स्त्री चेतना आणि डॉ. आनंदी गोपाळ जोशी

विवेक मराठी    25-Mar-2023   
Total Views |
 ज्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे हेच दुरापास्त होते, त्या काळी सातासमुद्रापलीकडे जाऊन कोणत्याही भारतीय स्त्रीने न घेतलेले वैद्यकीय शिक्षण घेण्याचे धाडस करणार्‍या आनंदीबाई. त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, जिज्ञासू वृत्ती, धैर्यशीलता वाखाणण्याजोगी आहे. भारतीय संस्कृतीविषयी, हिंदू धर्माविषयी, भारतीय स्त्रीजीवनाविषयी कितीतरी मौलिक विचार आनंदीबाईंनी मांडलेत. दि. 16 मार्च रोजी डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांचा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख.
 
anandi joshi
 
डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव सर्वसामान्य सुसंस्कृत मराठी माणसाला तसे परिचयाचे आहे. दीडशे वर्षांपूर्वी भारतात जेव्हा स्त्रियांनी रीतसर शाळेत जाऊन प्राथमिक शिक्षण घेणेही सोपे नव्हते, अशा काळात सतरा वर्षांच्या आनंदीबाई अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाल्या. श्री.ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या दांपत्य जीवनावर लिहिलेली ‘आनंदी गोपाळ’ ही लोकप्रिय कादंबरीही मी वाचली होती. पण ह्या कादंबरीत आनंदीबाईंपेक्षा गोपाळरावांचे व्यक्तिचित्र जास्त ठळकपणे उठून दिसते आणि हे आपल्याला अगदी ह्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासून जाणवते. अर्थात आनंदीबाईंच्या जीवनातले गोपाळरावांचे योगदान वादातीत आहे. समकालीन समाजाचा रोष व विरोध पत्करून आनंदीबाई लिहायला-वाचायला शिकल्या, त्या केवळ गोपाळरावांच्या आग्रहाखातर; पण नंतर स्वत: आनंदीबाईच शिक्षणाच्या इतक्या प्रेमात पडल्या की ज्ञानोपासना हेच त्यांचे ध्येय बनले.
 
 
 
आनंदीबाईंना अमेरिकेत जाऊन शिकता यावे, म्हणून गोपाळरावांनी खूप प्रयत्न केले. गोपाळराव आनंदीबाईंच्या आयुष्यात नसते, तर त्याही त्या काळच्या इतर बायकांसारख्या घराच्या चार भिंतीतच कैद झाल्या असत्या, हे खरे आहे; पण म्हणून काही त्या गोपाळरावांच्या हातातला निर्जीव चिकण मातीचा गोळा बनत नाहीत, ज्याला ठोकून-थापटून गोपाळरावांनी आकार दिला.
 
 
आनंदीबाईंच्या आयुष्याचा अभ्यास करताना मी आनंदीबाई जोशींची चार स्त्रियांनी लिहिलेली चरित्रे वाचली. त्यातली दोन चरित्रे आनंदीबाई निवर्तल्यानंतरच्याच वर्षात - म्हणजे 1888 साली प्रसिद्ध झाली होती. एक होते तत्कालीन अमेरिकन स्त्रीवादी लेखिका कॅरोलिन डॉल यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेले ‘ढकए ङखऋए जऋ ऊठ. अछअछऊखइअख गजडकख - अ घखछडथजचअछ जऋ ढकए झणछऊखढअ ठअचअइअख, हे साधारण 200 पानांचे चरित्र, तर दुसरे होते ते काशीबाई कानिटकरांनी लिहिलेले मराठीतले ‘डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे’ हे मराठी पुस्तक. ह्यातल्या कॅरोलिन डॉल ह्या आनंदीबाई आणि गोपाळराव ह्या दोघांनाही अमेरिकेत प्रत्यक्ष भेटलेल्या होत्या, तर काशीबाई फक्त गोपाळरावांना भेटलेल्या होत्या. दोघींनीही आपल्या पुस्तकांमध्ये आनंदीबाईंची मूळ पत्रे दिलेली आहेत. आनंदीबाईंचे तिसरे चरित्र मी वाचले ते अंजली कीर्तने ह्यांचे ‘डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व’ हे पाचशे पानी पुस्तक. त्याशिवाय मीरा कोसंबे ह्यांचे -"THE LIFE OF DR. ANANDIBAI JOSHI - A KINSWOMAN OF THE PUNDITA RAMABAI, अशी महत्त्वाची आणखी दोन इंग्लिश पुस्तके आनंदीबाईंवर आहेत. ह्यातली डॉल, कानिटकर, कीर्तने आणि पटवर्धन ह्यांची पुस्तके मी वाचलेली आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदीबाई जोशी त्यांच्या स्वत:च्या लिखाणातून मला भेटल्या आहेत.
 
