इतिहासाचा अमोल ठेवा

विवेक मराठी    09-Mar-2023   
Total Views |
कोल्हापूरचे विद्याधर गोखले यांना जुनं चलन संग्रहित करण्याची आवड आहे. ही आवड केवळ रिकाम्या वेळेत करायचे उद्योग इथपर्यंत सीमित न राहता ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. आज तब्बल 30 हजार चलनांचा संग्रह त्यांच्याकडे जमा झाला आहे. विशेष म्हणजे या छंदामुळे त्यांची गैरसोय न होता तो त्यांना मन:शांती देणाराही ठरतो आहे.
 
 collect old currency
 
छंद म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते वाचन, गायन, नर्तन असे प्रकार. त्यापलीकडे जाऊन विविध वस्तू संग्रहित करण्याचाही अनेकांना छंद असतो. कोल्हापूरचे विद्याधर गोखले यांना जुनं चलन संग्रहित करण्याची आवड आहे. ही आवड केवळ रिकाम्या वेळेत करायचे उद्योग इथपर्यंत सीमित न राहाता ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. आज तब्बल 30 हजार चलनांचा संग्रह त्यांच्याकडे जमा झाला आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज स्थापित मराठा साम्राज्यातील विविध प्रकारच्या शिवराई व अन्य चलन संग्रहित करणं ही त्यांची विशेष आवड आहे.
 
 
 
“मी अनेकदा माझा नाण्यांचा संग्रह काढून बसतो. त्यातली एखादी शिवराई हातात घेतो, न्याहाळतो. ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व कायम आहे, अशा महापराक्रमी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचा एक अस्सल पुरावा माझ्या मुठीत विसावलेला असल्याची जाणीव होते. ज्यांचं नाव, पराक्रम, निष्ठा, अष्टावधानी असणं हे प्रत्येक भारतीयासाठी प्रात:स्मरणीय व अनुकरणीय आहे, त्या शिवरायांच्या त्या शिवराईकडे पाहून मी अक्षरश: थरारतो!” विद्याधर गोखले सांगत होते. कोल्हापुरातील गोखले बंधू सराफ हे सुपरिचित नाव. हा पिढीजात व्यवसाय सांभाळणारे विद्याधर गोखले हे कोल्हापुरातील सुप्रसिद्ध चलन संग्राहकही आहेत.
 
 
 collect old currency
 
आपल्यापैकी कोणी कोणी पोस्टाचे स्टँप जमा करतं, तर कोणी बसची तिकिटं, कोणाला फ्रीज मॅग्नेट्सची आवड असते, तर कोणाला गणपतीच्या लहानमोठ्या मूर्ती गोळा करण्याची. कोल्हापुरातील सराफ विद्याधर गोखले यांना शालेय जीवनातच छंद लागला तो निरनिराळ्या देशांची चलनं गोळा करण्याचा. सुरुवातीला सहज गंमत म्हणून सुरू झालेला हा छंद आज त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. “चलन गोळा करण्याच्या या छंदाची सुरुवात कशी झाली?” असं विचारलं असता विद्याधर यांनी सांगितलं की, “खरं म्हणजे शाळेत असताना आपण चलनच जमवायचं असं काही डोक्यात नव्हतं. स्टँप गोळा कर, वेगवेगळ्या प्रकारची आगपेट्यांची कागदी खोकी जमव, कार्टूनचे फोटोज जमव असं सुरू असायचं. एकदा शाळेत जात असताना एक वेगळंच नाणं रस्त्यात माझ्या भावाला मिळालं व ते त्याने मला दिलं. घरातल्यांना दाखवलं त्या वेळेस आई म्हणाली की आपल्या घरातही अशी अनेक जुनी नाणी आहेत. ती ब्रिटिशकालीन नाणी होती. ते पाहिलं आणि आता याचाच संग्रह करू या असं मी ठरवलं. भावाला सापडलेल्या त्या एका नाण्यापासून आणि आईने दिलेल्या त्या जुन्या नाण्यांसह माझा संग्रह सुरू झाला.
 

