संस्कार भारतीच्या माध्यमातून मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज भवनात नुकताच ‘सिनेटॉकिज 2024’ हा चित्रपटविषयक चर्चासत्रांचा मॅरेथॉन सोहळा संपन्न झाला. ‘सिने सृष्टि भारतीय दृष्टि’ या बोधवाक्यात या सिनेटॉकिजचे सारे सूत्र सामावलेले आहे. ‘सिनेटॉकिज 2024’मध्ये ‘वूड्स टू रूट्स’ या संकल्पनेअंतर्गत विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सिनेमात भारतीयत्व जपले जावे, त्याची दृढपणे पुनर्स्थापना व्हावी, हेच मत प्रकर्षाने मांडले गेले. या अत्यंत दिमाखदार सोहळ्याचा हा धावता आढावा.
विविध कला आणि संस्कृतींमधून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तिन्हीची ओळख निर्माण होते इतके त्यांचे सामर्थ्य आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्र-शिल्प-हस्तकला अशा विविध कलांच्या संवर्धनासाठी संस्कार भारती दीर्घकाळापासून कार्यरत आहे. कला-संस्कृती रक्षण व संवर्धनासाठी विविध उपक्रम संघटनेच्या वतीने कायमच आयोजित केले जातात. चित्रपट या दृक्श्राव्य कलेच्या विविध अंगोपांगांविषयी, त्यातील मांडणी, कथ्य (नॅरेटिव्हज) आणि तथ्यांविषयी चर्चा घडवून आणणारा ‘सिनेटॉकीज 2024’ हा कार्यक्रम संस्कार भारतीच्या वतीने दि. 13 ते 15 डिसेंबर या काळात संपन्न झाला.
आपल्याकडे चित्रपट महोत्सव होतात, सिनेमांची स्क्रीनिंग्ज होतात, चित्रपटांतील कलाकारांच्या मुलाखती होतात, चित्रगीतांना-नृत्यांना-कलाकारांना प्रसिद्धी मिळते, चित्रपटांवर आस्वादक समीक्षा लिहिली जाते; परंतु चित्रपटांवर, त्यांच्या अंगोपांगांवर थेट चर्चा घडवून आणणारे कार्यक्रम मात्र तुलनेने अतिशय कमी आहेत. अशी सविस्तर चर्चा व्हावी, या हेतूने संस्कार भारतीच्या माध्यमातून पहिला ‘सिनेटॉकीज 2022’ हा चर्चासत्रांचा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठात संपन्न झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाचा ‘सिनेटॉकीज 2024’ हा कार्यक्रम ‘वूड्स टू रूट्स’ (सिनेजगताच्या विविध शाखांच्या मुळाशी असणारा भारतीय विचार) या संकल्पनेवर आधारित होता. सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांची, सिनेक्षेत्रात कार्यरत नवोदितांची, सिनेमा आणि मासमीडियाचे प्रशिक्षण घेणार्यांची या चर्चासत्रांमध्ये लक्षणीय उपस्थिती होती. अनेक अनुभवी चित्रकर्मींनी या चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला व विविध विषयांवर आपले विचार मांडले.
दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशीष चौहान यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर व ज्येष्ठ सिनेपत्रकार भारती प्रधान, दिग्दर्शक अभय सिन्हा, कवी आणि संस्कार भारती सदस्य डॉ. रवींद्र भारती यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती.
संस्कार भारतीचे अखिल भारतीय संयोजक अभिजीत गोखले यांनी आपल्या भाषणात ‘वूड्स टू रूट्स’ या संकल्पनेवर भाष्य केले. ते म्हणाले की, सिनेमा ही ‘स्टोरी टेलिंग’चे, गोष्ट सांगण्याचे एक आगळेवेगळे माध्यम आहे आणि कथा हा त्याचा अविभाज्य घटक आहे. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून कालसुसंगत रूपात भारतीय कथा समाजापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहेच. त्याच वेळेस त्यात अस्सल भारतीय मूल्यांचा अंतर्भाव असणेही तितकेच गरजेचे आहे. आपल्या मुळांकडे परत जाण्याकरिता सिनेमा हे एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरू शकते. बॉलीवूड असो, टॉलीवूड किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो, त्यामध्ये भारतीय मूल्ये प्रस्थापित करणे, लोकपरंपरांचे सकारात्मक सादरीकरण करणे, व्यवस्थांप्रति विश्वास निर्माण करणे, समाजहिताच्या संकल्पनांबाबत जागृती निर्माण करणे, ही कार्ये भारतीय सिनेमांच्या माध्यमातून झाली, तर त्याचा समाज किती मनापासून स्वीकार करतो हे आपण पाहिले आहे. वूड्सकडून आपल्याला रूट्सपर्यंत जाण्यात यशस्वी व्हायचे असेल, तर भारतीय व्यवस्था, प्रशासन परंपरा आणि लोकपरंपरा यांचे सकारात्मक चित्रण भारतीय सिनेमातून सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.
मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेच्या सन्मानार्थ आपण आपला पुढचा सिनेमा मराठी भाषेवरच करणार असल्याचे सचिन पिळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. भारतीय न्याय संहितेतील हिंदी सिनेमॅटोग्राफी अॅक्टमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ज्या प्रांतात सिनेमा तयार होत असेल त्याची सांस्कृतिक ओळख त्यात उमटली पाहिजे. उदाहरणार्थ जर मराठी सिनेमा करत असू, तर त्यात येथील संस्कृती प्रतिबिंबित झालीच पाहिजे. तरच मराठी प्रेक्षक सिनेमा पाहतील अन्यथा ते हिंदी किंवा अन्य भाषेतील चित्रपट पाहणे पसंत करतील, असेही सचिन पिळगावकर म्हणाले.
दोन दिवसांमध्ये एकूण पाच विषयांवरील चर्चासत्रे संपन्न झाली. दि. 14 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात ‘बॉक्स ऑफिसवरील आकडे हेच सिनेमाचे यश आहे का?’ या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात शिवाशीष सरकार (रिलायन्स एन्टरटेन्मेंट समूह - मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष), वेंकट नारायण (संस्थापक, केव्हीएन प्रॉडक्शन) आणि राहुल भोळे (सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक) या तिघांचा सहभाग होता. त्यांच्याशी अर्फी लांबा (सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक) यांनी संवाद साधला. पूर्वीच्या काळी केवळ बॉक्स ऑफिस कलेक्शन अर्थात थिएटरवरील तिकिटविक्रीचे आकडे हे चित्रपटाचे आर्थिक आणि प्रसिद्धीचे यश मोजण्याचे एकमेव एकक होते; पण गेल्या काही वर्षांत चित्रपटाचे थिएटरमधील पुनर्प्रसारण, ओटीटी प्रसारण व त्यावरील प्रतिसाद, समाजमाध्यमांवरील चर्चा व प्रभाव, चित्रपटांतील गाण्यांची होणारी रील्स अशा सार्याच अनुषंगाने चित्रपटाच्या यशाचे मोजमाप करावे लागते. एखादा सिनेमा ओटीटी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमानसावर अधिक परिणाम करतो, तर काही वेळेस तो बॉक्स ऑफिसवर तात्कालिक प्रभाव निर्माण करतो; पण लगेचच विस्मरणातही जातो. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील आकडे हे सापेक्ष असू शकतात. निर्मात्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सिनेमा बॉक्स ऑफिसवर किंवा अन्य माध्यमांवर तोंडावर पडणे हे पुढच्या सिनेमाच्या तयारीच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकते, असा गोषवारा या तिघांशी झालेल्या चर्चेतून निघाला.
