भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या सव्वादोन महिन्यांतच काश्मीर प्रश्नावरून युद्ध सुरू झाले. या कालखंडातील राजकीय, सामाजिक आणि सैनिकी कथांचा आढावा आपण घेतोच आहोत. याच घटनाक्रमात भूदल, नौदल आणि वायुदल यांनी एकत्रितपणे चढाईचा पवित्रा घेणे, असाही प्रसंग घडला. तसेच मानवी स्वभाव किती विचित्र असतो हे दाखवणारे काही विनोदही घडले. यांचा आढावा आता या लेखात घेऊया..
ब्रिटिश इंडियाचे व्हाईसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी 3 जून 1947 या दिवशी जाहीर घोषणा केली की, ब्रिटिश राजसत्ता भारत सोडून जात आहे. 18 जुलै 1947 या दिवशी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या मंत्रीमंडळाने ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव पारित करून त्याला कायद्याचे रूप दिले. त्याला ’इंडियन इंडिपेंडन्स अॅक्ट-1947’ असे म्हटले जाते.
या कायद्याने भारत आणि पाकिस्तान अशी धर्मावर आधारित दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येत असल्याचे घोषित केले. तसेच भारतातील संस्थानांच्या अधिपतींशी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून झालेले मांडलिकत्वाचे सर्व करारही यामुळे रद्द झाले. म्हणजे भारतीय उपखंडातील सर्व संस्थानिक आता स्वतंत्र असून, त्यांनी वाटल्यास भारत किंवा पाकिस्तान कुणालाही सामील व्हावे किंवा वाटल्यास स्वतंत्र राहावे, असा हक्क त्यांना देण्यात आला.
जुनागड संस्थान
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यावर मंत्रीमंडळ अस्तित्वात येऊन सरदार वल्लभभाई पटेल हे केंद्रीय गृहमंत्री झाले. यामुळे संस्थानांच्या अधिपतींना भारतात सामील करून घेणे, हे गृहमंत्र्यांचे कामच होते. प्रत्यक्षात सरदार पटेल आणि यांचे प्रमुख सहायक आय. सी. एस. अधिकारी व्ही. पी. मेनन यांनी अगोदरच या कामाला सुरुवात केलेली होती.
तिकडे कराचीत बसलेल्या महंमद अली जिनांनी पण भारतीय प्रदेशात जाणार्या मुसलमान संस्थानिकांशी संधान बांधायला सुरुवात केली होतीच. जिनांचे दूत ज्यांच्याशी खास संपर्क ठेवून होते, त्यातलाच सर्वात महत्त्वाचा होता हैद्राबादचा निजाम, तसाच आणखी एक म्हणजे जुनागडचा नवाब सर मुहम्मद महाबतखान, हा होय.
जुनागड संस्थान म्हणजे हिंदू समाजाचे प्रख्यात प्राचीन तीर्थक्षेत्र प्रभासपट्टण आणि तिथे असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे सोरटी सोमनाथ यांचा प्रदेश, इसवी सनाच्या 14 व्या शतकात दिल्लीचा तुर्क-अफगाण सुलतान मुहम्मद तुघलख याने पुन्हा एकदा गुजरातवर स्वारी करून सगळी हिंदू तीर्थक्षेत्रे पुन्हा उदध्वस्त केली. यावेळी त्याने आपल्या एका पठाण सरदाराला जुनागडची सुभेदारी दिली. या पठाण सरदाराच्या टोळीचे नाव बाबई किंवा बाबी. अशी आणखीही काही पठाण घराणी कायमची गुजरातमध्ये बसली. नियाझी, बंगश, दुराणी, युसुफझाई अशी यांची नावे आहेत. पैकी जुनागडची सरदारकी मिळालेले आणि नंतर इंग्रजी राजवटीत संस्थानिक बनलेले घराणे ’बाबी’ म्हणून ओळखले जाते. 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच नावारूपाला आलेली परवीन बाबी ही या गुजराती पठाणांपैकीच होय.
आता खरे म्हणजे जुनागडचे नवाब सर मुहम्मद महाबतखान रसूलखानजी बाबी यांना राज्यकारभार करायला वेळच नव्हता. त्यांना बर्याच बायका होत्या, यापेक्षाही म्हणजे त्यांना कुत्रे पाळण्याचा मोठा शौक होता. संपूर्ण जगभरातून उत्तमोत्तम असे दोन हजार कुत्रे त्यांनी जमवले होते. या कुत्र्यांना खाऊपिऊ घालणे, त्यांचे लाड करणे, त्यांची समारंभपूर्वक लग्ने लावणे यातच नवाब साहेब दंग असत. यामुळे राज्यकारभार यांचे दिवाण सर शहानवाज भुट्टो हेच बघत असत.
