होमिओपॅथीमधील नागपूरचे भीष्माचार्य विलास डांगरे यांना नुकताच केंद्र सरकारने पद्मश्री घोषित केला आहे. होमिओपॅथीशिवाय अन्य कोणत्याही औषधांचा ते वापर करत नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते उपचार घेऊन रोगमुक्त झाले आहेत. अशा डॉक्टरांना पद्मश्री मिळाली त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, आता जबाबदारी अजून वाढली आहे. आईचे संस्कार, संघसंस्कार आणि रामकृष्ण मिशनची प्रेरणा यातून ही जबाबदारी मी अजून समर्पण भावनेने पार पाडीन. हीच त्यांच्या कार्यामागील प्रेरणा आहे. अशा या कर्मयोगी डॉक्टर विलास डांगरे यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.होमिओपॅथीमधील नागपूरचे भीष्माचार्य विलास डांगरे यांना केंद्र सरकारने पद्मश्री घोषित केली आणि या संपूर्ण परिसरात हर्षाचे वातावरण पसरले आहे. होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर तर अनेक असतात. डॉक्टर डांगरे यांचे असे काय वैशिष्ट्य आहे की, त्यांना हा सन्मान प्राप्त झाला, असा प्रश्न त्यांना न जाणणार्यांना पडणे स्वाभाविक आहे.
डॉ. विलास डांगरे नागपुरातील प्रथितयश डॉक्टर असूनही त्यांच्या घरी ना फोन आहे वा ना त्यांच्या दवाखान्यात फोन आहे. 21 व्या शतकात वावरत असूनही डॉ. भ्रमणध्वनी जवळ बाळगत नाही. त्यांच्या दवाखान्यात नंबर लावायचा असेल तर पहाटे 4 वाजल्यापासून रुग्ण रांगा लावतात. सकाळी 7 वाजता आणि दुपारी 1वाजता त्यांच्या दवाखान्यात क्रमांक वाटले जातात. सकाळी 100 आणि संध्याकाळी 100 असे रुग्ण डॉक्टर तपासतात. याशिवाय डॉक्टरांची ओळख काढून घुसखोरी करणारी मंडळीही असतातच. त्यांची संख्या सहज पन्नास-साठ असतेच. सकाळी 9 वाजता डॉक्टर दवाखान्यात येतात ते एक-दीडला बाहेर जातात. संध्याकाळी 6 वाजता रुग्णसेवा करण्यासाठी पुन्हा हजर होतात ते रात्री 10 पर्यंत. ही सेवा झाल्यानंतर पुन्हा समाजसेवेत कार्यरत होतात. आतापावेतो लक्षावधी रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी परिषद या सर्वांशी ते जोडलेले आहेत. शिवाय शनिवार दुपारपासून ते रविवार रात्रीपर्यंत सार्वजनिक सभा-समारंभांत ते उत्साहाने वावरत असतात. डॉक्टरांवर झालेल्या आघातानंतर त्यांना आता अंधत्व आलेले आहे; पण या अंधत्वाचा त्यांच्या सार्वजनिक जीवनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. अंधत्व आले असतानाही ते अजूनही आपल्या सहकार्यांच्या मदतीने व्यासपीठावर वावरत असतात आणि भाषणेही देत असतात. याशिवाय त्यांची रुग्णसेवा ही अजून सुरू आहे. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून अजूनही मोठ्या संख्येत रुग्ण त्यांच्या दवाखान्यात येत असतात आणि नंबर लागला नाही तर निराश होऊन परत जातात आणि दुसर्या दिवशीही नव्या उमेदीने नंबर लावायला येतात. डॉक्टरांच्या हाताला विलक्षण यश आहे हेच खरे.
सामान्यतः होमिओपॅथी म्हणजे सर्दी, खोकला आणि बारका आजार यावरील औषध, अशी सामान्य माणसाची समजूत असते; पण डॉ. डांगरे यांनी ती समजूत खोडून काढली आणि अतिशय असाध्य अशा रोगांवरही फक्त होमिओपॅथिक औषधांनी उपचार केला आहे. होमिओपॅथीशिवाय अन्य कोणत्याही औषधांचा ते वापर करत नाहीत. डॉ. डांगरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रुग्णालयात क्रमांक पुकारले जातात. रोगी येतात, त्यांच्याशी डॉक्टर बोलतात आणि त्यांची रोग लक्षणे सांगणे पूर्ण होण्याआधीच डॉक्टर आपल्या सहकार्यांना भराभर क्रमांक सांगून कोणत्या औषधी द्यायच्यात याची सूचना करतात आणि बाकी सहकारी ती औषधे कशी घ्यायची वगैरे संबंधीच्या सूचना देत असतात. डॉक्टर स्वतः पैसे घेत नाहीत. ती जबाबदारी सहकारी पार पाडतात आणि फी द्यायला पैसेही नसतील तर डॉक्टरांना सांगितले जाते. त्याला औषध दिले जाते. डॉक्टरांचे रुग्ण फक्त नागपूरमधीलच असतात असे नाही, तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधूनही रोज रुग्णांची रीघ लागते. याशिवाय सार्वजनिक जीवनातील अनेक नामवंत त्यांचे उपचार घेऊन रोगमुक्त झाले आहेत. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे लालकृष्ण अडवाणी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पोलीस संचालक उल्हास जोशी या मंडळींचा समावेश येतो. संघाच्या सरसंघचालकांपैकी बाळासाहेब देवरस आणि सुदर्शनजी यांच्यावरही उपचार करून त्यांना व्यवस्थित करण्याचे भाग्य डॉक्टरांना लाभले आहे. डॉक्टर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे कट्टर कार्यकर्ते असले तरी उपचारासाठी त्यांच्याकडे येणार्यांचा पक्ष ते बघत नाहीत. नागपूरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारही त्यांचा उपचार घेत असतात.
डॉक्टर स्वतः मोठे आहेत; पण त्याचबरोबर ते आपले सहकारी आणि इतरांनाही मोठे करतात. अनेकांनी आता वेगळी रुग्णालये काढून उपचार करणे सुरू केले आहे. जवळजवळ साडेतीनशे होमिओपॅथ त्यांचे सहकारी राहिलेले आहेत आणि आता डॉक्टरांच्या प्रेरणेने समाजासाठी कार्यरत झालेले आहेत ज्यात स्मिता मांजरे- आता रवि कोल्हे यांच्या पत्नी, डॉक्टरांची सहकारी होती, आता मेळघाटमध्ये ती आदिवासींवर रुग्णोपचार करीत आहे. नागपुरात बोटावर मोजण्याइतकेच होमिओपॅथ असतील ज्यांना डॉक्टर विलास डांगरे यांचा परिसस्पर्श झालेला नाही. आई असेपर्यंत डॉक्टरांच्या मागे कुटुंबाचा पाश होता. आई गेल्यानंतर ते पूर्णपणे समाजाचे झाले. ‘तरुण भारत नागपूर’चे प्रकाशन करणार्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे ते जवळजवळ दोन दशके अध्यक्ष आहेत. या प्रकाशन संस्थेच्या पूर्वीच्या अध्यक्षांच्या मांदियाळीत सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचेही नाव आहे. यावरून हे पद किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते.
डॉक्टरांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील. तिथे सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते नागपूरला शिकायला आलेत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीचीच होती. नागपूरला आल्यावर त्यांची बहीण ताराबाई भोयर यांच्या रेशीम बागमधील निवासस्थानी राहून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण सुरू केले.
माझा त्यांचा संबंध हा त्याच वेळी आला. त्या काळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व नागपुरातील दायित्व सांभाळत होतो आणि त्या होमिओपॅथिक महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची शाखा काढावी असे प्रयत्न सुरू होते. नागपूर होमिओपॅथ कॉलेजमध्ये जे तीन कार्यकर्ते उभे राहिले त्यात डॉक्टर डांगरे यांचा समावेश होता. याशिवाय सुश्मिता महाशब्दे आणि सुषमा देशपांडे यांचा समावेश होता. या वेळी शुक्रवार तलावाच्या पाळीवर असणार्या होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. कुंभलकर आणि उपप्राचार्य डॉ. श्रीमती वझलवार या दोघांचेही गुरुपूजन विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करीत आहेत अशी छायाचित्रे आम्ही प्रसिद्ध करून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी परिषदेचा दबदबा निर्माण केला होता. डॉक्टरही आपल्या महाविद्यालयीन अभ्यासाचा वेळ विद्यार्थी परिषदेच्या कामाला देत असत आणि त्यातूनच एक चांगला कार्यकर्ता उभा राहिला होता. विद्यार्थी परिषद, संघ आणि रामकृष्ण मिशन यातून वेळ मिळाला की, डॉ. प्रभाकरराव भोयर यांच्या महाल येथील दवाखान्यातील डॉ. डांगरे काम करत असत. 1975 साली आणीबाणी लागली आणि डॉ. भोयर यांना मिसामध्ये स्थानबद्ध करण्यात आले. त्यानंतर त्यांचा दवाखाना डॉ. डांगरे यांनी एकहाती सांभाळला होता. आणीबाणी संपल्यावर डॉ. भोयर परत आल्यानंतर काही काळातच सुरेंद्र नगरमध्ये डॉ. डांगरे यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. डॉक्टरांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात येणार्या रुग्णसंख्येचा त्रास वसाहतीमध्ये राहणार्यांना होत नसेल असे नाही; पण सुरेंद्रनगर वसाहत तो त्रास सहज सहन करत असते. शिवाय डॉक्टर सांगत असतात की, वसाहतीतील लोकांना त्रास होईल असे रुग्णांनी वागू नये. कुणाच्याही प्रवेशद्वारासमोर गाड्या लावू नये आणि एकूणच वर्तन वस्तीला त्रास होईल असे नसावे आणि त्याचे यथोचित पालन होत असते.
रामकृष्ण मिशन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे डॉक्टर डांगरे यांच्या जीवनातील श्वास आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संवेदनशील मनाचे आणि हळव्या स्वभावाचे डॉ. डांगरे यांच्यावर डिसेंबर 14 ला जबर आघात झाला. राजीव नगरमध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना डॉक्टर एकदम तत्त्वज्ञाच्या भूमिकेत गेले होते. हे जग नश्वर आहे. मी आज तुमच्यासमोर बोलतो आहे, उद्या कदाचित माझ्याबाबत तुम्हाला वेगळीच बातमी ऐकायला येऊ शकते, असे एक वाक्य ते बोलले आणि काही वेळाने रात्री त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली. त्यांना एका खासगी हॉस्पिटलला हलविण्यात आले. जवळजवळ महिनाभराने ते रुग्णालयातून परत आले; पण त्यांची दृष्टी पार गेली होती. काही सेकंद मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाला होता आणि त्याचाच परिणाम दृष्टीवर झाला होता. अनेक मोठमोठ्या इस्पितळांतून त्यांना दाखविले गेले; पण सर्वांनी एकमताने सांगितले की, डॉक्टरांची दृष्टी आता परत येणार नाही. डॉक्टर या आघातानंतरही पुन्हा पूर्वीच्या जोमाने उभे राहिले आणि सार्वजनिक जीवनात तेवढ्याच उत्साहाने वावरून रुग्णांवर उपचार करू लागले. फक्त आता रुग्णांना सांगावे लागत असे की, तो कोण आहे. नाव सांगताच डॉक्टर सहजतेने तुला असा त्रास होता ना? आता कसा आहेस? कोणता त्रास आहे म्हणून आता आला आहेस? सार्वजनिक जीवनात वावरणार्या माणसाने कोणत्या रुग्णाला कोणता रोग झाला होता, हे इतक्या प्रदीर्घ काळ ध्यानात ठेवावे हेदेखील आश्चर्य आहे.
नागपुरात त्यांचा देवदुर्लभ असा षष्ठ्यब्दीपूर्तीचा समारंभ वसंतराव देशपांडे सभागृहात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला होता. ज्यांच्यासमवेत त्यांनी सार्वजनिक कामाला प्रारंभ केला होता असे संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता.
डॉक्टरांना पद्मश्री मिळाली त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया होती- आता जबाबदारी अजून वाढली आहे. आईचे संस्कार, संघसंस्कार आणि रामकृष्ण मिशनची प्रेरणा यातून ही जबाबदारी मी अजून समर्पण भावनेने पार पाडीन. हीच त्यांच्या कार्यामागील प्रेरणा आहे. या डॉक्टरांना शतायू लाभो आणि समाजासाठी ते अविरत कार्यरत राहोत यासाठी शुभेच्छा.
8888397727