उद्योजकतेच्या वाटेवरची मार्गदर्शक आणि साथीदार

विवेक मराठी    04-Mar-2023   
Total Views |
एकल, भूमिहीन, अल्पभूधारक ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना सूक्ष्म उद्योजक बनवायला हवे, हे ज्योतीने जाणले. त्यासाठी ज्योतीने WEच्या माध्यमातून अशा सर्व गरजू महिलांचे सर्वेक्षण करून महिलांना अनेक ठिकाणी प्रशिक्षणासाठी नेले. त्यातून थए ही कंपनी समर्थपणे चालवणारी संचालक महिलांची टीम उभी केली. दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या स्वप्नांना भरारी देणारी ज्योती कोल्हे-भुते.
 
women day
 
 
संभाजीनगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील ‘डोंगरातील गाव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गावांपैकी हातमाळी हे छोटे गाव. दिवेलागणीची वेळ. गावाच्या एका टोकाला चारही बाजूंनी कुंपण, पण आत मोकळ्या असलेल्या एका आवारात ओळीने मांडून ठेवलेली सौर वाळवण यंत्रे. त्यापलीकडे विजेवर चालणारी आणखी काही यंत्रसामग्री. पंधरा-वीस महिला दिवसभर सौर ऊर्जेने वाळवण आणि निर्जलीकरण झालेल्या कांद्याच्या फोडी गोळा करून पॅकिंग करून ठेवत आहेत. एक महिला प्रत्येक काम करणार्‍या महिलेचा हिशोब पूर्ण करत आहे. त्यापलीकडे एक जण हा माल घेऊन जाणार्‍या टेम्पोचालकाशी फोनवर बोलून उद्या तो कधी येणार त्याची वेळ नक्की करून घेत आहे. तेवढ्यात एक जीप गेटजवळ थांबते व एक तरुणी त्यातून उतरते. त्याबरोबर कामात असलेल्यांपैकी सर्वात वडीलधारी महिला उद्गारते, “आली बया माझी लेक!”
 
 
संभाजीनगरच्या सावित्रीबाई फुले मंडळाच्या WE (WE for Women Empowerment) या 474 महिला भागधारक असलेल्या व सौर वाळवणातून अन्नप्रक्रिया उद्योगात उतरलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीतील हा प्रसंग आणि जीपमधून आलेली ती तरुणी म्हणजे या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कोल्हे-भुते. सुरुवात झाल्यापासून तीन वर्षांत या ग्रामीण महिलांनी या कंपनीची वार्षिक उलाढाल चक्क 8 कोटींपर्यंत नेली आहे! कधीकाळी दुष्काळाने गांजलेल्या या परिसरातील 50 गावांतील शेतकरी कुटुंबांतील या कंपनीच्या भागधारक महिला आता स्वावलंबी झाल्यात. बाजारातील चढ-उतारामुळे आणि इतर काही अपरिहार्य कारणामुळे वाया जाणार्‍या शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे आयुष्य वाढवता आले तर चांगले होईल, हा विचार करून S4S आणि सावित्रीबाई फुले मंडळ यांनी सौर वाळवणाच्या प्रयोगाला सुरुवात केली होती. WE कंपनीने संभाजीनगर तालुक्यात त्याचा विस्तार केला. सुगीचे दिवस संपल्यावर पूर्वी महिलांच्या हाताला काहीच काम नसायचे. आता प्रत्येकी चाळीस-पन्नास हजार सहज मिळतात. दीड-दोन एकर शेती, तीही बव्हंशी कोरडवाहू. त्यामुळे ही कंपनीमुळे मिळणारी रक्कम त्या मानाने खूपच मोठी व महत्त्वाची आहे.
 
 
women day
 
  ज्योती कोल्हे-भुते
 
हा चमत्कार घडवून आणण्यात ज्योतीचा वाटा मोठा आहे. त्या परिसरातील महिलांमध्ये तिच्याविषयी इतकी आत्मीयता निर्माण झाली, कारण या कंपनीची नोंदणी करण्यापासून ती महिलांबरोबर आहे. महिलांना या कंपनीच्या भागधारक बनवण्यासाठी ज्योतीला आणि तिच्या टीमला अक्षरश: दिवसरात्र परिश्रम घ्यावे लागले. हा प्रयोग नवीनच होता. त्यातही केवळ महिलांना सोबत घेऊन काम करायचे होते. महिलांच्या मनात अनेक शंका होत्या. त्या सर्वांची समर्थपणे उत्तरे देत ज्योतीने भागधारक संख्या पावणेपाचशेपर्यंत नेली. कंपनीच्या संचालकदेखील ग्रामीण भागातील शेतकरी महिला. कंपनी कशी चालवायची याचा न कुठला अनुभव, न व्यवस्थापनाचे शिक्षण! पण त्यांच्या घर आणि शेती यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर ज्योतीचा विश्वास होता. स्वत:च्या जबाबदारीवर तिने या संचालक महिलांना अनेक ठिकाणी प्रशिक्षणासाठी नेले. त्यातून ही कंपनी समर्थपणे चालवणारी संचालक महिलांची टीम उभी राहिली. दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या स्वप्नांनी भरारी घेतली! सौर वाळवणाबरोबरच ‘मुंबा’ या ब्रँडखाली 50 गावी शेतमाल खरेदी केंद्रांची शृंखला निर्माण झाली. गावातील शेतकर्‍यांचा माल रास्त भावात गावातच खरेदी होऊ लागला आहे. विशेष असे की या केंद्रांचे संचालनदेखील थए कंपनीच्या भागधारक महिलाच करतात. गावांमध्ये आजही शेतमाल खरेदी-विक्री व्यवसाय प्रामुख्याने पुरुष मंडळीच करतात. जेव्हा ज्योतीच्या कंपनीने हा व्यवसाय महिलांना सोबत घेऊन करण्याचे ठरवले, त्या वेळी अनेकांनी ‘महिलांना हा व्यवसाय जमेल का?’ अशी शंका व्यक्त केली. मात्र योग्य प्रशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर याद्वारे या महिला (ज्यांना थएच्या पदाधिकार्‍यांनी ‘मुंबाताई’ असे टोपणनाव दिलेले आहे) अत्यंत यशस्वीपणे हा व्यवसाय करत आहेत. त्यांनी खरेदी करून दिलेल्या एकूण मालाच्या मोबदल्यात त्यांनाही उचित उत्पन्न मिळते आणि शेतकर्‍यांचा वाहतूक खर्च, अडत, वेळ याची बचत होते. व्यवहार झाल्यावर 24 तासात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आताच्या पद्धतीनुसार पेमेंट रोखीनेच व्यवहार झाल्यावर लगेच किंवा 7 दिवस ते एक महिना किंवा व्यापारी देईल तेव्हा मिळत होते. त्यामुळे खात्यावर रक्कम ऑनलाइन जमा होणार हा विषय शेतकर्‍यांसाठी जरा नवीनच होता. आज मात्र शेतकरी निर्धास्त होऊन कंपनीला माल विकत आहेत.
 


महिलांना मार्गदर्शन करताना ज्योती भुते
women day 
 
ज्योतीच्या मते गरजू महिलांचे - विशेषत: एकल, भूमिहीन, अल्पभूधारक ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना सूक्ष्म उद्योजक बनवायला हवे. त्यासाठी ज्योतीने थएच्या माध्यमातून अशा सर्व गरजू महिलांचे सर्वेक्षण केले. त्यांना भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, सौर ड्रायर खरेदी करून देणे, पीएमएफएमई योजनेत अर्ज करून कर्ज रकमेवर 35% अनुदान मिळवून देणे, एआयएफ नाबार्ड योजनेत अर्ज करून कर्जावरील व्याजदर 3%ने कमी करून घेणे इ. गोष्टी करवून घेतल्या. सावित्रीबाई फुले मंडळासारखी भक्कम संस्था पाठीशी असणे आणि महिलांचा प्रचंड विश्वास या जोरावर हे अवघड काम तिने लीलया करून दाखवले.
 
 
 
WE कंपनीच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील शारदाताई. डोईजड झालेले कर्ज आणि पतीचे व्यसन यामुळे खूप अडचणीत आलेल्या. “ज्योतीताई, काही करून मला काम द्या. कामाची खूप गरज आहे” अशी त्यांची विनवणी. WEकंपनीने त्यांना भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करून दिला. आज त्या आनंदी आहेत, कारण त्यांची आर्थिक अडचण बर्‍यापैकी दूर झाली. विशेष म्हणजे संस्थेचे व्यसनमुक्ती शिबिर आणि समुपदेशन यामुळे पतीचे व्यसनही सुटले. त्या म्हणतात, “ज्योतीताई, तुम्ही योग्य वेळी आम्हाला मदत केली. नाहीतर आज माझा घर-संसार उद्ध्वस्त झाला असता!” WE कंपनीच्या संचालक प्रभावती पडूळ या स्वत: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले महिला नेतृत्व! ज्योतीची जिद्द, ग्रामीण महिलांबरोबर काम करताना आवश्यक असलेला समजूतदारपणा आणि संयम आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती याबद्दल प्रभावतीताई भरभरून बोलतात. प्रभावतीताईंचे घर हे माझे माहेर आहे असे ज्योती जेव्हा अभिमानाने सांगते, तेव्हा कुठल्याही विकासकार्यात आत्मीयता आणि अकृत्रिम स्नेह यांचे महत्त्व अधोरेखित होते! WEमार्फत आगामी काळात सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती, मका व हरभरा प्रक्रिया युनिट, अवजार बँक, कृषी मॉल, ग्राहक सेवा केंद्र आदी योजनांवर काम सुरू होईल. किमान 1000 सक्षम महिला उद्योजक निर्माण करण्याचे स्वप्नही काही वर्षांतच पूर्ण होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. आर्थिक विकासाबरोबरच आता या गावात अन्य विषयांचीही चर्चा सुरू झाली आहे. स्वावलंबी महिला समग्र ग्रामविकास करू शकतात. त्या दृष्टीने विविध उपक्रमांची रचनाही सुरू झालेली आहे.
 
 
women day
 
या 500 ग्रामीण महिलांच्या यशोपथावरील वाटचालीची ही तर सुरुवात आहे. त्या आणखी भरपूर वाटचाल करणार, हे तर नक्कीच आहे. या वाटचालीतील त्यांच्या वाटाड्याच्या भूमिकेत असलेल्या ज्योतीच्या आयुष्याची वाटचाल मात्र किती खडतर होती, याची जराशीही कल्पना तिच्या सहजपणे वावरण्यातून आपल्याला येत नाही. तिच्या आयुष्याविषयी मुद्दाम बोलते केल्यावरच कळते की अन्य कोणी मुलगी असती, तर कधीच उभारी न घेण्याइतपत खचून गेली असती, इतके दु:ख अगदी बालपणी मिळालेले असतानाही ज्योतीने ज्या जिद्दीने त्यावर मात केली, ते फारच प्रेरणादायक आहे. कष्ट करून उपजीविका चालवणारे आईबाबा, बारा वर्षांचा भाऊ आणि सहा वर्षांची ज्योती. अचानक एका आर्थिक चक्रव्यूहात अडकल्याने वडिलांनी घर आणि गाव सोडले ते कायमचेच. आईला बसलेल्या मानसिक धक्क्यातून ती सावरलीच नाही आणि पाच वर्षांनंतर तिने स्वत:चे आयुष्य संपवले. फार मोजके नातेवाईक मदतीला आले. आजी-आजोबांनी त्यांच्या परीने कष्ट करीत या दोन्ही भावंडांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. ज्योतीला खरे तर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी बनायचे होते, पण ते राहूनच गेले. ज्योतीने तिचे महाविद्यालयीन शिक्षण- वाणिज्य शाखेतील पदवी आणि एम.कॉम.पर्यंत सगळे - शासकीय वसतिगृहात राहून, भावाच्या मदतीने आणि स्वत: छोट्या-मोठ्या नोकर्‍या करीत पूर्ण केले.
 
 
women day
 
तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय शिक्षक, जळगावच्या अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य राणे सर आणि अन्य प्राध्यापक यांचा ती कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते. सेवायोगी संत गाडगेबाबा समरसता पुरस्काराने सन्मानित प्रा. राणे सरांनी महाविद्यालयाच्या आणि त्यांच्या स्वत:च्या संस्थेच्या वसतिगृहामार्फत शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करायला मदत केलेली आहे. तिने काही काळ प्राध्यापकाची हंगामी नोकरी केली, मात्र कोरोना काळात पुन्हा सगळे थंडावले. या दरम्यान जीवन भुते यांचे स्थळ सांगून आले. जीवननेही खडतर वाटचाल करत सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते व ते सावित्रीबाई फुले मंडळात समुपदेशक म्हणून कार्यरत होते. ज्योतीची धडाडी आणि स्वतंत्र विचार करण्याची पद्धत याबद्दल जीवनला खूप आदर आहे. ग्रामीण महिलांसह काम करायचे, तर त्यांना जेव्हा वेळ असतो तेव्हाच संपर्क करता येतो. म्हणजे एकतर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा. वेळेची अशी कसरत करत ज्योती घर आणि सासरची नातीही उत्तमपणे सांभाळते. सावित्रीबाई फुले मंडळामुळे मला ग्रामीण महिलांबरोबर कामाची संधी मिळाली. अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपण काहीतरी करून दाखवू शकतो असा विश्वास वाटतो, अशी कृतज्ञता व्यक्त करतानाच ‘आणखी खूप काही पल्ला गाठायचा आहे’ असे भक्कमपणे पाय जमिनीवर ठेवून ज्योती बोलते, तेव्हा राष्ट्रकवी दिनकर यांची एक सुंदर कविता आठवते -
 
 
सच है, विपत्ति जब आती है,
कायर को ही दहलाती है,
सूरमा नहीं विचलित होते,
क्षण एक नहीं धीरज खोते,
विघ्नों को गले लगाते हैं,
काँटों में राह बनाते हैं!
मुख से न कभी उफ कहते हैं,
संकट का चरण न गहते हैं,
जो आ पड़ता सब सहते हैं,
उद्योग-निरत नित रहते हैं!

डॉ. प्रसन्न पाटील

डॉ. प्रसन्न पाटील हे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आहेत.