डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकारण्याची सुचिन्हे

विवेक मराठी    08-Apr-2024   
Total Views |
babasaheb
आपल्या देशाच्या जडणघडणीसाठी अनेक महापुरुषांनी समर्थ आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिलेले आहे. त्यासाठी त्यांचा वैचारिक वारसा जतन करत देशाने प्रगतिपथावर वाटचाल केली, तर त्यांच्या स्वप्नातील भारत नक्कीच साकार होऊ शकतो. भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करीत असताना त्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याची सुचिन्हे दिसत आहेत, हे निश्चित!
भारतरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 14 एप्रिलला जयंतीदिनी स्मरण करण्यासाठी त्यांच्या छायाचित्राकडे पाहताना त्यांचा चेहरा नेहमीपेक्षा अधिकच प्रफुल्लित वाटला, चेहर्‍यावरचे स्मितही अधिक गहिरे वाटले, तर हा भास नव्हे, वास्तवच असे आपण जाणले पाहिजे! हे स्मित आहे समाधानाचे! कसले समाधान वाटत असावे बाबासाहेबांना? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार याचसोबत प्रखर देशाभिमानी आणि थोर देशभक्त ही आहे बाबासाहेबांची ओळख. त्यामुळे आपल्या स्वप्नातील भारत साकारत आहे हे समाधान डॉ. बाबासाहेबांना वाटत असावे.
फाळणी होऊन जो भारत भारतीयांच्या वाट्याला आला तो अखंड राहावा, एकात्म राहावा आणि जगाच्या नकाशावर महासत्ता म्हणून ओळखला जावा, हाच आपल्या देशाबाबत डॉ. बाबासाहेबांचा विचार. आज जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण पाहून डॉ. बाबासाहेबांच्या चेहर्‍यावर समाधानाचे स्मित उमटले आहे. जे कलम 370 रद्द केले गेले आहे त्याचा मसुदा तयार करण्याच्या विरोधात डॉ. बाबासाहेब होते. त्यांना या कलमाचा मुळात राज्यघटनेत समावेशच करायचा नव्हता आणि अंतिमत: ते रद्द केल्यामुळे डॉ. बाबासाहेबांना हवा असलेला भारत साकारतोय, असे आपण म्हणू शकतो.
हे कलम भारताची अखंडता आणि एकात्मता धोक्यात आणल्यावाचून राहणार नाही, याची पूर्ण कल्पना डॉ. बाबासाहेबांना असल्यामुळे ते या कलमाच्या विरोधात होते. डॉ. बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी जो अंतिम मसुदा सोपविला होता, त्यात जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम मुळातच नव्हते. हा सर्व पं. जवाहरलाल नेहरू यांचा आग्रह आणि कल्पना होती की, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यात यावा आणि शेख अब्दुल्ला यांना देशाच्या पंतप्रधान पदाच्या समकक्ष असा पंतप्रधान पदाचा दर्जा देण्यात यावा. राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्वाची वीण उसवणार्‍या या तरतुदीला शेख अब्दुल्ला यांच्यासोबतच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब यांनी तीव्र नापसंती आणि विरोध दर्शविला होता. त्यांनी असे खडे बोल सुनावले होते, “भारताने काश्मीरचे रक्षण करावे, काश्मीरच्या जनतेचे भरणपोषण करावे, काश्मीरच्या जनतेला भारतीय नागरिकांप्रमाणे देशभर समान अधिकार असावेत असे आपल्याला वाटते; पण त्याच वेळी भारत आणि भारतीयांना सर्व प्रकारचे अधिकार काश्मीरच्या बाबतीत आपण पूर्णपणे नाकारता आहात. मी देशाचा कायदामंत्री आहे आणि राष्ट्रीय हिताबाबत असा विश्वासघात करण्याचे माध्यम बनण्यास मी पूर्णपणे नाकारतो आहे.“
एक तडजोड डॉ. बाबासाहेबांनी नाकारली. दुसरी तडजोड त्यांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍या भाजपाने नाकारली. खर्‍या अर्थाने भारत एकसंध झाला. दुसरी तडजोड होती भारताच्या हक्काच्या भूमीला शेजारी बळकावून बसले आहेत त्यांची वहिवाट मान्य करण्याची. तो भूप्रदेश आणि त्यातील जनताही आपलीच आहे, असे भारताचे गृहमंत्री ठासून म्हणाले आणि देशाच्या सार्वभौमत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. या भूप्रदेशाच्या संदर्भात आपल्या देशशत्रूंचा मुळात काही अधिकार आहे व त्याचा विचार करावा, ही तडजोडीची भाषा विद्यमान सरकारने नाकारली.
मात्र ही घडामोड ज्यांच्या पचनी पडलेली नाही ते मुखंड हे 370 कलम परत आणू, अशी भाषा बोलायला लागले आहेत. पाकिस्तानचा अखंड भारत भूमीवरचा हक्क हा डॉ. बाबासाहेबांना मान्यच होता, असा वैचारिक चोथा हे मुखंड चघळत बसले आहेत. त्यांना डॉ. बाबासाहेबच जेथे पचनी पडले नाहीत, त्यांना आताचे वास्तव कसे पचनी पडावे? धर्माच्या आधारावर मुसलमानांना पाकिस्तान देऊन टाकणारी डॉ. बाबासाहेबांची भूमिका ही मुसलमानांच्या कल्याणाच्या हिताच्या विचाराने प्रेरित झालेली नसून ती देशाच्या शत्रूची व्याख्या करण्याच्या भूमिकेतून प्रेरित होती. पाकिस्तानप्रेमी लोकांनी पाकिस्तान स्वतंत्रपणे त्यांच्या पदरात पडल्यावर कोणती कृती केली ते आपल्याला माहीत नाही का? ज्यातून आपण फुटून निघालो आहोत त्याच भारतावर हल्ला त्यांनी केला. भारतीय सेनेने आतपर्यंत घुसून त्याचा वचपा काढण्याचा प्रयास केला; पण त्या वेळचे राज्यकर्ते ‘घर में घुस के मारेंगे’ या ‘नया भारत’ संकल्पनेचे नसल्यामुळे जे सेनेने रक्त सांडून मिळविले ते राज्यकर्त्यांनी कागदावर शाई सांडून गमाविले. हा डॉ. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रकार खचितच नव्हता. पाकिस्तानच्या निर्मितीमागे या देशाबाबत अन्य देशाचा शत्रुमित्र भाव अधोरेखित व्हावा, हीच भूमिका होती. डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे होते की, मी भारताचे मुस्लीम भारत आणि गैर-मुस्लीम भारत असे विभाजन होणे अधिक चांगले मानतो, कारण हा दोघांनाही सुरक्षा प्रदान करण्याचा सर्वांत ठोस आणि सुरक्षित मार्ग आहे. आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर असे अनुभवले आहे की, सीमेपलीकडून पाकिस्तानने सातत्याने दहशतवाद चालविला आहे; पण ते वेगळे राष्ट्र असल्यामुळेच आपण पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा आग्रह आंतरराष्ट्रीय समुदायासमोर धरू शकलो. जर अखंड भारतात अशा दहशतवादी कारवाया पाकिस्तानप्रेमी लोकांनी चालविल्या असत्या तर दहशतवादाला मोकळे रान मिळाल्यामुळे ती आपल्यासाठी किती डोकेदुखी झाली असती? डॉ. बाबासाहेबांचा मुस्लीम समाजाविषयीचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे ते अशा निष्कर्षाप्रत आले होते की, मुसलमान समाजाचे हिंदू समाजाशी जमवून घेणे कठीण आहे आणि जोपर्यंत कट्टरपंथी मुल्ला-मौलवींचा प्रभाव मुसलमानांवर कायम आहे तोपर्यंत हिंदू-मुस्लीम समाजाची सरमिसळ होणे कठीण आहे. त्यामुळे पाकिस्ताननिर्मितीचा विषय पुढे आला. आताच्या राज्यकर्त्यांनी जो पाकिस्तानसमर्थित दहशतवादाच्या विरोधात कठोर पवित्रा घेतला आहे तो पाहून डॉ. बाबासाहेबांच्या मुखावर समाधानाचे स्मित उमटले आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
 
डॉ. बाबासाहेबांच्या मुखावर समाधानाचे स्मित उमटण्याचे तिसरे कारण म्हणजे अयोध्या येथे झालेली भगवान रामलला यांची प्राणप्रतिष्ठा. काहींना या गोष्टीचे आश्चर्य वाटू शकते, मात्र आपण इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला डॉ. बाबासाहेबांचा नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह आठवेल. त्याचबरोबर पर्वती मंदिर सत्याग्रह आणि अंबादेवी मंदिराचा सत्याग्रहसुद्धा आठवेल. यापैकी नाशिकच्या काळाराम मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह फार महत्त्वाचा आहे. 2 मार्च 1930 पासून 3 मार्च 1934 इतका दीर्घकाळ हा सत्याग्रह चालला. तेव्हा सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना मारहाण केली. हा सत्याग्रह यशस्वी होऊ दिला नाही. ज्या प्रभू रामचंद्रांनी वनवासी शबरीची उष्टी बोरे खाल्ली, गुहकाला आलिंगन दिले, त्यांनाच सनातनी हिंदूंनी सामान्य माणसांसाठी अस्पृश्य ठरविले.
 
अमरावतीच्या सभेत डॉ. बाबासाहेबांनी मंदिरप्रवेशाविषयी भूमिका मांडत असताना सांगितले होते, ‘हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे, तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठासारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी, तुकाराम यांच्यासारख्यांनी केली, तितकीच वाल्मीकी, चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे... हिंदुत्वाच्या नावाखाली उभारलेली मंदिरे जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांची आहेत.’
 
या सत्याग्रहावर भाष्य करताना शंकरराव खरात लिहितात - ‘हिंदूंचे मंदिर म्हणजे हिंदूंचा आत्मा असे म्हणतात. हिंदू ग्रंथांत व मंदिरांत हिंदूंचा सगळा जीव असतो... हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळाल्यावर हिंदूंच्या हृदयातही बदल घडेल, त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न सुटण्यास एक पाऊल पुढे पडेल, हीच डॉ. बाबासाहेबांची समजूत असावी.’
 
पुढे ते लिहितात - “राम’ हे हिंदूंचे पूज्य दैवत आहे, ‘राम’ म्हणजे हिंदूंचे हृदय आहे. प्रत्येक हिंदूच्या हृदयात रामाला स्थान आहे. या दृष्टीने रामाच्या मंदिरात प्रवेश सत्याग्रह करावा, म्हणजे बाकीच्या मंदिरांचा प्रश्न आपोआप सुटेल आणि त्याबरोबर हिंदू मनात यथायोग्य बदलही होईल, असाच त्यामागचा उद्देश असावा.’
 
रामजन्मभूमी आंदोलन आणि रामलला यांची प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याची अपूर्वता आपण सर्वांनी अनुभवली आहे. शंकरराव खरात म्हणतात त्याप्रमाणे भगवान रामाचे स्थान अद्वितीय आहेच व रामाच्या मंदिरात प्रवेश म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या मनात प्रवेश हे खरेच आहे; पण हे तेव्हा घडले नाही, हे हिंदू समाजाचे दुर्दैव होय; पण हा कलंक धुऊन काढण्याचा प्रयास काळाराम मंदिराच्या त्या वेळच्या पुजार्‍यांचे नातू महंत सुधीरदासजी महाराज यांनी केला हेसुद्धा आपण पाहिले आहे आणि अयोध्या येथे मंदिराचा शिलान्यासच मुळी कामेश्वर चौपाल या बांधवाच्या हातून झाला आणि भगवान रामलला यांची प्राणप्रतिष्ठा होत असताना गर्भगृहात पूजेसाठी देशभरातून 14 जोडप्यांना निमंत्रण देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील भटके-विमुक्त समाजातील महादेवराव गायकवाड, नवी मुंबईचे विठ्ठलराव कांबळे, लखनऊचे दिलीप वाल्मीकी, डोम राजाच्या घराण्यातील अनिल चौधरी आदींचा समावेश होता. हिंदू समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण होता आणि एकता व एकात्मता दृढ करणाराही क्षण होता. ही घटनासुद्धा डॉ. बाबासाहेबांना सुखावणारी ठरली असेल यात नवल ते काय?
 
आज आपल्या देशात केवळ भारतीय राज्यघटना म्हणजेच भीमस्मृतीला प्रमाणभूत मानणारे शासक सत्तेवर असल्यानेच सर्वक्षेत्रीय परिवर्तनाचा रथ गतिमान झाला आहे. तेव्हा याच राष्ट्रीय विचारधारेच्या पाईकांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील आदर्श समाज घडून आपला भारत देश समर्थ महासत्ता म्हणून जागतिक क्षितिजावर तळपू लागेल, अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे!