तीसरी बार... लगातार

विवेक मराठी    08-Jun-2024   
Total Views |
 साठ वर्षांच्या खंडानंतर सलग तीन वेळा एकच व्यक्ती पंतप्रधानपदी असणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येणे हीदेखील लक्षवेधी घटना आहे. अशी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविणार्‍या भाजपासहित त्याच्या सर्व मित्रपक्षांचे आणि पंतप्रधानांचे ‘विवेक’ समूहाच्या वतीने अभिनंदन आणि तिसर्‍या कार्यकाळासाठी शुभेच्छा.
vivek
 
अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन भाजपाप्रणीत रालोआ आघाडीने तिसर्‍यांदा सत्तासूत्रे हाती घेतली आहेत. हा अंक वाचकांना मिळेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित त्यांच्या मंत्रिमंडळातील निवडक सहकार्‍यांचा शपथविधीही झाला असेल आणि पुढील 100 दिवसांचे नियोजन आधीच केलेले असल्याने कामकाजही सुरू झाले असेल.
या निवडणुकीत भाजपाने पूर्ण बहुमत मिळवून सत्ता हाती घेतली असती, तर भाजपाच्या समर्थकांना, मतदारांना अधिक समाधान वाटले असते हे खरे; पण आज मिळालेल्या यशाचे मोलही मोठे आहे. 2019ला कोरोनासारख्या जागतिक महामारीचेे संकट ओढवल्यावर अनेक देश हतबल झाले. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना हा प्रश्न नीट हाताळता न आल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींना मिळालेले यश नजरेआड करता येणार नाही.
 
साठ वर्षांच्या खंडानंतर सलग तीन वेळा एकच व्यक्ती पंतप्रधानपदी असणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येणे हीदेखील लक्षवेधी घटना आहे. अशी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविणार्‍या भाजपासहित त्याच्या सर्व मित्रपक्षांचे आणि पंतप्रधानांचे ‘विवेक’ समूहाच्या वतीने अभिनंदन आणि तिसर्‍या कार्यकाळासाठी शुभेच्छा.
 
आघाडीला सलग तिसर्‍यांदा देशाची सत्तासूत्रे सांभाळण्याची संधी मिळणे हे कौतुकास्पद असले तरी हा कार्यकाळ त्यांच्यासाठी अनेक आव्हानांनी भरलेला असणार आहे. निकाल लागताच इंडी आघाडीने सुरू केलेले कारनामे पाहता, रालोआसाठी पहिल्या दोन कार्यकाळांच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक, कसोटी पाहणारा असा हा कालखंड असण्याची शक्यता आहे. काही तरी करून सतत विघ्ने आणणे, सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांनीच निवडलेल्या सरकारबद्दल अविश्वास निर्माण होईल अशी बडबड करत राहणे, हा इंडी आघाडीचा एककलमी कार्यक्रम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भाषणात म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्षातल्या खासदारांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा आहे. तसे घडले तर 18वी लोकसभा त्या दृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण ठरेल.
मात्र भाजपाविरोधी शक्तींनी आपले काम करायला सुरुवात केली आहे. त्याची पहिली झलक निकालाच्या दुसर्‍याच दिवशी दिसली. हिमाचल प्रदेश येथील नवनिर्वाचित भाजपा खासदार कंगना रणौत या बैठकीसाठी नवी दिल्ली इथे येत असताना चंदीगड विमानतळावर महिला सुरक्षारक्षकाने त्यांच्या कानशिलात लगावली. शेतकरी आंदोलनाच्या वेळी कंगना यांनी त्याविरोधात घेतलेली भूमिका आणि त्या संदर्भात केलेल्या ट्विटरवरची ती प्रतिक्रिया होती, असे सांगण्यात येते. मात्र अशी प्रतिक्रिया देणारी ती महिला देशाच्या सुरक्षाव्यवस्थेतील कर्मचारी आहे आणि ती खलिस्तानवादी आहे, या दोन्ही बाबी चिंताजनक आहेत. ज्यांच्या हाती देशाची सुरक्षाव्यवस्था आहे त्यांच्यातील काही जर विघटनवादी चळवळीचे समर्थक असतील, तर ही कीड किती खोलवर पसरली आहे याचा अंदाज येईल. अशा अस्तनीतल्या निखार्‍यांचा बंदोबस्त पुढच्या काळात मोठ्या कौशल्याने करावा लागेल.
 
सलग तिसर्‍या वेळेस भाजपाप्रणीत रालोआ सत्तेवर येत असली तरी खर्‍या अर्थाने ज्याला आघाडीचे सरकार म्हणता येईल ते या तिसर्‍या कार्यकाळात असणार आहे, कारण पहिल्या दोन कालखंडांत भाजपाकडे पूर्ण बहुमत होते. मोदींसारख्या नेत्याला सहमतीने कारभार करणे शक्य होईल का, अशी त्यांच्या विरोधकांच्या मनात शंका आहे आणि त्या विषयात कुजबुज मोहीम सुरूही झाली आहे. 2001 पासून प्रमुख या नात्याने राज्य व देशाची सूत्रे एकहाती सांभाळणार्‍या नरेंद्र मोदींना आघाडीतल्या पक्षांशी जुळवून कसे घेता येईल, असा विरोधकांचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे त्यांनी शोेधलेले उत्तर, मोदींना हे शक्य नाही, असे असल्याने हे सरकार लवकरच कोसळेल, अशी दिवास्वप्ने ते पाहू लागले आहेत. ज्या इंडी आघाडीतल्या बहुतेक प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, त्यांनी मोदींसंदर्भात अशी शंका उपस्थित करणे याहून मोठा विनोद नाही.
 
अशी बेजबाबदार टीका करताना हे विरोधक, मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांशी ज्या प्रकारे सौहार्दाचे नाते निर्माण केले आहे त्याकडे कानाडोळा करतात. परस्परांशी तीव्र मतभेद असलेले दोन देशांतले नेते एकाच वेळी मोदींचे ऐकतात, ही आजची वस्तुस्थिती आहे. मोदी आपल्या वर्तनातून भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार कृतीत आणत आहेत. अशा व्यक्तीला आघाडीतील घटक पक्षांशी जुळवून घेता येणार नाही? त्यांना सर्वार्थाने बरोबर घेऊन देशहिताच्या योजना प्रत्यक्षात आणता येणार नाहीत? वास्तविक याचे खरे उत्तर त्यांच्या विरोधकांनाही चांगलेच ठाऊक आहे; पण सर्वसामान्य जनतेच्या मनात मोदींविषयी संभ्रम निर्माण करणे, त्यांच्या मनातल्या मोदींच्या प्रतिमेला धक्का लावणे यातून विरोधकांच्या मनासारखे काही घडेल, अशी त्यांची भाबडी आशा आहे.
 
‘सब का साथ, सब का विकास... सब का विश्वास, सब का प्रयास’ ही निव्वळ घोषणा नाही, तर मोदींनी इथल्या जनतेला दिलेला मंत्र आहे. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी सरकारच्या माध्यमातून कामही केले आहे. या घोषणेतून सामूहिकतेचे महत्त्वच अधोरेखित केले आहे. सेंट्रल हॉलमधील भाषणात जेव्हा मोदी, ‘सब का सन्मान’ म्हणाले तेव्हा त्यातून त्यांना आघाडीतल्या पक्षांना आश्वस्त करायचे होते. त्यांची नेतेपदी निवड करण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांना आपल्या बरोेबरीने व्यासपीठावर स्थान देत त्यांनी ते सूचितही केलेे. आपल्या भाषणात एनडीएचा नवा अर्थ उलगडून दाखवताना ‘नवा भारत’, ‘विकसित भारत’, ‘महत्त्वाकांक्षी भारत’ असे म्हणत त्यांनी सर्व सहकार्‍यांमध्ये नवी ऊर्जा भरली. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी संविधानाच्या प्रतीचे केलेले पूजन, तिला मस्तकी धरून तिच्याप्रति दाखवलेला आदरभाव हेही विरोधकांनी प्रचारकाळात केलेल्या निराधार टीकेचे खंडनच होते.
 
अटलजींनी 22 घटक पक्षांना बरोबर घेऊन केलेला देशाचा कारभार मोदींनी पाहिला आहे. लोकसभेत अवघ्या दोन जागांवर विजयी झालेल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचे विराट स्वरूप देताना लालकृष्ण अडवाणींनी समविचारी कार्यकर्त्यांबरोबर घेतलेले कष्ट, कार्यकर्त्यांमध्ये जागा ठेवलेला आशावाद याचेही मोदी साक्षीदार आहेत आणि त्या विचारांचे वारसदारही. तेव्हा या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने ते निराश होणार नाहीत. स्वत:सह सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावून पुन्हा नवी झेप घेतील याची खात्री आहे. इतिहास याला साक्षी आहे.