सौगंध राम की खायी थी...

विवेक मराठी    27-Nov-2025   
Total Views |
मंदिरात प्रभू रामरायाचे वास्तव्य आहे अशी हिंदूंची केवळ श्रद्धाच नाही तर दृढ विश्वास आहे. पाचशे वर्षांच्या अथक, अविरत संघर्षानंतर हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानाला त्याची हक्काची जागा देऊ शकले. ‘सौंगध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे’ ही जनमानसाचे लक्ष वेधून घ्यायला केलेली निव्वळ एक घोषणा नव्हती. तिला अधिष्ठान होते अढळ निश्चयाचे, परम रामभक्तीचे. भक्तीचा अमीट परिमळ असलेली ही ‘सौंगध’ जेव्हा समूहाच्या दृढसंकल्पात परिवर्तित झाली तेव्हा तिला यश मिळणे ही काळ्या दगडावरची रेघ होती. मात्र तोपर्यंतचा प्रवास जिद्दीने, उमेद कायम ठेवत करणे ही पूर्वअट होती. तिचे सामूहिक पालन झाले म्हणून हा शुभ दिवस दिसला.
 
rammandir

वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या स्वयंभू शिवमंदिरात शिवरायांनी काही मोजक्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. तिची आठवण मनात सतत जागती ठेवून, ती पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या वाटेवरून न डगमगता दृढ निश्चयाने ते चालत राहिले आणि 44 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पाच पातशाह्यांचा बीमोड करत रायगडावर स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण केले. ‘राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ या दृढ भावनेने केलेला तो पराक्रम होता. रायरेश्वरावर घेतलेली शपथ हा त्या प्रवासाचा आरंभबिंदू. पुढच्या प्रवासात तिचे दृढ संकल्पात रूपांतर झाले. एका व्यक्तीच्या पुढाकारातून साकारलेला हा संकल्प बघताबघता समूहाचा संकल्प झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे या सामूहिक संकल्पाचा मूर्तिमंत आविष्कार! शपथेचे मोल आणि बळ काय असते तसेच गंतव्यापर्यंत पोचण्याचा मार्ग काट्याकुट्यांचा असला तरी निश्चयापासून जराही विचलित न होता मार्गक्रमण करत राहिले तर परमेश्वराचे आशीर्वाद कसे लाभतात, याचे भारतीय इतिहासातील हे एक प्रेरक उदाहरण. एका शपथेपासून सुरू झालेल्या प्रवासाचे.
 
 
आजच हे आठवण्याचे कारण सहज समजण्याजोगे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आराध्य दैवत, म्हणूनच सर्व स्वयंसेवकांचेही. छत्रपतींचा राज्याभिषेक दिन म्हणजे हिंदू साम्राज्य दिन हा संघातील एक महत्त्वाचा उत्सव. स्व-प्रेरणा जागरणाचा दिवस.
 
 
रघुकुलभूषण प्रभू श्रीरामांचा जिथे जन्म झाला आणि जिथून राज्यकारभार करत त्यांनी रामराज्य या संकल्पनेला मूर्त रूप दिले त्या अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या करोडो स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. हा संघर्ष साधासोपा नव्हता. एकरेषीय नव्हता. त्यासाठी सामूहिक इच्छाशक्ती निर्माण करत, सामूहिक संकल्पाची प्रेरणा जागवली गेली. रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनात यश मिळेपर्यंत घेतलेल्या शपथेचे स्मरण समाजात जागे ठेवले. त्यासाठी रस्त्यावरचा लढा लढत असतानाच, न्यायालयीन लढाई जिद्दीने लढणार्‍यांची फौज उभी केली. दीर्घकाळ चाललेल्या या न्यायालयीन लढ्यात यश मिळाले आणि प्रभू रामांचा कलियुगातला वनवास, झालेली अवहेलना संपण्याची शुभचिन्हे दिसू लागली. त्यावेळी केंद्रात बहुमताच्या बळावर स्थापन झालेले भाजपाप्रणित सरकार होते, या मुक्ती आंदोलनात ज्यांचा सहभाग होता अशी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होती, योगी आदित्यनाथांसारखा योद्धा संन्यासी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदी होता...अशा अतिशय सकारात्मक परिस्थितीत भव्य राममंदिराच्या उभारणीचा शुभारंभ वेदमंत्रांच्या घोषात, पंतप्रधानांच्या शुभहस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीत झाला. या घटनेने संघस्वयंसेवकांमध्ये, रामभक्तांमध्ये नवचैतन्य तर उसळलेच पण जागतिक स्तरावरील राजकारणात योग्य तो संदेश पोचला. ‘अब हिंदू मार नहीं खायेगा, अब हिंदू हार नहीं मानेगा’चे मूर्त रूप जगाने पाहिले. त्याचा प्रभाव कोविडसारख्या महामारीच्या अभूतपूर्व लाटेतही टिकून राहिला.
 
