स्थलानुरूप जलसंधारण शाश्वत जलसंधारणाची गुरुकिल्ली

विवेक मराठी    16-Mar-2024   
Total Views |
vivek
 
पाणीटंचाई ही समस्या जरी सगळीकडे असली, तरी शाश्वत मार्गाने त्या समस्येचं अभ्यासान्ती निराकरण करून उपाययोजना होऊ शकते. त्यामुळे पाणीटंचाई दीर्घकाळ लांब ठेवता येते. स्थलानुरूप उपाययोजना केली आणि योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे, योग्य उपाय केले, तर त्याचा निश्चित फायदा होतो, हे पुण्याजवळ वडाची वाडी या गावातील केलेल्या प्रयोगाने सिद्ध झालं आहे.
 
आपल्याला हे माहीत आहेच की जगामध्ये गोड पाणी आधीच खूप मर्यादित आहे; जे आहे, त्यातील वापर करता येण्यासारखं पाणी आणखी मर्यादित आहे आणि त्यातील उपलब्ध असलेलं पाणी आपण वेगाने संपवतोय आणि प्रदूषित करतोय. प्रमाणापेक्षा जास्त पाणी आणि ऊर्जा वापरून आपण हा प्रश्न आणखी जटिल करतोय. जलचक्रावर परिणाम होत असल्याने ही परिस्थिती आणखी वाईट होते आहे. अशा परिस्थितीत, पर्यावरणाचं होणारं नुकसान भरून काढायला मदत व्हावी, एकीकडे असलेली पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे चाललेली उधळपट्टी यावर मार्ग निघावा आणि एकूणच पर्यावरण आणि जीवसृष्टी यांचं भलं व्हावं, यासाठी पाण्याची बचत करणं अत्यंत आवश्यक आणि तातडीचं काम झालं आहे.
 
 
कोणत्याही भागामध्ये यशस्वी जलसंधारण करायचं असेल, तर स्थलानुरूप जलसंधारण करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. जलसंधारण करताना ते आपण कुठे करतोय हे आधी अभ्यासून, मग त्याप्रमाणे उपाय करावे लागतात. सगळीकडे सारखेच उपाय उपयोगी पडत नाहीत. पावसाचं प्रमाण, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, पाण्याची गरज, जागेची उपलब्धता, व्यवहार्यता इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करून मगच योग्य निर्णयापर्यंत पोहोचता येतं. शहरात किंवा नागरी वस्तीत करण्याचे उपाय, खेड्यांमध्ये उपयोगी पडणारे उपाय, शेतीसाठी करायचे उपाय, स्रोताचं पुनरुज्जीवन करण्यासाठी करायचे उपाय इत्यादी गोष्टींसाठी वेगवेगळे पर्याय असतात. साकल्याने विचार करून उपाय केले, तर दूरगामी यश मिळण्याची शक्यता खूप वाढते.
 
vivek 
 
पुण्याजवळ वडाची वाडी या गावाजवळ राज्य राखीव सुरक्षा दलाची एक जागा आहे. तीन बाजूंनी टेकड्या आणि एका बाजूला तीव्र ते मध्यम स्वरूपाचा उतार अशा प्रकारचा हा भाग आहे. त्या भागात गेली 4-5 वर्षं कमिन्स कंपनीच्या पुढाकाराने वनीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे. त्यातून 20,000पेक्षा जास्त रोपांची लागवड केली गेली आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात वनीकरण केलं जातं, तेव्हा त्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. या भागात पाऊस अत्यंत अनियमित आणि कमी पडत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी असमान आणि बेभरवशाची असते. लागवड केलेल्या झाडांना आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, तसंच पुढे होणार्‍या वनीकरणासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाच्या कामात आम्ही सहभागी झालो.
 
सर्वात आधी या सर्व भागाचं सर्वेक्षण करून, अभ्यास करून, कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना करायला हवी, त्याचा नक्की फायदा काय आणि कधी होईल, त्यासाठी आवश्यक खर्च किती, हे काम शाश्वत यशस्वी व्हावं यासाठी काय करायची आवश्यकता आहे, इत्यादी बाबींवर विचार आणि अभ्यास करून आम्ही त्या भागात करायच्या जलसंधारण कामाच्या आराखड्याची आखणी केली.
 
vivek 
त्या भागातून वाहणार्‍या दोन ओढ्यांवर आणि आजूबाजूला योग्य जागा शोधून कोणत्या ठिकाणी पाणी जमिनीत जिरवायचं, कोणत्या ठिकाणी जमिनीवर बंधारा किंवा तलाव याच्या मदतीने साठवायचं, इत्यादी उपाय करायच्या जागा आणि स्रोताचं स्वरूप याची आखणी करून काम सुरू केलं.
 
पहिल्या वर्षी तिथे असलेल्या तलावाची स्थिती सुधारून त्यात वर्षभर पाणीसाठा राहील यासाठी उपाययोजना केली. त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी बंधारा बांधून पाणीसाठा करण्यासाठी उत्तम जागा होती, तिथे एक उघडबंद करता येणार्‍या झडपा असलेला बंधारा बांधला. या दोन्ही उपायांमुळे अंदाजे दोन कोटी लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला. यामध्ये, जमिनीत जिरणार्‍या आणि त्यामुळे भूजलपातळी वाढवणार्‍या पाण्याचं गणित मांडलंच नाही आहे. तो अतिरिक्त फायदा या दोन उपायांमुळे झाला आहे आणि होत आहे.
 
 
दुसर्‍या वर्षी त्या भागात आणखी दोन तलावांची निर्मिती केली गेली. या तलावांमध्ये पाणीसाठा तर होतोच, त्याचबरोबर उतारावरून वेगाने वाहून येणारं पावसाचं पाणी या तलावांमध्ये येतं आणि तलाव भरून त्याचा विसर्ग परत ओढ्यामध्ये होतो आणि पाणी प्रवाहाच्या रूपाने पुढे जातं.
 
 
तिसर्‍या वर्षी आणखी एक तलाव आणि तिथल्या विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक झडपा असलेला बंधारा, हे दोन उपाय केले.
 
या सर्व उपायांमधून अंदाजे 4 कोटी लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्याव्यतिरिक्त, पाणी अनेक ठिकाणी जमिनीमध्ये जिरवलं असल्याने त्या सर्व भागातील भूजलपातळी चांगलीच सुधारली आहे.
 
 
एकूण अंदाजे 300 एकर जागेमध्ये हे काम चालू आहे आणि तिथे 22,000 वृक्ष लावून वनीकरणाचा एक प्रकल्प चालू आहे. त्यासाठी लागणारा पाणीसाठा करणं आणि तो करताना पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणं हे उद्दिष्ट मनात ठेवून काम चालू आहे.
 
तीन वर्षं नीट अभ्यास करून आणि योग्य जागी योग्य उपाय या पद्धतीने केलेल्या कामांचा फायदा किंवा परिणाम या वर्षी अनुभवायला मिळत आहे.
 
 
गेल्या वर्षी (2023चा पावसाळा) या भागात जेमतेम 10-15% पाऊस झाला. इथे पाणीसाठा करण्यासाठी उपाय केले आहेत. पण पाऊसच कमी झाला. गेल्या 3 वर्षांमध्ये जी कामं केली, त्यामुळे भूजलसाठा चांगला टिकला आहे, हे आत्ता सगळ्यांच्या लक्षात येतंय.
 
तिथे असलेल्या विहिरीतून रोज अंदाजे सरासरी 30,000 लीटर्स पाणी काढलं जातं. मागच्या वर्षीच्या (2022) पावसाळ्यानंतर आता गेले 20 महिने पाऊस झालाच नाहीये आणि तरीही, आजही रोज 30,000 लीटर्स पाणी मिळतंय आणि विहिरीत पाणीसाठा शिल्लक राहतोय.
 
गणित मांडलं, तर गेल्या 20 महिन्यांमध्ये अंदाजे 1800 टँकर्स (10,000 लीटर्सचा एक) पाणी मिळालं आहे.
 
 
त्या भागात एका टँकरसाठी 1500 रुपये खर्च येतो - म्हणजे गेल्या 20 महिन्यांमध्ये साधारण 27 लाख रुपये पाण्यासाठी खर्च झाले असते, ते केलेल्या कामामुळे वाचले आहेत. जमिनीत अजूनही चांगला भूजलसाठा उपलब्ध आहे, हे विहिरीतील पाण्याची पातळी बघून कळतंय. उन्हाळ्याचे उरलेले 3-4 महिने हा पाणीसाठा पुरेल असं दिसतंय. म्हणजे जवळजवळ 24 महिने पाणी उपलब्ध होतंय आम्ही योजलेल्या उपायांमुळे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आली आहे आता.
 
 
जलसंधारण हे खरं तर राज्य राखीव संरक्षण दलाच्या भागासाठी केलं असलं, तरी त्यात त्या भागातील भूजलसाठा वाढवणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवलेलं असल्याने, काम करताना त्या भागातील पाण्याची पातळी उंचावण्यात आम्हाला यश आलं. त्याचा परिणाम असा झाला की, काम केलं त्या भागातच नव्हे, तर त्याजवळच्या गावातील सगळ्या विहिरी वर्षभर पाणीपुरवठा करायला लागल्या. भौगोलिक परिस्थिती आणि भूगर्भ यांचा अभ्यास करून योग्य पद्धतीने काम केलं तर त्याचा, फायदा दीर्घकाळ मिळतो, हे आमचा आजपर्यंतचा अनुभव सांगतो.
 
 
स्थलानुरूप उपाययोजना केली आणि योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे, योग्य उपाय केले, तर त्याचा निश्चित फायदा होतो हे परत एकदा अनुभवायला मिळालं.
 
 
पाणीटंचाई ही समस्या जरी सगळीकडे असली, तरी शाश्वत मार्गाने त्या समस्येचं निराकरण करायचं असेल, तर त्या भागाचा अभ्यास करून, पाणीसाठा करण्याच्या योग्य जागा निवडून, पाणी जमिनीत जिरवण्याच्या योग्य जागा निवडून तिथे योग्य पद्धतीने काम केलं, तर पाणीटंचाई दीर्घकाळ लांब ठेवता येते, हे नक्की. या कामात तांत्रिक कौशल्याबरोबरच जर प्रत्यक्ष कामात लोकसहभागाची जोड देता आली, तर त्या कामाची आणि त्याच्या यशाची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते.

डॉ. उमेश मुंडल्ये

डॉ. उमेश मुंडल्ये हे निसर्गाचा वारसा सांगणाऱ्या देवरायांचे अभ्यासक. त्यांनी महाराष्ट्रातल्या ३,७८३ देवरायांची नोंद करताना १,४५० देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. ह्या भटकंतीदरम्यान त्यांनी १,०६८ वनस्पतींची ओळख पटवली आहे. वनस्पतिशास्त्रात Ph.D. असलेले डॉ. मुंडल्ये, पुस्तकी शिक्षणापेक्षा निसर्गातल्या शिक्षणावर भर देतात आणि त्यातच रमतात. म्हणूनच ‘फील्डवरचा बॉटनिस्ट’ अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. महाराष्ट्रात पाणी विषयावर अभ्यासपूर्ण काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. मुंडल्ये देवराईतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात.