स्वरगंधर्व साकारताना...

विवेक मराठी    19-Apr-2024   
Total Views |

sudhir fadke 
महाराष्ट्राचे लाडके संगीतकार-गायक कै. सुधीर फडके यांच्या जीवनावरील बहुप्रतीक्षित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चरित्रपट दि. 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. गायक व संगीतकार एवढीच सुधीर फडके यांची ओळख नव्हती. प्रखर हिंदुत्व समर्थक, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, सावरकरभक्त असे त्यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. ‘स्वरगंधर्व’ या चित्रपटात फडके यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांनी साकारली आहे. ही भूमिका साकारण्याच्या यानिमित्ताने फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अभ्यासता आले. आपण भाग्यवान आहोत म्हणून ही भूमिका करण्याची संधी मिळाली, हे ते आवर्जून सांगतात.
‘या सुखांनो या’, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’, ‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‘का हो धरिला मजवर राग’, ‘विकत घेतला श्याम’, ‘पराधीन आहे जगती’, ‘ज्योतिकलश छलके’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘सखी मंद झाल्या तारका’ ही आणि अशी असंख्य उत्तमोत्तम गाणी ज्यांच्या संगीतातून आणि स्वरांतून खुलली, बहरली ते कै. सुधीर फडके अर्थात बाबूजी. रसिकांच्या मनात अत्यंत आपुलकीचे, जिव्हाळ्याचे स्थान त्यांना मिळाले. त्यांच्या जीवनाचे विविध पदर उलगडून दाखवणारा, बहुप्रतीक्षित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा योगेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित, रीडिफाइन प्रॉडक्शन निर्मित संगीतप्रधान चरित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे.
 
 
महाराष्ट्राच्या या कलासक्त भूमीने संगीत क्षेत्राला उत्तमोत्तम रत्ने दिली. त्यातले मराठी रसिकहृदयात अग्रणी असलेले नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके अर्थात बाबूजी. चित्रपटगीते, भावगीते, भक्तिगीते, लावणी, शृंगारगीते अशा वैविध्यपूर्ण गीत प्रकारांच्या माध्यमातून फडके यांनी संगीतसृष्टीत गायक आणि संगीतकार म्हणून स्वतःचा असा रसिकवर्ग निर्माण केला; पण केवळ गायक वा संगीतकार एवढीच त्यांची ओळख नाही. हिंदुत्वाचे प्रखर समर्थक, स्वा. सावरकरांचे निस्सीम भक्त, अत्यंत तत्त्वनिष्ठ राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यसैनिक असे त्यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. बाबूजींचे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी देणारा ‘स्वरगंधर्व सिनेमा’ हा आपल्यासाठी विलक्षण अनुभव होता, असे सुनील बर्वे आवर्जून नमूद करतात.
 
 
या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर तेव्हा मनात काय भावना होती, असे विचारले असता बर्वे यांनी सांगितले, एखाद्या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या चेहर्‍याशी माझा चेहरा जुळतो असे मला कधी वाटले नाही किंवा मी यापूर्वी कधीही बायोपिकमध्ये काम केलेले नाही. त्यामुळे योगेश देशपांडे यांनी जेव्हा रोलची विचारणा केली तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की, मी त्यांच्यासारखा दिसेन का? अर्थात भूमिकेला मी होकारच दिला, कारण एवढ्या आव्हानात्मक भूमिकेला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त मी त्या भूमिकेत शोभेन का, याबाबत साशंक होतो. मराठी संगीतप्रेमींमध्ये सुधीर फडके यांच्याबद्दल अतिशय आदर आहे, एक वेगळीच आपुलकी आहे. या आदराला, प्रतिमेला कुठेही धक्का पोहोचता कामा नये असे वाटत होते. यावर योगेशनी तोडगा काढला. सौरभ कापडे या रंगभूषाकाराने मला बाबूजींसारखा दिसेन अशा प्रकारचा मेकअप केला आणि आम्ही त्याचे खास फोटोशूट केले. ते फोटो पाहिल्यावर मला मात्र मनात विश्वास निर्माण झाला की, आपण फडके यांच्यासारखे दिसू शकतो आणि त्या भूमिकेशी हळूहळू एक ‘कम्फर्ट झोन’ तयार होत गेला.
 
 
sudhir fadke
 
एखादी भूमिका साकारायची तर त्या व्यक्तिमत्त्वाचा विविध अंगांनी अभ्यास करावा लागतो. त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात हळवा कोपरा असेल तर अधिक काटेकोरपणे, संवेदनशीलपणे भूमिकेचा विचार करावा लागतो. या सिनेमाच्या निमित्ताने लोकांना गाण्यांतून ज्ञात झालेले संगीतकार, गायक सुधीर फडके यापलीकडे जात त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा, सामाजिक-कौटुंबिक वावर याचाही अभ्यास करावा लागणार होता. यासाठीची तयारी कशा प्रकारे केली, असे विचारले असता सुनील बर्वे यांनी सांगितले, बाबूजींचे पात्र साकारण्यात योगेश हा मोठा दुवा होता. या रोलसाठी काय काय करायला हवे यासाठी त्याच्याबरोबर माझी सतत चर्चा सुरू होती. बाबूजींचे जेवढे व्हिडीओज् उपलब्ध होते ते पाहिले, कारण त्यांच्यासारखे दिसणे पुरेसे नव्हते, तर त्यांच्यासारखे वाटणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यांची गाण्याची पद्धती, त्यांचा स्वभाव यांचे प्रतिबिंबच त्यांच्या हावभावात दिसून येते, हे व्हिडीओ पाहताना जाणवले. त्यांचे गाण्यावरचे, स्वरांवरचे त्यांच्या चेहर्‍यावर झळकणारे प्रेम आपल्यालाही या भूमिकेत साधता आले पाहिजे असे वाटत होते. त्यांचे एकूण आचार-विचार, वागणे-बोलणे समजून घेण्यासाठी वाचन सुरू केले. बाबूजींचे सुपुत्र, संगीतकार श्रीधर फडके, स्नुषा अ‍ॅड. चित्रा फडके यांच्याशी वेगवेगळ्या टप्प्यांवर चर्चा होत गेली आणि गोष्टी सोप्या होत गेल्या.
 

vivek

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा अत्यंत सुंदर सिनेमा तयार केल्याबद्दल आम्ही सर्व फडके कुटुंबीय निर्माते सौरभ गाडगीळ आणि लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे अत्यंत ऋणी आहोत. हा चित्रपट पुढच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरेल. माझ्या वडिलांनी आयुष्यात अत्यंत हालअपेष्टा सोसूनही आपले काम निष्ठेने, न डगमगता सुरू ठेवले. ते अत्यंत साधे होते, प्रेमळ होते. आपल्याला झालेला त्रास कोणालाही न दर्शवता आपले काम सुरू ठेवून त्यांनी संगीत क्षेत्रात सुधीर फडके नावाचे विद्यापीठ उभे केले. या चित्रपटाची माहिती मिळाली तेव्हा मी निर्माते, दिग्दर्शकांना नम्रपणे विनंती केली होती की, शक्य झाल्यास मला कथा-पटकथा ऐकवा आणि मूळ गाणी तशीच ठेवा. त्यांनी या विनंतीचा मान ठेवला व आम्हा फडके कुटुंबीयांना कथा-पटकथा ऐकवली. ती ऐकून हा चित्रपट दर्जेदार होणार याची आम्हाला खात्री झाली. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्या गाण्यातील गायकाचा मूळ आवाज वेगळा काढला आणि मूळ वाद्यसंगीताचे पिसेस परत रेकॉर्ड केले. हे दोन्ही मिक्स करून त्यांची गाणी अद्ययावत स्वरूपात तयार केली. त्याचा परिणाम आपण आज पाहात आहोत. अभिनेते आदिश वैद्य आणि सुनील बर्वे या दोघांनीही बाबूजींची भूमिका समरसून केली आहे. त्यांचे बोलणे, देहबोली, स्वभाव नेमका पकडला आहे. त्यांचे बालपण, तरुणपण, संगीत कारकीर्द, त्यांचे संघजीवन, सावरकरभक्ती, तत्त्वनिष्ठा हे सारे या सिनेमात विविध प्रसंगांच्या निमित्ताने पाहायला मिळते. ‘स्वरगंधर्व...’ चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात अत्यंत कुतूहल आहे. सुधीर फडके यांच्यावर प्रेम करणार्‍या परदेशस्थ नागरिकांकडून परदेशातही या सिनेमाच्या प्रदर्शनाची मागणी होते आहे. सुधीर फडके या व्यक्तिमत्त्वाबद्दल लोकांच्या मनात असणारी आपुलकी, आदर याचेच हे प्रतीक आहे.
 
बाबूजी हे संगीतकार, गायक म्हणून कसे होते याची अनेक उदाहरणे मैफलींच्या उपलब्ध रेकॉर्ड्समधून त्यांना पाहायला मिळाली; पण पत्नी ललिता फडके, मुलगा श्रीधर, ग.दि. माडगूळकर, राजा परांजपे यांच्याशी त्यांचा संवाद कसा होत असेल, ते कसे बसत असतील- समोरच्याकडे कसे पाहत असतील याबाबत संबंधितांशी झालेल्या चर्चेतून, पुस्तकांतून, व्हिडीओ रेकॉर्ड्सवरून अंदाज घेऊन थोडे ‘व्हिज्युअलाइज’ करून मग ती भूमिका उभी करावी लागली, असे बर्वे आवर्जून सांगतात. या चित्रपटांचे अनेक ट्रेलर प्रसिद्ध झाले आहेत. यातील स्वा. सावरकरांनी ‘पराधीन आहे जगती’ गाण्याचा केलेला आग्रह आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून बाबूजींनी केलेले सादरीकरण याचा ट्रेलर विशेष गाजला. या ट्रेलरमध्ये जाणवलेली विशेष बाब म्हणजे सुनील बर्वे यांनी अगदी बाबूजींप्रमाणेच पुढ्यात त्यांच्या विशिष्ट पद्धतीने हार्मोनिअम ठेवून, ओठांची-हनुवटीची खास लकब साधत केलेले सादरीकरण. या लकबी कशा साधल्या याबाबत विचारले असता सुनील बर्वे म्हणाले की, बाबूजींच्या स्वभावात मुळातच आक्रस्ताळेपणा नव्हता. त्यांचा निर्धार हा त्यांच्या डोळ्यांतून प्रकट होत असे. मोठ्याने बोलणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ते हळू आवाजात सहजपणे बोलत. व्हिडीओ पाहताना आमच्या लक्षात आले, की बोलताना, गाताना चेहर्‍याची, ओठांची कमीत कमी हालचाल करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अपवाद होता पोटफोड्या ‘ष’चा, ‘क्ष’चा, ‘हृ’चा. या अक्षरांचा ठसठशीत, मुळाबरहुकूम उच्चार ते करत असत, कारण भाषेशी, उच्चारांशी, स्वरांशी कोणतीही तडजोड नाही हे त्यांचे तत्त्व होते. व्हिडीओज्, जुन्या रेकॉर्ड्स पुनःपुन्हा पाहून ही सगळी वैशिष्ट्ये भूमिकेत झिरपली असावीत असे वाटते.
 
देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, हिंदुत्वाविषयीची कळकळ, रा. स्व. संघाप्रति असलेला समर्पणभाव, सावरकरांवरील निरतिशय भक्ती, दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामात थेट उडी घेण्याचे धाडस, ही सुधीर फडके यांच्या स्वभावाची काही बलस्थाने. ही वैशिष्ट्ये भूमिकेत कशी सापडत गेली; त्यांच्या स्वभावावर, कारकीर्दीवर या राष्ट्रप्रेमाचा कसा प्रभाव दिसून आला याबाबत बर्वे म्हणाले की, बाबूजींचे देशप्रेम, राष्ट्रभक्ती रा. स्व. संघातील त्यांच्या कार्यकाळात अधिक रुजत गेली असावी. हे प्रेम केवळ भावनांपुरते सीमित न राहता थेट स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांबद्दल त्यांच्या मनात अतोनात आदर होता. त्यात सर्वात अग्रणी नाव होते ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे. त्यांच्याविषयी वाचताना पदोपदी त्यांच्या या वैशिष्ट्यांची अनुभूती येतच होती.
 

sudhir fadke 
 
सिनेमात आम्ही त्यांच्या एकूण जीवनाचा आढावा घेतला आहे. त्यामुळे त्यांचे देशप्रेम, हिंदुत्व, राष्ट्रनिष्ठा या जीवनविषयक तत्त्वांवर वेगळा फोकस करावा लागला नाही, कारण ही तत्त्वे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच होती व त्यांनी ती आयुष्यभर सचोटीने पाळलेली होती. त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीला, जीवनाला त्यांच्यापासून वेगळे काढता येणार नाही. बाबूजी हे स्वभावाने अत्यंत तत्त्वनिष्ठ होते. आपली तत्त्वे त्यांनी आयुष्यभर कटाक्षाने जोपासली, त्यांच्याशी तडजोड न करता आपली कारकीर्द घडवली. करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर संघाच्या संपर्कातून देशात दूर-दूरपर्यंत जाऊन सांगीतिक कार्यक्रम केले. त्यातून उदरनिर्वाह केला. त्यानंतर संगीत क्षेत्रात स्थिरावत गेले, व्यग्र होत गेले. त्यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अनेक आव्हानांना सामोरे जात, अनेक संकटांना तोंड देत संगीताचा आपला प्रवास पूर्णत्वाला नेला; परंतु मनात रुजलेले सावरकरप्रेम शांत बसू देत नव्हते. आयुष्याच्या उत्तरार्धात सावरकरांवरील चित्रपट हेच त्यांच्या आयुष्यातील एकमेव ध्येय झाले होते. वय झालेले होते तरी गाडीने प्रवास करणे शक्य असतानाही, बसने प्रवास करून सिनेमासाठी एक-एक रुपया साठवणारा हा तत्त्वनिष्ठ कलाकार होता. सुधीर फडके यांची तत्त्वनिष्ठा ही जशी त्यांच्या राष्ट्रभक्तीशी जोडलेली होती तशीच ती गाण्याशीही जोडलेली होती. गायकाकडून गाणे आपल्याला हवे तसे गाऊन घेण्याची त्यांची हातोटी होती.
 
 
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या संगीतप्रधान सिनेमाची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या सिनेमाचे संगीतकार आहेत स्वतः सुधीर फडके. त्यांनी गायलेली, संगीत दिलेली सगळी मूळ गाणी ‘जशीच्या तशी’ म्हणजे त्याची चाल, गायक वगैरे न बदलता कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने ‘डिजिटली’ अद्ययावत करून वापरली आहेत. बाबूजींच्या सुमधुर ओरिजिनल गाण्यांचा आनंद आबालवृद्ध रसिकांना घेता येणार आहे व सुरुवातीच्या श्रेयनामावलीत संगीतकार-गायक सुधीर फडके, गायिका आशा भोसले, गायिका माणिक वर्मा ही नावे पाहण्याचा, ती गाणी प्रत्यक्षात घडताना पाहण्याचा योग या सिनेमाच्या निमित्ताने येणार आहे.
 
 
“‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग माझ्या मनावर आजही कोरलेले आहेत. गदिमा आणि बाबूजींच्या उतारवयातील भेटीचा एक सीन योगेश देशपांडेंनी लिहिला होता. योगेशच्या तोंडून तो सीन आम्ही ऐकला आणि काही काळासाठी सगळी टीम निःशब्द झाली. आताही तो प्रसंग आठवला तरी माझ्या अंगावर काटा येतो. गदिमा दुर्धर आजाराने ग्रस्त असण्याचा तो काळ होता. ते फार काम करत नव्हते. बाबूजी मुद्दाम त्यांच्याकडे गेले आणि मला एक गाणे लिहून द्या, असे सांगितले. गदिमांनी गाणे लिहून दिले. पुढे म्हणाले, हे शेवटचे समजा, द्या चाल याला. आता तुम्ही आधी जाणार की आम्ही ते तो प्रभू श्रीरामच ठरवेल. फडके, आपले काम करून झाले. आपली गाणी आता पुढच्या अगणित पिढ्या गात राहतील. मागच्या दरवाजाने आता हळूच आपण येथून निघून जायचे. फक्त एकदा मागे वळून आलेल्या सुखांकडे वळून पाहायचे... हा सीन संपतो आणि त्याच वेळेस गाणे सुरू होते, ‘या सुखांनो या!’  ”
 
या सिनेमात तरुण वयातील बाबूजींचे काम आदिश वैद्य या तरुण अभिनेत्याने केले आहे. त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत आहे मृण्मयी देशपांडे. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजा परांजपे यांच्या भूमिकेत मिलिंद फाटक, गायिका माणिक वर्मा यांच्या भूमिकेत सुखदा खांडकेकर आणि आशा भोसले यांच्या भूमिकेत अपूर्वा मोडक आहेत. रा. स्व. संघ संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली आहे, तर ग. दि. माडगूळकरांच्या भूमिकेत सागर तळाशीलकर आहेत. स्वा. सावरकरांची छोटीशी भूमिका धीरेश जोशी यांनी केली आहे. या पात्रनिवडीबाबत सुनील बर्वे म्हणाले की, दिग्दर्शक योगेश देशपांडे हे स्वतः कमर्शिअल आर्टिस्ट आहेत. त्यांची पात्रनिवडीची पद्धत फारच छान होती. सिनेमा करण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक पात्राचे त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे फोटो मिळवले होते. त्यांना अनुसरून कलाकारांची निवड केली होती. माझी या भूमिकेसाठी निवड करताना त्यांनी बाबूजींचा फोटो आणि बाबूजींच्या लुकमध्ये माझे डिजिटली एडिट केलेले स्केच पाठवले होते. अशा प्रकारचे स्केच जवळपास प्रत्येक कलाकारासाठी तयार केले होते आणि तो कलाकार मूळ पात्रच वाटावे इतके ते बेमालूम होते. त्यामुळे पात्रनिवडीचे सगळे श्रेय हे त्यांच्या मेहनतीला जाते. त्यांनी सिनेमासाठी भरपूर होमवर्क केले होते.
 

sudhir fadke 
 
बहुआयामी साहित्यिक, कवी ग.दि. माडगूळकर आणि संगीतकार-गायक सुधीर फडके यांची वेगळीच केमिस्ट्री महाराष्ट्राने अनुभवली, पाहिली. गदिमांनी काव्याच्या रूपात एखादी लावण्यवती जन्माला घालावी आणि बाबूजींनी तिला संगीताचा उत्तम साजशृंगार करून रसिकांसमोर आणावी. अनेक अवीट चालीची गीते आणि ‘गीतरामायण’सारखी अद्वितीय अशी कलाकृती या दोघांनी महाराष्ट्राला दिली. एकमेकांचा प्रदीर्घ सहवास या दोघांनाही लाभला. सिनेमात चित्रित केलेल्या या दोघांच्या खास ऋणानुबंधाबद्दल सुनील बर्वे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या दोघांच्या पहिल्या भेटीपासून गदिमांच्या निर्वाणापर्यंतचा त्यांचा सहवास या सिनेमात चित्रित करण्यात आला आहे. गदिमा-बाबूजी यांच्यातील अपार स्नेह, तात्त्विक मुद्द्यांवर प्रसंगी उडणारे खटके, परस्परांसाठी असणारा आदर, ‘गीतरामायण’चा जडणघडणीचा सुवर्णकाल, अगदी गदिमांनी बाबूजींच्या हाती सुपूर्द केलेले शेवटचे गीत आणि त्या वेळेस व्यक्त केलेल्या भावना हे सारे या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. त्यांच्या नात्यातील विशेष बाब म्हणजे, राजकीयदृष्ट्या दोघांचीही भूमिका पूर्णपणे वेगळी होती; पण ही भूमिका ना त्यांच्या सांगीतिक कार्यात आडकाठी ठरली ना त्यांच्यातील स्नेहभावात.
 
 
‘स्वरगंधर्व’ हा सिनेमा करायला मिळाल्याबद्दल मनात आज काय भावना आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, हा चित्रपट करायला मिळाला हे माझे भाग्य आहे. यापुढे जगाच्या पाठीवर कुठेही सुधीर फडके यांच्या नावाची चर्चा होईल तेव्हा त्यांच्यावरील बायोपिकमध्ये भूमिका करण्याबद्दल माझे नाव घेतले जाईल. माझ्या नावाला एक वेगळी ओळख या सिनेमामुळे मिळत आहे. आजवर बाबूजींची जी गाणी सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाईक यांच्या तोंडी आपण पाहिली, आज तीच गाणी मी बाबूजी म्हणून गाणार आहे हे किती विलक्षण वाटते आहे मला. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका करायला मिळणे ही बाबच माझ्यासाठी एक कलाकार म्हणून अत्यंत सुखावणारी आहे. मी भाग्यवान आहे, एवढीच भावना मनात आहे.
 
 
 
 
सुधीर फडके यांनी मराठी गानरसिकांच्या मनावर अर्धशतकाहून अधिक काळ साम्राज्य केले. त्यांच्यातल्या गायक-संगीतकाराला कोंदण होते ते प्रखर हिंदुत्वनिष्ठेचे, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून असलेल्या अभिमानाचे, अजोड सावरकरभक्तीचे. त्यामुळे हा हिरा अधिक झळाळून उठला. असे व्यक्तिमत्त्व साकारायची संधी मिळणे ही भाग्याची आणि अभिनेता म्हणून आयुष्य सार्थकी लावणारी गोष्ट असते. सुनील बर्वे यांना ही संधी लाभली. त्यांनी ही भूमिका साकारायचा जीवतोड प्रयत्नही केला आहे हे त्यांच्या बोलण्यातून पोहोचते. ही भूमिका पेलण्यात ते किती यशस्वी झाले आहेत ते आता सुजाण प्रेक्षकांनी ठरवायचे आहे.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.