 
25 March, 2023 | 12:38
 
कॅरोलिन डॉल आणि काशीबाई कानिटकर या दोघीनींही लिहिलेली चरित्रे संशोधनाच्या दृष्टीने मला अपूर्ण आणि एकांगी वाटतात. डॉलबाईंची आनंदीबाईंकडे बघण्याची दृष्टी ही ‘गरीब बिचारी परंपरांच्या जोखडाखाली अडकलेली हिंदू बाई’ अशी आहे. गोपाळरावांवर तर त्यांचा रागच आहे आणि त्याचे कारण त्यांनी अमेरिकेला आल्यावर आपल्या व्याख्यानांमधून, वृत्तपत्रांमधल्या लेखांमधून गोर्‍या लोकांच्या वर्णभेदावर आणि मिशनर्‍यांवर उडवलेली टीकेची झोड. डॉलबाईंना आनंदीबाईंबद्दल कितीही कळवळा असला, तरी तो एका गोर्‍या वसाहतवादी, ख्रिस्ती व्यक्तीने एका ‘गरीब हिंदू नेटिव्ह स्त्री’बद्दल दाखवलेला ‘पुअर डियर सिन्ड्रोम’ ह्या स्वरूपाचा आहे.
 
 
 
काशीबाई कानिटकर आनंदीबाईंकडे एक आदर्श आर्य हिंदू पतिव्रता स्त्री म्हणून पाहतात. आनंदीबाई आणि गोपाळरावांकडे बघण्याची काशीबाईंची दृष्टी ही आदरयुक्त भक्तीची आहे, चिकित्सक नाही. एका बाजूने डॉलबाईंचे पॅट्रोनायझिंग ओरिएंटॅलिझम आणि दुसरीकडे काशीबाईंचा भक्तिभावाने ओथंबलेला आदर्शवाद ह्या दोन्ही दृष्टीकोनांच्या मधून खर्‍या आनंदीबाई कुठेतरी निसटूनच जातात. त्या तुम्हाला भेटतात त्या त्यांच्याच शब्दांमधून, गोपाळरावांना, कार्पेंटर मावशीला त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधून, त्यांच्या भाषणांमधून.
 
 
anandi joshi
 
अंजली कीर्तने यांचे मराठी आणि नंदिनी पटवर्धन यांचे हल्लीच बाजारात आलेले नवे इंग्लिश चरित्र ही दोन्ही पुस्तके संशोधनाच्या बाबतीत पहिल्या दोन्ही पुस्तकांहून उजवी आहेत. त्यात आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांहून अधिक कालावधी लोटून गेला असल्यामुळे ह्या दोघी संशोधिका म्हणून जास्त निष्पक्ष राहू शकतात. तरीही मला ही दोन्ही पुस्तके परिपूर्ण वाटली नाहीत. एकतर ह्या दोघींनीही एकविसाव्या शतकाच्या स्त्रीवादाचा चश्मा लावून एकोणिसाव्या शतकाकडे बघितलेय, त्यामुळे आनंदीबाईंना झुकते माप देताना गोपाळरावांवर अन्याय झालेला आहे, असे मला वाटते.
 
 
आनंदी-गोपाळ यांचे नाते गुंतागुंतीचे होते हे खरेच आहे.गोपाळराव आनंदीबाईंचे केवळ पती नव्हते, तर त्यांचे शिक्षकही होते, पालकही होते. आनंदीला शिकवण्यासाठी, तिला शिक्षणासाठी परदेशी पाठवण्यासाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. आनंदीबाईंना ह्याची जाण होती, पण गोपाळरावांच्या विक्षिप्त स्वभावाचा त्रासही त्यांना होत होता. तरीही ह्या सगळ्यासकट ह्या अठरा-एकोणीस वर्षांच्या मुलीने गोपाळरावांना स्वीकारले होते, त्यांच्यावर निरलस प्रेमही केले होते.
 