14 डिसेंबर रोजी भोजनोत्तर दोन सत्रे झाली. दुपारच्या सत्रात ‘सिनेमा - केवळ मनोरंजन की आणखी काही?’ या विषयावर चर्चा झाली. या चर्चासत्रात मृणाल कुलकर्णी (सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका व दिग्दर्शिका), अभिषेक शर्मा (सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक) आणि अपूर्व सिंह कर्की (सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक) यांचा सहभाग होता. भारती प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले की, चित्रपट निवडताना त्याच्या विषयात मनोरंजनापलीकडे जाऊन त्यात काही तरी शिकवण असावी. मुलांना इतिहास आणि आपली संस्कृती शिकवणे आवश्यक झाले आहे. अभ्यासाच्या पुस्तकापलीकडील इतिहास शिकवण्यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम म्हणून सिनेमा उत्तम काम करतो, असेही त्या म्हणाल्या. ‘एन्टरटेन्मेण्ट’ ही संकल्पना मुळातच परदेशातील आहे. सिनेमा, नाटक किंवा कोणत्याही मनोरंजनाच्या माध्यमाच्या मुळाशी रसनिष्पत्तीचा निकष असावा. मानवाच्या भावभावनांचे संतुलन करण्याचे सामर्थ्य या माध्यमांमध्ये असते, असे अभिषेक शर्मा म्हणाले. मूल्ये ही सार्वकालिक असतात, तर चकचकीतपणा, खोटेपणा हा तात्कालिक असतो. त्यामुळे त्याचा विचार सिनेमा करताना अवश्य व्हायला हवा, असे या तिघांचेही मत होते.
सायंकाळच्या सत्रात ‘लोकल इज ग्लोबल - आपल्या मुळाकडे परतणे हा प्रगतीकडे वाटचाल करण्याचा मार्ग आहे का?’ या विषयावर चर्चा झाली. या चर्चासत्रात स्वप्निल जोशी (लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते), नील माधव पांडा (सुप्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक) आणि निरेन भट्ट (प्रसिद्ध पटकथा लेखक व दिग्दर्शक) यांचा सहभाग होता. विनोद अनुपम यांनी त्यांच्याशी संवाद साधला. लोकल म्हणजे ग्रामीण नाही, तर स्थानिक भावभावना, जाणिवा आणि रीती-परंपरा यांचा समावेश असणे म्हणजे लोकल असे नील माधव पांडा म्हणाले. सिनेमात व्यक्त झालेल्या भावना या सर्वत्र एकसारख्या असल्या, तरी सिनेमा मात्र आपल्या मातीतला, अस्सल वाटला पाहिजे; पण हे सारे करायचे असेल तर येथील साहित्य आणि लोकसाहित्य वाचावे लागेल. त्यातील गोष्टी कालसुसंगतपणे मांडाव्या लागतील, असे मत स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले. मागे वळून पाहणे म्हणजे मागे जाणे नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा आढावा घेणे आहे. संस्कृतीसापेक्ष वातावरण असेल, तर प्रेक्षक सिनेमाशी लगेच कनेक्ट होतो. त्यामुळे तसा विचार सिनेमा तयार करताना व्हावा, असे निरेन भट्ट म्हणाले. गेल्या काही काळात जागतिकीकरणाच्या रेट्यात सिनेमातील नातेसंबंधांचे स्वरूप बदलले आहे. आपणच आपली नाती ग्लॅमराइझ केली तरच त्याची नोंद जग घेणार आहे. नातेसंबंध अधोरेखित करणार्या कथा, तशीच गाणी, वातावरण यांचा अंतर्भाव केला, तर सिनेमा नक्की हिट होऊ शकतो, असे मत या सर्वांनी मांडले.
14 डिसेंबर रोजी सायंकाळी ‘पुण्यश्लोक लोकमाता’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन संस्कार भारतीच्या वतीने एनएसईच्या प्रेक्षागृहात करण्यात आले होते. हे वर्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे 300वे जयंती वर्ष आहे. अहिल्यादेवींचे ऐतिहासिक योगदान आणि त्यांचे कार्यकर्तृत्व यांना उजाळा देण्याच्या निमित्ताने हा विशेष नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाटकासही उपस्थितांची विशेष दाद मिळाली.