 
त्याआधी कैक वर्षे, विशेषत: बाबरी ढाच्याच्या पतनानंतर ‘मंदिर वही बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे’ अशा शेलक्या शब्दांत कारसेवकांचा, संघस्वयंसेवकांचा आणि भाजपाच्या माध्यमातून यासाठी लढत असलेल्यांचा पाणउतारा जाहीरपणे होत होता. त्याने नाउमेद न होता, दिलेल्या न्यायपूर्ण लढतीला यश आले आणि राममंदिराची पायाभरणी झाली. संघशताब्दीच्या पावन कालखंडात ध्वजारोहणाने त्याची सांगता झाली हा आणखी एक शुभयोग.
 
या मंदिरात प्रभू रामरायाचे वास्तव्य आहे अशी हिंदूंची केवळ श्रद्धाच नाही तर दृढ विश्वास आहे. पाचशे वर्षांच्या अथक, अविरत संघर्षानंतर हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानाला त्याची हक्काची जागा देऊ शकले. ‘सौंगध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे’ ही जनमानसाचे लक्ष वेधून घ्यायला केलेली निव्वळ एक घोषणा नव्हती. तिला अधिष्ठान होते अढळ निश्चयाचे, परम रामभक्तीचे. भक्तीचा अमीट परिमळ असलेली ही ‘सौंगध’ जेव्हा समूहाच्या दृढसंकल्पात परिवर्तित झाली तेव्हा तिला यश मिळणे ही काळ्या दगडावरची रेघ होती. मात्र तोपर्यंतचा प्रवास जिद्दीने, उमेद कायम ठेवत करणे ही पूर्वअट होती. तिचे सामूहिक पालन झाले म्हणून हा शुभ दिवस दिसला. प्रभू रामचंद्रांचे भक्त असलेले सर्व जण छत्रपती शिवरायांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत हे या संघर्षाने सिद्ध केले. मंदिर उभारणीसाठी शपथ जरी रामरायाची घेतली असली तरी आदर्श होता, रायरेश्वरासमोर शपथ घेणार्‍या आणि ती पूर्ण करणार्‍या छत्रपती शिवरायांचा.
 
 
अभिजित मुहूर्तावर 25 नोव्हेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते, संतमहंतांच्या उपस्थितीत या भव्यदिव्य मंदिरावर तेज:पुंज भगव्या ध्वजाचे मोठ्या दिमाखात आरोहण झाले. ध्वजारोहणाने मंदिरनिर्माणाचे काम पूर्ण झाल्याची ग्वाही दिली. हे राम मंदिर केवळ आमच्या भगवंताचे निवासस्थान नाही तर ते राष्ट्रमंदिर उभारणीसाठी प्रेरणा देणारे स्थान आहे. ज्या रामरायाला आपला हिंदू समाज आदर्श मानतो त्याच्यासारखे राज्य प्रत्यक्ष साकारण्यासाठी यापुढे सर्वांनी झटायचे आहे. त्यासाठी आपापल्या क्षेत्रात मन:पूर्वक योगदान द्यायचे आहे याची जाणीव सर्व भारतीयांमध्ये सदैव रहायला हवी. प्रभू रामांचे जीवन हे मूल्याधिष्ठित आयुष्याचे उदाहरण आहे. त्याचे स्मरण ठेवत सर्वांनी जीवन जगावे अशी अपेक्षा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केली. आपली राष्ट्रीय अस्मिता प्राण पणाला लावून कशी जपायची असते त्याचे जितेजागते उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. त्याला समोर ठेवत, आपल्या परंपरांचा डोळस अभिमान बाळगत देश म्हणून आपल्याला पुढे जायचे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र त्यासाठी गरज आहे ती मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याची. ही भूमी 1947 साली ब्रिटिश जोखडातून मुक्त झाली असली तरी 190 वर्षांपूर्वी मेकॉलेने दिलेले मानसिक गुलामीचे जोखड अद्याप मानेवरून पूर्णपणे उतरलेले नाही, याचा स्पष्ट उच्चार त्यांनी केला. ‘आनेवाले दस वर्षों मे भारत को गुलामी की मानसिकता से मुक्त कर के रहेंगे’, हे पंतप्रधानांचे उद्गार म्हणजे एक प्रकारची शपथ ग्रहण करणे आहे. आपल्या सर्वांच्या वतीने घेतलेली जाहीर शपथ. तिचा आपण डोळस स्वीकार करत कृतीत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू या. शपथेला सामूहिक निश्चयाचे अधिष्ठान मिळाले तर यश मिळतेच याची ग्वाही देणारा धर्मध्वज अयोध्येत डौलाने फडकतो आहेच.