 
 
आनंदीबाई अमेरिकेला गेल्यावर गोपाळरावांना थोडेफार असुरक्षित वाटू लागले असणार. गोपाळरावांना जाणवणारी असुरक्षितता त्यांच्या पत्रांतून दिसते, पण आनंदीबाई त्यांना शक्यतो न दुखावता अत्यंत संयत भाषेत, पण ठामपणे उत्तरे देतात. त्यांच्या विक्षिप्त वागण्याची, चंचल मनोवृत्तीची, लोकांशी विनाकारण भांडणांची परखड पण तटस्थ समीक्षा करतात. गुजराती साडीतला आनंदीबाईंचा तो प्रसिद्ध फोटो पाहून गोपाळरावांनी त्यांना एक कुजकट पत्र लिहिले होते, वेशभूषा बदलताना आपल्याला विचारले का नाही म्हणून. तेव्हा त्या शांतपणे पत्रात लिहितात, ‘गुजराती साडीदेखील भारतीयच आहे. मर्यादशील आहे. पूर्ण ब्लाउज व पायघोळ साडीमुळे थंडीमध्ये गळा झाकून ठेवणे व पाय गरम ठेवणे शक्य होते. महाराष्ट्रात परत आले की मी पुन्हा नऊवारी लुगडे नेसणारच आहे आणि नथ तर मी भारतातही रोज घालत नव्हते, तर आता इतके आश्चर्य का?’
 
 
25 March, 2023 | 12:40
 
अमेरिकेला जायला निघाल्या, तेव्हा आनंदीबाई अवघ्या सतरा वर्षांच्या होत्या. पण इतक्या कमी वयात त्या चार राज्यांमध्ये राहिल्या होत्या, सात भाषा शिकल्या होत्या, अल्प घटकेच्या मातृत्वाचा, पुत्रशोकाचा, समाजाच्या कोतेपणाचा कठोर अनुभव घेऊन परिपक्व बनल्या होत्या. अमेरिकेला जाण्यापूर्वी श्रीरामपूर (बंगाल) इथल्या बॅप्टिस्ट कॉलेजच्या सभागृहात आनंदीबाई जोशी यांनी ‘मी अमेरिकेस का जाते?’ यावर अस्खलित इंग्लिशमध्ये जे भाषण दिले, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्या म्हणतात की ”माझ्या अमेरिकेला शिकायला जाण्याविषयी लोकांना खूप प्रश्न आहेत आणि त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे मी आज येथे देणार आहे.
 
 
मी परदेशी का चाललेय?
 
भारतात मी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाही का?
 
मी एकटी परदेशी का जातेय?
 
धर्मबहिष्कृत व्हायची मला भीती वाटत नाही का?
 
मी अमेरिकेत असताना काही वाईट घडले, तर?
 
आजवर दुसर्‍या कुठल्याच भारतीय स्त्रीने केलेले काम मी का करू इच्छिते?”
 
त्यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या स्पष्ट म्हणतात, “पृथ्वीच्या पाठीवर सध्या हिंदुस्थानाइतका रानटी देश दुसरा नाही. डॉक्टर स्त्रियांची हिंदुस्थानातल्या प्रत्येक भागात अतिशय जरुरी आहे. सभ्य स्त्रिया पुरुष डॉक्टरकडून तपास करून घेत नाहीत. भारतात हिंदू स्त्री डॉक्टरची नितांत गरज आहे आणि म्हणून या कामासाठी मी स्वत:ला तयार करतेय.”
 
दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर देताना आनंदीबाई म्हणतात की “मी एक हिंदू स्त्री आहे, ब्राह्मो किंवा धर्मपरिवर्तित ख्रिस्ती नाहीये. मी भारतात राहून शिक्षण घेतले तर मला खूप विरोध होईल. ह्या रोजच्या विरोधाला सामोरे जाऊन शिक्षण घेणे सोपे नाही, म्हणून मी अमेरिकेत जाऊन शिकू इच्छिते.”
 
 
तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर देताना आनंदीबाई म्हणतात, “मी एकटी जाते, कारण आमच्याकडे इतके पैसे नाहीत की आम्ही दोघेही अमेरिकाला एकत्र जाऊ शकू. शिवाय माझ्या पतीच्या खांद्यावर त्याच्या आईची जबाबदारी आहे.”
 
