खगोलऋषि - डॉ. जयंत नारळीकर

विवेक मराठी    23-May-2025   
Total Views |
astrophysicist Jayant Narlikar
थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे 20 मे 2025 रोजी पुणे येथे निधन झाले. आर्यभट व वराह मिहीर यांच्यानंतर बव्हंशी खंडित झालेल्या भारतीय खगोल संशोधनाचे पुनरूज्जीवन मागच्या शतकामध्ये मेघना दसाहा, वैनूबापू, नोबेल पारितोषिक विजेते सुब्रमण्यन चंद्रशेखर आणि जयंत नारळीकर यांनी केले असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. अशा ऋषितुल्य नारळीकरांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
घरामध्ये संस्कृत आणि गणित या विषयांमधील विद्वानांचे वातावरण असलेले जयंत नारळीकर साहजिकच या विषयांमध्ये पारंगत होते. गणितातील संशोधनाचा भाग म्हणून आणि फ्रेड हॉयल यांच्या व्याख्यानांमुळे प्रभावित होऊन त्यांनी खगोलशास्त्रीय विषय हाताळण्याचे ठरवले. 1963मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. 1965मध्ये भारतदौर्‍यावर आले असता त्यांना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व शिक्षणमंत्री छागला यांना भेटण्याची संधी मिळाली. या दोघांनीही त्यांना भारतात येऊन संशोधन करण्याचे आवाहन केले. मात्र तिकडील काही जबाबदार्‍या पार पाडायच्या असल्यामुळे ते काही काळानंतर भारतात परतले. पुढे तेव्हाच्या सरकारबरोबर ठरवल्याप्रमाणे 1972मध्ये त्यांनी भारतात परतून मुंबईच्या टाटा मुलभूत संशोधन संस्थेत (TIFR) आपले संशोधन चालू ठेवले. देशातील विविध विद्यापीठांमधील अंतराळविषयक संशोधनात कसलीही सुसूत्रता नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वातंत्र्यानंतर झालेली विद्यापीठांची अधोगती पाहता संशोधनातून काही भरीव निष्पत्ती व्हायची; तर ती विद्यापीठांमधून नव्हे; तर संशोधन संस्थांमधूनच होईल अशी स्थिती देशात निर्माण झाल्याची जाणीव त्यांना झाली. आयुकाच्या (खगोलशास्त्र व खगोलभौतिकी आंतरविद्यापीठीय केंद्र ) स्थापनेच्या निमित्ताने ही फार मोठी उणीव भरून काढता येईल, असे त्यांना वाटले आणि टाटांच्या संशोधन संस्थेतील सतरा वर्षांची कारकिर्द संपवत त्यांनी युजीसीच्या प्रा. यशपाल यांचे यासाठीचे निमंत्रण स्वीकारले. त्या निमित्ताने संशोधकाचे रक्त असलेल्या डॉ. नारळीकरांनी आपल्यातील उत्तम प्रशासकाचीही ओळख दाखवली आणि भारतातील लाल फितीच्या नोकरशाहीचा सामना करत आयुका ही संस्था केवळ उभी केली एवढेच नाही; तर ती नावारूपाला आणली. विशेष म्हणजे खगोलशास्त्रातील त्यांचे गुरू फ्रेड हॉयल यांनी इंग्लंडमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल स्ट्रॉनॉमी ही संस्था स्थापन केली होती. डॉ. नारळीकरांनी नेमके तसेच योगदान आयुकाच्या स्वरूपात भारतासाठी केले.
 

