भारत : लोकशाहीची जननी

प्रजासत्ताक दिन विशेष

विवेक मराठी    20-Jan-2024   
Total Views |
भारत ही लोकशाहीची जननी आहे, अशी मांडणी सातत्याने होताना दिसते आहे. भारतीय इतिहासाच्या अगदी प्राचीन काळापासून याचे पुरावे मिळतात. मात्र, पुरेसे गांभीर्य नसलेल्या आणि विविध विषयांकडे बघण्याचा ‘टच अ‍ॅण्ड गो’ दृष्टिकोन झालेल्या माध्यमांचे या विषयाकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे या विषयाबद्दल काही संदर्भ, ऐतिहासिक ज्ञात पुराव्यांच्या वा नोंदींच्या आधारे मांडणी करण्याचा तसेच, परिस्थितीजन्य निरीक्षणातूनदेखील काही लिहिण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहे.

DemocracyDemocracy
 
गेली काही वर्षे पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यातून भारत ही लोकशाहीची जननी आहे, अशी मांडणी सातत्याने होताना दिसते आहे. ‘जी-20’च्या वर्षभराच्या अध्यक्षपदामुळे भारतात अनेक ठिकाणी विविध समित्यांच्या बैठका झाल्या, वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात ‘जी-20’ परिषददेखील पार पडली. अशा सर्व बैठकांत, परिषदांत भारतातील लोकशाही परंपरांच्या ऐतिहासिक पाऊलखुणांबाबत आग्रहाने बोलले गेले आणि त्या म्हणण्याला पूरक असे साहित्यदेखील देण्यात आले. मोदींनी सांगितलेले काहीही किरकोळीत काढायचे किंवा असत्य ठरवायचे, याची घाई झालेले राजकीय विरोधक आणि त्यांची ‘री’ ओढणार्‍या काही माध्यमांनी लगेचच मोदींचे हे विधान अतिरंजित आहे, असा शिक्का घाईने उमटवला आणि त्या मांडणीची पुरेशी चर्चाच झाली नाही. ‘जी-20’ परिषदेनंतर लगोलग स्थापन झालेली इंडिया आघाडी पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुका आणि रामजन्मभूमी मंदिरात होणारा रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना समारंभ हे विषय इतके वेगाने समोर आले आणि चर्चेचा देशव्यापी धुरळा उडवणारे ठरले. त्यामुळे पुरेसे गांभीर्य नसलेल्या आणि विविध विषयांकडे बघण्याचा ‘टच अ‍ॅण्ड गो’ दृष्टिकोन झालेल्या माध्यमांचे भारत ही लोकशाहीची जननी आहे, या विषयाकडे दुर्लक्ष न झाले तरच नवल! त्यामुळे या विषयाबद्दल या व अशा काही लेखांतून साधार काही मांडण्याचा प्रयत्न आहे. या मांडणीत काही संदर्भ ऐतिहासिक ज्ञात पुराव्यांच्या वा नोंदींच्या आधारे देण्याचा जसा प्रयत्न असेल, तसाच परिस्थितीजन्य निरीक्षणातूनदेखील काही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारतीय इतिहासाच्या अगदी प्राचीन काळापासून जर सुरुवात करायची म्हटली, तर आपल्याला वेदकाळापासून आढावा घ्यावा लागेल. भारतातील तेच पहिले ज्ञात अक्षरवाङ्मय आहे. ते महाभारताच्या काळाच्याही पूर्वीचे आहे, असेही मानले जाते. तसा विचार केला तर हा काळ किमान 3000 ते 3500 वर्षांपूर्वीचा आहे. (अनेक जण जरी महाभारताचा काळ पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे आणि वेदांचा त्याही पूर्वीचा आहे, असे मानत असले, तरी अनेक इतिहासकार वर लिहिल्यानुसार कालनिश्चिती करताना दिसतात. त्यामुळे किमान 3000-3500 वर्षे अशी शब्दयोजना केली आहे) म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 1500 वर्षांचा. ग्रीक संस्कृतीमध्ये लोकशाही राज्याचे संदर्भ ज्या काळातले आहेत, त्याच्या अनेक शतके आधी आपल्या संस्कृतीत हे संदर्भ आढळतात. ‘लोकशाही’ किंवा ’लोकतंत्र’ या शब्दांत मुख्यत: ‘लोक’ आणि त्यांचे/त्यांच्यासाठीचे शासन किंवा शासन पद्धती हे अर्थ अपेक्षित आहेत. ऋग्वेद आणि अथर्ववेद या दोन्ही वेदांमध्ये अशा प्रक्रियेबद्दल किंवा पद्धतीच्या अस्तित्वाबद्दल काही संकेत आपल्याला मिळतात. विशेषत: ‘सभा’ आणि ‘समिती’ या दोन शब्दांचा असाच उल्लेख या दोन्ही वेदांमध्ये आहे. आजही आपल्या लोकशाही रचनांमध्ये ‘सभा’ आणि ‘समिती’ या दोन रचनांबाबत आपण सर्व जाणतो. अधिक काही लिहिण्याची गरज नाही. याव्यतिरिक्त प्रशासनिक दृष्टीने सर्वात लहान लोक समूह म्हणून ‘विदथ’ त्यापेक्षा मोठा समूह ‘ग्राम’ या शब्दाने सांगितला आहे. आजही ‘ग्रामसभा’, ‘ग्रामपंचायत’ हे गावपातळीवरील लोकशाहीच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत, हे आपण जाणतोच. ग्रामाचा प्रमुख किंवा नेता म्हणून ‘ग्रामणी’ असाही शब्द वेदांमध्ये आढळून येतो. काही ग्रामांच्या समूहाला ‘जन’ असा उल्लेख आहे. हे सगळे उल्लेख अनेकदा आणि शंभर - दोनशेहून अधिक वेळा आले आहेत. ‘जन’ या समूहांच्या एकत्रित अशा मोठ्या समूहाला ‘जनपद’ अशा शब्दाने संबोधले आहे, पण ‘जनपद’ शब्द मात्र फक्त एखादा किंवा अगदीच मोजक्या वेळा आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘राष्ट्र’ हा शब्द जगात पहिल्यांदा ऋग्वेदात आला आहे. ही सगळी उदाहरणे विविध प्रशासनिक एककां(युनिट्स)च्या बद्दल सांगणारी आहेत.

DemocracyDemocracy 
 
अशा रचना केवळ ‘सैनिकी’ प्रकारच्या किंवा ‘राजा बोले प्रजा हले’ अशा नव्हत्या, तर लोकांच्या सहभागातून उत्पन्न झालेल्या होत्या. त्याचे पुरावे आपल्याला अनेक वेदऋचांमधून मिळतात. ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् ।’ यासारख्या सूक्तामधून आपण एकत्र जाऊया, एकत्र बोलूया, आपले सर्वांचे मन एक होवो असे सांगितले आहे. किंवा ‘समानी व आकूति: समाना हृदयानि व:। समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति॥’ यामधून आपला उद्देश एक असू दे, त्याला सुसंगत आपली भावना असू दे, आपले विचार सारखे असू दे, जसे या विश्वात ऐक्य आहे किंवा ‘ॐ सहनाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।’ या प्रसिद्ध ऋचेमधून आपण एकत्र येऊ, एकत्र अन्नग्रहण करू आणि एकत्र शौर्य गाजवावे/ तपस्या करू, असे सांगितले आहे. ही सगळी उदाहरणे लोकांना विविध प्रकारे सहभागाचे आवाहन करणारी आहेत. ‘राजाज्ञा’ सांगणारी नाहीत.
 
भारतवर्षात जशी परंपरेने राजा सत्तास्थानी असणारी राज्ये होते, तशी अनेक ‘जनपद’ नावाचीदेखील शासनव्यवस्था होती. 
वेदकाळानंतर येणारा टप्पा हा रामायण काळातील मानला, तर त्याही काळात आपल्याला लोकशाहीच्या काही खुणा दिसून येतात. ही गोष्ट खरी की, सत्तास्थानी ‘राजा’ होता. ‘रघुकुल’ नावाची रामाच्या आधीची आणि नंतरची मोठी वंशावळ ज्ञात आहे. ती यादीही त्या-त्या काळी सत्ताप्रमुख असलेल्या राजांची आहे. पण तरीही ‘राजसभा’ आणि ‘मंत्रिपरिषद’ निर्णयप्रक्रियेत आणि कार्यवाहीत सहभागी असायचे, असेही भरपूर दाखले मिळतात. ‘संसद’ हा शब्ददेखील ‘राजसभा’ अशा अर्थाने रामायण काळात वापरला आहे, असे म्हणतात. महाभारताच्या काळातही भारतवर्षात जशी परंपरेने राजा सत्तास्थानी असणारी राज्ये होते, तशी अनेक ‘जनपद’ नावाचीदेखील शासनव्यवस्था होती. जसे हस्तिनापूर राज्य परंपरेने कुरुवंशाचे राज्य होते, तसे ‘अंग’ किंवा ‘मगध’ अशी काही जनपदे होती. तिथे जरी सत्तास्थानी ‘राजा’ असला, तरी ‘राजसभा’, ‘मंत्रिपरिषद’ अशा रचनांमार्फत कारभार चालवला जायचा. आजही युरोपातील अनेक देशांमध्ये अशी पद्धत आहे.
 