 collect old currency 
 
सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या नेहमीच्या वापरातल्या वेगवेगळ्या चित्रांचे छाप असणारी नाणी गोळा करण्याचा मला छंद लागला. हातात येणारं प्रत्येक नाणं पडताळायची सवय लागली. कधी बाबांकडून घे, तर कधी दुकानदाराकडून येणारे सुट्टे पैसे बघ हे सुरूच होतं. माझं ते नाणं पडताळून बघणं पाहून दुकानदारही विचारायचे. त्यांनाही समजलं की मी नाणी गोळा करतो, मग ते आपणहोऊन वेगळी नाणी वगळून मला द्यायचे. कधी कोणी नातेवाईक परदेशात गेले की तिकडचं चलन आठवणीने द्यायचे. एकदा गोखले बंधूंच्या दुकानासमोरून काही परदेशी नागरिक जात असताना विद्याधर यांना दिसले. आपण चलन गोळा करत असल्याचं त्यांना मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये सांगितलं. त्यांनी गोखले यांना काही परदेशी नाणी दिली. असेच कधी कोणी परिचित देत असत. संग्रह वाढतच होता, पण त्याला निश्चित आकार येत नव्हता.”
 
 

 collect old currency
 
“गांभीर्याने आणि योजनाबद्ध रितीने संग्रह करण्यात केव्हा सुरुवात झाली?” असं विचारलं असता ते म्हणाले, “शाळेत असताना मी फक्त एका डब्यात नाणी साठवत होतो. पुढे दहावी ते पदव्युत्तर शिक्षण या काळात मी याकडे लक्षच दिलं नाही. पदव्युत्तर शिक्षणानंतर एकदा आवराआवरी करताना माझाच खजिना माझ्या हाती लागला. दरम्यान, एकदा कोल्हापुरात रिझर्व्ह बँकेने जुन्या चलनांचं प्रदर्शन भरवलं होतं. तिथे मला चलनाचं विभाजन कसं करायचं, कशी काळजी घ्यायची हे समजलं आणि मी त्या पद्धतीने माझ्या साठ्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेच्या या प्रदर्शनात कालखंडानुसार विविध साम्राज्यांचं चलन, परकीय आक्रमकांचं चलन, परकीय आक्रमकांनी आणलेलं आणि इथे पाडून घेतलेलं चलन, परदेशी चलन, भारताचं स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर चलन, विशेष घटना-प्रसंगोपात छापण्यात आलेलं चलन अशा विविध पद्धतीने चलनाचं विभाजन केलं होतं. मी त्या पद्धतीने सॉर्टिंग करायला सुरुवात केली. स्वातंत्र्योत्तर काळातील चलनाचा डाटा, त्याची माहिती आरबीआयच्या वेबसाइटवर असते, ती पाहायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्या माहितीत भर पडत होती आणि मला संग्रहाची दिशाही स्पष्ट होत होती.’
 
 
 
आज विद्याधर गोखले यांच्याकडे सुमारे सात ते आठ हजार प्रकारची सुमारे पंचवीस हजार नाणी/नोटा आहेत. यात भारतीय चलनांसह जवळपास 250 अन्य देशांचीही वैविध्यपूर्ण चलनं आहेत. भारतातील इसवीसनपूर्व सहाव्या शतकातील बेंट बार प्रकारची - ही भारतातील पहिली नाणी मानली जातात - पट्टीसारखी एकाच बाजूला छाप असणारी वैशिष्ट्यपूर्ण नाणी आहेत. क्षत्रपांची नाणी, कुशाणांची नाणी, चोल साम्राज्य, गुर्जर साम्राज्य, मराठा साम्राज्य यांची चलनं, त्याचप्रमाणे विविध मुघलकालीन नाणीदेखील आहेत. भारतातला पहिला (चांदीचा) रुपया शेरशहा सुरीने काढला होता त्याची नाणी, ब्रिटिश काळातील विविध संस्थानं, भारतात ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगीज या आक्रमकांनी लागू केलेली चलनं, त्याचप्रमाणे परदेशी साम्राज्यांचीही नाणी त्यांच्या संग्रहात आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विविध घटना-प्रसंगांच्या निमित्ताने चलनं तयार करण्यात आली. उदाहरणार्थ - गुरू नानक देवजी यांच्या 350वं प्रकाशवर्ष, हरित क्रांती, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव-अमृतमहोत्सव ती जवळपास सर्वच त्यांच्याकडे आहेत.
 
 
 
आपण अनेक चलनांचा संग्रह करत असलो, तरी मराठा साम्राज्यातील चलन हे आपल्या संग्रहाचं वैशिष्ट्य आणि आपली विशेष आवड असल्याचं ते आवर्जून नमूद करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना, त्यांचा राज्याभिषेक ते मराठा साम्राज्याचं 1818चं अखेरचं युद्ध या कालखंडातील विविध नाणी त्यांच्या संग्रहात आहेत. जिथे जिथे मराठे गेले, तिथे तिथे त्यांनी आपल्या नावाची नाणी पाडली. आज सुमारे सातशे ते आठशे प्रकारच्या शिवराई त्यांच्याकडे आहेत. मराठ्यांचे तंजावर घराणे, शिवाजी महाराजांनी विविध भूप्रदेश ताब्यात घेतल्यावर पाडलेल्या शिवराई, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, ताराराणी, रामराजे महाराज असे भोसल्यांचे वारस यांनी काढलेल्या शिवराई, भोसले घराण्याशी संबंधित अन्य घराणी, विविध संस्थानं, पेशव्यांनी अटकेपार लावलेले झेंडे, अगदी पार लाहोरपर्यंत पसरलेलं त्यांचं साम्राज्य किंवा गाजवलेला पराक्रम या सगळ्यांची नोंद असणारी अनेक तांब्याची, सोन्याची नाणी त्यांच्या संग्रहात आहेत. विविध ठिकाणी ही नाणी पाडली गेली. पूर्वी परवाने देऊन नाणी तयार केली जायची. अशी परवाने घेऊन पाडलेली नाणी. साधारण जो जो भूभाग राज्यकर्ते ताब्यात घेतात, तिथे तिथे मूळ चलन बंद करून स्वत:चं चलन लागू करतात. त्यामुळे आपलं मराठा साम्राज्य उत्तरेत कुठपर्यंत पोहोचलं होतं, याची साक्षच ही नाणी आपल्याला देतात. तंजावरचं घराणं हे शिवरायांच्या सावत्र बंधूंचं स्वतंत्रपणे कारभार करणारं घराणं असलं आणि दाक्षिणात्य प्रांतात कार्यरत असलं तरी त्यावर श्रीराजा छत्रपती अशी देवनागरी अक्षरंच आहेत, असंही ते नमूद करतात.
 
 
केवळ कालखंड वा साम्राज्यसापेक्ष नाणीच त्यांच्याकडे आहेत असं नव्हे. त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण आकाराची नाणी आहेत. त्याबद्दल ते सांगतात, “विजापूरच्या आदिलशाहाचं नाणं हे चक्क हेअरपिनसारख्या आकाराचं होतं. इराणनंतर ते थेट विजापूरच्या दरबारातच दिसून येतं. वास्तविक कोणताही राजा किंवा तत्सम व्यक्ती जेव्हा एखादा भूप्रदेश ओलांडत येते, तेव्हा ती वाटेवर अनेक ठिकाणी आपल्या अस्तित्वाचे वा प्रवासाचे पुरावे म्हणून काही नाणी तिथे ठेवते. पण हे नाणं मात्र इराणनंतर थेट विजापुरातच आढळून येतं. भारताचे ग्रीसशी व्यापारी संबंध होते, हे दर्शवणारी काही नाणी भारतात सापडतात. अनेकदा शेजारच्या प्रांताच्या नाण्यांचा प्रभाव काही नाण्यांवर दिसून येतो. अशी अनेकविध नाणी गोखले यांच्या संग्रहात आहेत.
 

 collect old currency 
 
काही नोटा किंवा नाणी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असतात असं नाही, पण त्यांच्या वैशिष्ट्यामुळे त्याला संग्रहात अमूल्यत्व प्राप्त होतं. नाणी किंवा नोटा छापल्या जाताना अचूकतेचा निकष महत्त्वाचा असतो. पण काही वेळा एरर किंवा चुकीमुळे काही नोटा किंवा नाणी बाद होतात. काही वेळा नंबर चुकतो, एकच छाप दोन्ही बाजूंना उमटतो, नंबर उमटतच नाही, नोटेला घडी पडते, नाण्यांवर एकच आकडा किंवा चित्र दोन्ही बाजूंना उमटतं. या चलन छापण्याच्या बाबतीतल्या दुर्मीळात दुर्मीळ घटना असतात. काही वेळा नोटांवर विशिष्ट आकडे असतात. त्यामुळे त्या नोटांचे/नाण्यांचे संग्रह केले जातात. अशीही काही चलनं गोखले यांच्याकडे आहेत. नाणी किंवा चलनं हा इतिहासाच्या अभ्यासातला थेट पुरावा किंवा क्लास वन पुरावा मानला जातो. एखाद्या ऐतिहासिक तथ्याची, साम्राज्याची स्थल-कालनिश्चिती, दळणवळणाची साधनं, व्यापाराची माहिती, तत्कालीन समृद्धी याचा चलन हा पुरावा ठरतो. ठोस उदाहरण द्यायचं, तर कोल्हापूरमधील एका गावातील उत्खननात ग्रीक चलन सापडलं, यावरून भारताचा इसवी सनापूर्वी ग्रीसशी व्यापार होत असे, हे स्पष्ट होतं. त्यामुळे चलन संग्रह हे एका अर्थाने इतिहासाचं डॉक्युमेंटेशन दस्तऐवजीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावतं” असं ते सांगतात.
 
 
 collect old currency
 
हा संग्रह करण्याला घरच्यांनी कसा पाठिंबा दिला? याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “नाण्यांचा किंवा चलनाचा संग्रह ही मुळातच खर्चीक बाब आहे. पण छंदाचा भार मी कधीही घरावर पडू देत नाही. सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे मी शिक्षण पूर्ण झाल्यावरच संग्रहाकडे गांभीर्याने पाहू लागलो. तोपर्यंत आवश्यक ते लौकिक शिक्षण झालेलं होतं. त्यामुळे त्याच्याशी तडजोड करावी लागली नव्हती. त्याचप्रमाणे मी व्यवसायात उतरल्यानंतरही कामाला प्राधान्य देऊन उरलेल्या वेळात हे सारं करत होतो. त्याचप्रमाणे, आमचा पिढीजात सराफीचा आणि भांड्यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे बाबांना या चलनांचं, त्या धातूंचं मोल माहीत होतं.त्यामुळे घरच्यांनी वेळोवेळी पाठिंबाच दिला. आईने, माझी पत्नी पल्लवी हिनेही माझी ही आवड समजून घेऊन आईबाबांप्रमाणेच पाठिंबा दिला. लग्नानंतरच माझी प्रदर्शनंही सुरू झाली. त्यासाठीही तिने पाठिंबा दिला.“ अनेक शाळा, विविध सार्वजनिक संस्था, गणेशोत्सव मंडळं अशा विविध ठिकाणी विद्याधर गोखले यांची प्रदर्शनं झाली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला 350 वर्षं पूर्ण झाली, तेव्हा किल्ल्यावरील सिंधु महोत्सवातही त्यांचं प्रदर्शन झालं.प्रदर्शनात पै, पैसा, आणा अशी आता वापरात नसलेली पण आपण पूर्वी खरेदीसाठी वापरलेली नाणी पाहून ज्येष्ठ नागरिक नॉस्टॅल्जिक होतात. आज एक रुपयादेखील फार अपवादाने लहान मुलांच्या वापरात येतो. अशा वेळेस तांब्याचा पैसा, भोकाचा पैसा, जुनी ऐतिहासिक चलनं पाहून ही मुलं हरखून जातात. त्यामुळे सर्वच वयोगटांचा या प्रदर्शनांना उत्तम प्रतिसाद असतो, असं गोखले सांगतात. चलनं ही कागदी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धातूंची असतात. या सगळ्याची काळजी कशी घेतली जाते? त्यासाठी किती वेळ लागतो? असं विचारल्यावर गोखले म्हणाले, “रसायनमुक्त प्लास्टिकचे फोल्डर्स बाजारात मिळतात. या प्लास्टिकच्या फोल्डरमध्ये नोटा ठेवल्यावर त्यावर धूळ बसत नाही, बुरशी लागत नाही. तसंच तांब्याच्या नाण्यांना रसायनमुक्त शुद्ध खोबरेल लावून ठेवावं लागतं. चांदीची नाणी काळी पडू नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवावी लागतात. सोन्याच्या नाण्यांवर मात्र कोणताच परिणाम होत नाही. ती आहे तशीच राहतात. ती स्टीलच्या डब्यात ठेवून चालतात. मुळातच चलनांचा संग्रह करणं, त्याची काळजी घेणं, प्रदर्शनं भरवणं, मुलांना त्याची माहिती देणं यासाठी लागणारा वेळ हा मला मन:शांती देणारा काळ असतो. माझ्या अन्य जबाबदार्‍यांमुळे येणारा ताण, धकाधकीच्या दिनचर्येमुळे होणारी दगदग हे सारं चलनांचा संग्रह करताना, तो पाहताना कुठच्या कुठे पळून जातं. ऐतिहासिकदृष्ट्या हा संग्रह मोलाचा आहेच, त्याच वेळी माझ्यासाठी हा एक प्रकारचा यज्ञच आहे. मनात तो 24ु7 धगधगत असतो. त्याच वेळी माझ्या मनाला शांतवतही असतो, मला माणूस म्हणून समृद्धही करत असतो.“

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.