vivek 
 
संशोधनाचे स्वरूप
 
ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंबंधी त्यांनी डॉ. फ्रेड हॉयल यांच्याबरोबर मांडलेल्या ‘स्टेडी स्टेट’ सिद्धांतामुळे ‘बिग बँग’ या प्रचलित सिद्धांताला आव्हान मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता उपलब्ध असलेल्या प्रगत उपकरणांच्या सहाय्याने ब्रह्मांडाची जी निरीक्षणे नोंदवली जात आहेत, त्या आधारावर ‘स्टेडी स्टेट’ सिद्धांत मागे पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ‘बिग बँग’ सिद्धांतदेखील त्रुटीपूर्ण गृहितकांवर आधारित आहे व त्यातून अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण मिळत नाही. हे संशोधन व प्रत्यक्ष निरीक्षणे केवळ गेल्या काही दशकांमधली असल्यामुळे हे क्षेत्र अद्यापही विकसित होत आहे. याखेरीज डॉ. नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणाच्या सुधारित सिद्धांतावर काम केले. माकच्या तत्त्वाचा खगोलशास्त्रात उपयोग करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
 
 
पुरस्कार व मानसन्मान
 
त्यांचे संशोधन चालू असतानाच; म्हणजे 1965मध्ये वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला. त्याचे ते कदाचित सर्वात तरुण सन्मानार्थी असावेत. पुढे 2004मध्ये यावर पद्मविभूषण सन्मानाचा कळस चढला. 1963मध्ये म्हणजे शिक्षण चालू असताना ते लंडनमधील रॉयल खगोलशास्त्र सोसायटीचे पार्टनर होते. 1978मध्ये त्यांना देशातील प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आणि पुढे 1996मध्ये युनेस्कोतर्फे दिला जाणारा विज्ञानाच्या प्रसारासाठीचा कलिंग पुरस्कार मिळाला. पुढे 2004मध्ये त्यांना फ्रान्सच्या खगोलशास्त्रीय सोसायटीने सन्मानित केले. 2010मध्ये त्यांना राज्य सरकारचा महाराष्ट्रभूषण हा सन्मान जाहीर झाला. विस्तारभयास्तव त्यांना मिळालेल्या सर्व मानसन्मानांची जंत्री येथे देणे शक्य नाही.
 
astrophysicist Jayant Narlikar 
2014मध्ये ‘चार शहरांतले माझे जीवन’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. 2021च्या नाशिकमधील अ. भा. मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
 
भारतीय वारशाचा अभ्यास आणि आधार
 
द लाइटर साइड ऑफ ग्रॅव्हिटी या पुस्तकात त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा वरवर सोपा वाटणारा परंतु क्लिष्ट असलेला विषय अतिशय सोप्या व रंजक पद्धतीने समजावला आहे. ते करताना त्यांनी भारतीय संस्कृतीतील ध्रुवतार्‍यासारख्या उदाहरणांचाही संदर्भ दिलेला आहे. द सायंटिफिक एज (Edge) या आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी प्राचीन काळापासून आजवरच्या भारतीय संशोधनाचा आढावा घेतलेला आहे आणि एके काळी अतिशय प्रगत असलेली भारतातील संशोधनसंस्कृती का ठप्प झाली असावी याचाही उहापोह केला आहे. ’आकाशाशी जडले नाते’ या ग्रंथरूपी पुस्तकात त्यांनी खगोलीय विश्वाचा अतिशय सखोल असा आढावा घेतला आहे. ज्याला या क्षेत्रात जेवढी रुची आणि जेवढे कुतूहल, तेवढे घेता यावे अशा पद्धतीने या ग्रंथाची उत्कृष्ट मांडणी झाली आहे.
 
विज्ञानमूल्य असलेल्या विज्ञानकथांवर भर
 
संशोधनात आधीच मोठे नाव कमावलेल्या डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी आपण मराठीतून विज्ञानकथा लिहू शकतो का, याची चाचपणी केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसल्यावर त्यांनी वैज्ञानिक कथा म्हणून केवळ कल्पनारम्य कथानके न निवडता वैज्ञानिक तथ्यांवर आधारित कथा लिहिल्या. मात्र विज्ञानकथा या प्रकाराला आपल्याकडे एकूणच मिळणारा अतिशय थंड प्रतिसाद पाहता त्यांच्या विज्ञानकथा लोकप्रिय होण्यास त्यांच्या संशोधक असण्याचे वलय कारणीभूत झाले असावे असे म्हणण्यास जागा आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
 
डॉ. नारळीकर यांनी विज्ञानलेखनाचे सहा प्रकार सांगितले आहेत. वैज्ञानिक विषयांवरील संशोधन प्रबंध, विज्ञान शाखा-उपशाखांवरील परीक्षणे, वैज्ञानिक मुद्द्यांची नियतकालिकांमधून केलेली उकल, विज्ञान माहितीकोष, मासिक-पुस्तकांमधील वैज्ञानिक माहिती देणारे लेख आणि कथा-कादंबरी-कविता-नाटके हे ते सहा प्रकार. ज्या क्रमाने हे सहा प्रकार मांडले आहेत, त्याच क्रमाने त्यातील विज्ञानाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्या-त्या माध्यमाचे महत्त्व वाढत जाते असे ते सांगतात. विज्ञानकथेतून मुख्यत: विज्ञानाचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे व्हायला हवा; मात्र मराठीमध्ये लिहिण्यात येणार्‍या विज्ञानकथा बव्हंशी भयकथा वाटतात, असे त्यांचे म्हणणे होते.
 
 
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे नेमके काय!
 
संशोधकाचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा समाजाच्या कुतूहलाचा विषय असतो. संशोधक देवाचे अस्तित्व मानत नाहीत असा एक सर्वसाधारण समज असतो. मात्र तसे गृहित धरताना देवाच्या अस्तित्वाचे स्वरूप नेमके कोणते; याबाबत अनेकदा गल्लत केली जाते. देव मनुष्यप्राण्याच्या दररोजच्या जीवनावर नियंत्रण ठेवतो हा एक मोठा समज प्रचलित आहे. ती संकल्पना कुतूहल आणि भीती या भावनांपोटी बनते व त्यातून अंधश्रद्धांचा जन्म होतो. मूळ कल्पना शुद्ध न राहिल्यामुळे आस्तिक व नास्तिक या शब्दांनी आपला अर्थ गमावला. मला वाटते की, या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली आणि शरीरात प्राण आहे किंवा नाही म्हणजे नेमके काय आहे किंवा नाही, या तीन प्रश्नांची उकल झाल्यास देव या संकल्पनेची गरजच उरणार नाही. ती तशी होत नाही म्हणूनच प्रत्येकजण आपापल्या परीने त्याची कल्पना करतो. त्यामुळे डॉ. नारळीकर यांच्या याबाबतच्या भूमिकेबद्दल विशेषत्वाने सांगायला हवे. देव आणि अध्यात्म याबाबत त्यांची भूमिका समन्वयाची होती. प्रत्येकाची याबाबतची अनुभूती वेगवेगळी असल्यामुळे ती संकल्पना पूर्णपणे झिडकारणे उचित नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ‘देव आहे की नाही?’ याचे थेट उत्तर न देता एक वैज्ञानिक म्हणून विश्वातील नियमांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते, असे त्यांचे म्हणणे होते. एखाद्या कामचुकार विद्यार्थ्याने परीक्षेत यश मिळवण्यासाठी देवाला नवस बोलण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात लाच देण्याचे कबूल केल्यावर प्रत्यक्षात त्याप्रमाणे घडत असेल, तर तो मेहनत घेणार्‍या विद्यार्थ्यांवरचा अन्याय ठरणार नाही का, असे विचारून डॉ. नारळीकर देव मानायचाच झाला; तर त्यातील फोलपणा व दांभिकपणा सहजपणे दाखवू शकत. एकूण सांगायचे तर ‘देव दिसतो का? नाही ना, मग तो नाही’ छाप उथळ बुद्धिप्रामाण्यवाद जपणार्‍यांनी व त्यातून स्वत:ला नास्तिक म्हणवणार्‍यांनी आपल्याकडे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन या संकल्पनेचे प्रत्यक्षात फार मोठे नुकसान केले आहे.
 
 
डॉ. नारळीकरांचा भारतीय ज्ञानपरंपरेचा मोठा अभ्यास होता. कोणतीही गोष्ट अभिनिवेशातून मान्य करण्याऐवजी त्यामागचा कार्यकारणभाव शोधण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ज्यास ब्रह्मास्त्र म्हणजे आण्विक अस्त्र समजले जाते, त्यासाठी आवश्यक विद्युतऊर्जा त्या काळात उपलब्ध होती का, या त्यांच्या प्रश्नाने आपल्या भावना दुखावल्या न जाता उलट त्या दिशेने आपल्या विचारांना चालना मिळायला हवी. त्यांच्या अशा विधानांमुळे भारतीय ज्ञानपरंपरेचा व विविध धर्मग्रंथांचा अपमान होतो असा आविर्भाव काही जण आणतात. दुसरीकडे कशातलेच काही न समजणारेदेखील त्यांच्या विधानांच्या आधारावर त्यांनी असा भारतीय वारसा मोडीत काढला असा सोयीस्कर प्रचार करतात. मात्र यामागे डॉ. नारळीकरांची मूळ संशोधक व चिकित्सक वृत्ती आहे; भारतीय वारशाची टिंगल करण्यासारखी त्यांची विध्वसंक वृत्ती नव्हती हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना मिळालेले फार मोठे मानसन्मान पाहता साहित्य क्षेत्रातील सन्मानांचा त्यांना मोह असणे शक्य नव्हते. त्यामुळे खोडसाळ पुरस्कारवापसी मोहिमेदरम्यान त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा सन्मान परत करण्यास त्यांनी दिलेला नकार महत्त्वाचा ठरतो. हे त्यांच्या स्वयंप्रज्ञ वृत्तीचे आणखी एक उदाहरण.
 
 
अभिनिवेश विरूद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन
 
त्यांच्या वैज्ञानिक लेखनाचे वैशिष्ट्य असे की ते त्याबाबतीत असलेल्या पारंपरिक गैरसमजुती दूर करतात. उदाहरणार्थ, गॅलेलियो वा इतरांनी केलेल्या संशोधनातील त्रुटींचे बारकावेही ते दाखवून देतात. तेव्हा तीच पद्धत ते प्राचीन भारतीयांच्या संशोधनाबाबत आता उपलब्ध असलेल्या उल्लेखांबाबत अवलंबतात यात आश्चर्य नाही. एखादा सिद्धांत संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात चुकीचा ठरला, तरी त्या काळात त्याच्या आधारावर पुढील सुधारणा झालेली असते, हे ते उदाहरणांसह दाखवून देतात. पुराणातील विमाने, ब्रह्मदेवाच्या संदर्भातील सापेक्षतावादाचा सिद्धांत, महाभारतातील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला बसल्या जागी सांगणारा संजय, अंतराळात स्वैर संचार करणारे देव-गंधर्व, गणपतीला असलेले हत्तीचे शीर या व अशा अनेक उदाहरणांची आजच्या काळाशी सांगड घालत ‘त्या’ काळातही आजचे तंत्रज्ञान अस्तित्वात होते, असा दावा करण्याची सहजप्रवृत्ती आपल्याकडे आढळून येते. सहसा असे दावे करणार्‍यास व्यक्ती स्वत: संशोधनक्षेत्रात नसूनही सवंगपणा करण्यात धन्यता मानत असतात. काहीजण याचा प्रतिवाद करताना वेद-उपनिषद-पुराण वगैरे वारशात काही विज्ञान आहे हे साफ नाकारून आपली मानसिक गुलामगिरी दाखवत असतात. तर काहीजण स्वप्नरंजनाचे दुसरे टोक गाठत असतात. डॉ. नारळीकरांचे याबाबतचे म्हणणे इतकेच की याबाबत केवळ विधानांपेक्षा या दाव्यांना पूरक असे आणखी काही तपशील मिळाले, तर या दाव्यांना पुष्टी देता येईल. आता कालौघात यातले कोणते संदर्भ मिळणे खरोखर शक्य आहे, हा प्रश्न पाहता हे अनुत्तरितच राहील की कसे हे पहावे लागेल. वैज्ञानिक निकष लावले की उपलब्ध पुरावा पुरेसा नाही, असे म्हणावेच लागते; असे असले तरी हा प्रश्न येथे संपत नाही आणि याबाबतचे आव्हान पुराण वाङ्मय संशोधकांनी स्वीकारावे, असे त्यांचे सांगणे आहे. अर्थात या प्राचीन ज्ञानाचा अर्थ लावून आजच्या संदर्भात ते पडताळून पाहण्यापुरतेच नव्हे; तर भविष्यातील संशोधनासाठी ते कसे वापरता येईल, हे फार मोठे आव्हान आहे. अन्यथा आपण समृद्ध वारसाशून्य नव्हतो हे दाखवण्यापलीकडे त्याचा काही उपयोग उरणार नाही. कारण हे बहुतेक ज्ञान संस्कृतमध्ये उपलब्ध आहे आणि आज बहुतेक वैज्ञानिकांना संस्कृतचे वावडे आहे.
 
 
मातृभाषेतून शिक्षणाची कळकळ
 
मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे सर्वविदित आहेत, परंतु देशातील शासनव्यवस्थेच्या इच्छाशक्तीचा अभाव ते प्रत्यक्षात आणण्याच्या नेहमीच आड येतो. जर विचार करण्याची क्षमता मातृभाषेतील शिक्षणामुळे वृद्धिंगत होत असेल, तर मग त्याचा मुलांच्या कल्पकतेवरही विपरित परिणाम होत नसेल का? मात्र आपल्याकडचा विचारप्रवाह असा असतो की किमान गणित आणि विज्ञान हे विषय तरी इंग्रजीत जावेत. उलट नेमक्या याच कारणाने डॉ. नारळीकर विज्ञानाचे विषयदेखील मातृभाषेतून शिकवले जावेत असे सांगत. इंग्रजी माध्यमातून शिकण्यातून इंग्रजी भाषा येण्याखेरीज (अर्थात हेदेखील साध्य झाले तर!) आणखी काय साध्य होते हा प्रश्न ते उद्विग्नपणे विचारत. नव्या शिक्षणधोरणामध्येही या वास्तवावरच्या उपाययोजनेला थारा दिलेला नाही हे लक्षात येईल.
 
 
विज्ञानप्रसार
 
सेलिब्रिटी आणि सह्यांसाठी चाहत्यांची गर्दी हा प्रकार आपल्याला नवा नाही. डॉ. नारळीकरांच्या स्वाक्षरीसाठी बाळगोपाळांची झुंबड उडत असे. त्यावेळी ते अगदी प्रेमाने त्यांना सांगत की तुम्ही पोस्टकार्डाद्वारे त्यांना एक प्रश्न विचारा आणि मग ते उत्तरादाखल जे पत्र पाठवतील. त्यावर त्यांची स्वाक्षरी मिळेल. अशा प्रकारे हजारो मुलांना त्यांनी प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले आहे. त्यापैकी काही प्रश्नोत्तरे पुस्तिकारूपाने प्रसिद्ध केली आहेत. आपल्याकडे बालसाहित्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते म्हटल्यावर कुमार वयातील विविध टप्प्यांच्या गरजा ओळखून त्याला अनुसरून वैज्ञानिक कथांचे लेखन करणे हे तर कल्पनेपलीकडचे ठरते. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा ही डॉ. नारळीकरांची कळकळ होती.
 
 
केवळ विज्ञान कथांमधूनच नव्हे; तर प्रत्येक वयोगटाशी विज्ञानविषयक व खगोलविषयक चर्चा करताना त्यांना समजेल अशा अतिशय सुबोध मराठी व इंग्रजीतून तो विषय समजावून सांगण्याची हातोटी डॉ. नारळीकरांकडे होती. त्यात अतिशय सहजता असे. ते कोणताही बडेजाव मिरवत नसत. त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेतून प्रेरणा घेतलेल्या मुला-मुलींची आणि तरुण-तरुणींची संख्या फार मोठी आहे. ऋषितुल्य डॉ. नारळीकर केवळ आपली सामजिक व्यंगे दाखवणारे नव्हते. ते स्वत: त्यावर उपाय शोधत राहिले. देशाने एक थोर खगोलऋषि गमावला आहे.