सत्याग्रही डॉ. हेडगेवार

लेखांक 3

विवेक मराठी    16-Aug-2022   
Total Views |

Dr Hedgewar
डॉ. हेडगेवार यांनी आपल्या अकराव्या पथकासह कायदेभंग केला. यवतमाळ येथे झालेल्या या जंगल सत्याग्रहात आबालवृद्धांनी, स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला होता. डॉ. हेडगेवार यांना नऊ महिने सश्रम कारावास व इतरांना चार महिने सश्रम कारावास अशा शिक्षा झाल्या. त्यावेळी यवतमाळ ते अकोला डॉक्टरांना कैदी म्हणून रेल्वेने नेत असताना आलेले अनुभवप्रसंग.
देशासाठी जीव देणारे नव्हे, तर जीवन देणारे हवेत, देशाचे कल्याण हंगामी नव्हे, तर स्थायी देशभक्तीने होते आणि व्यक्तिनिर्माणाच्या खडतर आणि वेळखाऊ मार्गानेच राष्ट्रनिर्माण होते अशी पक्की धारणा असलेल्या डॉ. हेडगेवारांनी जंगल सत्याग्रहात भाग घेण्यासाठी दि. 12 जुलै 1930 या दिवशी आपल्या नवजात संघटनेच्या चालकत्वाचा त्याग केला. जंगल सत्याग्रह करण्यासाठी डॉक्टरांच्या तुकडीत नागपूरचे विठ्ठलराव देव, गोविंद सीताराम उपाख्य दादाराव परमार्थ, ’महाराष्ट्र’ पत्राचे उपसंपादक पुरुषोत्तम दिवाकर उपाख्य बाबासाहेब ढवळे, वर्ध्याचे हरी कृष्ण उपाख्य आप्पाजी जोशी (संघाचे जिल्हाधिकारी), रामकृष्ण भार्गव उपाख्य भैय्याजी कुंबलवार, सालोडफकीरचे त्र्यंबक कृष्णराव देशपांडे (संघचालक), आर्वीचे नारायण गोपाळ उपाख्य नानाजी देशपांडे (संघचालक), आनंद अंबाडे, चांद्याचे राजेश्वर गोविंद उपाख्य बाबाजी वेखंडे, घरोटे, पालेवार असे एकूण बारा सत्याग्रही होते.
 
सत्याग्रही तुकडीला निरोप
 
दि. 14 जुलै 1930ला पुसद येथील जंगल सत्याग्रहाकरिता डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील तुकडी नागपूर रेल्वे स्थानकावरून निघाली. स्थानकावर 200-300 मंडळी निरोप देण्यासाठी जमली होती. पुष्पहार अर्पण केल्यावर आग्रहास्तव केलेल्या भाषणात डॉक्टर म्हणाले, “चालू लढा हाच स्वराज्याचा अंतिम लढा आहे व तोच तुम्हाला स्वातंत्र्य देईल या भ्रमात राहू नका. याच्यापुढेच खरा लढा लढावयाचा आहे व त्यात सर्वस्व अर्पण करून उडी घेण्याची तयारी करा. या लढ्यात आम्ही आणि इतरांनीही भाग घ्यावा याचे कारण हेच की तो आपले पाऊल स्वातंत्र्याच्या मार्गावर पुढे ढकलील असा मला भरवसा आहे.” ‘वंदे मातरम’च्या घोषात गाडी वर्ध्याला जावयास निघाली. सायंकाळी संघाला सुट्टी देण्यात आली.
 
 
दि. 15 जुलैला वर्ध्याच्या श्रीराममंदिरात डॉक्टरांचा आणि त्यांच्या सहकार्‍यांचा सत्कार झाला. मिरवणूक काढून त्यांना वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचविण्यात आले. वर्ध्यानंतर पुलगाव, धामणगाव आदी ठिकाणी सत्कार स्वीकारत ही मंडळी पुसद (जि. यवतमाळ) येथे पोहोचली (केसरी, 22 जुलै 1930).
 
 
RSS

जंगल सत्याग्रहातील डॉ. हेडगेवारांची सत्याग्रही तुकडी

 
वर्‍हाड युद्धमंडळाचे अध्यक्ष डॉ. जी.जी. भोजराज यांना दि. 17 जुलैला अटक झाल्यावर त्यांच्या व गंगाधर बळवंत उपाख्य अण्णासाहेब पांडे हिवरेकर यांच्या अभिनंदनाची सभा अधिवक्ता दामले यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळला झाली. अनधिकृत पत्रिकांवर बंदी घालणार्‍या आणि काँग्रेस कार्यसमितीला अवैध ठरविणार्‍या सरकारी आदेशाचा निषेध करणारा ठराव सभेत मांडण्यात आला. या सभेत डॉ. हेडगेवार आणि आप्पाजी जोशी यांची भाषणे झाली (के.के. चौधरी संपादक, सिव्हिल डिसोबीडियन्स मूव्हमेंट एप्रिल-सप्टेंबर 1930 खंड 9, गॅजेटियर्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार, 1990, पृ. 997). दि. 19 जुलैला यवतमाळला लक्ष्मणराव ओक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत यवतमाळ जिल्हा युद्धमंडळाच्या वतीने टी.एस. बापट यांनी इथून पुढे पुसदला सत्याग्रह करावयाचा नसून यवतमाळपासून चार मैलांच्या अंतरावर धामणगाव रस्त्याजवळील जंगलात दि. 21 जुलैपासून 21 दिवस सत्याग्रह केला जाईल, असे घोषित करून त्याचे उद्घाटन डॉ. हेडगेवार करतील असे सांगितले (चौधरी, पृ.998).
 
सत्याग्रही डॉ. हेडगेवार

 
दि. 21 जुलैला यवतमाळ येथे जंगलाचा कायदा मोडल्यामुळे डॉ. हेडगेवार व त्यांच्याबरोबर असलेल्या अकरा स्वयंसेवकांना पकडण्यात आले. ’केसरी’ने या प्रसंगाचे पुढील शब्दांत वर्णन केले- ‘यवतमाळास कायदेभंग ता. 21 रोजी सुरू करण्यात आला. डॉ. मुंजे यांच्या पथकात जाण्याच्या तयारीने नागपूरहून आलेले डॉ. हेडगेवार, ढवळे प्रभृती मंडळींनी आपले एक स्वतंत्र बारा जणांचे पथक तयार करून पहिल्याच दिवशी कायदेभंग केला. पुसदपेक्षा हे गाव मोठे असल्यामुळे येथील रणक्षेत्रावर 10-12 हजारांचा समूह जमला. हे ठिकाण येथून 4 मैल 2 फर्लांग अंतरावर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे. भोवताली टेकड्या असून सर्वत्र हिरवेगार झाले असल्यामुळे ’शस्यश्यामल’ भूमीची निसर्गरमणीयता फारच खुलून दिसत होती. पाच-पाच वर्षांची मुले, 70-75 वर्षांचे पुरुष व स्त्रिया आणि अंगावर तान्ही मुले घेतलेल्या अनेक बाया पायी चालत या पावन क्षेत्रावर आल्या होत्या. डॉ. हेडगेवार यांनी आपल्या अकराव्या पथकासह कायदेभंग केला, तेव्हा म. गांधी की जय! स्वतंत्रतादेवी की जय! इत्यादी गर्जनांनी सारे जंगल हादरून गेले!! कायदेभंग करणार्‍या वीरास ते रस्त्यावर आले असता पकडून नेण्यात आले. तुरुंगातील एका खोलीत त्यांचा खटला चालविण्यात आला. डॉ. हेडगेवार यांजवर 117 व 279 कलमान्वये आक्षेप ठेवण्यात येऊन त्यांस अनुक्रमे 6 व 3 अशी एकूण 9 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 11 स्वयंसैनिकांस 379 कलमाखाली प्रत्येकी 4 महिने स.म.ची शिक्षा देण्यात आली. या सर्वांना ताबडतोब अकोला तुरुंगात नेण्यात आले.’(केसरी, 26 जुलै 1930).
 
