सावित्रीबाई फुले काळापुढच्या समाजसेविका

विवेक मराठी    28-Dec-2024   
Total Views |

savitribai phule biography
रूढी-परंपराच्या जोखडात बंदिस्त असणार्‍या त्या काळात सावित्रीबाई पतीच्या शब्दांवर विश्वास ठेवून उंबरठा ओलांडून त्यांनी सांगितलेल्या वाटेवर ठामपणे चालू लागल्या. त्या वाटेवर स्वकर्तृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवली. त्यांनी निवडलेला हा मार्ग पुढे अनेकींसाठी राजमार्ग झाला. 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस... त्यानिमित्त त्यांचे हे कृतज्ञ स्मरण.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, महाराष्ट्रात, पुणे शहरात जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले हे एक जगावेगळे जोडपे आगळावेगळा संसार करीत होते. 1850-51 चा तो काळ! महाराष्ट्रात पेशवाई जाऊन इंग्रजी अमलाला सुरुवात झाली होती. त्या काळातील स्त्री जीवन मोठे बिकट होते. शिक्षण घेण्याचा अधिकार तर दूरच, पण तिला पायांत जोडे अथवा वहाणा घालण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. तिने छत्री वापरली तरी तो वडीलधार्‍यांचा अपमान मानला जाई. नवराबायको इतरांदेखत आपसांत बोलत नसत. स्त्री ही दोषांची आणि अज्ञानाची खाण मानली जात असे. तिने शिकणे म्हणजे तर मोठे पातकच! स्त्री शिकली तर तिला अकाली वैधव्य येते, अशी समजूत होती. या रूढींना स्त्रियांचीही मान्यता होती. त्यांनाही हेच सत्य आहे असे वाटत असे. अशा काळात सावित्रीबाई पतीच्या शब्दांवर विश्वास ठेवून उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या.
 
 
अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याचे अग्रणी असलेल्या जोतीराव फुले यांचे कार्य हे जणू आपले अपत्यच आहे असे मानून, त्या कार्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली होती. पतीच्या प्रत्येक कार्यात त्यांनी साथ दिली. मग ते बालहत्या प्रतिबंधक गृह असो, विधवा पुनर्विवाह असो, की स्त्री शिक्षण. म्हणूनच आपल्या मृत्युपत्रात म. फुले यांनी खात्रीपूर्वक लिहिले की, ‘माझी पत्नी सावित्रीबाई माझे कार्य निश्चितच पुढे नेईल.’ पतीचा हा विश्वास ही सावित्रीबाईंच्या कार्यनिष्ठेची पावती होती.
 
 
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंवर मातेच्या ममतेने प्रेम करणार्‍या, वयाने मोठ्या अशा मावसभगिनी सगुणाआऊ यांचा खूप प्रभाव होता. या सगुणाआऊ एका मिशनरी कुटुंबात नोकरीला होत्या. त्या मुलांना सांभाळताना इंग्रजी बोलायलादेखील शिकल्या होत्या. मिशनर्‍यांची शिस्त, इंग्रजी वळण आणि ठरवलेल्या कार्याचा यश-अपयश याकडे लक्ष न देता केलेला पाठपुरावा हे त्यांनी पाहिले. या गुणांची रुजवण त्यांनी जोतीरावांमध्ये केली होती. म्हणूनच कितीही त्रास झाला आणि कष्ट पडले तरीही सावित्रीबाई व जोतीराव फुले यांनी आपले कार्य थांबवले नाही.
 
 
ज्या काळात स्त्रियांवर रूढी-परंपरांचा जबरदस्त पगडा होता; अगदी शिकले तर कूळ बुडते, वैधव्य येते, अशा पक्क्या समजुती होत्या, त्या काळात त्या शिकल्या व त्यांनी शिकविलेदेखील!! स्वत:ला शिक्षिकेचे काम करता यावे म्हणून अहमदनगरला सरस्वतीबाई गोवंडेंबरोबर मिशनच्या शाळेत गेल्या. अध्यापन कौशल्याचे धडे परमहंस सभेच्या केशव भवाळकर यांच्याकडून गिरवले आणि जोतीरावांनी सुरू केलेल्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. मिशनरी बाईकडून आणि परपुरुषांकडून एका स्त्रीने शिकणे आणि आपल्यापेक्षा खालच्या मानल्या जाणार्‍या जातीच्या मुलींना शिकवणे, हे असामान्य धैर्याचे काम होते.
 

savitribai phule biography  
 
ज्ञाती बहिष्कारामुळे सावित्रीबाई व जोतीरावांना राहते घर सोडावे लागले. गृहखर्चासाठी जोतीरावांनी कापडाचे दुकान टाकले. त्यात विक्रीसाठी सावित्रीबाई स्वतः रजया शिवत असत.
 
 
विधवांचे हात अत्याचार अथवा नैतिक अधःपात यामुळे भ्रूणहत्येच्या रक्ताने माखले जात, हे विदारक सत्य होते. जोतीरावांनी यावर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. किती तरी विधवा तेथे कोणासही कळू न देता बाळंत होऊन गेल्या. सावित्रीबाई मोठ्या ममतेने मुलांना न्हाऊ घालत, मदतनीस बायकांच्या मदतीने दूध आणि खाणेपिणे यांची व्यवस्था लावत.
 
 
सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या प्रतिज्ञादेखील घेतल्या होत्या. जेव्हा त्यांची भावी सून राधा त्या काळातील रूढीनुसार वळण लावण्यासाठी सासरी आली, तेव्हा त्यांनी तिला शिकवणे सुरू केले. ती न कळत्या वयातील लहान मुलगी होती. तिला खेळावेसे वाटत असे. तिला खेळ आणि अभ्यास करता यावा म्हणून सावित्रीबाई गृहकार्ये स्वतःच करत व तिला सवड देत असत. मोठी होईल तेव्हा गृहकार्ये करेल, आता तिचे शिकण्याचे वय आहे, असे त्या म्हणत.
 
सामाजिक कार्याचे बहुविध आयाम
 
स्त्री शिक्षणाची सुरुवात करणार्‍या पहिल्या महिला शिक्षिका तर त्या होत्याच, परंतु जोतीराव फुल्यांनी सामाजिक न्याय आणि मानवी हक्कासाठी ज्या ज्या चळवळी उभ्या केल्या, त्या प्रत्येक चळवळीत सावित्रीबाईंनी सक्रिय सहभाग घेतला.
 
प्रसंगी शेणामातीचे गोळे अंगावर झेलून, परत कपडे बदलून शाळेत शिकवणे त्यांनी सुरूच ठेवले. त्या समाजातील पन्नास टक्के वर्गाच्या उद्धाराच्या अग्रदूत ठरल्या! तत्कालीन विधवांच्या समस्या गंभीर होत्या. केशवपन, भ्रूणहत्या अशा बाबींना विधवांना सामोरे जावे लागे. आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक कोणताच अधिकार स्त्रीला नव्हता. अशा वेळी जोतीरावांनी स्थापन केलेले ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ सावित्रीबाईंनी मोठ्या निगुतीने चालवले. तेथेच जन्मलेल्या यशवंतला दत्तक घेतले. पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण केले.
 
 
पूर्वअस्पृश्यांसाठी फुल्यांनी हौद खुला केला तेव्हा सावित्रीबाई स्वतः पाणीवाटप करत असत. जुन्या समजुतींना त्यांनी बुद्ध्याच तिलांजली दिली होती. काळाच्या दोन पावले पुढे चालून सावित्रीबाईंनी कर्त्या पुरोगामित्वाचा पाया घातला.
 
 
1873 साली, पुण्यात पुरोहिताशिवाय विवाह करण्याचे ठरले.आज हे विशेष वाटणार नाही; पण त्या काळात ही फार धाडसाची गोष्ट होती. या प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेव्हा लग्नाच्या वेळी मुलीच्या आईने व नातलग स्त्रियांनी कच खाल्ली, त्या वेळी त्यांची समजूत सावित्रीबाईंनी घातली व सोहळा संपन्न झाला.
 