भुट्टो हे सिंध प्रांतातले एक अतिश्रीमंत घराणे होते, आजही आहे. हे मूळचे राजपूत हिंदू जमीनदार. हजारो एकर जमिनीचे मालक. सर शहानवाज हे सिंध प्रांताच्या मंत्रीमंडळात होतेच, जिनांनी यांच्याशी व्यवस्थित संपर्क ठेवलेला होता. भुट्टोंनी नवाब साहेबांचे कान फुंकले आणि नवाब साहेबांनी भारत सरकारला कळवले की, आमचे संस्थान पाकिस्तानात सामील होत आहे. आता भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानची सीमा कुठेही जुनागड संस्थानच्या सीमेशी संलग्न नव्हती. पण व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि यांचे सल्लागार वॉल्टर माँक्टन यांनी जुनागडचे पाकिस्तानशी सामिलीकरण कायदेशीर ठरवले का? तर म्हणे, जुनागडचे वेरावळ हे बंदर आणि पाकिस्तानचे कराची बंदर यांच्या सागरी सीमा एकमेकींना जोडलेल्या आहेत, म्हणून. पण सरदार पटेलांनी जुनागडला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
ऑपरेशन पीस
जुनागडजवळ राजकोट येथे भारतीय भूदलाची एक ब्रिगेड म्हणजे सुमारे 1 हजार ते 2 हजार सैनिकांची तुकडी होतीच. तिच्या दिमतीला एक कुमाउँ बटालियन देण्यात येऊन कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर गुरुदयाल सिंग यांना जुनागड संस्थानच्या सर्व सीमा रोखून धरण्याचा आदेश देण्यात आला. भूदलाच्या या कारवाईचे संचालन जाफराबाद इथून करण्यात येत होते. आपल्याला महान क्रिकेटपटू रणजी आणि यांच्या स्मरणार्थ खेळली जाणारी ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ माहीत असेल. हे रणजी किंवा रणजितसिंहजी हे काठेवाडमधल्या नवानगर या संस्थानचे अधिपती म्हणजे जामसाहेब होते. जामनगर ही त्यांची राजधानी. यावेळी ते हयात नव्हते. पण जामनगर विमानतळावर भारतीय वायुदलाच्या टेम्पेस्ट विमानांची एक स्क्वाड्रन म्हणजे 18 ते 20 झुंजी विमानांची तुकडी येऊन दाखल झाली. तिचे प्रमुख होने स्क्वाड्रन लीडर पदमसिंग गिल, नवानगर संस्थानच्या समुद्रातल्या एका निर्मनुष्य बेटावर टेम्पेस्ट विमानांनी बाँबफेकीचा सरावही केला. याच वेळी भारतीय नौदलाची तीन फ्रिगेटस, तीन माईन स्वीपर्स आणि तीन लँडिंग क्राफ्टस् अशी नऊ लढाऊ जहाजे वेरावळ आणि कराची यांच्या दरम्यानच्या समुद्रात येऊन उभी राहिली. यांचे प्रमुख होतेे कमांडर रामदास कटारी. हे कटारी पुढे अॅडमिरल बनून स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय नौदल प्रमुख बनले.

भारतीय सेनादलांची ही नुसती हालचाल बघूनच नबाब महाबतखान यांची घाबरगुंडी उडाली. 26 ऑक्टोबर 1947 या दिवशी त्यांनी जुनागडला कायमचा रामराम ठोकला. कराचीला जाणारे विमान पकडताना आणि त्यात आपले सगळे आवडते कुत्रे भरून नेताना त्यांची इतकी धांदल उडाली की कुत्रे विमानात चढले, बर्याचशा बायका पण विमानात चढल्या, तरी एक बायको आणि तिचे मूल खालीच राहिले. विमान उडून गेले.
थोडक्यात सेनादलांना प्रत्यक्षात लढाई करण्याची वेळ आली नाही. नुसती हूल देऊनच काम भागले. नंतर शहानवाज भुट्टो यांनी, आपण राजकोटच्या रीजनल कमिशनरकडे संस्थानचा कारभार सुपूर्त करीत आहोत, असे दिल्लीला कळवले आणि 8 नोव्हेंबर 1947 ला तेही कराचीला निघून गेले. मात्र अगदी शेवटपर्यंत भुट्टोंना अशी आशा होती की, जिना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला मदत पाठवतील. पण जिनांनाही ते शक्य झाले नसावे. कारण नवाब कराचीला पळून जाण्याआधीच चार दिवस म्हणजे 22 ऑक्टोबर 1947 रोजी जिनांनी पठाणी टोळीवाल्यांकरवी काश्मीरवर आक्रमण सुरू केले होते. काश्मीरसमोर जुनागडचा विषय अर्थातच दुय्यम ठरला, भुट्टोंनाही जुनागड सोडावे लागले.
भारतीय सेनादलांनाही आता जुनागडमध्ये काम उरले नव्हते आणि तिकडे काश्मीर सीमा धडाडून पेटली होती. यामुळे सगळ्यांचेच लक्ष जुनागडकडून काश्मीरकडे वेधले गेले. जुनागडमध्ये नागरी प्रशासनाची प्रक्रिया सुरू झाली.
मात्र पाकिस्तानने हा विषय सोडून दिला नाही. जुनागड संस्थानाच्या अधिपतीने पाकिस्तानला सामिलीकरणाचे अधिकृत पत्र दिले होते. यामुळे कायदेशीरदृष्ट्या जुनागड संस्थानचा भूप्रदेश हा पाकिस्तानचाच आहे, असा मुद्दा पुढे करून पाकिस्तानने हा विषय ’युनो’मध्ये नेला.
भारताने यावर तोड म्हणून जुनागडमध्ये सार्वमत घेतले. सार्वमताचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. प्रथम त्याला ’सौराष्ट्र’ या राज्यात ठेवण्यात आले. पुढे 1956 साली सौराष्ट्र राज्यच मुंबई राज्यात विलीन झाले. नंतर 1960 साली भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबई राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये निर्माण झाली. आज जुनागड हा गुजरात राज्याचा एक जिल्हा आहे.
पाकिस्तानने मात्र आजही हे विलीनीकरण मान्य केलेले नाही. आजही पाकिस्तान सरकारच्या अधिकृत नकाशात जुनागड संस्थान हा पाकिस्तानी भूभाग असल्याचे दाखवले जाते.