चिंतनशील, कृतिशील, विचारवंत

विवेक मराठी    28-Jan-2023   
Total Views |
@डॉ. अशोक कुकडे
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत ज्येष्ठ लेखक, संविधान अभ्यासक व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांचे नाव झळकणे ही त्यांच्याइतकीच विवेक समूहासाठीही सन्मानाची बाब आहे. रा.स्व. संघाच्या संस्कारांचे कृतिशील सामाजिक कार्यात रूपांतर करणार्‍या स्वयंसेवकांपैकी ते एक आहेत. रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा पद्मश्री डॉ. अ.ल. कुकडे (काका कुकडे) यांचा पूर्वप्रकाशित लेख येथे देत आहोत.

vivek
 
वरील लांबलचक शीर्षक वाचून मनात प्रश्न उभे राहतील! अशी गुणवत्ता एका व्यक्तीपाशी असू शकते का? फार क्वचित एखाद्यापाशी मूलत: ती असू शकते! पतंगे यांची ही वर उल्लेख केलेली गुणवत्ता स्व-अर्जित आहे. त्याला मुख्यत: संघसंस्कार कारणीभूत आहेत. एखाद्या गुणवत्तेचे बीज असल्यास परिश्रमपूर्वक ते जोपासून त्या गुणांचा व्यापक विस्तार करता येतो. असा केलेला विस्तार स्वार्थासाठी, स्वहितासाठी न करता व्यापक समाजहितासाठी केला, तर ते अधिकच विशेष आहे! रा.स्व. संघाच्या संस्कारातून कृतिशीलतेचा ध्यास शिकविला जातो, परंतु चिंतनशीलता परिश्रमपूर्वक स्वत:च जोपासावी, फुलवावी लागते. त्याच्यात ‘शील’ हा शब्द असल्यामुळे नैतिकता अभिप्रेत असते. हे चिंतन कृतिशीलतेमुळे, हस्तिदंती मनोर्‍यातील विचारांप्रमाणे जमिनीपासून फार दूर राहत नाही. यालाच परिश्रमांच्या माध्यमातून, आपली क्षमता वाढविण्याची जोड दिली, तर चिंतनशीलतेचे रूपांतर विचारवंत होण्यात निश्चितच होऊ शकते. गेल्या सुमारे 35 वर्षांच्या रमेश पतंगे यांच्या व माझ्या सहवास-संबंधातून हे सर्व गुण मी त्यांच्या ठायी विकसित झालेले अनुभवत आलो आहे. या दीर्घकाळात त्या त्यांच्या या विकासाचा मी निकटचा साक्षीदार आहे.
 
 
सुमारे 35 वर्षांपूर्वी आमचा जवळून परिचय झाला तो त्यांनी लिहिलेल्या ‘मी, मनु व संघ’ या पुस्तकावरील चर्चेच्या माध्यमातून. तेथून आमची तार जुळली. त्यांच्या लेखणीतून पुढील काळात व्यापक चिंतन, उत्तम विचार व व्यवहारातील कृती आराखडा त्यांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाच्या बाबतीत मी अनुभवत आलो आहे. या दीर्घकाळात त्यांनी विविध विषयांवर प्रचंड लिखाण केले आहे. त्यातील काही तात्कालिक विषयांवरती होते, परंतु संघ विचारधारेविषयी मूलभूत व अनेक उपयोजित (applied) सामाजिक विषयांसंबंधी त्यांनी नेहमीच मार्गदर्शक असे लिखाण केले आहे. त्यातील काहींचा मी आवर्जून उल्लेख करीन. मला त्यांचे अत्यंत भावलेले पुस्तक म्हणजे ‘मला उमगलेले डॉ. हेडगेवार’. त्या पुस्तकाने मला अक्षरश: भारावून टाकले, भावुक केले! ते वाचताना अनेकदा डोळ्यांतून अश्रू येत होते. ‘अंगुस्तान ते लेखणी’ या त्यांच्या आत्मचरित्राविषयी तसेच म्हणता येईल. या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी, अशी त्यांनी मला विनंती केली होती, परंतु त्या कामाला अधिक चांगला न्याय मिळावा, म्हणून हे काम नुकतेच दिवंगत झालेले मा. बाबूराव वैद्य यांच्याकडे देण्यास मी सुचविले. बाबूराव वैद्य यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना या पुस्तकासाठी लिहिली आहे. त्यानंतरच्या काळात त्यांच्या अनेक पुस्तकांना किंवा लेखनकार्याला मी प्रस्तावना दिली किंवा यावर टिप्पणी केली. गेल्या दोन दशकांत त्यांच्या लेखणीने किंवा संपादन कौशल्याने अक्षरश: प्रचंड ग्रंथभांडार निर्माण झाले आहे. हे सगळे लेखन संघाच्या मूलगामी विचारापासून ते समाजजीवन, व्यापक राष्ट्रजीवन व अतिव्यापक मानवी जीवन यांच्याशी संबंधित आहे, पण या प्रत्येक विषयाचे सूत्र संघविचाराशी, हिंदुत्वाशी व भारतीय परंपरेशी निगडित आहे. हे सर्व करण्यासाठी किती व्यापक विचार, सखोल चिंतन व परिश्रमाची कृती हे सर्व करावे लागले असेल त्याची केवळ कल्पनाच करता येईल. रा.स्व. संघाची 100 वर्षे पूर्ण होत आली आहेत. संघ हे जीवनमान व गतिमान संघटन आहे. त्यासंबंधीचे विचारही ‘गतिमान’ ठेवावे लागतात. हे सोपे काम नाही. त्यासाठी सातत्याने प्रचंड परिश्रम लागतात, शिस्त लागते, अभ्यास लागतो, स्वयंप्रेरणा असावी लागते. त्याखेरीज, संघभाव निर्माण करून सोबत कार्यकर्त्यांचा समूह उभा करावा लागतो. या सर्वांसाठी विलक्षण क्षमता विकसित करावी लागते. रमेश पतंगेंनी हे सर्व करून दाखविले आहे आणि या सर्वांना अधिकतम बळ दिले आहे ते रा.स्व. संघाविषयी त्यांचा समर्पण भाव, दृढ श्रद्धाभाव यांनी! त्यामुळेच या सर्व लिखाणातून संघतत्त्वे, संघकार्यपद्धती, संघाचा विकास याविषयी उत्तम संदर्भमूल्य असलेले भरपूर वाङ्मय निर्माण झाले आहे. या सर्वांविषयी विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या काव्यपंक्तींची आठवण येते -
’हे मातृभूमी तुजला मन वाहियेले।

वक्तृत्व वाग्विभ्वहि तुज अर्पियेले।

लेखाप्रति विषय तूची अनन्य झाला!’
 
 

vivek 
 
हे सर्व वर्णन रमेश पतंगे यांच्या गुणांना तंतोतंत लागू पडते. म्हणूनच आजच्या या अत्यंत खळबळीच्या समाजजीवनाच्या कालखंडात उद्भवणार्‍या नवनवीन विषयांसंबंधी संघाचा विचार, संघाचे मत काय? असा प्रश्न आला, तर ‘पतंगे जे मांडत आहेत ते अधिकृत मत धरावे,’ असे. पू. सरसंघचालकांनीच उद्गार काढल्याचे मला माहीत आहे.
 
 
गेल्या काही वर्षांत पतंगे यांनी केलेल्या एका विशेष कामाचा उल्लेख मला करावासा वाटतो. भारताचे संविधान याविषयी त्यांनी लिहिलेले पुस्तक दिसायला छोटेसे आहे, पण त्यासाठी त्यांनी केलेले अफाट परिश्रम मी जाणून आहे. अनेक ग्रंथांचे वाचन व अभ्यास, अनेक नेत्यांच्या चरित्राचे परिशीलन, या सर्वांविषयी सखोल चिंतन यांच्या आधारावर हे लेखन सिद्ध झाले आहे. त्यामुळे संविधानावरील त्यांचे हे पुस्तक सर्वांसाठी एक पाठ्यपुस्तकच व्हावे असे मला वाटते. प्रचंड अभ्यास व विचारमंथन (इीरळप डीेीांळपस) यातून ही निर्मिती झाली आहे. सामाजिक दृष्टीने त्याचे फार व्यापक महत्त्व आहे.
 
रमेश पतंगे यांनी संघरचनेत तळापासून काम केले आहे. शिवराय तेलंग व दामुअण्णा दाते यांनी त्यांच्या विचारांना व लेखनाला उत्तेजना व गती दिली. दीर्घकाळ ‘सा. विवेक’चे संपादक व आता ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे अध्यक्ष या नात्याने त्यांची भरीव कारकिर्द झाली आहे. या संस्थांच्या माध्यमातून जे प्रचंड ग्रंथभांडार निर्माण झाले आहे, ते संघकार्यकर्त्यांना कायम पथदर्शक राहील. ‘संघसरिता’ या नावाने जी ग्रंथमालिका झाली, त्या माध्यमातून शून्यातून आजच्या प्रस्थापित झालेल्या संघकार्याचा पूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. नवनवीन संघकार्यकर्त्यांनी, संघकामाची यथायोग्य जाण होण्यासाठी पाठ्यपुस्तके म्हणून या साहित्याचा सर्वांनी उपयोग केला पाहिजे, असे मला वाटते.
 
 
जवळपास 100 वर्षांच्या अनेकांच्या अमाप परिश्रमातून, त्यागातून, बलिदानातून ही स्थिती प्राप्त झाली आहे. ती चिरस्थायी होण्यासाठी पुढेही अखंड परिश्रम लागणार आहेतच. त्यासाठीचे विचारधन व प्रेरणा पतंगे यांच्या लेखनातून व जीवनातून आपल्या सर्वांना अखंडपणे मिळत राहील, असा मला विश्वास वाटतो.
‘अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथकविध्, विविधाच पृथक चेष्टा, दैवं तत्रार्थ पंचकम्।’ या भगवद्गीतेतील उक्तीप्रमाणे संघविचाराचे भक्कम अधिष्ठान, रमेश पतंगे यांच्यासारखे कार्यकर्ते, त्यांनी चालविलेले समाजजीवनातील भिन्न भिन्न प्रयोग, त्यातून निर्माण झालेली व्यापक उपक्रमशीलता या सर्वांच्या आधारावर आज रा.स्व. संघाला अनुकूल काळ आलेला आहे आणि म्हणूनच या परमेश्वरी कार्याला दैव हे अनुकूल राहील आणि आपणा सर्वांचे राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार होईल, असा दृढ विश्वास वाटतो.
 
‘नंदादीप’ या पुस्तकातून