 
पित्याच्या मृत्यूनंतर श्राद्ध घालायचे नाही, असे जोतीरावांनी ठरवले. या संकल्पाला सावित्रीने साथ दिली. शाळेतील मुलामुलींना पाट्या आणि वह्या वाटल्या. तसेच अनाथ आणि अपंगांना स्वहस्ते भोजन बनवून वाढले. जाती बहिष्काराची तमा बाळगली नाही. या आगळ्यावेगळ्या श्राद्धकर्माची कहाणी अशी आहे- 1868 साली जोतीराव फुले यांच्या वडिलांचे निधन झाले. मुलाचे सुधारकी विचार न पटल्यामुळे व ज्ञाती बहिष्काराच्या सावटामुळे जोतीराव व सावित्रीबाई वेगळे राहत होते. तरीही पिता-पुत्राचा एकमेकांवर विलक्षण जीव होता. अंत्यसंस्कार झाल्यानंतर जोतीराव सावित्रीबाईंना म्हणाले, ‘आता दिवसकार्ये करण्यासाठी नातलग मागे लागतील. मला वडिलांच्या नावे अन्न आणि वस्तू दिल्या पाहिजेत हे पटते, मात्र ते ज्याच्याकडे नाही त्याला द्यावेसे वाटते, तुमचे मत सांगा.’ (जोतीराव आपल्या पत्नीला अहोजाहो करत, तर सावित्रीबाई जोतीरावांना शेटजी म्हणत.)
त्यावर सावित्रीबाई म्हणाल्या, ‘इथल्या घरात राजाराम भावजी पिंडदान वगैरे करावे असेच म्हणतील. तुमच्या मनात काय असेल तसे आपण आपल्या घरी जाऊन करू.’
 
त्यावर, ”चला तर मग” म्हणून दोघे घरी आले.
 
 
सावित्रीबाईंनी अनाथ आणि अपंगांना जेवण देऊ या, असे सुचवले. तसेच शाळेतील मुलामुलींना पाटी आणि पुस्तके द्यावी असेही ठरवले. दुसर्‍या दिवशी पहाटेच सावित्रीबाई काही शेजारच्या महिलांना मदतीला घेऊन स्वयंपाक करायला बसल्या, तर जोतीराव आमंत्रणे द्यायला गेले. एकाकडून दुसर्‍याला असे हळूहळू कळत गेले आणि अनाथ-पंगू लोकांनी अंगण भरून जाऊ लागले. ज्यांना चालत येणे शक्य नाही त्यांना कुणी दुसर्‍याने पाठुंगळी घेऊन अंगणात आणून सोडले. “माझ्या वडिलांनी मला लहानाचे मोठे केले. त्यांना सर्वांना जेवू घालणे प्रिय होते, म्हणून त्यांच्या आठवणीसाठी आज हा भोजन समारंभ करीत आहे.” अशी प्रस्तावना करून जोतीरावांनी स्वहस्ते सर्वांना भोजन वाढले. सावित्रीबाईंनीही आग्रह करून सर्वांना गोडाधोडाचे पदार्थ वाढले. पोटभर जेवून आशीर्वाद देत पंगत उठली. दुसर्‍या दिवशी फुले पती-पत्नींनी शाळेतील गरीब मुलामुलींना पाटी, पुस्तके इत्यादी वस्तूंचे वाटप केले.
 
 
ती अद्भुत पंगत व वस्तुवाटप बघून पुणेकर थक्क झाले. या पद्धतीने अन्नदान करून श्राद्धकर्म केलेले कुणी बघितले नव्हते.
सावित्रीबाईंनी पुण्यात पहिल्यांदा सर्व जातींच्या स्त्रियांचा एकत्रित हळदीकुंकू समारंभ साजरा केला होता. त्या वेळी इंग्रज अधिकार्‍यांच्या घरातील महिलांनाही बोलावले होते. पत्रिकेत, ’सर्वांना समान समजून एकाच जाजमावर बसवण्यात येईल’ असे स्पष्ट लिहिले होते. अधिकारी लोकांचे कुटुंब उपस्थित होते, त्यामुळे इतरही लोकांनी आपापल्या घरातील महिलांना पाठवले व हळदीकुंकू सोहळा संपन्न झाला.
 
