सांगून प्रकाश टाकला. मुलाखतकार विवेक कवठेकर यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून बोलते केले. दुसरी मुलाखत होती अशोक देशमाने (आळंदी) यांची. स्नेहवन या प्रकल्पात आत्महत्याग्रस्त, कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या मुलांना जीवन शिक्षण दिले जाते. देशमाने यांच्या पत्नी अर्चना देशमाने यादेखील या प्रकल्पात झोकून देऊन काम करतात. तरुण वयात असे काम सुरू करणे आणि ते चालवणे हे सोपे नाही. डॉ. रमा गर्गे (कोल्हापूर) यांनी त्यांची मुलाखत घेतली. विजय राठोड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
 
samrasta
 
संमेलनात संगीत रजनी हे विशेष आकर्षण ठरले. ‘वेदकाल ते वर्तमान.. समरसता’ या जीवनमूल्याचा प्रवास उलगडणार्‍या, समरसतेच्या प्रबोधनासाठी आयुष्य वेचणार्‍या महामानवांना अभिवादन करणार्‍या संगीतमय कार्यक्रमात अमर कुलकर्णी, मंजिरी वैद्य आणि गुणवंतजी घटवाई यांच्या भावमधुर स्वरांनी उपस्थित रसिकांना भावधारेत चिंब केले. आशुतोष अडोणी यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. मा. दादा इदाते, डॉ. रमेश पांडव, पद्मश्री गिरीश प्रभुणे आदी अनेक ज्येष्ठ मंडळी या संमेलनास उपस्थित होती. समारोप कार्यक्रमदेखील आटोपशीर झाला. समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे यांचे संक्षिप्त पण आशयगर्भ भाषण झाले. रंगावली, चित्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन ही रसिकांसाठी विशेष आकर्षणे होती. रांगोळीत रेखाटलेल्या महामानवांच्या अप्रतिम प्रतिमा, सगळ्या माजी अध्यक्षांची लक्षवेधक स्केचेस अतिशय सुरेख होती.
 
 
 
नागपूरकरांनी अतिशय नेटकेपणाने भोजन, निवास आदी व्यवस्था उभ्या केल्या. चारशेहून अधिक प्रतिनिधी संमेलनास उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून - निपाणी ते गोंदिया, पालघर ते गडचिरोली, अक्कलकोट ते नंदुरबार अशा विविध ठिकाणांहून सर्व जण आले होते. तरुणांचा प्रतिसाद लक्षणीय होता! तीस नामवंत निमंत्रित कवींच्या कवितांची कविसंमेलनातील मेजवानी आणि दोन्ही दिवस ऊर्जेने ओथंबलेला मुक्त काव्य मंच याने रसिक आनंदित झाले.
 
 
 
या संमेलनाने उच्चरवाने हे घोषित केले की सगळे महापुरुष हे सर्व समाजाचे असतात. त्यांना कोणत्याही ज्ञातीच्या कुंपणात अडकवता येणार नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रीय विचार व मांगल्याचे भाव या निमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचले.सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी समरसता मूल्याची जपणूक व बंधुभावाचे जे सूत्र सांगितले आहे, ते या संमेलनाने आणखी घट्ट बांधले गेले. संमेलनाला आलेल्या प्रत्येकाच्या मनात हे संमेलन सुरेख आठवणींची कुपी ठरेल, हे नक्की.