विरोधकांची वैचारिक दिवाळखोरी

विवेक मराठी    12-Dec-2024   
Total Views |
ईव्हीएम ही मतदान यंत्रणा निर्दोष असल्याचे वारंवार सिद्ध झालेले असतानाही त्याच्या नावाने घातल्या गेलेल्या या गोंधळामुळे मविआची उरलीसुरली पतही मातीत मिळाली आहे. मात्र अद्यापही हे समजून घेण्याच्या, पराभवातून शिकण्याच्या- शहाणे होण्याच्यामनःस्थितीत मविआचे नेते नाहीत. सभागृहात विरोधी पक्षनेता निवडला जाण्याएवढे संख्याबळ यापैकी एकाकडेही नाही. याचे त्यांना गांभीर्य नसले तरी, ’विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कितीही असली तरी आम्ही त्यांना गांभीर्याने घेऊ,’ असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे.
EVMs
 
 नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत बहुमत मिळवत महायुतीने सत्तासूत्रे हाती घेतली तरी अद्यापही महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यश स्वीकारताना- ते मोठ्या जल्लोषात साजरे करताना ज्यांच्या मनात ईव्हीएमबद्दल कोणताही किंतु-परंतु नव्हता असे मविआचे सूत्रधार आता मात्र ईव्हीएमभोवती संशयाचे जाळे निर्माण करत आहेत. या आघाडीतील पराभूतांनी आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडून मोकळे होणे एक वेळ समजून घेता येईलही. कारण असे रडीचे डाव खेळणे, हा या आघाडीचा स्थायिभाव आहे. मात्र, जेव्हा मविआच्या विजयी उमेदवारांनी, ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करत शपथ घेण्याचे टाळले, तेव्हा हसावे की रडावे ते कळेना. निवडणुका जाहीर झाल्यापासून, खरे तर त्याही आधीपासून त्या ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणार हे माहीत होते. तरीही त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवली. याचाच अर्थ ही मतदान प्रक्रिया त्यांना मान्य होती. त्या माध्यमातून ते निवडूनही आले, विजयाचा आनंदही साजरा केला आणि ज्यासाठी हा सगळा खटाटोप केला त्या पदाची शपथ घ्यायचे मात्र नाकारले. इतका बिनबुडाचा विरोध केल्याचे दुसरे उदाहरण नसावे. हा लटका विरोध टिकणार नाही, हे या विजयी उमेदवारांना ठाऊक होते (तो टिकावा अशी मनातून इच्छाही नसावीच.) तरी आघाडीच्या नेत्यांच्या आदेशावरून हा बिनपैशाचा तमाशा केला. असा सावळा गोंधळ घालून मतदारांनी आपल्याला दिलेल्या कौलाचा अनादर करत आहोत हे त्यांच्या गावीही नव्हते. मग या औटघटकेच्या नाटकामुळे आपले मतदार नाराज होतील, त्याचा दूरगामी परिणाम आपल्या कारकीर्दीवर होईल याचा विचार करणे, ही तर फार लांबची गोष्ट.
 
सभागृहातल्या या गोंधळाबरोबरच मविआच्या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करत मतदानोत्तर चाचणीची मागणी केली. ही ग्रामस्थांची मागणी नव्हती, तर राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली चिथावणी होती, हेही उघड झाले. प्रत्यक्ष निकालानंतर सहा दिवसांनी हा आरोप करण्यात आला. याबाबत मतमोजणी प्रतिनिधीने लेखी वा तोंडी तक्रार केली नव्हती तसेच त्या मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे लक्षही होते. तरीही गावकर्‍यांच्या मनात किल्मिष उत्पन्न करण्यासाठी आणि हाताशी धरलेल्या काही प्रसारमाध्यमांच्या मदतीने ते सर्वदूर पसरवण्यासाठी सभा आयोजनाचे प्रयत्न झाले. ती तर उधळली गेलीच, त्याचबरोबर मारकडवाडीतील गेल्या दहा वर्षांतील मतदानाची पक्षनिहाय आकडेवारी समोर आणत भाजपने मविआचा डाव हाणून पाडला. या आकडेवारीतून हा मतदारसंघ कोणत्याही एकाच पक्षाला सतत मतदान करत आलेला नाही हे समोर आले.
 
 
ईव्हीएम ही मतदान यंत्रणा निर्दोष असल्याचे वारंवार सिद्ध झालेले असतानाही त्याच्या नावाने घातल्या गेलेल्या या गोंधळामुळे मविआची उरलीसुरली पतही मातीत मिळाली आहे. मात्र अद्यापही हे समजून घेण्याच्या, पराभवातून शिकण्याच्या- शहाणे होण्याच्यामनःस्थितीत मविआचे नेते नाहीत. सभागृहात विरोधी पक्षनेता निवडला जाण्याएवढे संख्याबळ यापैकी एकाकडेही नाही. याचे त्यांना गांभीर्य नसले तरी, ’विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कितीही असली तरी आम्ही त्यांना गांभीर्याने घेऊ,’ असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे.
 
 
राज्याची विधानसभा असो की केंद्रातली लोकसभा... दोन्ही सभागृहांमध्ये अविचाराने वागण्याची अहमहमिकाच लागल्यासारखे विरोधकांचे वर्तन आहे.
 
 
लोकसभेचे अधिवेशन जवळ येऊ लागले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी ’अदानी’च्या नावे गोंधळ घालण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू करतात. आता हा त्यांचा रिवाजच बनला आहे. या विषयावरून सभागृहात काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांकडून गदारोळ घातला जातो आहे आणि संसद परिसरात आंदोलन केले जात आहे. संसद परिसरात एक दिवस पंतप्रधान मोदी आणि उद्योजक अदानी यांचे मुखवटे घालून काँग्रेसी आले आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी राहुल गांधी आपला मोबाइल कॅमेरा घेऊन सरसावले. देशाच्या सर्वोच्च सभागृहासमोर असा पोरखेळ अद्याप कोणी केला नसावा. ’विरोधी पक्षनेत्यांची वर्तणूक संसदीय कार्यप्रणालीस अनुसरून नाही’ अशा शब्दांत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त करूनही विरोधक भानावर येत नाहीत. सभागृहाचा मोलाचा वेळ वाया घालवणे, हेच इतिकर्तव्य समजतात इतके त्यांचे वैचारिक अधःपतन झाले आहे.
 
 
अराजकतावादी सोरोस, त्याच्याशी संबंधित ओसीसीआरपी ही संघटना आणि काँग्रेस यांचे असलेले परस्परसंबंध, त्यातून देशाच्या स्थैर्याला असलेला धोका, हा विषय सत्ताधार्‍यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात सभागृहाला आणि देशवासीयांना खुलासा वा स्पष्टीकरण सादर करण्याऐवजी, सर्वांची दिशाभूल करणे, बुद्धिभेद करणे यातच विरोधी पक्षनेते धन्यता मानत आहेत.
 
 
‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’, हे आपल्या प्रतिज्ञेतील एक वाक्य आहे. त्यानुसार भारतीय नागरिक असलेला प्रत्येक जण एकमेकांचा बांधव आहे याची कल्पना राहुल गांधी यांना नसावी. म्हणूनच ते ’मोदी-अदानी’ भाई भाई असे म्हणत डिवचण्याचा उथळपणा करतात. त्याऐवजी, संशयाच्या भोवर्‍यात असलेले आपले नागरिकत्व त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवे. अर्थात, ’हिंदी चिनी भाई भाई’ अशी निरागस (की भाबडी) घोषणा करणार्‍यांच्या वंशजाकडून अशी अपेक्षा करणेही चूकच!
 
सभागृहातील विरोधकांची घटती संख्या यापेक्षा त्यांची घटती प्रगल्भता हा लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे. इतके लक्षात घेतले तरी त्यावर मात करण्याचे मार्ग दिसतील. विरोधक हे करतील का?