रविवार, दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी ‘भारतीय सिनेमाचे पुनरुत्थान - वुड्स टू रूट्स’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात के. एस. श्रीनिवासन (आघाडीचे निर्माते), अभिजीत देशपांडे (सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक) आणि मनीष सैनी (सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक) यांचा सहभाग होता. ज्येष्ठ पत्रकार पंकज शुक्ला यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दाक्षिणात्य सिनेमात हिंदी सिनेमाच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे भारतीय संस्कृतीची मांडणी आहे, असे ठाम प्रतिपादन श्रीनिवासन यांनी केले. अभिजीत देशपांडे हे मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक आहेत. ते म्हणाले की, बॉलीवूड हॉलीवूडची आणि मराठी सिनेक्षेत्र बॉलीवूडची कॉपी करण्यात रमलेले असताना दाक्षिणात्य सिनेमा हा ‘अनअॅॅपॉलॉजिकल’ राहून आपल्या संस्कृतीची मांडणी करताना दिसतो. परदेशातील निर्माते भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात; पण आपण मात्र अजूनही गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही. आपण अजूनही ‘अॅॅपॉलॉजिकल स्लेव्ह’ राहिलो असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली. मनीष सैनी यांनी वेगवेगळे ट्रेण्ड (सीक्वेल, प्रीक्वेल, विशिष्ट विषय/पॅटर्न, ठरावीक कलाकारांची निवड) फॉलो करण्याच्या नादात अनेकदा चांगल्या कसदार स्थानिक कथांचा बळी जात असल्याचे नमूद केले, तर नातेसंबंधांचे सकस चित्रण, नातेसंबंधांवर आधारित गाणी आणि संवाद संपले व सिनेमाचा दर्जा आणि त्यातील भारतीयत्व लयाला जाऊ गेले, असे भाष्य संवादक शुक्ल यांनी केले.
रविवारच्या अंतिम सत्रात ‘भारतीय सिनेमाच्या प्रगतीतील आणि भारतीय सिनेमातील स्त्रीची भूमिका’ यावर चर्चा झाली. या वेळेस मधुर भांडारकर (राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक), प्रणिता सुभाष (सुप्रसिद्ध अभिनेत्री) आणि पंकजा ठाकूर (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) यांचा सहभाग होता. डॉ. रामचंद्रन श्रीनिवासन (ज्येष्ठ पत्रकार) यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बिमल रॉय यांच्यापासून सुरू झालेली नायिकाकेंद्रित सिनेमांची परंपरा 80च्या दशकात नायककेंद्रित झाली व नायिकाकेंद्रित सिनेमांना मिळणारे पाठबळही कमी झाले. गेल्या काही वर्षांत या परंपरेचे पुनरुज्जीवन झाले आहे व अशा सिनेमांना प्रेक्षकवर्ग लाभला आहे. त्यामुळे निर्मात्यांनीही अशा सिनेमांना पाठबळ दिले पाहिजे. त्याचप्रमाणे स्त्रियांप्रतिचा आदरयुक्त दृष्टिकोन लक्षात घेऊनच भूमिका आणि गाण्यांची निर्मिती झाली पाहिजे, असे मत या जाणकारांनी व्यक्त केले. भारतभरातील 18 प्रांतांमधील प्रतिनिधी ‘सिनेटॉकिज 2024’मध्ये तीनही दिवस उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्वच चर्चासत्रांमध्ये उपस्थितांनाही मान्यवरांना प्रश्न विचारण्याची व शंकानिरसन करण्याची संधी देण्यात आली. या प्रश्नोत्तर सत्रांमध्ये अत्यंत मार्मिक प्रश्न लोकांनी विचारले.
रविवारी सायंकाळी 5 वाजता ‘सिनेटॉकिज 2024’चे समारोप सत्र संपन्न झाले. या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख प्रमोद बापट प्रमुख वक्ते म्हणून, तर ज्येष्ठ पत्रकार व विश्व संवाद केंद्र मुंबईचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे टिप्स इंडस्ट्रीजचे सहसंस्थापक रमेश तोरानी, ज्येष्ठ लेखक व कवी डॉ. रवींद्र भारती, संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील बर्वे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते.
प्रमोद बापट म्हणाले, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके यांनी ब्रिटिशांनी भारतात प्रदर्शित केलेले सिनेमे सहकुटुंब पाहिले, कारण मुळात सिनेमा हे सहकुटुंब आस्वाद घेण्याचे माध्यम आहे, असे त्यांचेही मत होते. परदेशात गेले असताना चित्रपटात भारताचे विकृत चित्रण त्यांनी पाहिले. आपला भारत असा नाही, आपल्याकडे भारतात मोठमोठे चरित्रपुरुष होऊन गेले आहेत. त्यांची महत्ता जनमानसांमध्ये प्रभावीपणे पोहोचवण्याचे चलतचित्र हे उत्तम माध्यम आहे, असे त्यांना वाटले व सिनेमाकडे चरित्रनिर्मितीचे साधन म्हणून पाहिले. खरा भारत कसा आहे तो मी जगाला दाखवेन, या भावनेतून त्यांनी सिनेमा क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील सिनेमा भारताचे जगात प्रतिनिधित्व करणार आहे याचे भान या क्षेत्रातील सर्वांना असले पाहिजे. भारताचे प्रतिनिधित्व करणारी त्याची मांडणी असली पाहिजे. भारताचा स्वभाव, भारतीयांचा स्वभाव, येथील समरसता, त्यागवृत्ती, सोशीकता, संस्कृती, येथील संकल्पना, कथाकहाण्या, येथील परंपरांची माहिती आपल्या चित्रपटांतून जगाला होणार आहे. येथील मृदा (माती) कशी आहे ते वृक्षच आपल्या रूपाद्वारे सांगत असतो. अगदी तसेच येथील चित्रपटच सांगतील, की भारत कसा आहे. ‘वूड्स टू रूट्स’ अर्थात मुळापर्यंत जाणे म्हणजे अस्सल भारतीयत्वाचा शोध घेऊन त्याची मांडणी करणे. मग ते बॉलीवूड, टॉलीवूड असे कोणतेही भारतीय चित्रपट क्षेत्र असो; पण याकरिता चित्रपटांवर सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठीच सिनेटॉकिजसारखा मंच सुरू करण्यात आला आहे.
यंदाचे वर्ष हे बंगाली चित्रपट दिग्दर्शक तपन सिन्हा, ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी, अभिनेते-दिग्दर्शक अक्किनेनी नागेश्वर राव आणि शोमन राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यापैकी मोहम्मद रफी वगळता अन्य तिघांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके या महत्त्वपूर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतीय सिने संगीतात स्वतःचे स्वतंत्र, उल्लेखनीय स्थान निर्माण करणार्या या गायकाला जन्मशताब्दी वर्षात दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात यावे, असे मत सुधीर जोगळेकर यांनी या वेळेस व्यक्त केले. ‘सिनेटॉकीज 2024’मध्ये ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक प्रमोद पवार तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे इत्यादी अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली.
‘सिनेटॉकिज’ हा चर्चासत्रांचा महोत्सव दर दोन वर्षांनी नव्हे, तर वर्षातून एकदा तरी व्हावा. तसेच तो केवळ एकाच ठिकाणी नव्हे, तर वेगवेगळ्या ठिकाणी व्हावा, जेणेकरून ‘सिनेसृष्टीतील भारतीय दृष्टी’चा हा विचार अधिकाधिक वेळा लोकांच्या कानावर पडेल, मनावर उमटेल. येथे लक्षात घेतले पाहिजे की, ही चर्चासत्रे केवळ सिनेमाची भारतीय विचारांतून मांडणी या घटकाभोवती फिरत नसून सिनेमा कसा पाहावा? याभोवतीही हे सूत्र फिरते. काय पाहावे, काय स्वीकारावे, या विचारांचीही पेरणी अशा चर्चासत्रांमुळे प्रेक्षकांच्या मनात होत असते. या महोत्सवाला उपस्थित राहिल्याने मला जाणवले की, सिनेमातील भारतीयत्वाच्या मांडणीच्या मुद्द्याचा या क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक मान्यवर अतिशय मनापासून पुनरुच्चार करत आहेत. तसेच ओटीटीवरील हिंसात्मक चित्रणासाठी सेन्सॉरचे बंधन असावे, असेही काहींचे ठाम मत आहे. येथील स्थानिक परंपरा, आपला धर्म, संस्कार-कुटुंबव्यवस्था-नातेसंबंध यांचे चित्रण आवर्जून सिनेमांत व्हावे तसेच समाजातील अपप्रवृत्तींचाही समाचार सिनेमांनी घ्यावा, असे मतही अनेक जाणकारांनी नोंदवले. यंदाच्या ‘सिनेटॉकिज 2024’मध्ये झालेल्या चर्चांमधील विचार आणि पुढच्या सिनेटॉकिजसाठी लवकरच भेटू, ही भावना मनात घेऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.