 
चौथ्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणतात, “अमेरिकेला गेले, तरी मी आहे तशीच राहणार आहे. माझ्या आचार-विचारात काहीही बदल मी करणार नाही. मी हिंदू म्हणून अमेरिकेला चाललेय आणि हिंदू म्हणूनच परत येणार आहे, तेव्हा बहिष्कार कशाचा? आणि बहिष्कार करायचाच असेल तर माझे धर्मबांधव आत्ताही मला बहिष्कृत करू शकत होते. माझ्या लोकांपासून इतकी दूर कलकत्त्यात मी राहते, मी किती धर्माज्ञा पाळते, ते कोण बघायला येणार?‘’
 
 
‘परदेशात असताना तुम्हाला काही होईल ह्याची भीती नाही का वाटत?’ ह्या पाचव्या प्रश्नाचे जे उत्तर आनंदीबाई देतात, ते त्यांच्या स्वयंप्रज्ञेचे आणि मानसिक प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण आहे. त्या म्हणतात की “काही लोकांना काल्पनिक भीतीचाच बाऊ वाटतो. ते नेहमी भविष्यात काहीतरी अशुभच घडेल असा विचार करून कुठलेच काम करत नाहीत. पण ज्याला काम करायचेय, त्या स्त्रीला किंवा पुरुषाला असे निराशाजनक विचार शोभत नाहीत. दुर्भाग्य आणि मृत्यू कधीही घाला घालू शकतात हे खरे आहे. पण ह्या भीतीने माणसे घरी बसून राहत नाहीत. दुसर्‍या देशात जाऊन शिकणे, तिथले अनुभव घेणे चांगलेच आहे, त्यामुळे आपली दृष्टी विशाल होते, नव्या गोष्टी शिकता येतात. प्रत्येक व्यक्तीला त्याला/तिला योग्य वाटेल ते करण्याचा हक्क आहे. भविष्यात संकट येऊ शकते ह्या भीतीने काहीच न करणे हे बरोबर नाही.”
 
 
‘ह्याआधी कुठल्याच स्त्रीने कधी न केलेले काम तुम्ही का करू इच्छिताय?’ ह्या शेवटच्या प्रश्नाचे आनंदीबाईंनी दिलेले उत्तर तर सर्वांनीच वाचावे असे आहे. त्या म्हणतात, “समाजासाठी काम करणे हे प्रत्येक स्त्री-पुरुषाचे कर्तव्य आहे आणि असे काम करून घेण्याचा समाजाला हक्क आहे. आज भारतीय समाजाला हिंदू डॉक्टरची गरज आहे आणि केवळ ह्यापूर्वी कुठल्या स्त्रीने परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले नव्हते म्हणून मीही ते करू नये असे कुणी म्हणावे याचे मला आश्चर्य वाटते. मनू म्हणतो की माणसे तीन प्रकारची असतात - जे अपयशाच्या भीतीने कुठलेच काम हाती घेत नाहीत ते अधम वृत्तीचे, जे काम हाती घेतात पण संकटे आली तर हातातले काम अर्धवट सोडून पळून जातात ते मध्यम वृत्तीचे आणि जे अनेक संकटे आली तरी चिकाटीने आपले कर्तव्य करत राहतात ते उत्तम वृत्तीचे, कारण ते बाजी जिंकतात. म्हणून धैर्यशील रितीने प्रत्येकाने आपले कर्तव्य करीत राहावे.” किती प्रगल्भ, स्वतंत्र विचार होते आनंदीबाईंचे!
 
 
आनंदीबाईंच्या कष्टाने भरलेल्या आयुष्यातली स्नेहभरित हिरवळ म्हणजे पेनसिल्व्हेनियामधल्या रोसेल या गावात राहणार्‍या कार्पेंटर कुटुंबाशी त्यांचा जडलेला स्नेह. एक मध्यमवयीन सुखवस्तू अमेरिकन गृहिणी व एक तरुण भारतीय हिंदू मुलगी यांच्यात पत्रव्यवहार सुरू होऊन मायलेकीचे नाते जुळले. कार्पेंटरबाईंनी अखेरपर्यंत आनंदीबाईंची पाठराखण केली आणि ना नात्याच्या ना रक्ताच्या अशा एका भारतीय हिंदू मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी सक्रिय मदत केली. आनंदीबाईंनी ह्या कार्पेंटर मावशींना लिहिलेली पत्रे अत्यंत जिव्हाळ्याची तरीही चिंतनशील, चिकित्सक आणि सखोल अशी आहेत.
 