 
सावित्रीबाईंचे नीतिधैर्य आणखी एका प्रसंगाने उजळून निघाले आहे. कोणत्याही स्त्रीसाठी पतीचे निधन, ही बाब अत्यंत क्लेशकारक असते. अशा वेळी नातलग तिला धीर देतात; परंतु महात्मा फुलेंच्या मृत्यूच्या वेळी, ‘यशवंत तुमचा पोटचा पोर नाही, तेव्हा त्याला टिटवे (स्मशानात नेण्याचे अग्नीचे मडके) धरू देणार नाही’, अशी भूमिका जोतीरावांच्या पुतण्यांनी घेतली. तेव्हा लहानग्या यशवंतला बोटाशी धरून स्वतः सावित्रीबाई तिरडीच्या समोर टिटवे घेऊन चालल्या व पतीचे अंत्यसंस्कार पूर्ण केले.
तत्कालीन बहुजन समाजातील स्त्रियांवर असलेला रूढींचा पगडा पाहाता, सावित्रीबाई फुले यांचे विविध प्रकारच्या सामाजिक कार्यांत सक्रिय असणे लोकविलक्षण ठरते. मग विधवा केशवपनविरोधात नाभिकांचा संप असो की अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बालकाला दत्तक घेऊन त्याच्यावर पोटच्या पोरावर करावी तशी माया करणे असो. जोतीराव फुलेंनी उभ्या केलेल्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंनी समजून उमजून भाग घेतला. या बहुआयामी घटनांनी सावित्रीबाईंचे आयुष्य समृद्ध झालेले होते.
 
सेवाव्रती सावित्रीबाई
 
 
जोतीरावांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. त्यांचा मुलगा यशवंत डॉक्टर होऊन मिलिटरीमध्ये नोकरीस लागला होता. 1897 साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. रँड हा अधिकारी इंग्रजांनी या कामी नेमला होता. त्याच्या तपासणीच्या पद्धतीमुळे जनभावना दुखावल्या जात होत्या. एकीकडे गरिबांना औषध आणि सेवा मिळणे कठीण झाले होते. नुकताच 1896 साली भयंकर दुष्काळ पडला होता. या संकटातून समाज वर येतो न येतो तो हे प्लेगचे संकट उभे राहिले होते. सावित्रीबाई हे सगळे पाहून अस्वस्थ होत्या. त्यांनी यशवंतरावाला रजा काढून ये, असे सांगितले. त्यांचे नातेवाईक ससाणे यांच्या माळरानावर तात्पुरता दवाखाना व सेवागृह उभारण्यात आले. या रोगाची लागण लगेच होते, म्हणून जमेल तशी स्वतःची काळजी घेत रोग्यांची सेवा आणि त्यांचे खाणेपिणे याकडे सावित्रीबाई व सत्यशोधक कार्यकर्ते लक्ष देऊ लागले. एके दिवशी मुंढवा या गावात काही लोकांना घेऊन सावित्रीबाई गेल्या होत्या. तेथे महारवाड्यात पांडुरंग गायकवाड हा बालक प्लेगची बाधा होऊन आजारी पडला होता. ते बालक तळमळत पडले होते. सोबतच्या लोकांनी त्याला झोळी करून नेण्याचे नाकारले. त्या काळी ‘कर्ते सुधारक’ आणि ‘बोलके सुधारक’ असे म्हटले जायचे, ते नेमके काय याची प्रचीती सावित्री माऊलीला आली. शेवटी सावित्रीबाईंनी स्वतःच्या पाठीवर झोळी करून त्याला दवाखान्यात पोहोचवले. यशवंतरावांनी लगेचच उपचार सुरू केले. बालक वाचले, मात्र माऊलीला प्लेगची लागण झाली. डॉक्टर यशवंतराव फुले यांनी प्रयत्नांची शर्थ केली; परंतु 10 मार्च 1897 रोजी सेवामयी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. ‘दीनबंधु’ या पत्रिकेत त्यांच्या कार्याची व निधनाची बातमी छापून आली.
 
सावित्रीबाईंच्या काव्यरचना
 
सावित्रीबाईंनी काव्यरचनाही केल्या. त्यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह त्यांच्या विकसित मनाचा आरसा आहे.
या काव्यसंग्रहातील ‘संसाराची वाट’ या कवितेत त्या लिहितात.
 
माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।
जैसा मकरंद। कळीतला।
 
सावित्रीबाई फुलेंकडे पांडित्याची पार्श्वभूमी नव्हती. त्या मराठी भाषापंडिता नव्हत्या; परंतु शिक्षणाने त्या स्वतःला आणि आजूबाजूच्या वातावरणाला समजून घेऊ लागल्या होत्या. त्यांनी जोतीरावांना लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत, ज्यांवरून सावित्रीबाईंच्या उत्तम आकलनशक्तीची व सामाजिक बांधिलकीची साक्ष पटते.
 
धनंजय कीर यांनी जोतीराव फुल्यांचे समग्र चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सुधारक असणे म्हणजे काय, हे सांगताना खालील आशयाची मांडणी केली आहे.
 
सुधारक असण्यासाठी अत्यंत बुद्धिमान असणे, हीच केवळ पूर्वअट नसते; तर त्या मेधावी व्यक्तीकडे नीतिधैर्य असावे लागते. हक्कांसाठी लढणे एक वेळ सोपे असते; पण आजूबाजूला सतत विरोधी वातावरण असताना आपल्या हक्कांचे रक्षण करणे, यासाठी असीम धैर्य असावे लागते. टोकाची तत्त्वनिष्ठा असावी लागते!
 
हे गुण सावित्रीबाईंकडे अपरंपार होते.
 
त्यांचे हे गुण त्यांच्या काव्यातूनही दिसून येतात. ‘काव्यफुले’ हा त्यांचा कवितासंग्रह आहे!! एका ओवीत त्या म्हणतात...
 
विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ सार्‍या धनाहून।
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन।
जोतीरावांसाठी त्या लिहितात...
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।
सर्वां जागे केले। सूर्याने या।
शूद्र या क्षितिजी। जोतिबा हा सूर्य।
तेजस्वी अपूर्व। उगवला।
 
सावित्रीबाई फुले! एका फुलमाळ्याच्या घरात जन्मलेली साधी मुलगी. लग्न करून तशाच दुसर्‍या घरात जाते. भोवती रूढींचा विळखा! पण तिचा जीवनसाथी तिला वेगळी वाट दाखवतो. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून ती त्या वाटेवर चालू लागते! त्या वाटेवर स्वकर्तृत्वाची लखलखीत मुद्रा उमटवते. तिने निवडलेला हा मार्ग पुढे अनेकींसाठी राजमार्ग होतो. 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस... त्यानिमित्त त्यांचे केलेले हे कृतज्ञ स्मरण.
 
संदर्भ :
1) सावित्रीबाई फुले, कार्य व कर्तृत्व. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई
2) सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय. महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई
संपादक ः प्रा हरी नरके
प्रा. मा.गो. माळी
3) महात्मा जोतीराव फुले
लेखक ः धनंजय कीर
पॉप्युलर प्रकाशन
पुनर्मुद्रण ः 1996

रमा दत्तात्रय गर्गे

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे

शिक्षण:M.A.(हिस्ट्री)Ph.D.(योगशास्त्र)...वैचारिक /साहित्य /तत्वज्ञान/इतिहास विषयक लेखन..

6 पुस्तके प्रकाशित। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या पूलं गौरव विशेषांक,व बाळशास्त्री हरदास गौरव विशेषांकात लेखन।
कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्र समन्वयक।
समरसता साहित्य परिषद,महाराष्ट्र प्रांत सदस्य
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समिती सदस्य