संघर्ष आणि बलिदान

लेखांक 4

विवेक मराठी    17-Sep-2022   
Total Views |
दि. 19 जुलैला आर्य समाजाने आपला लढा थांबविला. दहा टक्के मुस्लिमांना नव्वद टक्के हिंदूंचा राजकीय दर्जा दिल्याचा डाग सुधारणांना लागला असला, तरी एकूण त्यांचे स्वागत करत हिंदूमहासभेच्या कार्यकारी मंडळाने दि. 30 जुलै 1939ला ठराव करून नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा स्थगित केला.

vivek
 
हैदराबाद नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा हिंदू महासभा, आर्य समाज आणि स्टेट काँग्रेसने लढविला. हा लढा म्हणजे संघर्ष आणि बलिदानाची गाथा आहे. निजाम सरकारने लढा चिरडण्याचा निर्दयपणे प्रयत्न केला. काँग्रेसने हैदराबाद संस्थानातील पीडित हिंदूंचा घात करण्याचे आणि स्टेट काँग्रेसला तोंडघशी पाडण्याचे काम केले.
 
 
लढ्याचे स्वरूप
 
 
हिंदू महासभेची नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ 1938 ऑक्टोबर अखेरपासून चालू झाली. मार्च 1939पर्यंत मुंबई-महाराष्ट्रातून 200, वर्‍हाड-नागपूरकडून सुमारे 200 याप्रमाणे केवळ बृहन्महाराष्ट्रातून हिंदू महासभेकडून 400 नि:शस्त्र प्रतिकारक निजाम संस्थानात पाठविण्यात आले. दि. 17 नोव्हेंबर 1938ला नागपूरहून प्रतिकारकांची पहिली तुकडी निघाली. हिंदू महासभेने या लढ्याचे धोरण असे ठरविले की महाराष्ट्रेतर प्रांतांनी केवळ निधी पाठवावा. माणसे पाठविण्यात अंतरामुळे प्रवासव्यय अधिक पडतो, जे कार्य व्हावयाचे त्यात भरमसाठ आर्थिक व्यय होऊ नये या व्यवहारी व आवश्यक दृष्टीने ही योजना ठरविण्यात आली.
मार्च 1939पर्यंत सर्व नि:शस्त्र प्रतिकारक हे बहुतेक लहानलहान टोळ्या करून गेले. नागपूरकडील टोळ्या पंचवीस-तीस जणांच्या होत्या, तर दक्षिण महाराष्ट्रात आठ-दहाच्या टोळ्या असत. मोठ्या टोळ्या पाठविण्यात एक अडचण अशी होती की सर्व जण स्टेशनवरच पकडले जात. हिंदू महासभेच्या टोळ्यांतील बहुतेक सैनिकांनी निजामी राज्यात प्रवेश केल्यावर सभा भरवून, जयघोष करून व हस्तपत्रके वाटून प्रतिकार केला. अंतर्गत परिणामाच्या व जागृतीच्या दृष्टीने लहान टोळ्या पाठविण्याचा उपक्रम उपयुक्त वाटला, म्हणून चालविण्यात आला. नोव्हेंबर 1938पासून हिंदू सभेच्या लढ्याचा तीन महिन्यांपर्यंत हा क्रम सतत चालला होता. फेब्रुवारी 1939पासून आर्य समाजाने त्यात धडाक्याने उडी घेतली आणि लढ्याला व्यापक रूप दिले. मुंबई, कराची, लाहोर, दिल्ली, डेहराडून, फत्तेपूर, बरेली, मद्रास वगैरे शहरांतून आर्य समाजाच्या स्वयंसेवकांची भरती झाली (केसरी, 18 नोव्हेंबर 1938). फेब्रुवारी 1939च्या पहिल्या आठवड्यात आर्य समाजाचे पहिले सर्वाधिकारी पं. नारायणस्वामी 20 नि:शस्त्र प्रतिकारकांसह गुलबर्गा येथे गेले व आर्य समाजाच्या प्रचंड लढ्यास प्रारंभ केला.
 
 
20 September, 2022 | 16:50
 
आर्य समाजाचे दुसरे सर्वाधिकारी चांदकरण शारदा (अजमेर) पुण्यास आले, तेव्हा त्यांनी हिंदू सभेच्या कार्यकर्त्यांना सूचना केली की त्यांच्या मोठ्या टोळ्यांप्रमाणे हिंदू महासभेच्याही आता मोठ्या टोळ्या जाव्यात, म्हणजे संकलित परिणाम होईल. इतरही आर्य समाजी कार्यकर्त्यांनी हीच गोष्ट सुचविली. त्यामुळे मार्च 1939पासून सर्व सैनिक एकवटून पुण्याहून पन्नास-पन्नासची काही पथके निघावयाची, असे नवे धोरण राबविण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व केंद्रांना आता फुटकळ टोळ्या न पाठवता सर्व सत्याग्रही पुण्यातच पाठवा असे कळविण्यात आले (केसरी, 24 मार्च 1939).
 
 
vivek
 
नि:शस्त्र प्रतिकार लढ्याला हिंदूंतील विभिन्न जाती-संप्रदायांचा पाठिंबा मिळाला. परदेशात राहणार्‍या हिंदूंनीदेखील त्यास मदत केली. नागपूरच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात लढ्याला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव संमत झाल्यावर लगेचच शंकर जंगलाजी खडसे या नागपुरातील मांग समाजातील तरुणाने स्वा. सावरकरांना पत्र लिहून, ’आपण नवमतवादी मातंग उर्फ दु:खी समाजातर्फे हैदराबादमध्ये सत्याग्रह करण्यास ठरविले, तरी पहिल्या तुकडीमध्ये जाण्याची परवानगी मला मिळावी’ असे पत्र लिहिले (केसरी, 6 जानेवारी 1939). हिंदू धर्माचा सांगोपांग अभ्यास करणारे महार पुढारी पांडुरंग भिवाजी मुरकुटे यांच्या नेतृत्वाने दहा प्रतिकारकांची तुकडी पैठणला जाण्यासाठी दादर हिंदुसभेने पुण्यास पाठविली. चांभार जातीच्या अनेक तरुणांनी लढ्यात भाग घेतला (केसरी, 19 मे व 30 मे 1939).
 
 
 
दि. 26 फेब्रुवारी 1939ला जोशी मठाच्या शंकराचार्यांनी या लढ्याचे प्रचारकार्य सुरू केले. आमच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर लढा जारी राहील, असे वक्तव्य हैदराबाद हरिजन संघाचे अध्यक्ष व्ही.एस. व्यंकट राव यांनी एप्रिल 1939ला केले. पुण्याच्या हरिजन हक्क रक्षा मंडळाचे कार्यवाह आणि पुणे हिंदुसभेचे कार्यकर्ते कृष्णाजी गंगाधर गांगुर्डे यांनी पहिल्याच तुकडीत भाग घेतला. दि. 22 फेब्रुवारी 1939ला सयाम (सध्याचा थायलँड) आणि फिजीहून प्रतिकारकांची तुकडी सोलापूरला पोहोचली (केसरी, 1 ऑगस्ट 1939). ’केसरी’चे लंडनचे प्रतिनिधी द.वि. ताम्हणकर आणि ’हिंदू असोसिएशन ऑफ युरोप’चे कार्यवाह बेंगेरी यांनी या प्रश्नी परदेशात जनजागृती केली (केसरी, 21 जुलै 1939). ईस्ट आफ्रिका, वेस्ट आफ्रिका, टांगानिका वगैरे राहणार्‍या महाराष्ट्रीय कामगारांनी 100-200 शिलिंग वगैरे रकमांच्या हुंड्या पाठविल्या (केसरी, 28 एप्रिल 1939).
 
 
20 September, 2022 | 16:51

 
नि:शस्त्र प्रतिकारात अनेक शिखांनी भाग घेतला. दादर हिंदुसभेने सरदार जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली पाठविलेल्या अकरा नि:शस्त्र प्रतिकारकांच्या तुकडीला दि. 31 मे 1939ला नांदेड येथे अटक झाली. अमेरिकेतील हिंदुस्तान गदर पार्टीचे क्रांतिकारक पुढारी आणि अंदमानातून वीस वर्षांची शिक्षा भोगून सुटून आलेले शीख क्रांतिकारक बाबा मदन सिंग गागा यांनी पंजाबी नारायण सेनेच्या विद्यमाने अठरा प्रतिकारकांच्या जथ्यासह भाग घेतला. दि. 3 जून 1939ला बाबा सिंग यांच्या नेतृत्वाने सक्कर (सिंध) मधून नऊ शिखांचा एक जथा प्रतिकारासाठी पुण्यास येऊन पोहोचला (केसरी, 6 जून 1939).
 
 
vivek
 
देशभरातून आर्य समाजाच्या सुमारे 18,000हून अधिक प्रतिकारकांनी लढ्यात भाग घेतला. हिंदुमहासभेचे बरेचसे प्रतिकारक बृहन्महाराष्ट्रातून होते, त्यांची संख्या सात-आठ हजार होती. स्टेट काँग्रेसचे सुमारे 400 प्रतिकारक तुरुंगात असतानाच त्यांचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला. मे 1939च्या अखेरपर्यंत मुंबई हिंदुसभेच्या वतीने 595 प्रतिकारक लढ्यासाठी गेले. यात महाराष्ट्र, हिंदी मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, बिहार, बंगाल, राजस्थान, पंजाब, म्हैसूर, तेलंगणा, मद्रास आदी ठिकाणांहून प्रतिकारक आले होते. या संख्येपैकी 145 निरक्षर होते, तर वय वर्षे वीसखालील 125 जण होते. यांत 18 शीख आणि 23 गुरखे होते (केसरी, 30 मे 1939).
 
 
बारा आणि चौदा वर्षांच्या मुलांनीही लढ्यात भाग घेऊन स्वत:स अटक करवून घेतली. अठरा सत्याग्रह्यांनी या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. महिलांना प्रत्यक्ष लढ्यात भाग घेण्यास जाणीवपूर्वक मज्जाव करण्यात आलेला असला, तरी त्यांनी निधी संकलन, जनजागृती आणि प्रतिकारकांना धीर देण्याचे काम केले. या लढ्यापायी हिंदुमहासभेने सुमारे लाखभर रुपये खर्च केले. हा भार महाराष्ट्राने आणि त्यातही प्रामुख्याने मुंबईने उचलला. निजाम सरकारचे या लढ्यापायी एक कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे (दाते, पृ.194-195).
 
 
 
निजामीतील हिंदूंविरुद्ध दमनचक्र आणि विद्वेष
 
 
हैदराबाद रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी विकाराबादपासूनच संशयित उतारूंवर पाळत ठेवण्यात येऊ लागली. मुंबई, पुणे, सोलापूर येथून हैदराबादला कोण जातो याकडे गुप्त पोलीस लक्ष ठेवू लागले. उतारू स्थानकावर उतरताच कस्टम नाक्यावर त्याच्या सर्व सामानाची कसून झडती घेण्यात येऊ लागली. ही झडती घेण्यासाठी यच्चयावत सारे नोकर मुस्लीम असावयाचे. त्यामुळे झडती घेताना बर्‍याच सनातनी हिंदू लोकांना आपले गुरुचरित्र, शिवलीलामृत किंवा नित्य पाठाच्या पोथ्या सर्व धर्माभिमान सोडून त्या मुस्लीम अधिकार्‍यांच्या हातात द्याव्या लागत. एखाद्याच्या ट्रंकेत संशयित वाङ्मय वस्तू आढळली, तर ती ट्रंक पोलीस चौकीत नेऊन तिचा पंचनामा होऊन मग उतारूला हात हलवीत परत जावे लागत असे. कित्येक वेळा उतारूला चार-चार तास तसेच तिष्ठत बसावे लागे. घरमालकांनी व हॉटेल मालकांनी पोलिसांकडे पाहुण्यांच्या आगमनाची वर्दी दिली नाही, तर घरमालकासही दहा वेळा पोलीस चौकीवर आपली बाजू मांडण्यासाठी जावे लागे. याउलट एखादा मवाली दाढीवाला पठाण मुस्लीम राजरोस गावात फिरू शकत होता. सत्याग्रह चळवळ सुरू होताच गुप्त पोलिसांची बेफाम भरती करण्यात आली. भिंतीलाही गुप्तहेर चिकटले असतील या भीतीने घरीदेखील कोणी राजकारणावर जाहीर चर्चा करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत हिंदू लोकांची दु:खे ऐकू म्हटले तरी महाकठीण होऊन बसले होते. हिंदूंचे मोठेमोठे पुढारी मनात असूनही कुणाजवळ उघडपणे बोलू शकत नव्हते. हिंदू पुढार्‍यांच्या प्रत्येक हालचालीवर दरबारी गुप्तहेरांचा डोळा होता. एका अर्थी हिंदू पुढारी नजरकैदेतच होते.
 
 
20 September, 2022 | 16:52
 
 
रस्तोरस्ती मुस्लीम जातीय भावना विकोपाला गेली होती. प्रत्येक गल्लीत हिंदू दुकानांसमोर मुस्लीम दुकान उभारण्यात येऊ लागले. मध्यवर्ती भागातील एका बँकेकडून सहा लाख रुपये भांडवल काढून सर्वस्वी मुस्लीम दुकाने उघडण्यात आली. या दुकानांतूनच मुस्लिमांनी माल घ्यावा, म्हणून रस्तोरस्ती मुस्लीम स्वयंसेवक साध्या पोशाखात हिंदू दुकानासमोर पिकेटिंग करू लागले. बर्‍याच सधन मुस्लीम व्यापार्‍यांनी हिंदू व्यापार्‍यांना नाहीसे करण्याचा चंग बांधला. निजामशाहीचा विवक्षित नोकरवर्ग आतून या विरोध प्रचारास पाठिंबा देत होता. भाजी मार्केट, फूलवाले, कल्हईवाले, कासार, पिंजारी हे वर्ग सर्वस्वी मुस्लिमांचे होते. आता ’इस्लामी दुकाने’ म्हणून गावांत त्यांची सररास वाढ होऊ लागली. जातीय विद्वेष पिकवणारा वर्ग बाहेरून मुस्लीम व्यापारी आणून व्यापारात मुस्लीम वर्गास पुढे आघाडीवर आणण्याचा प्रयत्न करीत होता. इतर सरकारी खाती मात्र संपूर्णपणे इस्लामी बनली होती. तेव्हा उरलेले व्यापारक्षेत्रही काबीज करण्यासाठी ही बहिष्काराची चळवळ सुरू झाली. दुसरीकडे बंदी असलेल्या वृत्तपत्रांची संख्या रोजच वाढत होती. चीनच्या भिंतीसारखी एक प्रचंड भिंतच निजाम सरकारने आपल्या प्रदेशाभोवती उभी केली (केसरी, 18 नोव्हेंबर 1938).
 
 
 
स्थानिक सत्याग्रही एक तास अगोदर आपल्या सत्याग्रहाची वार्ता पोलीस चौकीत देत पण सत्याग्रह कुठे करणार हे सांगत नसत. त्यामुळे सत्याग्रहाची वार्ता मिळाली की शहरात काळ्या डगलेवाल्या पोलिसांची धावपळ सुरू होत असे. अनेकदा ते निरपराध लोकांवर, त्यांच्या घरांत घुसून जबर लाठीमार करून त्यांची डोकी फोडत. या परिस्थितीमुळे गावागावात हिंदू वस्त्यांमध्ये स्मशानशांतता पसरत असे. त्याच सुमारास रमजान महिना असल्यामुळे रात्री मशिदी फुलून जात. सरकारी खर्चाने उत्तम जेवण दिले जाई (केसरी, 22 नोव्हेंबर 1938).
 