 
भारतीय संस्कृतीविषयी, हिंदू धर्माविषयी, भारतीय स्त्रीजीवनाविषयी कितीतरी मौलिक विचार आनंदीबाईंनी मांडलेत. सत्यवान-सावित्रीची जी कथा त्यांनी कार्पेंटर मावशीला पत्रातून लिहिली आहे ती तर मुळातूनच वाचण्यासारखी आहे. आनंदीबाईंची सावित्री स्वतंत्र आहे, बुद्धिमान आहे, कणखर आहे, प्रत्यक्ष यमाला आपल्या वाक्पटुत्वाने हरवणारी स्वतंत्र प्रज्ञेची स्त्री आहे सावित्री आणि तरीही ती सत्यवानाच्या अर्ध्या वचनात आहे.. कदाचित आनंदीबाईंची सावित्री म्हणजे त्या स्वत:च असाव्यात!
 
 
1883 सालच्या जून महिन्यात ‘द सिटी ऑफ कॅलकत्ता’ नावाच्या बोटीत बसून आनंदीबाई कोलकात्यातून न्यूयॉर्कला पोहोचल्या. थिओडिशिया कार्पेंटर त्यांना उतरवून घ्यायला आल्या होत्या. आनंदीबाईंनी वैद्यक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा, म्हणून पेनिसिल्वानियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहिले.
 
 
वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेत आनंदीबाईंचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले खरे, पण एक हिंदू, शाकाहारी स्त्री म्हणून अमेरिकेत राहणे त्या काळात सोपे नव्हते. कुशाग्र बुद्धीमुळे आनंदीबाईंना शिक्षण घेणे सोपे होते, पण स्वत:च्या आचार-विचारपद्धतीला जपत हिंदू म्हणून जगणे अमेरिकेत त्या काळात अजिबातच सोपे नव्हते.
 
 
आनंदीबाईंची भारतात असतानाच नाजूक असलेली तब्येत अमेरिकेत गेल्यावर तिथला कठोर हिवाळा आणि कुपोषण यांमुळे आणखीनच बिघडली. ओलसरपणा आणि गारव्यामुळे त्यांना डिप्थेरिया झाला. त्यातूनच पुढे क्षयाचे निदान झाले. असे असतानाही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदीबाईं 11 मार्च 1886 रोजी एम.डी. झाल्या. ‘हिंदू समाजातील प्रसूतिविद्या’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.
 
 
त्यांच्या पदवीदान समारंभाला पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. गोपाळरावही तोपर्यंत अमेरिकेत पोहोचले होते. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अमेरिकेत आणि भारतातही खूप कौतुक झाले. कोल्हापूर संस्थानातील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभागात मुख्य डॉक्टर म्हणून कोल्हापूर संस्थानाने त्यांची नेमणूकही केली.
 
 
 
नऊवारी साडी नेसलेल्या, कपाळाला ठसठशीत कुंकू लावलेल्या आनंदीबाई गोपाळरावांसह बोटीतून 16 नोव्हेंबर 1886 रोजी मुंबईच्या बंदरात उतरल्या. मी हिंदू म्हणून जातेय आणि हिंदू म्हणूनच परत मायदेशी येईन हे त्यांनी श्रीरामपूरच्या सभेत काढलेले उद्गार त्यांनी खरे करून दाखवले होते.
 
 
 
पण अमेरिकेत सोसलेले कष्ट त्यांच्या शरीराला झेपले नाहीत. त्यांचा क्षयरोग वाढतच गेला. 26 फेब्रुवारी 1887 रोजी, वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी आनंदीबाईंचे निधन झाले.
 
 
उणेपुरे बावीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या आनंदीबाईंनी त्या अल्पायुष्यात खूप काही करून दाखवले. अमेरिकेत पहिला हिमवर्षाव पाहिल्यावर ‘हिमवृष्टी कशी सगळीकडे आणि सर्वावर सारखी पडते. आणि मग सारा आसमंत सुंदर बनवते. हा आपल्यासाठी एक धडाच नव्हे का?’ असा उदात्त विचार मनात आलेल्या आनंदीबाई म्हणजे त्यांच्याच लाडक्या कवयित्री म्हणून त्यांनी जी नावे निवडली होती, त्या मुक्ताई-जनाईच्या उदार परंपरेतल्या आहेत. स्त्री चेतनेचा याहून उदात्त, उन्नत, मंगल आविष्कार तो दुसरा काय असणार?