डॉ. हेडगेवारांच्या कार्यपद्धतीची तीन सूत्रे

विवेक मराठी    21-Jun-2023   
Total Views |
rss

लोकसंग्रह, संस्कार आणि दृढ संबंध ही पू. डॉक्टरांच्या कार्यपद्धतीची तीन महत्त्वाची सूत्रे होती. स्वयंसेवक आणि संघटना सर्वगुणसंपन्न व्हावेत असा त्यांचा प्रयत्न असे. देशभक्त, समाजभक्त, ज्वलंत ध्येयवादी आणि नेतृत्व करण्यास समर्थ असा स्वयंसेवक या शब्दाला अर्थ संघानेच उत्पन्न केला. हे डॉक्टरजींचेच वैशिष्ट्य होते.
 
पू. बाळासाहेब देवरसांनी 1951 साली ‘पांचजन्य’साठी लिहिलेल्या मूळ हिंदी लेखाचा अनुवाद पू. डॉक्टरांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रकाशित करीत आहेत.


इंग्लिशमध्ये एक म्हण आहे - A hero is never a hero to his private servant (एखादा महापुरुष त्याच्या व्यक्तिगत सेवकासाठी कधीही महापुरुष नसतो). कारण त्याच्या व्यक्तिगत सेवकाला त्याच्या बाबतीत सर्व काही माहीत असते. परंतु डॉक्टरांच्या बाबतीत अनुभव अगदी भिन्न असे. जणू काही ते या म्हणीला अपवादच होते. त्यांना दुरून पाहणारी कोणीही व्यक्ती हेच तुमचे अखिल भारतीय नेते का? असा आश्चर्याने प्रश्न करीत असे. अखिल भारतीय नेत्यांच्या बाबतीत लोकांची एक विशिष्ट कल्पना असते. परंतु डॉक्टरांमध्ये असे काहीच नव्हते. ते दुरून मोठे वाटत नसत, परंतु जवळ आल्यानंतर त्यांचे महत्त्व प्रकट होई. अनेक लोक त्यांना सामान्य मनुष्य समजून त्यांच्याजवळ जात आणि विनम्र होऊन परतत असत. Those who came to scoff remained to pray (उपहास करण्यासाठी आलेले लीन होऊन गेले) अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
लोकसंग्रह
 
 
डॉक्टर अत्यंत कुशल संघटक होते. त्यांच्या कार्यपद्धतीची तीन सूत्रे मांडण्याचा मी इथे प्रयत्न करीन. पहिले सूत्र आहे लोकसंग्रह! संघटनेचा अर्थच मुळी लोकसंग्रह असा आहे. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. चार लोकांना एकत्र करणे आणि त्यांना एकत्र करून एका निश्चित मार्गावर चालविणे अत्यंत अवघड काम आहे. आजकाल तर सख्खी भावंडेदेखील एकत्र असली आणि विवाहित असली, तर त्यांच्यात अद्याप भांडण कसे नाही झाले याचे आश्चर्य वाटते. अशा स्थितीत लोकांना एकत्र करून त्यांना सदासर्वदा एकत्र ठेवणे अतिकठीण काम आहे.
 
 एकदा एका माणसाने संघ मुलांना चोरी करायला शिकवितो असे डॉक्टरांना आमच्यासमोर त्वेषाने सांगितले. परंतु डॉक्टरांना यानेदेखील राग आला नाही.
लोकसंग्रह एक शास्त्र आहे, एक कला आहे असे परमपूजनीय डॉक्टरांचे म्हणणे होते. लोकसंग्रह कसा करावा? केवळ ध्येय सांगून आणि प्रचार करून लोकसंग्रह होतो अशी लोकांची कल्पना होती. परंतु चार लोकांना एकत्र करून, एका ध्येयाने बांधून वर्षानुवर्षे कार्यरत ठेवणे अशा प्रकारे शक्य नाही. मी लोकसंग्रहाचे साधन आहे असे डॉक्टरांचे म्हणणे असे. स्वयंसेवक स्वत:च लोकसंग्रहाचे साधन असतो. सार्वजनिक भाषणाचा किंवा प्रचाराचा त्यासाठी उपयोग नाही. या गोष्टींनी क्षणिक उत्तेजना किंवा क्षणिक संघटना निर्माण होऊ शकते. परंतु टिकाऊ संघटनेसाठी ही सर्व साधने व्यर्थ आहेत. म्हणूनच ’लोकसंग्रह करू शकाल असे स्वत:ला घडवा’ असे डॉक्टरांचे म्हणणे असे. हे त्यांनी स्वत: करून दाखविले. ते स्वभावाने फार रागीट होते. परंतु राग लोकसंग्रहाचा शत्रू असल्याचे त्यांनी पाहिले, म्हणून त्यांनी स्वत:मधून प्रयत्नपूर्वक राग काढून टाकला. एकदा एका माणसाने संघ मुलांना चोरी करायला शिकवितो असे डॉक्टरांना आमच्यासमोर त्वेषाने सांगितले. परंतु डॉक्टरांना यानेदेखील राग आला नाही. त्यांनी त्या माणसाला शांतपणे सर्व काही समजावून सांगितले. राग म्हणजे काय हे जणू ते विसरून गेले होते. अशा प्रकारे त्यांनी स्वत:ला लोकसंग्रहाचे साधन बनविले होते.
 
 लोक डॉक्टरांची टर उडवायचे, कारण त्या काळी शाखेत जाणारी आम्ही सर्व मुले त्यांच्या लेखी ’शेंबडी पोरे’ होतो. ’या मुलांच्या भरवशावर तुम्ही अखिल भारतीय संघटना बांधणार का?’
’शेवटी मी मनुष्य आहे’ आणि ’चूक होणे स्वाभाविक आहे’ असे म्हणणे त्यांना रुचत नसे. क्वचित चूक झाली तर अडचण नाही, पण चूक दुरुस्त करणे माणसाच्या हाती असते. मी आहे तसा राहणार, माझा त्याप्रमाणे उपयोग करून घ्या हा विचारच मुळी चुकीचा आहे. आपले दोष अवश्य दूर केले पाहिजेत असे त्यांचे मत होते. डॉक्टरांनी आपल्या जीवनाद्वारे अनेक जीवने उन्नत केली, त्यांच्यात जबाबदारीची जाणीव जागविली हेच संघाला सर्वत्र मिळणार्‍या यशाचे रहस्य आहे. सुरुवातीला लोक डॉक्टरांची टर उडवायचे, कारण त्या काळी शाखेत जाणारी आम्ही सर्व मुले त्यांच्या लेखी ’शेंबडी पोरे’ होतो. ’या मुलांच्या भरवशावर तुम्ही अखिल भारतीय संघटना बांधणार का?’ असा प्रश्न लोक विचारीत. आज खरोखरच ’नाक पुसणारे स्वयंसेवक’च स्वत:ला संघमय करून प्रांताप्रांतांत संघकार्य करीत आहेत. या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात आदर्श प्रस्थापित केला आहे. संघाचे कार्यकर्ते फार चांगले असतात असे विरोधकही म्हणतात, म्हणूनच विरोधी संघटनांचे नेतेसुद्धा त्यांना ’संघाप्रमाणे संघटना करा’ असे सांगत असतात. परमपूजनीय डॉक्टरांनी सर्व लोकांना आपल्या उदाहरणाने लोकसंग्रह करण्यास योग्य बनविले. ते लोकसंग्रह करू शकतील असा त्यांचा स्वभाव घडविला.
 
 
संस्कार
 
 
डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे दुसरे सूत्र आहे संस्कार! पुष्कळ लोकांना एकत्र करून त्यांच्यापुढे भाषण करून संघटना होत नाही. एकत्र येणार्‍या लोकांवर संस्कार करणे आवश्यक असते. आपल्यात संस्कारक्षमता असल्यास कुठल्याही मनुष्याचा स्वभाव संस्कारांनी हवा तसा निर्माण करता येतो, म्हणूनच त्यांनी शाखा-व्यवस्था सुरू केली. व्यायाम करण्यासाठी शाखा सुरू करण्यात आली असे अनेक लोकांना वाटते, पण अशा प्रकारचा डॉक्टरांचा कोणताच विचार नव्हता. हा कार्यक्रम वातावरण निर्माण करण्यासाठी, संस्कार उत्पन्न करण्यासाठी करण्यात आला. संघातील कार्यक्रमांचा हाच हेतू आहे. कार्यक्रम बंद झाले तर संघ बंद होईल, असा काही जणांचा भ्रम असतो. परंतु वस्तुत: कार्यक्रम कार्यक्रमासाठी नसतो. संघस्थान आणि कार्यक्रम वातावरणासाठी आहेत. कार्यक्रम काहीही करावेत, पण संस्कारक्षम वातावरण निर्माण झाले पाहिजे. संस्कारक्षम वातावरण आवश्यक गुण आहे. डॉक्टरांनी शाखेच्या वातावरणात तीव्र संस्कारक्षमता निर्माण केली. ही संस्कारक्षमता साधारण नव्हती, तर अनेक जणांची जीवने प्रज्वलित करणारी, जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी होती. संघात गेल्याने मनुष्य वेडा होतो असे आजही अनेक जण म्हणतात. वस्तुत: हा आक्षेप नसून आपल्या वातावरणाच्या संस्कारक्षमतेचे प्रमाणपत्र आहे. याच वातावरणाने हिंदूंमध्ये आत्मविश्वास जागविला आहे. याद्वारेच संघाने व्यक्तिजीवनाची परंपरा तोडली आहे.
 
लोकांना एकत्र करून त्यांच्यापुढे भाषण करून संघटना होत नाही. एकत्र येणार्‍या लोकांवर संस्कार करणे आवश्यक असते.  
 हे वातावरण कसे निर्माण होते? वास्तविक यालाही स्वयंसेवकच जबाबदार आहे. सर्वत्र एकसारखे वातावरण निर्माण व्हावे, एकसारखे संस्कार निर्माण व्हावेत असा स्वयंसेवकांचा व्यवहार असला पाहिजे. कार्यक्रम हे संघाच्या यशाचे इंगित नसून वातावरण हे यशाचे इंगित आहे. एका दीपाने दुसरे दीप प्रज्वलित करण्याची अखंड परंपरा त्या महान दीपाने - म्हणजे परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉक्टरांनी सुरू केली.
 
 
 
दृढ संबंधांची निर्मिती
 
दृढ संबंधांची निर्मिती हे तिसरे सूत्र होय! संघटनेला प्रभावी बनविण्यासाठी त्याच्या घटकांमध्ये अक्षुण्ण संबंध असले पाहिजेत, असे डॉक्टरजी म्हणत.
 
 
या तिन्ही गोष्टी त्यांच्या स्वत:च्या होत्या. यांपैकी कोणतीही गोष्ट कुठल्या जुन्या सार्वजनिक परंपरेत नव्हती. हा त्यांच्याच प्रतिभेचा प्रसाद आहे. सार्वजनिक जीवनात अनेकदा एकच ध्येय असलेल्यांमध्ये आपसात लठ्ठालठ्ठी होते. केवळ ध्येय एक असल्याने एकमेकांसह लोक काम करत राहतील ही समजूत चुकीची आहे. संघटना ठीक चालविण्यासाठी प्रेमभाव आवश्यक आहे, हे सूत्र डॉक्टरजींनी सांगितले. संघस्वयंसेवकांमध्ये दिसणारे प्रेम ही त्यांनीच निर्मिलेली परंपरा आहे. डॉक्टरजी स्वत: स्वयंसेवकांच्या घरगुती कामांत मोठ्या उत्साहाने भाग घेत असत. लग्नाच्या मोसमात डॉक्टरजी एका दिवशी दहादहा, वीसवीस लोकांच्या घरी जाऊन लग्नसमारंभांत सहभागी होत असत. अशा प्रकारे सरसंघचालक असूनही आपले व्यक्तिगत संबंधही अधिकाधिक असावेत, असा त्यांनी आदर्श घालून दिला.
 डॉक्टरजी स्वत: स्वयंसेवकांच्या घरगुती कामांत मोठ्या उत्साहाने भाग घेत असत. लग्नाच्या मोसमात डॉक्टरजी एका दिवशी दहादहा, वीसवीस लोकांच्या घरी जाऊन लग्नसमारंभांत सहभागी होत असत.
 प्रत्येक स्वयंसेवक मित्र असावा आणि प्रत्येक मित्र स्वयंसेवक असावा, असे त्यांचे म्हणणे असे. आजही एखादा स्वयंसेवक आजारी पडला, तर त्याला भेटायला इतक्या संख्येने स्वयंसेवक जातात की घरातील मंडळींनाही आश्चर्य वाटते. स्वयंसेवकांच्या परस्परभेटीने काही क्षणांतच इतकी घनिष्ठता वाढते की जणू फार वर्षांचे मित्र असावेत! सख्ख्या भावांपेक्षाही अधिक प्रेम असते. हे सर्व डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक निर्माण केले. संघाचे कोणतेही काम असो, ते करताना लाज नाही वाटत. अशी श्रमनिष्ठा त्यांनी निर्माण केली. मोहिते संघस्थान डॉक्टरांनी स्वत: स्वच्छ केले होते, हे आपण जाणतोच.
 
 
डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व
 
 
डॉक्टरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व! त्यांची बैठक अतिशय रोचक असे. बैठकीत अनेक कथा-किस्से असत आणि त्या कथांद्वारे थट्टामस्करी करत ते लोकांना त्यांचे दोष दाखवीत, जेणेकरून त्यांत सुधारणा व्हावी. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करीत. स्वयंसेवक निर्दोष व्हावेत आणि संघाचा मार्गही निर्दोष व्हावा याकडे ते विशेष लक्ष देत. स्वयंसेवक आणि संघटना सर्वगुणसंपन्न व्हावेत असा त्यांचा प्रयत्न असे. मोठ्यामोठ्या बदमाश लोकांना त्यांनी ठीक केले होते, हे सर्व पाहून लोकांना आश्चर्य वाटत असे. त्यांचा संपर्क अत्यंत प्रभावी होता. त्यांनी ’स्वयंसेवक’ शब्दाचा अर्थच बदलून टाकला. स्वयंसेवक म्हणजे देशभक्त, समाजभक्त, ज्वलंत ध्येयवादी आणि नेतृत्व करण्यास समर्थ असा अर्थ संघानेच उत्पन्न केला. हे डॉक्टरजींचेच वैशिष्ट्य होते. आज त्यांच्या पुण्यतिथीचे स्मरण करून असेच स्वयंसेवक ठिकठिकाणी निर्माण करण्याचे आणि समाजाची शक्ती वाढविण्याच्या कार्याचे व्रत आपण घेतल्यास परमपूजनीय डॉक्टरांचे ध्येय शीघ्र प्राप्त होईल.
 
 
मूळ हिंदी लेख - पू. बाळासाहेब देवरस
(पांचजन्य, वर्षप्रतिपदा, एप्रिल 1951)
अनुवाद - डॉ. श्रीरंग गोडबोले

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन