“ नरेंद्र मोदी हे आमूलाग्र क्रांतीचे अग्रदूत!”- विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर

विवेक मराठी    09-Mar-2024   
Total Views |
Narendra Modi
पुण्यातील केसरीवाडा येथे 7 मार्च 2024 रोजी भव्य समारंभात पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर - नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ते पाहून केसरीवाड्याच्याच मनातील विचार मांडणारे हे मनोगत.
“श्री रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर आमच्या आयुष्यामध्ये उभे राहील, जम्मू आणि काश्मीरबाबतचे कलम 370 रद्द होईल असे आमच्या पिढीला कधीच वाटले नव्हते. पण लोकशाही प्रक्रियेतूनच कलम 370 रद्द झाले, आता अयोध्येत भगवान रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली, हे मोठे परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या आमूलाग्र क्रांतीच्या अग्रदूताने घडविले आहे. या प्रसंगी त्यांनी जे भाषण केले, त्याची आपण अनेक वेळा पारायणे केली पाहिजेत. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र यांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा ते कौसल्या मातेला म्हणाले होते की, “प्रजाकल्याणार्थ आणि प्रजारंजनासाठी तातांनी माझी नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.” भगवान रामचंद्राची हीच भूमिका घेऊन मोदी देशाचे राज्य चालवीत आहेत. त्यांनी जे परिवर्तन घडविले आहे, त्याचा अत्यंत सुंदर आलेख पद्मश्री रमेश पतंगे यांनी ‘दि गेम चेंजर नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून चितारला आहे. ज्यांना हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरा कळली, ते टिळक आपल्या राष्ट्रातील क्रांतीचे पहिले अग्रदूत आहेत. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या ठिकाणी या ग्रंथाचे प्रकाश होणे हा अत्यंत शुभयोग आहे,” असे विद्यावाचस्पती गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर वदले मात्र.. महाशिवरात्रीच्या त्या पावन पूर्वसंध्येला प्रसन्नवदनाने पुलकित होऊन मी माझ्या पुण्यपुरुष पूर्वज मालकाच्या तसबिरीकडे पाहत असतानाच त्यांनी मला नजरेनेच खुणावले, ‘अरे केसरी, इतका थरारून जाऊ नकोस, अन्यथा तुझ्या सभागारात जमलेल्या माझ्या वैचारिक वारसदारांना भूकंपाचा भास होईल. हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम पाहून, आषाढवारीत गाभार्‍यातील वारकर्‍यांनी वेढलेल्या विठ्ठलासारखी विस्मयावस्था होऊनही मी माझ्या गीतारहस्यातील वर्णित स्थितप्रज्ञासमान स्तब्धच आहे की!’
 

पुस्तक खरेदी करण्यासाठी 

दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी

2024ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’

https://www.vivekprakashan.in/books/game-changer-narendra-modi/ 

भारतात झालेले परिवर्तन समजून घेण्यासाठी, कोणता खेळ मोदींनी बदलला, हे समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

  
पण मंडळी, खरोखरच रोमहर्षक क्षण होता तो! सर्व श्रोतृसमुदाय रोमांचित होऊन गेला असतानाही मी मात्र टिळक महाराजांची आज्ञा पाळून थरारण्याचा मोह आवरला! आपल्या भाषणात अभ्यंकर पुढे असे म्हणाले, “जेथे 1947-48 साली ख्रिश्चनांचे प्रमाण सुमारे 3 टक्के होते, त्या ईशान्येतील 4 राज्यांमध्ये ख्रिश्चनांचे प्रमाण शंभर टक्के होऊन गेले. हिंदूंचे प्रचंड प्रमाणात धर्मांतर झाले आणि राष्ट्रविरोधी कारवाया वाढल्या. तेथे परिवर्तन घडून आणण्यासाठी सक्षम लोकांनाच पुढे जावे लागते. सुनील देवधर यांना ईशान्य भारतात जावे लागले, म्हणून तेथे परिवर्तन घडून आले. असे लोकप्रतिनिधी असले, तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण देवधर यांच्या रूपाने दिसते.”
 
Narendra Modi
 
भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर आपल्या भाषणात म्हणाले, “भारताची सत्तासूत्रे मिळाली, तर समाजातील वर्गभेद संपवून टाकू असे म्हणणार्‍या कम्युनिस्टांचे पश्चिम बंगालवर 34 वर्षे राज्य होते, पण त्यांना तेथे चालणार्‍या साध्या ट्रामगाडीतून पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग यांच्यातील भेदभावसुद्धा संपविता आला नाही. तो तसाच चालू राहिला, हे वास्तव आहे. मोदींनी कोणते परिवर्तन घडविले? या देशांमध्ये महिला पंतप्रधानदेखील झाल्या आहेत. पण त्यांना महिलांसाठी शौचालये देता आली नाहीत. त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. पण महिलांसाठी बारा कोटी शौचालये निर्माण करून आणि त्यांना ‘इज्जतघर’ असे नाव देऊन मोदींनी महिलांना जी प्रतिष्ठा मिळवून दिली, ते आहे परिवर्तन! म्हणून मोदी आहेत गेम चेंजर! आवास योजनेतून महिलांना अडीच लाखात घर देऊन त्यांनाही मोदींनी लखपती बनविले. सॅनिटरी पॅड वापरासाठी या देशात पंतप्रधानांना जागृती करावी लागते. पण तरुण मुलींसाठी मोदींनी महाविद्यालयाच्या परिसरात केवळ एक रुपयात पॅड देणारी व्हेंडिंग मशीन्स बसविली, हे आहे परिवर्तन!” अशा रितीने देवधर यांनी मोदी सरकारच्या समाजसन्मुख, लोककल्याणकारी योजनांचा धावता आढावा घेऊन मोदींच्या गेम चेंजर कार्याचा वेगळा पैलू समोर आणला.
 
 
सहस्रचंद्रदर्शनाच्या सीमारेषेवरील सरस्वतीपुत्र पद्मश्री रमेश पतंगे आपल्या वयापेक्षाही दोन अंक पुढील क्रमांकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “मी अकरावीत असताना गीतारहस्याचे वाचन केल्यानंतर माझ्या मनावर टिळकांचा मोठा प्रभाव पडला होता. त्याच लोकमान्यांच्या केसरीवाड्यात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होणे हा माझा आतापर्यंतचा सर्वोच्च गौरव आहे, असे मी मानतो. या पुस्तकात मोदींनी जो वैचारिक ‘गेम’ बदलून टाकला आहे, त्याचे वर्णन असले तरी ही व्यक्तिपूजा नव्हे! आपल्याला जर जगात सन्मानाने जगायचे असेल, आपल्या संस्कृतीचा उत्कर्ष करून जगायचे असेल, सशक्त, समृद्ध आणि बलशाली राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल, तर मोदींशिवाय अन्य नेता दिसत नाही. या दृष्टीने हे चिंतन मांडले आहे.” मग पुढे पतंगे यांनी या पुस्तकाच्या लेखनामागील आपली भूमिका विशद केली.
 
 
“एका स्वयंसेवकाने दुसर्‍या स्वयंसेवकाची करून दिलेली उत्कृष्ट ओळख म्हणजे ‘दि गेम चेंजर - नरेंद्र मोदी’ हे पुस्तक होय” असे सांगून प्रदीपदादा रावत यांनी समयोचित भाषणातून आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे संयोजक कुणाल शैलेश टिळक यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अभय थिटे यांनी या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. एखाद्या चित्राप्रमाणे तटस्थ बसलेली सभा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवली आणि राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यबोधाच्या उत्कट क्षणाचा मी साक्षीदार बनलो! एक वाडा म्हणून मला या माझ्या भाग्याचाच हेवा वाटतो.
 
‘दि गेम चेंजर नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे वेगळेपण
 
हे पुस्तक नरेंद्र मोदी यांचे केवळ चरित्रकथन करणारे पुस्तक नव्हे! नरेंद्र मोदी सरकारची दोन कार्यकाळातील कामगिरी, त्यांनी अंमलात आणलेल्या विविध लोककल्याणकारी योजना व लाभार्थी यांची माहिती आणि आकडेवारी आंतरजालावरही उपलब्ध आहे आणि ही माहिती देणारी अनेक लेखकांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. परंतु रमेश पतंगे यांच्या पुस्तकात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचे एका आगळ्याच उंचीवरून वैचारिक मूल्यमापन केले आहे, ते अत्यंत वाचनीय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जो ध्येयवाद आपल्या स्वयंसेवकांना दिला, तो एखादा कार्यकर्ता त्याच्याकडे सोपविलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तेथील मूल्यात्मक चौकट आणि परिभाषा यांच्या माध्यमातून कशी अभिव्यक्ती करतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी होय. या पुस्तकाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला डॉ. हेडगेवार, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अब्राहम लिंकन, जॉन एफ. केनेडी, एडमंड बर्क अशा थोर पुरुषांची मार्मिक अवतरणे दिली आहेत, ज्यांच्या प्रकाशात आपण त्या प्रकरणांचे वाचन केले तर त्याची रोचकता आणखीच वाढते. यांच्यासोबत आणखीही वैशिष्ट्ये वाचकांना प्रत्यक्ष वाचनात नक्कीच आढळू शकतात.
 
दीपक जेवणे
 9594961864