मिताकुये ओयासीन

विवेक मराठी    06-Feb-2024   
Total Views |
'इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज' या संस्थेने आसाममधील दिब्रुगड येथे ‘प्राचीन जीवित संस्कृती’ ह्या विषयावर चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद भरवली होती. यामध्ये 33 वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या पुरातन संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे लोक उपस्थित होते. 2009पासून आतापर्यंत या संस्थेने सात आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या आहेत. दिब्रुगडची परिषद ही आठवी आणि आजवरची सर्वात मोठी परिषद होती. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. विविध देशांमधले, विविध संस्कृतींचे प्रतिनिधी दिब्रुगडमध्ये चार दिवस अगदी खेळीमेळीने एकत्र राहिले होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय संकल्पनेच्या जवळपास जाणारी ‘मिताकुये ओयासीन’ ही या परिषदेची टॅगलाईन होती. या विचारसूत्राभोवती गुंफलेल्या या परिषदेविषयी...

vivek
 
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आसाममधल्या दिब्रुगड येथे एका अनोख्या परिषेदेत सहभागी व्हायचा योग आला. इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज ह्या संस्थेने ‘एक प्राचीन जीवित संस्कृती’ ह्या विषयावर चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद भरवली होती, ज्यात 33 वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या पुरातन संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणारे लोक आले होते.
 
 
अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनिया ह्या राज्यातल्या वेस्टचेस्टर ह्या शहरात इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज ही संस्था स्थापन झाली. जगभरातल्या निसर्गपूजक, अनेकेश्वरवादी प्राचीन संस्कृतींचा अभ्यास करणं आणि त्या संस्कृतींवर आजही विश्वास ठेवणार्‍या लोकांना एकत्र आणणं हे आयसीसीएसचं मुख्य काम. 2009पासून आयसीसीएसने सात आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या आहेत. दिब्रुगडची परिषद ही आठवी आणि आजवरची सर्वात मोठी अशी परिषद होती.
 
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते 28 तारखेला परिषदेचे उद्घाटन झालं. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्माही त्या वेळेला उपस्थित होते.
 
 International Center for Cultural Studies 
 
मी 30 तारखेला जेव्हा दिब्रुगडमध्ये पोहोचले, तेव्हा मुख्य मंडपात सत्र सुरू होतं. ऑस्ट्रेलियाचा एक अबोरिजिनल नेता, आर्मेनियाची एक प्राध्यापिका, पोलंडचा एक तरुण आणि इराकी याझिदी लोकांचा नेता असे चार संस्कृतीतले चार जण व्यासपीठावर होते. सत्र सुरू होण्यापूर्वी निवेदिकेने गर्जना केली, “मिताकुये ओयासीन” आणि सभागृहातून जोरदार प्रतिसाद उमटला, “आहो, आहो”! ही घोषणा म्हणजे परिषदेचं घोषवाक्य आहे. साधारण आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ ह्या भारतीय संकल्पनेच्या जवळपास जाणारी ही घोषणा आहे. अमेरिकेतल्या लाकोटा ह्या अमेरिकन इंडियन जनजातीतून आलेल्या ह्या घोषणेचा अर्थ आहे ‘सारं विश्व, त्यातले सर्व सजीव आणि भोवतालचा निसर्ग हे एकमेकांशी जोडलेले आहेत.’ दिब्रुगडमध्ये आलेले विविध देशांमधले प्रतिनिधी बघता हे घोषवाक्य किती खरं होतं, ते पटलंच अगदी.
 
दक्षिण अमेरिकेतून आलेले मायन, इन्का, अ‍ॅझटेक ह्या संस्कृतींचे प्रतिनिधी, युरोपमधून आलेले स्लाव्हिक, पुरातन ग्रीक, आर्मेनियन आदी संस्कृतींचे प्रतिनिधी, आशियामधून आलेले जपानचे शिंटो, व्हिएतनामचे चाम, कोरियाचे सूर्यपूजक, आफ्रिकेमधून आलेले तिथल्या मूळ निसर्गपूजक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळ्या जनजातीतले लोक, न्यूझीलँडचे माओरी, ऑस्ट्रेलियाचे अबोरिजिनल, अमेरिकेतल्या विविध अमेरिकन इंडियन जमातींचं प्रतिनिधित्व करणारे आदी अनेक लोक दिब्रुगडमध्ये एका मंचावर एकत्र जमले होते.
 
 International Center for Cultural Studies
 
त्यांच्या त्यांच्या देशामध्ये एकेकाळी त्यांच्या संस्कृती जिवंत होत्या, संपन्न होत्या. कधीकाळी त्यांच्या हाती सत्ता होती, साधनं होती, त्यांच्या विश्वासाला, विचारांना प्रतिष्ठा होती. पण पुढे एकेश्वरवादी धर्मांचं त्यांच्या संस्कृतीवर आक्रमण झालं आणि त्यांचे धर्म नष्ट केले गेले, त्यांची नावं बदलली गेली, त्यांची गाणी, त्यांच्या भाषा, त्यांचे कपडे, त्यांच्या चालीरिती ह्या सर्वांवर ‘अप्रगत, जुनाट, पेगन, काफिर’ असे शिक्के मारून त्यांना शेकडो वर्षं अपमानित करण्यात आलं. त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा एका मृत संस्कृतीचे अवशेष म्हणून म्यूझियममध्ये ठेवल्या गेल्या.
 
 
ख्रिस्ती धर्म युरोपमध्ये फोफावायच्या आधी, म्हणजे साधारण दोनेक हजार वर्षांपूर्वी जगामध्ये अनेक बहुईश्वरवादी आणि निसर्गपूजक संस्कृती नांदत होत्या. रोमन, ग्रीक, इजिप्शियन, केल्टिक आदी संस्कृतींच्या उपासकांनी चित्रकला, मूर्तिकला, वास्तुकला, इतर हस्तकला, तसंच विज्ञान, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र आदी विषयांत खूप प्रगती केली होती. त्यांच्या कलाविष्कारांमधून व्यक्त झालेली उच्च दर्जाची कलात्मकता आजही आपल्याला दिसते, म्हणूनच दर वर्षी लाखो लोक ह्या संस्कृतींचे अवशेष पाहायला त्या त्या देशात जातात.
 
 
पण अब्राहमिक धर्मांच्या झंझावाताखाली ह्या संस्कृती दीर्घकाळ टिकू शकल्या नाहीत. ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या अनुयायांनी ख्रिस्ती न बनलेल्या आणि त्यांच्या त्यांच्या उपासनापद्धतींवर श्रद्धा ठेवणार्‍या लोकांना ‘पेगन’ हे तुच्छतादर्शक नाव दिलं. पेगन लोक हे ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लीम ह्या अब्राहमिक लोकांसारखे एकेश्वरवादी नव्हते. ‘खेडूत’ या अर्थाच्या ‘पेगॅनस’ या लॅटिन शब्दापासून ‘पेगन’ हा शब्द बनला आहे. बहुदेवतावादी, अडाणी, गावंढळ ह्या अर्थाने हा शब्द निसर्गपूजक, बहुईश्वरवादी आणि पूर्वजांची उपासना करणार्‍या संस्कृतींसाठी ख्रिस्ती लोकांनी प्रथम वापरला. पुढे इस्लामचा प्रभाव वाढला, तेव्हा याच लोकांना काफिर असं संबोधलं जाऊ लागलं.
 International Center for Cultural Studies 
 
परंतु जगाचं फार वेगाने अब्राहमीकरण झाल्यावरदेखील पुरातन धर्म, रूढी, तत्त्वज्ञान, साहित्य, संस्कृती, लोकपरंपरा इत्यादींचा लोकांवर प्रभाव पूर्णपणे नाहीसा झाला नाही. आपल्या जुन्या संस्कृतीवर विश्वास ठेवणारे लोक कुठे कुठे टिकून राहिले, जे वरवर ख्रिस्ती किंवा मुसलमान झाले, तरी त्यांनी आपली जुनी संस्कृती, आपल्या ज्ञानपरंपरा सोडल्या नाहीत. आज जगभरातल्या अशा पेगन संस्कृतींचे पाईक त्यांच्या त्यांच्या देशात त्यांच्या धर्माचं, संस्कृतीचं पुनरुज्जीवन करू बघताहेत आणि ह्या महायज्ञाचं पौरोहित्य भारताने करावं, अशी त्यांची आशाही आहे आणि इच्छाही आहे.
 
 
भारत हा जगातला एकमेव देश असा आहे, जिथली संस्कृती कधीही मृत झाली नाही, ना तिच्या अव्याहत प्रवाहात कधी खंड पडला. आपल्यावरही एकेश्वरवादी आक्रस्ताळ्या पंथांची इतकी आक्रमणं झाली, पण भारत सतत चिवटपणे प्रतिकार करत राहिला. इथले लोक आपल्या प्राचीन धर्मविचारांना कधीही विसरले नाहीत. भारतीय लोक लवचीक होते, चिवट होते, म्हणून आपली संस्कृती जिवंत राहिली. भारतीय लोक लव्हाळ्यासारखे उरले आणि म्हणूनच तरले. परकीय आक्रमणांचा पूर आला, तेव्हा सामान्य हिंदू आडवे झाले, पाणी वाहून गेलं तेव्हा परत उठून उभे राहिले, पाणी नसेल तेव्हा वरवर सुकून गेले, पण इथले संत, प्रतिकार करणारे इथले राजे, विविध जनजातींचे नायक ह्या मुळांना आतून बळ देत राहिले, थोडं ऊन-पाणी मिळालं तेव्हा हिंदू परत तरारून वर आले. उगीच नाही संत तुकारामांनी म्हटलंय, ‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे राहती।’
 
 International Center for Cultural Studies 
 
साहजिकच अशी बहुसांस्कृतिक, बहुउद्देशीय परिषद भारतातच भरणं अत्यंत स्वाभाविक होतं. दिब्रुगडमध्ये घालवलेल्या तीन दिवसांत मला खूप शिकायला मिळालं, विविध देशांतून आलेल्या, विविध प्राचीन संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणार्‍या लोकांशी भरपूर गप्पा झाल्या, त्यांची कर्मकांडं, त्यांच्या उपासनापद्धती पाहायला मिळाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व प्राचीन संस्कृतींना जोडणारा धागा एकच आहे, हेही लख्खपणे समजलं.
 
 
माझी पहिली भेट झाली ती सॅम दाऊद व खदर हायोयान ह्या याझिदी समाजाच्या नेत्यांशी. याझिदी किंवा येझिदी लोक आज इराक, सिरिया, जर्मनी, तुर्कस्थान, आर्मेनिया, रशिया आदी अनेक देशांमध्ये विखुरलेले आहेत, पण इराक आणि सिरियाच्या ह्या दोन देशांमध्ये त्यांची प्रमुख वस्ती होती. जगाला याझिदी लोक माहीत झाले ते आयसिसच्या धर्मांध इस्लामी अतिरेक्यांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांमुळे. जेव्हा इराकमध्ये काही काळासाठी इस्लामिक स्टेट स्थापन झाली होती, तेव्हा याझिदी लोकांचा भयानक नरसंहार झाला. 2014मध्ये आयसिसच्या नराधमांनी इराकच्या सिंजर शहरावर कब्जा करून त्या प्रांतात राहणार्‍या हजारो याझिदी लोकांची कत्तल केली. हजारो लहान मुलांना गुलाम केले. असंख्य महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले. त्यात पाच-सहा वर्षांच्या मुलीदेखील होत्या. 10000 हून अधिक याझिदी महिलांना आणि मुलींना त्या वेळेला कैदी बनवून अर्धनग्नावस्थेत लोखंडी पिंजर्‍यात ठेवून इराक आणि सीरियाच्या बाजारांमध्ये सेक्स स्लेव्ह म्हणून विकण्यात आलं. सॅम दाऊद तेव्हा इराकमध्ये होते. त्यांनी हा सर्व भयानक प्रकार प्रत्यक्ष घडताना बघितला आहे. त्या काळाच्या भयानक वेदनांचं प्रतिबिंब अजूनही त्यांच्या डोळ्यात दिसतं.
 
 
आयसीसने याझिदी लोकांवर इतके अत्याचार केले, कारण याझिदी लोकांची संस्कृती इस्लामहून अगदीच भिन्न आहे. याझिदींच्या संस्कृतीचं हिंदू संस्कृतीशी मोठ्या प्रमाणात साम्य आहे. याझिदी लोकांची मंदिरं असतात, ज्यावर हिंदू मंदिरांसारखे शंकूच्या आकाराचं शिखर असतं. त्यांच्या मंदिरात तेलाचे दिवे लावले जातात, तसेच कुठलाही धार्मिक विधी करताना अग्निकुंड पेटवलं जातं व त्यांच्या भाषेत मंत्रोच्चार केले जातात. याझिदी लोक मंदिरात जाण्याआधी आधी नदीत अंघोळ करतात आणि मगच मंदिरात जाऊन पूजा करतात.
 
 
हिंदू धर्मामध्ये जसं आपण मानतो की विष्णूंनी धर्मरक्षणासाठी दहा अवतार घेतले, तसेच यझिदी लोक मानतात की यजदाननावाच्या त्यांच्या देवाने मानवजातीच्या कल्याणासाठी वेळोवेळी सात अवतार घेतले. त्यातला प्रमुख अवतार म्हणजे मयूर अवतार, ज्याला याझिदी लोक ’मलक ताउस’ असं संबोधतात. आर्मेनियाहून आलेल्या खादरचं म्हणणं आहे की यझीदी आणि हिंदू धर्मांमध्ये हजारो वर्षांचे नातं आहे. भारतीयांनी इराक, आर्मेनिया आदी ठिकाणी जाऊन याझिदी आणि हिंदूंमधलं नातं परत एकवार मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित केलं पाहिजे, असं सॅम आणि खादर ह्या दोघांचंही म्हणणं होतं.
 
 
त्यानंतर मला भेटले ते आफ्रिकेतल्या घाना देशातले हिंदू, संजया नावाचा तरुण आणि भारता नावाची तरुणी. ते वर्णाने कृष्णवर्णीय आफ्रिकन असले, तरी जन्माने हिंदू आहेत. घाना हा पश्चिम आफ्रिकेतला एक छोटासा देश. ह्या देशाचं पूर्वीचं नाव ‘गोल्ड कोस्ट’ होतं आणि भारतासारखंच घानामध्येही ब्रिटिशांचं राज्य होतं. आपल्यानंतर बरोबर एका दशकाने, म्हणजे 1957मध्ये घानाला स्वातंत्र्य मिळालं. घानामध्ये स्वामी घनानंद ह्या आफ्रिकेतल्या पहिल्या कृष्णवर्णीय हिंदू संन्याशाने 1975 साली आफ्रिकन हिंदू मोनास्टरी हा आश्रम स्थापन केला. हिंदू धर्माची दीक्षा घेणारे आफ्रिकेतले ते पहिले काळे संन्यासी.
 
 
घानामध्ये आज जवळजवळ साडेबारा हजार लोक धर्माने हिंदू आहेत, त्यातले दहा हजार लोक आफ्रिकन वंशाचे आहेत. घानाची राजधानी आकरा येथे स्वामी घनानंदांनी बांधलेलं सुंदर मंदिर आहे. तिथे सकाळ-संध्याकाळ शास्त्रोक्त पूजा चालते. संस्कृतात पूजा सांगणारे पुरोहितही आफ्रिकन आणि भक्तिभावाने पूजा करणारे भक्तही आफ्रिकन! भारता आणि संजय ह्या दोघांच्याही आई-वडिलांनी स्वामी घनानंदांकडून विधिवत हिंदू धर्माची दीक्षा घेतलेली असल्यामुळे त्यांचा दोघांचाही जन्म हिंदू धर्मात झालाय. ख्रिस्ती आणि इस्लामी धर्माचं प्राबल्य असलेल्या घानामध्ये हिंदू धर्माचं पालन करणं सोपं नाही. तरीही संजय आणि भारतासारखे अनेक तरुण-तरुणी तिथे अभिमानाने स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात. संजय आणि भारता ह्या दोघांचीही भारतात येण्याची मनापासून इच्छा होती. दिब्रुगडमधल्या जगन्नाथ मंदिरात त्या दोघांना नतमस्तक झालेलं पाहताना बघून हिंदू धर्माची पाळंमुळं किती दूरवर पसरली आहेत ह्या विचाराने मला भरून आलं.
 
 
प्राचीन संस्कृती जपण्यासाठी बनवलेल्या ह्या परिषदेचं स्वरूप नेहमीच्या अ‍ॅकॅडमिक कॉन्फरन्सेससारखं पेपर वाचनापुरतं सीमित नव्हतं, तर प्रत्येक दिवशी सकाळ-संध्याकाळ प्रत्येक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणार्‍या काही पारंपरिक सेरेमोनीज तिथे केल्या जायच्या, त्यातल्या पेरूमधल्या इन्का संस्कृतीच्या, ग्वाटेमालामधल्या मायन लोकांच्या, जपानमधल्या शिंटो लोकांच्या, अमेरिकेतल्या नेटिव्ह अमेरिकन लोकांच्या काही सेरेमोनीज मला पाहायला मिळाल्या.
 

vivek 
 
जगाच्या इतक्या वेगवेगळ्या भागांमधून हे लोक आलेले होते, पण त्यांच्या कर्मकांडांमध्ये काही बाबतीमध्ये कमालीचं साम्य होतं. पेरूमधल्या इन्का लोकांची सेरेमोनी हुबेहूब आपल्या होम-हवनासारखीच होती. त्याची सुरुवात झाली आपल्याकडे होते तशी शंखनादाने. हे होम करणारा जो हाय प्रीस्ट -म्हणजे मुख्य पुरोहित होता, त्याचं नाव होतं आनाउरको. अगदी पुरातन पुतळ्यातला इन्का कसा दिसतो, तसाच तो दिसत होता. आपलं हवन सुरु करताना तो म्हणाला की सकारात्मक ऊर्जा पसरावी म्हणून त्यांच्याकडे कुठलंही धार्मिक कार्य करताना शंखनाद करतात. त्यानंतर त्यांच्या केचवा भाषेत काही मंत्र म्हणून त्यांनी तो पवित्र अग्नी प्रज्वलित केला.  सगळं काही अगदी आपल्यासारखंच सुरू होतं. त्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या आपातानी समाजाचे गुरू पुनयो मुलो ह्यांनी त्यांच्या समाजात प्रचलित असलेला शांतीविधी केला, मूलत: तेही निसर्गपूजक असल्यामुळे त्याही विधीमध्ये आणि हिंदू चालीरितींमध्ये खूप साम्य आहे.
 
 
आयसीसीएसने भरवलेल्या ह्या परिषदेतले विविध संस्कृतींचे धार्मिक विधी बघताना, त्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना मला हे प्रकर्षाने जाणवलं की ह्या सर्व संस्कृतींमध्ये आणि हिंदू धर्मविचारामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये खूपच साम्य आहे. जाणवलेली काही साम्यस्थळं म्हणजे ईश्वराला पुरुषाबरोबरच स्त्रीरूप मानून त्या शक्तीची पूजा करणं, सूर्याची आणि चंद्राची उपासना करणं, पृथ्वीला माता मानून तिला तृप्त करण्यासाठी तिची पूजा करणं, मृत्यूनंतरही पूर्वज पितरांच्या स्वरूपात कुटुंबावर कृपादृष्टी ठेवतात अशी धारणा असणं, पंचमहाभूतांना पवित्र मानून त्यांची पूजा करणं आणि सर्व जीवसृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे अशी सर्वसमावेशक धारणा असणं.
 
 
थोड्याफार फरकाने जगातल्या सर्व प्राचीन संस्कृतींची हीच मूलतत्त्वं होती. पण दुर्दैवाने ही मूल्यं, ही विचारपद्धती फक्त भारतातच अजून मोठ्या प्रमाणावर जिवंत आहे. जगातल्या इतर सर्व देशांमध्ये, पृथ्वी आणि त्यावरील सर्व प्राणी-पक्षी-वनस्पती आदी सृष्टी ही फक्त मानवाच्या उपभोगासाठी आहे, ह्याच अब्राहमिक धर्मांच्या विचाराचा पगडा प्रबळ आहे आणि म्हणूनच जगातल्या इतर सर्व प्राचीन संस्कृतींचे पाईक भारताकडे मोठ्या आशेने बघत आहेत.
 
 
परिषदेच्या समारोपाच्या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्ताजी होसाबाळे ह्यांनीही जगातल्या विविध प्राचीन संस्कृतींमधल्या ह्या साम्यस्थळांचा खास उल्लेख केला. आपल्या भाषणात ते म्हणाले की संस्कृती म्हणजे कुठल्याही समूहाचा किंवा देशाचा आत्मा असतो आणि जगातल्या सर्व प्राचीन निसर्गपूजक, बहुईश्वरवादी संस्कृतींचा आत्मा म्हणजे त्यांचे अध्यात्मविषयक विचार. जी संस्कृती असे मानते की ईश्वरी तत्त्व एकच असले, तरी त्याची अनंत रूपे असू शकतात, त्या संस्कृतीमधल्या लोकांना इतर संस्कृतींचा आदर करणं हे स्वभावत:च येतं. हिंदू धर्मातील हे सर्वसमावेशक तत्त्वज्ञान जगातल्या अनेक प्राचीन धर्मपरंपरांमध्ये आढळतं. हिंदूंप्रमाणेच तेही लोक निसर्गाची पूजा करतात. त्याच्या अनेक कर्मकांडामध्ये निसर्गाला स्थान दिलेलं आढळतं. हिंदूंच्या रूढींशी आणि धार्मिक विधींशी साधर्म्य साधणार्‍या अनेक रूढी ह्या सर्व प्राचीन संस्कृतींमध्येही पाहायला मिळतात.
 
 

vivek
 
परिषदेच्या शेवटच्या दिवशी अरुणाचल प्रदेशमधल्या रोइंग ह्या शहराजवळच्या रिवॉच ह्या संस्थेला भेट द्यायची होती. रिवॉच ही संस्था इथल्या स्थानिक संस्कृतीचा अभ्यास, डॉक्युमेंटेशन आणि संवर्धन ह्या क्षेत्रात काम करते. एकेकाळी आसामचा भाग असलेले अरुणाचल प्रदेश हे राज्य भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं आणि तरीही वांशिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जवळजवळ सव्वीस प्रमुख जनजाती आणि शंभरेक उपजनजाती आहेत, ज्यामध्ये नोक्टे, आदि, न्याशी गॅलो, टॅगिन, आपातानी आणि मिश्मी यांचा समावेश आहे. मिश्मी जमातीमध्येच इडू-मिश्मी, दिगारू-मिश्मी आणि मिजू-मिश्मी अशा तीन उप-जमाती आहेत. ह्या सर्व जनजातींची संस्कृती, हस्तकला, इतिहास, त्यांची वेशभूषा, वस्त्राप्रावरणं, आभूषणं आदी शोकेस करणारे एक छोटं पण उत्तम वस्तुसंग्रहालय रिवॉच संस्थेने उभं केलं आहे. त्याशिवाय इथल्या संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी पुस्तकंही रिवॉच वेळोवेळी प्रकाशित करते. अरुणाचलची लोकसंस्कृती ह्या विषयावर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इथे राहून अभ्यास करायचीही व्यवस्था आहे.
 
 
 
रिवॉच संस्थेचा सुंदर परिसर आणि संस्थेच्या कामातला तिथल्या स्थानिक लोकांचा उत्साही सहभाग ही राष्ट्रवादी विचारांच्या अनेक संस्थांच्या अनेक पिढ्यांच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाची परिणती आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा देशाच्या कुठल्याही भागातून अरुणाचलला यायला कमीत कमी चार-पाच दिवस लागत असत, जेव्हा संपर्काची काही साधनं नव्हती, इथली भाषाही कुणाला येत नव्हती, अशा परिस्थितीत विवेकानंद केंद्र, ज्ञानप्रबोधिनी, वनवासी कल्याण आश्रम ह्यासारख्या अनेक संस्थांनी पूर्णपणे सेवावृत्तीने ह्या भागात काम केलं. इथल्या लोकांना भारतीय संस्कृतीच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. आज इथल्या स्थानिक लोकांशी बोलताना हे पदोपदी जाणवतं.
 
 
रिवॉच म्यूझियम बघताना परदेशातून आलेल्या प्रतिनिधींना, विशेषत: दक्षिण अमेरिकेतून आलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या संस्कृतीत आणि इथल्या संस्कृतीत खूप साम्यस्थळं जाणवत होती. विशेषत: इथली वास्तुकला, इथलं विणकाम हे मायन आणि इन्कन संस्कृतीशी बरंचसं साम्य दाखवणारं आहे, असं त्यांना वाटलं. परिषद जेव्हा संपली, तेव्हा सर्वांनाच वाईट वाटत होतं. विविध देशांमधले, विविध संस्कृतींचे प्रतिनिधी चार दिवस अगदी खेळीमेळीने एकत्र राहिले होते. मिताकुये ओयासिन ही आता नुसती घोषणा राहिलेली नव्हती, तर आमच्या सर्वांच्याच जीवनपद्धतीचा एक भाग बनली होती.
 
 
दिब्रुगडच्या ह्या परिषदेत घालवलेल्या ह्या तीन दिवसांत मला खूप शिकायला मिळालं. विविध देशांतून आलेल्या, विविध प्राचीन संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणार्‍या लोकांशी भरपूर गप्पा झाल्या, त्यांची कर्मकांडं, त्यांच्या उपासनापद्धती पाहायला मिळाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व प्राचीन संस्कृतींना जोडणारा धागा कसा एकच आहे, हेही समजलं.
 
 
अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्।
 
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
 
 
- ‘आपले, परके हा भेद करणं हे छोट्या मनोवृत्तीचं लक्षण आहे, उदार मनाच्या व्यक्तींसाठी सर्व पृथ्वी हेच एक कुटुंब आहे’ हा महाउपनिषदामधला उदात्त विचार ह्या परिषदेत प्रत्यक्षात उतरलेला दिसत होता.