मणिपूरचा हिंसाचार आणि चर्चच्या उलट्या बोंबा

विवेक मराठी    12-May-2023   
Total Views |
 
manipur
कुकी किंवा नागा ख्रिश्चन मैतेई हिंदूंवर अत्याचार करतात, तेव्हा त्यांचा या चकमकींकडे पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच ख्रिश्चन म्हणजे धार्मिक असतो. हिंदू समाज मात्र अशा घटनांकडे केवळ स्थानिक आणि जनजातीय संघर्ष म्हणून पहातो. मीडियातही तसेच मांडले जाते. नैसर्गिकपणे अशा प्रत्येक हिंसाचार आणि दंगलीनंतर, चर्चला अधिक मालमत्ता, अधिक जमिनी, अधिक ‘शुद्ध ख्रिश्चन भूमी’ मिळत जातात. तर हिंदू संख्या, जमीन, मालमत्ता कमी होत असते. मग हा हिंदू-ख्रिश्चन संघर्ष आहे असे का म्हणू नये? आधी आग लावायची आणि मग आपण पीडित आहोत अशी बोंब मारायची, ही चर्चची आणि बदमाश ख्रिश्चन नेतृत्वाची जुनी सवय आहे. सध्या उसळळेला हिंसाचार कोण करतोय याची वस्तुनिष्ठ मांडणी करणार लेख....
ईशान्य भारतातील म्यानमारला लागून असणार्‍या सीमावर्ती राज्य मणिपूरमध्ये सध्या गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. चुराचंदपूर, सेनापती, चंदेल, कांगपोकपी आणि टेंगनौपाल जिल्ह्यांमध्ये दंगली घडत आहेत. उपलब्ध व्हिडिओनुसार अनेक घरे जळून खाक झाली असून अनेक जण जखमी झाले आहेत. विविध प्रकारच्या बंदुका, घटक हत्यारे, क्रूड बाँब्ज इत्यादी वस्तू वापरून प्रचंड नासधूस करण्याचे काम आंदोलक करत आहेत. बंदुकीचे एक अख्खे दुकानच चुराचंदपूरमध्ये लुटले गेले. अशा भीषण परिस्थितीमुळे स्वाभाविकपणे सरकारने कर्फ्यू जाहीर केला आहे. विविध राज्यांतून सैनिकी व अर्धसैनिकी बलांच्या 120 तुकड्या, तसेच हवाई दलाच्या तुकड्या आजघडीला मणिपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. यात अजूनही वाढ होत आहे. बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक ठप्प केली गेलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाइलाजास्तव इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. आठ हजारांहून अधिक लोकांची सुरक्षित स्थळी व्यवस्था लावण्यात यंत्रणांना यश आले आहे. चाळीस हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. इतकी प्रचंड दक्षता घेऊनही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अराजकसदृश परिस्थितीसंदर्भात विविध प्रकारची खोटी, चुकीची, उलटसुलट माहिती नेहमीप्रमाणेच डाव्या मुखपत्रांतून, समाजमाध्यमांतून प्रसारित केली जात आहे. ते लोक या घटना म्हणजे उच्चवर्णीय हिंदूंचा गरीब, जनजातीय समाजावर अन्याय अशा प्रकारे रंगवतात. परंतु हा सगळा प्रकार गुंतागुंतीच्या अनेक घटनांचा, परिस्थितींचा परिपाक आहे. इंफाळ उच्च न्यायालयात 2012पासून मैतेई हिंदूंना जनजातीय अधिकार द्यावेत याकरिता चालू असणार्‍या केसला वेग आला आहे, हे कारण पुढे करून तिथे अराजकाची सुरुवात झाली. परंतु बाकीच्या अनेक अप्रकाशित पैलूंचाही या लेखात विचार करू.
 
 
 
एखाद्या भूभागातील भौगोलिक परिस्थितींचा तिथे वास्तव्य करणार्‍या विविध समाजांच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय, इत्यादी विविध सामाजिक अंगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आपल्याला माहीतच आहे की मणिपूर हे राज्य एखाद्या बशीसारखे आहे. चोहोबाजूंनी पहाडी प्रदेश आणि मध्ये सखल मैदानी भूभाग आहे. या खोर्‍यात विष्णोपासक मैतेई हिंदूंची वस्ती आहे. या मैतेई समाजाच्या राजाने सतराव्या शतकात हिंदू धर्म स्वीकारला, तेव्हापासून हा अनेकेश्वरवादी निसर्गोपासक समाज स्वत:ला वैष्णव हिंदू मानावयास लागला, असे म्हटले जाते. परंतु मैतेई समाज गेली हजारो वर्षे या भागात राहत आहे. या जनजातीची स्वत:ची अशी एक अतिशय प्रगल्भ, उन्नत संस्कृती आहे. त्याला सखोल अशी आध्यात्मिक बैठक आहे. यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 53% आहे; तर येथील पहाडी भागांत जे वेगवेगळे नागा, मिझो/कुकी नामधारी जनजातीय लोक राहतात, ते मात्र जवळपास 100% ख्रिश्चन धर्मांतरित आहेत. मणिपूरच्या उत्तरेला आणि वायव्येला मुख्यत: नागा ख्रिश्चन जनजाती, तर दक्षिण, नैर्ऋत्य आणि पूर्व भागांत बहुतेक सर्व धर्मांतरित झालेल्या कुकी जनजातींची वस्ती आहे. ही लोकसंख्या जवळपास 42% आहे. तसेच काही मैतेई महिला व मुस्लीम सैनिकांचे वंशजही आहेत. हा पांगल म्हणजेच मुस्लीम समाज 8 ते 9% आहे. आसामच्या दक्षिणेकडील मुस्लीम बहुसंख्य जिल्ह्यांतील मुस्लीम समाज, बांगला देशातील घुसखोर नेहमी यांच्या पाठीशी असतात. मणिपूरच्या लोकसंख्येची टक्केवारी खूपच अस्थिर आहे आणि दर दशकात हिंदूंची टक्केवारी कमी होत जाताना पाहायला मिळते आहे. 1901 साली 96% असणारा हिंदू समाज आज केवळ 53% आहे, यातच काय ते समजून जावे.
 
 

manipur
 
मणिपुरातील एकूण जमिनीच्या सुमारे 15% भूभागावर समतल प्रदेश आहे, जेथे 53% हिंदू आणि 9% मुस्लीम राहतात आणि सुमारे 80-85% जमीन टेकड्या आहेत, जेथे 42% नामधारी नागा-कुकी जनजातीय - म्हणजेच धर्मांतरित ख्रिश्चन राहतात. त्यामुळे आधीच उपलब्ध जमिनीची असमान वाटणी झालेली आहे. त्यात आणखी एक मोठी अडचण अशी आहे की डोंगरी जमातींच्या जमिनी कायद्यानुसार आदिवासी जमिनी म्हणून पहाडी भूभाग नागा, कुकी, मिझो जनजातींसाठी संरक्षित आहेत. इतर जातींच्या लोकांना तेथे स्थायिक होण्यास, जमिनींचे व्यवहार करण्यास मनाई आहे. या टेकड्यांवरील बहुतेक रहिवासी ख्रिश्चन असल्यामुळे या भूमी अक्षरश: ख्रिश्चनसंरक्षित प्रदेशच झाले आहेत. हिंदुबहुल खोर्‍यातील भागात मात्र वेगळे कायदे आहेत, कारण मैतेई हिंदूंना एसटीअंतर्गत वर्गीकृत केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या भूमीवर कोणीही येऊन स्थायिक होऊ शकतात. याच विचित्र कायद्यांचा फायदा घेऊन टेकड्यांवरील नामधारी जनजातीय ख्रिश्चन आणि पांगल मुस्लीम, मैतेई हिंदूंना त्यांच्या घरातून आणि जमिनीवरून विविध प्रकारे हुसकून लावीत आहेत. जमीन जिहादची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत असतीलच. इथेही असेच प्रकार घडताना दिसत आहेत. यामुळे अर्थातच मैतेई समाजावर असमान व अत्यंत अन्यायकारक परिस्थिती ओढवलेली आहे.
 
 
 
जेव्हा मणीपूर संस्थान भारतात विलीन झाले, तेव्हा मैतेई जनजातींत गणले जात होते. पण चर्चच्या कारस्थानांना शरण जात तेव्हाच्या केंद्र सरकारने मैतेई समाजाचा जनजातीय दर्जा काढून घेतला. जर आता मैतेई समाजाला जनजातीय दर्जा प्राप्त झाला, तर चर्चचे मोठे नुकसान होईल. मैतेईंचे धर्मांतरण करणे अतिशय जिकिरीचे होऊन जाईल. तसेच मैतेईंच्या जमिनी बळकावणे बंद होऊन जाईल. आरक्षणात वाटेकरी निर्माण होणे कुकींना कदापि आवडणारे नाही. ते सध्या ख्रिश्चन अल्पसंख्याक व जनजातीय असे दुहेरी आरक्षण मिळवत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘जनजातीय लोक हिंदू नसतात’ या चर्चच्या प्रचाराला मोठा धक्का पोहोचेल. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे.
 
 
 
आता या डोंगरी जमिनीविषयक कायद्यांचे अन्य दुष्परिणाम पाहू. मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्याला आता वर्ष होईल. गेल्या काही महिन्यांत सरकारने चुराचंदपूर जिल्ह्यात उपग्रह मॅपिंग करून घेतले. या पाहणीमुळे अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या. वर म्हटल्याप्रमाणे सगळे पहाडी जिल्हे ख्रिश्चन समुदायांसाठी अतिशय सुरक्षित असे अड्डे बनले आहेत. त्याचा वापर करून इथे अफूची प्रचंड प्रमाणात लागवड केली जात आहे. अनेक ठिकाणी दहशतवादी गटांचे अड्डे, छावण्या राजरोसपणे वसू लागल्या आहेत. अनेक नवीन गावे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली दिसत आहेत. इथल्या लोकसंख्येत अनैसर्गिकपणे वाढ झालेली आहे. कुकी जनजातीय फक्त भारतातच नाहीत, तर त्यांच्या अनेक भगिनी जमाती म्यानमारमध्ये आहेत. तिथून हे चीनवंशीय कुकी लोक मणिपूरमध्ये घुसखोरी करून आलेले आहेत. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. त्यांना इथले जातबंधू अवैधरित्या आधार कार्ड, रेशन कार्ड मिळवून देतात. त्यांना गावे वसवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात.
 
 
manipur
 
या चीनवंशीय घुसखोरांचे लागेबांधे पाकिस्तान आणि चीनबरोबरही आहेत. म्हणूनच म्यानमारमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून म्यानमारचे सैन्य जेव्हा त्यांना सळो की पळो करून सोडते, तेव्हा हे अशांतीचे पाईक मणिपूरच्या दिशेने धाव घेतात. पाक-चिनी संस्था त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणही देत असतात. भारतात अशांती निर्माण करण्यासाठी, विविध प्रकारच्या तस्करी करण्यासाठी, अफूच्या उत्पादनासाठी, दहशतवादी, फुटीरतावादी गट तयार करण्यासाठी यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असतो. जंगल भागात त्यांना संरक्षित करून हे अतिरेकी गट भारतभर अंमली पदार्थांची तस्करी करतात. या सगळ्या कारवाया विनासायास करता याव्यात यासाठी चर्च त्यांना सर्व प्रकारे संरक्षण उपलब्ध करून देत असते. उपलब्ध आकडेवारीनुसार मणिपूरमध्ये 1970 साली 1957 गावे होती. आज या गावांची संख्या 2788 आहे. यात पहाडी जिल्ह्यांत प्रचंड वेगाने नव्याने झालेली वस्ती उपग्रह छायाचित्रांद्वारे सहज लक्षात येते. पॉपी म्हणजेच अफूच्या लागवडीखालील क्षेत्रातही गेल्या काही वर्षांत जवळपास दुपटीने वाढ झालेली दिसत आहे.
 
 
ही आकडेवारी आणि त्यामागचे सत्य लक्षात घेऊन मणिपूर सरकारने मार्च महिन्यात एक महत्त्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे कुकी व झोमी नॅशनल आर्मीशी झालेल्या युद्धबंदीच्या करारातून राज्य सरकारने आपले अंग काढून घेतले. गेले काही महिने जागोजागी झालेली अवैध बांधकामे जमीनदोस्त करावयास सुरुवात केली. अफूची शेती नष्ट करण्यास सुरुवात झाली. म्यानमार सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करणारे ख्रिश्चन अतिरेकी गट मणिपुरी कुकी भागात घुसू नयेत, यासाठीही सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.
 

manipur 
 
खरी गोम आहे ती ही! या स्वच्छता कार्यक्रमामुळे अस्वस्थ झालेले दहशतवादी गट सक्रिय झाले व त्यांनी योजनापूर्वकरित्या आपापल्या भागातील मैतेई समाजावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. लवकरच मैतेईबहुल भागात याचे लोण पोहोचले आणि त्यांनीही स्वाभाविकपणे प्रतिकारास सुरुवात केली. मैतेई समाज अतिशय शूर, स्वाभिमानी आणि कट्टर आहे, म्हणूनच तर ते आजपर्यंत टिकून आहेत! अशा प्रकारच्या चकमकी कुकींसाठी नव्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या जनजातींशी यांचे सतत वाद होत असतात.
 
 
 
जेव्हा कुकी किंवा नागा ख्रिश्चन मैतेई हिंदूंवर अत्याचार करतात, तेव्हा त्यांचा या चकमकींकडे पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच ख्रिश्चन म्हणजे धार्मिक असतो. याद्वारे चर्चसाठी जमिनी लाटण्याचा, हिंदू व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात. हिंदू समाज मात्र अशा घटनांकडे केवळ स्थानिक आणि जनजातीय संघर्ष म्हणून पहातो. मीडियातही तसेच मांडले जाते. नैसर्गिकपणे अशा प्रत्येक हिंसाचार आणि दंगलीनंतर, चर्चला अधिक मालमत्ता, अधिक जमिनी, अधिक ’शुद्ध ख्रिश्चन भूमी’ मिळत जातात. ख्रिस्ती धर्मीयांची संख्या वाढत जाते. तर हिंदू संख्या, जमीन, मालमत्ता कमी होत असते. मग हा हिंदू-ख्रिश्चन संघर्ष आहे असे का म्हणू नये? आधी आग लावायची आणि मग आपण पीडित आहोत अशी बोंब मारायची, ही चर्चची आणि बदमाश ख्रिश्चन नेतृत्वाची जुनी सवय आहे.
 
 
 
जेव्हा पहाडी जिल्ह्यांमध्ये मैतेई हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत होते, तेव्हा चर्चप्रणीत मीडिया याला ‘दोन जमातींतील संघर्ष’ म्हणत होता. पण जेव्हा मैतेई हिंदूंनी इंफाळमधे चर्च आणि ख्रिश्चन समुदायाचा प्रतिकार करावयास सुरुवात केली, तेव्हा ट्रायबल चर्चेस फोरम मणिपूर, कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया, काउन्सिल ऑफ बाप्टिस्ट चर्चेस इन नॉर्थ ईस्ट इंडिया इत्यादी ख्रिश्चन गट ख्रिश्चन समुदायावर मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचार होत आहेत अशी ओरड करत आहेत. लवकरच या संदर्भात जागतिक ख्रिश्चन लॅाबीही सक्रिय होईल.
 
 
 
केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणात अतिशय सुबक, सुनियोजित हालचाली करून सामान्य हिंदू समाजाचे शिरकाण होण्यापासून मोठ्या प्रमाणात त्यांना वाचवले आहे. पण सर्वसामान्य भारतीयही जेव्हा देशविघातक शक्ती, चर्चचे षड्यंत्र ओळखून नेहमीसारखा सर्वधर्मसमभाववादी दृष्टीकोन जरा बाजूला ठेवून उघड्या डोळ्यांनी जेव्हा संस्कृतींच्या दीर्घ युद्धातली एक लढत म्हणून या अराजकाकडे पाहू लागतील, तेव्हाच दोन्ही बाजू तुल्यबळ होतील आणि जी संस्कृती शाश्वत, सर्वसमावेशक, न्याय्य आणि ताकदवान असेल, ती जिंकण्याची शक्यता निर्माण होईल.
 
 

अमिता आपटे 

ईशान्य भारत तसेच आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक, मराठी, इंग्रजी भाषेत लेखन, सामाजिक कार्यकर्ती, गेली आठ वर्षे ईशान्य भारतात वर्षांतून दोन तीन वेळा सामाजिक कामासाठी प्रवास.
 

९९८७८८३८७३