vivek
 
वंदे मातरम्ची चळवळ
 
 
दि. 16 नोव्हेंबर 1938ला औरंगाबादच्या उस्मानिया महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वंदे मातरम् म्हणण्यावर बंदी घातल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग पुकारला. त्यानंतर अधिकार्‍यांनी बंदी मागे घेतली (केसरी, 18 व 22 नोव्हेंबर 1938). हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी वसतिगृहातील हिंदू विद्यार्थ्यांनी सायंकाळी प्रार्थनेच्या वेळेस वंदे मातरम् म्हणण्यावर मुस्लीम विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे या सबबीखाली सुमारे 850 हिंदू विद्यार्थ्यांना दि. 12 डिसेंबर 1938ला महाविद्यालयांतून काढून टाकले. या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणक्रमावर तिलांजली दिली, पण वंदे मातरम्चा अपमान होऊ दिला नाही. या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू केदार यांच्याकडे धाव घेतली. कुलगुरू केदार यांनी नागपूर विद्यापीठाच्या कक्षेत असणार्‍या सर्व महाविद्यालयांच्या अधिकार्‍यांना उस्मानिया विद्यापीठातील या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आदेश काढला (केसरी, 27 डिसेंबर 1938; 13 व 17 जानेवारी 1939).
 
 
 
दि. 4 फेब्रुवारी 1939ला इन्स्पेक्टर-जनरल हॉलिन्स हैदराबाद तुरुंग पाहावयास गेला. तेथे वंदे मातरम् कोण कोण म्हणतात याची त्याने चौकशी केली. त्याच्या दमदाटीला भीक न घालता रामचंद्र रेड्डी नावाचा एक वीर पुढे आला आणि ’मी ते पद म्हणतो’ असे त्याने हॉलिन्सला सांगितले. त्याबरोबर हॉलिन्सने त्याला दोन ठोसे मारले. दुसर्‍या दिवशी त्याला आणि मोतीलाल नावाच्या दुसर्‍या बंदिवानाला प्रत्येकी 24-24 वेत मारण्यात आले. त्याच्या पुढच्या दिवशी रामलाल नावाच्या सत्याग्रह्यास 36 वेत मारण्यात आले. सरकारी हुकमान्वये वंदे मातरम्ला बंदी आहे, असे हॉलिन्सने स्पष्टीकरण दिले (केसरी, 7 मार्च 1939).
 
 
 
निजामशाहीतील तुरुंगांत छळ
 
 
अटक झालेल्या प्रतिकारकांचा विविध प्रकारे छळ केला जाई. उपासमार, नित्यकर्मासाठी पुरेसे पाणी न देणे, बेड्या घालणे, वेताने मारणे, आजारी बंदिवानांचे पथ्यपाणी न करता उलट त्यांना मारहाण करणे, धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेणे हे प्रकार सररास होत होते. वानगीदाखल दि. 5 ते 12 जून 1939 ला औरंगाबाद तुरुंगात घडलेल्या प्रकाराचा उल्लेख करावा लागेल. दि. 5 जूनला आर्य समाजाचे नेते महाशय कृष्ण आणि त्यांच्या 782 प्रतिकारकांच्या जथ्याला अटक होऊन औरंगाबाद तुरुंगात आणण्यात आले. त्यांना तब्बल तेरा तासांनंतर ज्वारीची अर्धी भाकरी देण्यात आली. नवीन बंदिवान आणि अगोदर असलेल्या 2000 राजबंदिवानांमुळे तुरुंगातील व्यवस्था कोलमडली.
 
 
 
दि. 6 व 7ला हीच परिस्थिती बहुतांशाने कायम राहिली. तुरुंगातील एका वॉर्डात असलेल्या शौचालयात सांडपाणी बाहेर नेणारा पाइप उघडा होता. दि. 7ला दुपारी तुफान पाऊस पडला आणि एक तृतीयांश तुरुंग सांडपाण्याने भरला. नवीन आलेल्या तुरुंगाधिकार्‍याभोवती सर्व प्रतिकारकांनी सामुदायिकरित्या जोराची तक्रार केली. काही आश्वासन देण्याऐवजी त्याने दि. 7ला रात्री 7.30 वाजता भयसूचक घंटा वाजवून बाहेरून पोलीस आणि लाठीधारी मुस्लीम गुंडांना बोलाविले. बंदिवानांना खोल्यांत ढकलण्यात आले. मग तेथील दिवे मालवून त्यांना लाठ्यांनी बेदम मारण्यात आले. त्यात सुमारे 75-100 लोकांना कमी-अधिक प्रमाणात दुखापती झाल्या. पाच ते सहा जणांना विशेष मार लागला. दि. 8ला दुपारी 2 वाजेपर्यंत बंदिवानांना कोंडून ठेवण्यात आले.
 
 
 
दि. 8 जूनला दुपारी भयंकर प्रकार करण्यात आला. तुरुंगाधिकार्‍याने ल.ब. भोपटकर, अनंत हरी गद्रे, विश्वनाथराव केळकर आदी नेत्यांना व्हरांड्यात बसविले. त्यानंतर दोन डझन पोलीस दोन ओळींत उभे राहिले. प्रत्येक वॉर्डातील दोन दोन बंदिवानांना बाहेर आणून दोन ओळींत उभ्या असलेल्या पोलिसांमध्ये त्यांना चालावयास सांगण्यात आले. आता लाथाबुक्क्या, छडीमार, बंदुकीच्या संगिनीने आणि भाल्यांनी ढोसणे, थुंकणे अशा प्रकारांना प्रत्येक बंदिवानाला सामोरे जावे लागले. नेत्यांना असह्यपणे आपल्या अनुयायांचा छळ पाहावा लागला. पोलिसांना मारण्याचे त्राण उरले नाही, तेव्हा कुठे हा अमानुष प्रकार थांबला. त्यातच दि. 7ला एका आर्य समाजी सत्याग्रह्याचा मृत्यू झाला. पुढील तीन दिवसांसाठी सर्व बंदिवानांना दिवस-रात्र कोंडून ठेवण्यात आले. सुमारे पंचवीस सत्याग्रह्यांना दि. 5 ते 12 जून या काळात पायांत जाड बेड्या घालण्यात आल्या (केसरी, 13 व 20 जून 1939; हा सगळा घटनाक्रम तिथे बंदिवान असलेल्या शं.रा. दाते यांच्या पुस्तकातील पृ. 159-173वर दिलेला आहे).
 
 
निजामाकडून सुधारणांची घोषणा
 
 
 
निजाम राजवटीतील अत्याचाराविषयी केंद्रीय विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आले. सर वेजवूड बेन आणि डेव्हिड रीस ग्रेनफेल या दोन ब्रिटिश संसद सदस्यांनी निजाम राजवटीचा विषय ब्रिटिश संसदेत आणि तेथील वृत्तपत्रांत मांडला. देशभरातील नव्वद नामांकित मंडळींनी व्हाइसरॉयला निवेदन सादर केले. दि. 22 जुलैला हैदराबाद आर्य समाजाचे नेते विनायकराव कोरटकर यांच्या नेतृत्वाने 1300 प्रतिकारकांची तुकडी सत्याग्रहासाठी सज्ज झाली. निजामविरोधी लढा बाहेरचे लोक घडवून आणत आहेत, त्याला स्थानिक पाठिंबा नाही असे म्हणणार्‍या निजामाला हे चोख उत्तर होते. हा सत्याग्रह होण्यापूर्वी त्याने नाइलाजाने दि. 17 जुलैला सुधारणांच्या मसुद्यावर स्वाक्षरी करून दि. 19ला तो प्रसिद्ध केला. निजाम हा सर्वसत्ताधारी राहणार असून राजकारण, सेना, परदेशी संबंध किंवा तत्सम स्वरूपाच्या इतर बाबी त्याच्याच कक्षेत राहणार होत्या. हैदराबादच्या प्रस्तावित विधिमंडळात 85 सदस्य राहणार असून त्यांपैकी 42 लोकनियुक्त आणि 43 सरकारनियुक्त असणार होते. सर्व प्रातिनिधिक संस्थांत हिंदू-मुस्लीम समसमान राहणार होते. धर्मस्वातंत्र्याच्या बाबतीत वादग्रस्त प्रश्नाचा निर्णय देण्यासाठी हिंदू-मुस्लिमांचे समसमान प्रतिनिधी असलेले कायमस्वरूपाचे कायदेशीर मंडळ, हैदराबाद संस्थानातील अधिकारिवर्गाच्या नेमणुकांसाठी स्वतंत्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ब्रिटिश हिंदुस्थानातील प्रेस कायद्याच्या धर्तीवर मुद्रण नियमनाचा नवा कायदा, संघ स्वातंत्र्य आणि अधिकार्‍यांना वर्दी देऊन सभा स्वातंत्र्य मान्य करण्यात आले (केसरी, 21 जुलै 1939).
 
 
 
दि. 19 जुलै 1939ला सकाळी निजामी सुधारणांची घोषणा करण्यात आली. या अल्प सुधारणांना स्थानिक मुस्लिमांनी काय प्रतिक्रिया द्यावी? घोषणा होताक्षणी मुस्लिमांची सारी दुकाने एकदम बंद झाली. हा हरताळ इतका कडकडीत होता की तो पूर्वनियोजित होता, हे उघड होते. हरताळ पडल्यानंतर सशस्त्र मुस्लिमांचे थवे पायी व सायकलवरून रस्त्याने भटकू लागले व रहदारीला अडथळा झाला. मुस्लीम तरुण काळी निशाणे घेऊन किंवा दंडाला काळे पट्टे गुंडाळून हरताळाचा प्रचार करीत रस्त्याने भटकत होते. काळी निशाणे घेऊन निरनिराळ्या ठिकाणांहून मिरवणुकी निघाल्या व त्या एकत्र येऊन पाच-सहा हजारांचा जमाव ’इस्लाह मुर्दाबाद’ (सुधारणांचा धिक्कार असो) अशा आरोळ्या ठोकत रस्त्याने जाऊ लागला. पोलिसांनी काहींना अटकाव केला व त्यामुळे पोलीस चौकीसमोर मुस्लिमांचा प्रचंड जमाव जमला. दुपारनंतर सशस्त्र मुस्लिमांच्या भीतीने हिंदू व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद केली. ’आम्हांस पोलीस मंत्र्यास भेटावयाचे आहे’, ’आम्हांस महसूल मंत्र्यांना भेटावयाचे आहे’ असे फलक लावलेली गाढवे रस्त्यात सोडण्यात आली (केसरी, 25 जुलै 1939).
 
 
 
दि. 19 जुलैला आर्य समाजाने आपला लढा थांबविला. दहा टक्के मुस्लिमांना नव्वद टक्के हिंदूंचा राजकीय दर्जा दिल्याचा डाग सुधारणांना लागला असला, तरी एकूण त्यांचे स्वागत करत हिंदुमहासभेच्या कार्यकारी मंडळाने दि. 30 जुलै 1939ला ठराव करून नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा स्थगित केला. दि. 17 ऑगस्ट 1939पासून एका आठवड्यात सर्व राजबंदिवानांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले. त्यांचा प्रवासखर्च निजाम सरकारने उचलला, जो सुमारे लाखभर रुपये होता.
 
 
 
अशा प्रकारे भागानगर नि:शस्त्र प्रतिकाराच्या या पर्वाची इतिश्री झाली. या लढ्यात रा.स्व. संघाची भूमिका काय होती? संघस्वयंसेवकांनी या लढ्यात काय कामगिरी बजावली? हे सर्व उर्वरित लेखांत.
(क्रमश:)

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन