ज्याची बुद्धी त्याचे बळ!

विवेक मराठी    29-Mar-2024   
Total Views |
 देशांतर्गत राजकारणाचे निमित्त करून धुळवड आणि शिमगा खेळण्यात रंगलेल्या बालिश बुद्धीच्या विरोधकांचा कावा ओळखून तसेच आपला निर्धार आणि निश्चय भक्कम राखून भारतमातेला विश्वगुरुपदाच्या सिंहासनावर बसविण्यास कटिबद्ध झालेल्या राष्ट्रीय बाण्याच्या राजकीय शक्तीच्या मागे समर्थपणे उभे राहण्यात राष्ट्रकल्याण आहे, हे निश्चित!
 
kejariwal
 
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे व मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ’आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हा विषय चर्चिला जात असताना आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातील लक्ष देण्याजोगी एक बातमी म्हणजे अमेरिकेकडून मॅथ्यू मिलर यांनी असे विधान केलेले आहे की, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत निष्पक्ष, न्याय्य आणि वेळेवर कायदेशीर प्रक्रिया पार पडावी अशी आमची भूमिका आहे.” हा मात्र कळसच म्हणावा लागेल. असे अनाहूत सल्ले देण्यासाठी अमेरिकेला भारत हे जणू आपल्याच संयुक्त संस्थानातील एक राज्य वाटते की काय? भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मिलर यांच्या विधानावर आक्षेप नोंदवताना असे स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा व अंतर्गत बाबींचा सन्मान राखला पाहिजे. जर हे दोन देश लोकशाही राष्ट्रे असतील तर ही जबाबदारी आणखीच वाढते, अन्यथा यातून चुकीचा पायंडा पाडला जाऊ शकतो.
 
 
भारतीय नागरिकांनी मात्र या गोष्टीवर गांभीर्याने विचार केलाच पाहिजे. मात्र तो कशासाठी? हे जाणून घेण्यासाठी थोडे भूतकाळात डोकवावे लागणार आहे. आपण आचार्य चाणक्य विष्णुगुप्त यांना कुशल राजनीतिविशारद असल्यामुळे ‘कौटिल्य’ या नावाने ओळखतो. चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे महामंत्री, गुरू, हितचिंतक आणि त्या राज्याचेच संस्थापक होते. त्यांनीच आपल्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून चंद्रगुप्ताला राजपदावर प्रतिष्ठित केले होते. आता देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत आपल्याला हवे ते योग्य शासन निवडून पात्र व्यक्तीला पुन्हा सत्तेवर आणण्याची भूमिका देशातील नागरिकांना बजावायची आहे. तेव्हा चाणक्य काय सांगतात याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
 
 
ते सांगतात - ‘बुद्धिर्यस्य बलं तस्य’. त्यांना आपल्या बुद्धी आणि पुरुषार्थावर संपूर्ण विश्वास होता. चाणक्य यांनी नंद वंशाच्या काळात देशाची जी बजबजपुरी झाली होती ती पाहिली आणि अनुभवली होती आणि त्यामुळे त्यांनी एक नियोजनबद्ध कार्यक्रम बनवून या देशाला एका सूत्रात बांधण्याचा संकल्प केला आणि तो सफल करून दाखविला होता. सध्या देशाला पुन्हा आत्मगौरव प्राप्त करून देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याला करंटा विरोध करताना राजकारणाने जी पातळी गाठली आहे ती पाहता राजकारणाचा आदर्श आपल्याला पुन्हा तपासून पाहावा लागणार आहे.
 
 
राजकारण्यांची जबाबदारी अशीही असायला हवी की, त्यांनी मानवसमाजाला म्हणजे आपल्या देशातील नागरिकांना राज्य संस्थापन, राज्य संचालन आणि राष्ट्र संरक्षण या तिन्ही विषयांचे योग्य ते ज्ञान देऊन त्यांना देशाच्या कारभारात सामावून घेतले पाहिजे आणि सहभागितेचा अनुभव दिला पाहिजे; पण आपल्याकडे एवढ्या उच्च कोटीचे ज्ञान असूनही स्वातंत्र्योत्तर काळात त्याची केवळ उपेक्षाच करण्यात आली. त्यामुळे आपल्याच देशात देशविघातक आणि देशविरोधी वेगवेगळ्या विचारधारांनी जन्म घेतला व त्या वेळच्या राजकारण्यांनी आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी यांचे पालनपोषण केले. आश्चर्य किती पाहा! या विचारधारांची प्रेरणास्थाने आणि कर्तेकरविते हे सर्व विदेशातच होते आणि विदेशी बळावर या सर्वांची घोडदौड सुरू होती. आजही जेव्हा आपल्याला अमेरिकेच्या उपटसुंभ सल्ल्याबाबत आश्चर्य वाटते, तेव्हा या सर्वांना कशाच्या बळावर हे धाडस होत असते हे आपण जाणून घेतले पाहिजे.
 
 
याच ठिकाणी आपण हेसुद्धा जाणून घेतले पाहिजे की, चाणक्याच्या राजनीतिक चिंतनधारेमुळेच भारताचा उद्धार होणार आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे सदाचारी, व्यवहारकुशल, धर्मनिष्ठ आणि कर्मशील नागरिकांच्या आधारावरच मानवसमाजाचा समुचित विकास होऊ शकतो.
 
 
खरे पाहता गेल्या नऊ-दहा वर्षांत जणू आपल्या देशाने कात टाकली आहे आणि याचा देशविदेश पातळीवर सर्वांना अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे व भारताच्या या नव्या रूपाकडे व तेजाकडे पाहून ते बावरले आहेत. अमेरिकेसारख्या देशाला जुन्या अनुभवांतूनच जी बेगुमान गुर्मी आणि धुंदी येत असते त्यातूनच असे सल्ले देण्याचे धाडस होत असते. जुन्या राज्यकर्त्यांनी महासत्तांच्या दारात देशाला याचक बनवून उभे केले होते आणि आज तोच भारत विश्वाला काही देण्याच्या भूमिकेत आणि क्षमतेत आलेला आहे, हीच गोष्ट अनेकांना खुपत चालली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या डावपेचातून अशा गोष्टी भविष्यातही केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण अशा वेळी कौटिल्याचा वारसा चालविणार्‍या बुद्धीचे शासक जर सत्तेवर असतील आणि त्यांच्या हाती सर्व सूत्रे असतील, तर या सर्व प्रकारच्या अपशकुनी कारवायांना ते शासक खरोखरच पुरून उरतील. चाणक्य सांगतात - जो निश्चित वस्तूला सोडून अनिश्चित वस्तूचा आधार घेतो, त्याच्या निश्चित वस्तूचाही नाश होतो आणि अनिश्चित वस्तूसुद्धा स्वतःच नष्ट होत असते. शेवटी निवड ही प्रजेच्याच हाती आहे. त्यामुळे देशांतर्गत राजकारणाचे निमित्त करून धुळवड आणि शिमगा खेळण्यात रंगलेल्या बालिश बुद्धीच्या विरोधकांचा कावा ओळखून तसेच आपला निर्धार आणि निश्चय भक्कम राखून भारतमातेला विश्वगुरुपदाच्या सिंहासनावर बसविण्यास कटिबद्ध झालेल्या राष्ट्रीय बाण्याच्या राजकीय शक्तीच्या मागे समर्थपणे उभे राहण्यात राष्ट्रकल्याण आहे, हे निश्चित!