नागपुरात अटकेची प्रतिक्रिया
 
डॉक्टरांनी सत्याग्रह केला, त्या दिवशी संघस्थानावर संध्याकाळी स्वयंसेवकांची सभा झाली. उमाकांत केशव उपाख्य बाबासाहेब आपटे यांचे भाषण झाले. रात्री साडेदहा वाजता ’महाराष्ट्र’मध्ये तार आली की डॉ. हेडगेवार यांना नऊ महिने सश्रम कारावास व इतरांना चार महिने सश्रम कारावास अशा शिक्षा झाल्या. डॉ. हेडगेवार व त्यांच्या तुकडीला यवतमाळ येथे पकडण्यात आल्यामुळे व डॉ. नारायण भास्कर खरे, पूनमचंद रांका, नीलकंठराव देशमुख विरूळकर, शंकर त्र्यंबक उपाख्य दादा धर्माधिकारी यांना नागपूर येथे पकडण्यात आल्यामुळे दि. 22 जुलैला नागपूर येथे अत्यंत कडकडीत हरताळ पाळण्यात आला. दुपारी सर्व शाळा-महविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मिरवणूक निघून काँग्रेस पार्कमध्ये आली व डॉ. मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. वरील मंडळींच्या अभिनंदनाचा व सरकारचा निषेध करणारा ठराव पारित झाला. श्री. बडिये व डॉ. मुंजे यांची अत्यंत सुंदर भाषणे झाली. दुपारी चिटणवीस पार्कमधून निघालेल्या निषेध मिरवणुकीचे नेतृत्व युद्धमंडळाचे नवीन अध्यक्ष गणपतराव टिकेकर, पी.के. साळवे, छगनलाल भारूका, ढवळे, रामभाऊ रुईकर, नंदगवळी, संघाचे सरसेनापती मार्तंडराव जोग आणि अनसूयाबाई काळे यांनी केले (चौधरी, पृ.994).

 
संध्याकाळी संघस्थानावर डॉ. हेडगेवार व त्यांच्या तुकडीचे अभिनंदन करण्यासाठी रा.स्व. संघातील स्वयंसेवकांची, नागपुरातील प्रतिष्ठित गृहस्थांची व इतर तरुण विद्यार्थ्यांची सभा झाली. प्रथम प्रार्थना होऊन सरसंघचालक डॉ. परांजपे व डॉ मुंजे यांची भाषणे झाली. रात्री चिटणवीस पार्कात नागपूरच्या युद्धमंडळाला पकडल्याविषयी जी सभा झाली, त्यात यवतमाळला डॉ. हेडगेवार व पुरुषोत्तम दिवाकर उपाख्य बाबासाहेब ढवळे यांच्या शिक्षेचा तपशील प्रकट करण्यात आला. या सभेला रा.स्व. संघाचे शारीरिक शिक्षण प्रमुख अनंत गणेश उपाख्य अण्णा सोहोनी यांच्यासह 250 स्वयंसेवक उपस्थित होते. डॉक्टरांना अटक झाली म्हणून संघाचे दैनंदिन काम काही थांबले नाही. दि. 23 जुलैपासूनच संघाचे वर्ग नियमितपणे पार पडले. दैनंदिन उपस्थिती 100च्या वर असे.

 
दि. 24 जुलैला संध्याकाळी नागपूर येथून मराठी मध्यप्रांत युद्धमंडळाचे नूतन अध्यक्ष गणपतराव टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली 24 सत्याग्रहींची तुकडी तळेगाव (ता. आष्टी, जिल्हा वर्धा) येथे सत्याग्रहाकरिता गेली. त्यात रामभाऊ वखरे व विठ्ठलराव गाडगे या दोन संघस्वयंसेवकांनी भाग घेतला. त्यांना भंडारा संघाचे उपसंघचालक कर्मवीर पाठक यांच्या हस्ते संघाच्या वतीने हार घालण्यात आले. त्यांच्या सन्मानाकरिता भाषण करताना कर्मवीर पाठक म्हणाले, “रा.स्व. संघ भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाकरिता जन्मास आलेला आहे आणि तो आपले राजकीय ध्येय साध्य करण्याकरिता स्वातंत्र्य मिळविण्यासाठी निघालेल्या कोणत्याही संस्थेशी सहकार्य करेल.” (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, registers\register 7\DSC_0236-239).
 
डॉक्टरांच्या स्वाभिमानाचा रुद्रावतार

 
यवतमाळ ते अकोला कैदी म्हणून जाताना ठिकठिकाणी डॉक्टरांचा सत्कार व जयजयकार झाला. त्यासाठी लोक बरेच येत व प्रत्येक स्थानकावर डॉक्टरांना पाच-पाच मिनिटे आग्रहावरून बोलावे लागत होते. दारव्हा येथे गाडी पोहोचली. दारव्हा हे मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावरील मोठे स्थानक. तेथील लोकांनी प्लॅटफॉर्मवर व्यासपीठ वगैरे करून स्वागताची जंगी तयारी केली होती. सातशे ते हजारपर्यंत समुदाय असावा. दारव्हापर्यंत स्वागताचा स्वीकार डॉक्टर दारातूनच करीत होते. दारव्ह्याला खाली उतरून व्यासपीठावरून पंधरा-वीस मिनिटे भाषण झाले. गाडी जरा अधिक वेळ थांबली होती. गार्ड, सब-इन्स्पेक्टर, स्टेशनमास्तर घाई करू लागले. लोकांनी फराळाच्या पदार्थांचे करंडे डब्यात ठेवून दिले. दारव्हा रेल्वे स्थानकाहून गाडी सुटल्यावर घडलेल्या प्रसंगात डॉक्टरांच्या स्वाभिमानाचा रुद्रावतार कसा झाला, याचे वर्णन प्रत्यक्षदर्शी असलेल्या आप्पाजी जोशी यांनी पुढील शब्दांत केले आहे -
 
“रामसिंग, हथकडी निकालो.” दारव्ह्याच्या पुढे गाडी गेल्यावर सब-इन्स्पेक्टर शिपायाला म्हणाला. सब-इन्स्पेक्टर 27-28 वर्षांचा होता.

 
त्यावर डॉक्टर म्हणाले, “हातकडी कशासाठी?”
 
 
“मी काय करू? मला डीएसपीकडून फोन आला असल्याने मी नोकर म्हणून मला तसे करावे लागत आहे.”
“डीएसपीची तशी इच्छा असती, तर सत्याग्रहापासून आत्तापर्यंत घालता आल्या असत्या. पण तू पाहिलेले आहेस की त्यांनी आतापर्यंत हातकड्या घातल्या नाहीत.”

 
“पण आता तशी आज्ञा आहे” असे सब-इन्स्पेक्टर म्हणाला. खोटीच गोष्ट होती ती.

 
“हा काही पहिला तुरुंगवास नाही. आम्ही आपणहोऊन सत्याग्रह केला आहे. पळून जाणारे आम्ही नाही. ते कड्या घालण्याच्या फंदात पडू नको.” इति डॉक्टर. तरी सब-इन्स्पेक्टर ऐकेना.
“रामसिंग, हथकडी क्यू नहीं निकालते?”
 
 
त्यावर डॉक्टर खरमरीत शब्दांत म्हणाले, “तुला विनंती मानवत नाही असे दिसते.” त्या निग्रही वाणीने तो गोंधळला. “मी कोण आहे हे तुला माहीत नाही वाटते. तुझा हातकडी घालण्याचा निश्चय दिसतो. मग मलाही माझा निश्चय दाखवला पाहिजे.”
“म्हणजे मला तुम्ही हातकडी घालू देणार नाही?”
 
डॉक्टर अतिशय संतापले. इतके संतापलेले त्यांना पूर्वी पाहिलेले नव्हते. ते म्हणाले, “घाल कसा बेड्या घालतोस! जास्त गमजा करशील, तर तुला डब्यातून बाहेर फेकून देईन. फारतर दुसरा खटला करशील, पण आम्ही तर सत्याग्रह करताना नऊ महिन्यांची शिक्षा होईल असे थोडेच धरले होते! तर नऊच्या जागी अठरा महिन्यांची शिक्षा होईल. तेव्हा पाहू कसा हातकड्या घालतोस ते.”
 
डॉक्टरांच्या रुद्रावताराने वृद्ध रामसिंग व त्याच्या बरोबरीचे शिपाई अधिकच गोंधळले. एकूण रागरंग ओळखून आप्पाजी पुढे होत म्हणाले, “या प्रांतात डॉक्टरांचे स्थान काय आहे, सरकार त्यांना कसे वागवते हे तुम्ही नवे असल्याने तुम्हाला माहीत दिसत नाही. डीएसपीने आज्ञा केली आहे ’ये सब झूट’ आहे. तुम्ही ठिकठिकाणी झालेल्या सत्काराने खवळलेले दिसता. पण अशा फंदात पडू नका. डीएसपी मुसलमान आहे, त्याला खूश करता येईल अशी कल्पना असेल तर तीही फोल आहे. कड्या घालून पाहा, म्हणजे तुला डीएसपीकडूनच बोलणे खायला लागल्यावर समजेल डॉक्टरांचे व त्याचे संबंध कसे आहेत ते. आम्ही काय पळून जाणार आहोत?” आप्पाजींच्या म्हणण्याची री ओढून बरोबरीच्या शिपायांनी सब-इन्स्पेक्टरला कड्या न घालण्यासंबंधी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
 
सब-इन्स्पेक्टरचा तोरा आता उतरला होता. तो पडत्या आवाजात म्हणू लागला, “मी गरीब मनुष्य. निरनिराळ्या स्टेशनवर तुम्ही उतरता, तेव्हा तुमच्यातील कोणी पळून गेला, तर माझ्या गळ्याला तात लागेल!” त्यावर आप्पाजी म्हणाले, “आतापर्यंत नसते का पळून जाता आले जायचे असते तर! तुम्ही चिंता करू नका. आम्हा बारा जणांना व्यवस्थित तुरुंगात पोहोचविण्याचे श्रेय तुम्हाला मिळेल अशी खात्री बाळगा.” त्याची उमज पटलेली दिसली. खळबळ शमलेली दिसली. डॉक्टर हसत म्हणाले, “झाली खात्री? आप्पाजींकडे समजूत घालण्याचे श्रेय जायचे होते. त्यामुळे मी सांगून पटले नाही.” सर्व जण मनमोकळेपणाने हसले व मग सब-इन्स्पेक्टरसह सर्वांनी डब्यातील फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला. रात्री दहाला मूर्तिजापूर व तेथून गाडी बदलून अकोल्याला रात्री साडेबाराच्या सुमारास पोहोचलो. लॉरीतून जेलमध्ये पोहोचविण्यात आले. सर्वांना एकाच खोलीत कोंबण्यात आले (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes - 5 5_115-119). अकोला कारागृहात डॉक्टरांचा कारावास सुरू झाला. तो दि. 14 फेब्रुवारी 1931पर्यंत चालला. जंगल सत्याग्रह केला म्हणून डॉ. हेडगेवार तर कारागृहात गेले. पण अन्य संघस्वयंसेवकांनी जंगल सत्याग्रहात काय भूमिका बजावली? ते पुढील लेखात.
(क्रमश:)

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन