हुताशनी पौर्णिमा होलिकादहन

विवेक मराठी    19-Mar-2024   
Total Views |
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते फाल्गुन कृष्ण पंचमीपर्यंत चालणारा होळीचा सुरेख सण मानवी मनाला अनेक शतकांपासून आकर्षित करीत आहे. धूलिवंदन, धुळवड, शिमगा, होलिकादहन, कामदहन, हुताशनी पौर्णिमा, डोल जात्रा अशा वेगवेगळ्या नावांनी होळीचा सण ओळखला जातो. वैविध्य आणि त्यातही असलेले मौलिक ऐक्य हा भारताचा मध्यवर्ती बिंदू या सणातही आपल्याला दिसून येतो.

holi
 
होळीचा सण काही ना काही कारणाने आपल्याला वर्षभर आठवतच असतो. एखाद्या व्यक्तीने आपले जीवन एखाद्या मोठ्या कार्यासाठी समर्पित केलेले असले, तर आपण म्हणतो - त्याने स्वत:च्या जीवनाची अक्षरश: होळी केली. एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने जर अद्वातद्वा बोलत असेल, तर आपण म्हणतो, ‘काय शिमगा लावलाय?’ स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढणार्‍या क्रांतिकारकांनी ’विदेशी कपड्यांची होळी’ केली, हा शब्दप्रयोग आपण इतिहासात अनेकदा वाचलेला असतो. एकमेकांवर नाही नाही ते आरोप करणार्‍या राजकीय नेत्यांबद्दल लिहिताना वर्तमानपत्रे, नियतकालिके ’राजकीय धुळवड’ असा शब्दप्रयोग सातत्याने करतात. अंगावर चिखलफेक केली, शिमगा नसताना बोंबा कशाला मारत आहे.. अशा प्रकारचे वाक्प्रयोगही आपण वारंवार ऐकतो. एकूणच वर्षातून एकदा येणारा हा सण वर्षभर आपल्याभोवती पिंगाच घालत असतो!
 
चित्रपटसृष्टीने तर होळी या सणाला चित्रपटांमधून एका वेगळ्याच पद्धतीने रंगवले आहे. ’होली का दहन’पेक्षा दुसर्‍या दिवशीची धुळवड किंवा पंचमीला खेळली जाणारी रंगपंचमी यालाच जास्त महत्त्व देऊन, त्यावर गाणी रचून, विशेष संवादातून चित्रपटसृष्टीने या सणाभोवती एक प्रकारचे ’ग्लॅमर’ तयार केले आहे. होळी किती तारखेला आहे असे घरामध्ये कुणी सहजपणे विचारले, तर दुसरा सदस्य आवर्जून ”कब है होली?” असे विचारतो आणि शोले चित्रपटाची आठवण करून देतो! रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचे ‘होळीचा सण लय भारी, चल नाचू या’ हे गाणे तर होळी सणाच्या दिवशी आणि रंगपंचमीच्या दरम्यान मंडळांनी लावण्याचे खास गाणे होऊन बसले आहे. ‘बुरा न मानो होली है।’ हे वाक्यसुद्धा जनमनाची पकड घेऊन बसले आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा सण म्हणजे नाच, गाणी, रंग, शिव्या, धुळीत माखणे, चिखलात लोळणे आहे असेच नव्या पिढीला वाटू शकते.
 
 

holi
 
धूलिवंदन, धुळवड, शिमगा, होलिकादहन, कामदहन, हुताशनी पौर्णिमा, डोल जात्रा अशा वेगवेगळ्या नावांनी होळीचा सण ओळखला जातो. काही ठिकाणी अष्टमीपासूनही हा सण सुरू होतो. तिथीचे लहानसहान बदल प्रादेशिक परिस्थितीनुसार ठरत असतात. होळी सणही याला अपवाद नाही. परंतु वसंत आगमनाच्या आधी भारतभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होळी साजरी केली जाते, हे खरे! या सणाच्या नावांमागची कहाणी, होलिकादहन, कामदहन, धूलिवंदन यांच्यामागची परंपरा, कथा काय आहे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
 
आपल्याकडे प्रत्येक सणाभोवती पौराणिक कथा गुंफलेल्या असतात आणि त्यांना धरूनच विविध सण प्रदेशानुसार थोडीफार भिन्नता धारण करून, परंतु मौलिक पद्धतीत साम्य ठेवून साजरे केले जातात. होळी हा सणही त्याला अपवाद नाही.
 
उत्तरेकडे होलिकादहन, तर दक्षिणेकडे कामदहन अशा दोन कथा या सणाला लाभल्या आहेत!
 

holi 
 
भक्त प्रल्हादाची आत्या म्हणजेच हिरण्यकशिपूची बहीण होलिका ही एक शापित देवी होती. तिला शंकराचे एक वरदान लाभलेले होते, ते म्हणजे तिने एक विशिष्ट प्रकारचे वस्त्र अंगावर ओढून घेतले तर अग्नी तिला जाळू शकत नसे. जेव्हा प्रल्हादाला मारण्याचे सर्व उपाय थकले, तेव्हा हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीला अग्नीमध्ये बसवले. भोवती गोवर्‍या आणि लाकडे रचली. प्रल्हादाला तिच्या मांडीवर दिले. तिने आपले वरदान मिळालेले विशिष्ट वस्त्र स्वत:च्या अंगावरून ओढून घेतले आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून घेतले. सगळीकडून अग्नी पेटवण्यात आला. त्याबरोबर प्रल्हादाने नामस्मरण सुरू केले आणि त्या नामस्मरणाच्या झंझावाताने असा काही वारा सुटला की ते वस्त्र उडून प्रल्हादाच्या अंगावर येऊन पडले. त्या होळीमध्ये होलिकेचे दहन झाले व प्रल्हाद मात्र त्यातून सुखरूप बाहेर पडला. तेव्हापासून या होलिकादेवीला शापातून मुक्तता मिळाली. प्रल्हादाच्या या भक्तीचे नेहमी स्मरण राहावे, म्हणून होलिकेचे पूजन केले जाईल असा वरही शंकराने तिला शापमुक्त होताना दिला.
 
म्हणूनच दर वर्षी या होलिकेचे विशिष्ट पद्धतीने पूजन केले जाते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. जमीन शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. मध्यभागी एरंडाचे रोपण केले जाते. एरंडाच्या फांद्यांभोवती इतर लाकडांची व गोवर्‍यांची रचना करून होळी तयार केली जाते. होळीसाठी पुरणाची पोळी हा विशेष नैवेद्य असतो. त्यामुळे ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असे म्हणण्याचीदेखील पद्धत पडली आहे. होळीभोवती फिरून, पालथ्या हाताची मूठ बांधून बोंब मारण्याचीही प्रथा आहे. होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो आणि नंतर तेे भाजलेले खोबरे प्रसाद म्हणून वाटले जाते. नंतर दूध आणि पाण्याच्या मिश्रणाने होळी शांत केली जाते. त्यानंतर त्या होळीची राख आपल्या कपाळावर भक्तिभावाने लावली जाते. दुसर्‍या दिवशी याच होळीची राख संपूर्ण अंगाला फासून धुळवड खेळण्याची प्रथाही काही ठिकाणी आहे.काही भागात होळीच्या दुसर्‍या दिवशी रंग खेळतात, तर काही भागात पंचमीला रंग खेळतात. महाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणेच कोकणामध्येही याच पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो, मात्र त्याबरोबरीने तेथे अगदी गावागावानुसार अन्य काही वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यामुळेच कोकणातली होळी म्हणजे शिमगा हा स्वतंत्र लेखाचाच एक विषय आहे!
 

holi 
 
आज मड बाथ, काऊ डंग बाथ हे प्रकार नॅचरोपॅथीमध्ये उपचारासाठी वापरले जातात. त्वचारोगावर हे उपचार केले जातात.होळीचा सण थंडीनंतरच्या काळात येतो. शेण, माती, राख, धूळ, पाणी यांनी शरीर माखून घेणे, मनातील अव्यक्त भावना शिव्यांच्या, बोंबांच्या माध्यमातून व्यक्त करणे यामागेही शरीर-मनाच्या आरोग्याचा विचार असेल का, यावर संशोधन व्हायला हवे!
दक्षिणेकडे होळी साजरी केली जाते, त्यामधील कामदहनाची कथा ही कालिदासाच्या कुमारसंभवम् या नाटकामध्ये आलेल्या कथेशी साधर्म्य असणारी आहे. ही कथा म्हणजे शंकराने स्वत:मधील कामाचे कसे दहन केले व तपश्चर्येने व वैराग्याने तो कसा झळाळून निघाला, हे सांगणारी विशेष कथा आहे!
 
 
शंकर आणि पार्वती यांना झालेला पुत्रच तारकासुराचा वध करू शकेल, असे देवांना कळले, तेव्हा शंकराच्या मनात पार्वतीविषयी प्रीती निर्माण व्हावी, म्हणून त्यांनी मदनाची योजना केली. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तो जेथे ध्यान करीत असे, तेथे जाऊन पार्वती रोजच त्याला पुष्पमाला अर्पण करीत असे. एकदा कमलबीजांची माला करून पार्वती आपल्या सखीसह शंकराच्या ध्यानाच्या स्थानी गेली, त्या वेळी वसंत ऋतूचे आगमन झालेले होते. रतीसह आलेला मदन एका वृक्षाआडून शंकराला संमोहन बाण मारू लागला, त्याच वेळी शंकराचे त्याच्याकडे लक्ष गेले. आपल्या तिसर्‍या नेत्राने शंकराने मदनाला भस्मसात केले. मदनाची पत्नी रती विलाप करू लागली, तेव्हा आशुतोष शंकराने तिला तिचा पती परत जिवंत करून दिला. दक्षिणेकडे कामदहनाची ही कथा प्रचलित आहे.
 
 
एकूणच ऋतूंचे सोहळे साजरा करणारा आपला हा भारत देश कृषीला आणि ऋतूंना केंद्रबिंदू मानून सण साजरा करतो! कुटुंबाने एकत्र येणे, आनंद व विनोद यांचे आदानप्रदान करणे, नूतन वस्त्रप्रावरणे धारण करणे, विशिष्ट मेवामिठाई, पारंपरिक पदार्थ तयार करणे-खाणे आणि संस्कृती जतन आणि परंपरा निर्वहन करणे हे या सणांचे वैशिष्ट्य असते.
 
 
घराचे सौभाग्य हे कुटुंबीयांच्या एकमेकांशी प्रेमपूर्ण संवादावर अवलंबून असते. अशा वेळी मधुमासाच्या म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी आकाश, वनस्पती, सूर्य, चंद्र, भूमी या सृष्टीला घरातील सर्वांनी नमन करून, चंदन-अबीर-गुलालाची उधळण करून, तसेच धूळ-राख-शेण-माती यांच्याशीही शरीराला एकरूप करून हा सण साजरा होतो. गंध, फुले, नूतन वस्त्रे, हळद-कुंकू यांना धारण करून हा होळीचा सण आनंदाच्या मधुमासाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असतो. अग्नीमध्ये दु:खाचे, दारिद्य्राचे, संशयाचे, अपमानाचे दहन केले जाते. स्वच्छ मनाने रंगीत सृष्टीचे स्वागत करताना आपल्या शरीर-मनावर रंगांची उधळण करून घेतली जाते. कामदहन आणि होलिकादहन यासारख्या कथांमधून परत परत भक्ती-तप-स्वाध्याय यांचे स्मरण करतो.
 
 
असा हा फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते फाल्गुन कृष्ण पंचमीपर्यंत चालणारा होळीचा सुरेख सण मानवी मनाला अनेक शतकांपासून आकर्षित करीत आहे. या होळीचे ही कितीतरी प्रकार आहेत - मग ती बरसानाची लठ्ठमार होळी असेल किंवा बंगालमध्ये विशिष्ट पद्धतीने साजरी होणारी ’डोल जात्रा’ असेल! वैविध्य आणि त्यातही असलेले मौलिक ऐक्य हा भारताचा मध्यवर्ती बिंदू या सणातही आपल्याला दिसून येतो!

रमा दत्तात्रय गर्गे

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे

शिक्षण:M.A.(हिस्ट्री)Ph.D.(योगशास्त्र)...वैचारिक /साहित्य /तत्वज्ञान/इतिहास विषयक लेखन..

6 पुस्तके प्रकाशित। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या पूलं गौरव विशेषांक,व बाळशास्त्री हरदास गौरव विशेषांकात लेखन।
कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्र समन्वयक।
समरसता साहित्य परिषद,महाराष्ट्र प्रांत सदस्य
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समिती सदस्य