 
इतिहासाच्या पुढील काळातही लोकशाहीच्या पाऊलखुणा आपल्याला दिसतात. भगवान महावीर, भगवान बुद्धांच्या काळात उत्तर भारतात राजेशाही आणि लोकांच्या छोट्या समूहाने चालवलेली शासनव्यवस्था अशा दोन्ही प्रकारच्या शासनव्यवस्था अस्तित्वात होत्या. लोकांच्या छोट्या समूहाने चालवलेल्या व्यवस्थेला ‘गणसंघ’ असे म्हणत. याच काळात ‘राजकोश’ आणि कर गोळा करणे या पद्धती सुरू झालेल्या दिसतात, ज्या चाणक्याच्या काळात स्थिर झाल्या. बुद्ध काळातील ‘वज्जी’ या गणराज्यातील शासन पद्धतीची चर्चा भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिष्यात झालेल्या संवादात नोंदवली गेली आहे. भगवान बुद्ध सांगतात, “वज्जी लोक त्यांच्या राज्यात ‘जनसभा’ नियमितपणे घेतात. सतत भेटत राहणे, राज्यात ‘जनसभा’ वारंवार घेणे, यामुळे त्यांना अधोगतीची काळजी नाही. त्यांचा उत्कर्षच होणार आहे. त्याच काळातील लिच्छवी गणराज्यशासित प्रदेशात छोट्या-छोट्या राज्यांसारखे प्रशासनिक भाग होते, त्यांचा एक प्रमुख असायचा.” नागरिकांनी निवडलेली एक ‘सभा’ असायची आणि तिची बैठक वर्षातून एकदा व्हायची. अशा अनेक गणराज्यांच्या बद्दल आणि शासन प्रणालीबद्दल बौद्ध साहित्यात भरपूर संदर्भ मिळतात.
 
 
वरील लेखनात सर्व उल्लेख प्रामुख्याने उत्तर भारतातील आहेत. दक्षिण भारतात आणि भारताच्या अन्य प्रदेशातही लोकसहभागाच्या, लोकशाहीच्या अनेक खुणा सापडल्या आहेत. नव्या संशोधनातून आणि उत्खननातून सापडतही आहेत. अशा सर्वांचा आढावा किंवा परिचय एका लेखात करणे शक्य होणार नाही. आपला देश हा त्याच्या वैविध्यतेबद्दल प्रसिद्ध आहे. लोकशाही, लोकसहभाग याबाबतही विविध प्रदेशांत वैविध्यपूर्ण माहिती आहे, ज्याचा परिचयदेखील आपल्याला यापुढील काही लेखात करून घेता येईल. आक्रमणाच्या काळात असे अनेक संदर्भ, ऐतिहासिक पुरावे नाहीसे, तरी झाले किंवा दुर्लक्षित तरी झाले. सुदैवाने गेल्या शतकात झालेल्या राष्ट्रीय विचाराच्या इतिहासकारांनी मोठ्या कष्टाने भारतीय इतिहासाच्या गौरवास्पद काळाची साधार मांडणी केली. के. पी. जयस्वाल, आळतेकर, भांडारकर, के. सी. मुजुमदार अशा अनेक इतिहास अभ्यासकांनी या संदर्भात लेखन केले आहे. त्या सर्वांचा मागोवा घेत लोकशाहीच्या ऐतिहासिक भारतीय परंपरांमध्ये आढळणार्‍या सर्व अभिमानास्पद गोष्टी लोकांच्या समोर आणणे गरजेचे आहे.

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक