The Annexation of Hyderabad (code-named Operation Polo)
हैद्राबाद हे सर्वात श्रीमंत संस्थान होते. व्हॉईसरॉय लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची व्यवस्था सुरू केल्यावर सर्वात प्रथम ती कोणी स्वीकारली असेल तर हैद्राबादच्या निजामाने. हैद्राबाद स्वातंत्र्य आंदोलने, चळवळी यांबद्दल भरपूर साहित्य उपलब्ध आहे. प्रस्तुत लेखात आपण वेध घेणार आहोत, याच्या सैनिकी अंगाचा.
अनेकांच्या मनात अहमदनगरची निजामशाही आणि हैद्राबादची निजामशाही यांच्या बद्दल बराच घोळ असतो. तो प्रथम दूर करायला हवा. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याचा दख्खनचा सुभेदार अल्लाउद्दिन हसन गंगू बहामनी हा इ.स. 1347 मध्ये स्वतंत्र बादशहा बनला. पुढे इ.स. 1490 मध्ये याचा एक सरदार मलिक अहमद निजाम शाह बहिरी याने स्वतःची बादशाही स्थापन केली. हा मूळचा हिंदू होता. हीच ती अहमदनगरची निजामी सल्तनत. तिचा शेवट सन 1636 मध्ये मुघल बादशाह शहाजहान याने केला. आता दक्षिणेत दोनच बादशाह्या शिल्लक राहिल्या - एक विजापूरची आदिलशाही आणि दुसरी गोवळकोंड्याची कुतुबशाही.
पुढे इ.स. 1686 आणि 1687 या वर्षी औरंगजेब बादशहाने अनुक्रमे आदिलशाही आणि कुतुबशाही राजवटी संपवल्या. पण सन 1646 साली निर्माण झालेले हिंदवी स्वराज्य मात्र तो संपवू शकला नाही. अकबराच्या काळात मुघल बादशाहीचे दख्खन सुभ्याचे ठाणे होते बर्हाणपूर हे शहर. औरंगजेब हा बादशहा होण्यापूर्वी दख्खन सुभ्याचा सुभेदार होता. तेव्हा त्याने प्रमुख ठाणे बर्हाणपूरहून आणखी दक्षिणेला देवगिरी किल्ल्याजवळ खडकी या ठिकाणी आणले आणि त्याला स्वत:चे नाव दिले ‘औरंगाबाद’ म्हणजेच आजचे छत्रपती संभाजीनगर! पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सन 1714 साली तत्कालीन मुघल बादशाह फरूखसियर याने मीर कमरुद्दिन याला दख्खनचा सुभेदार नेमले. याचे पूर्ण नाव मीर कमरुद्दिन चिनकिलिय खान याला निजाम-उल्-मुल्क अशी पदवी देण्यात आली. हा मूळचा इराणी होता.
या वेळेपर्यंत मराठे अतिशय प्रबळ झाले होते. सुभ्याचे मुख्य जे औरंगाबाद शहर ते मराठ्यांच्या सहज आवाक्यात आले होते. सन 1724 साली सुभेदार निजाम-उल्-मुल्कने सुभ्याचे ठाणे औरंगाबादहून मूळ कुतुबशाही राजधानी असलेल्या गोवळकोंडा किल्ल्यात नेले आणि त्याने स्वतःला आसफ जाह या नावाने स्वतंत्र बादशहा घोषित केले. गोवळकोंडा किल्ल्याच्या भोवती जे शहर आहे ते हैद्राबाद म्हणून ही नवी बादशाही हैद्राबादची निजामशाही म्हणून प्रसिद्ध झाली.
हैद्राबादच्या निजाम सुलतानांनी मराठ्यांना पायबंद घालण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण बाजीराव नानासाहेब, भाऊसाहेब, माधवराव या पेशव्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मराठ्यांनी निजामाचा सतत पराभव केला. प्रत्येक लढाईनंतर निजाम राज्यातले दोन-तीन मोठे प्रांत म्हणजे आजच्या भाषेत जिल्हे मराठे आपल्या राज्याला जोडत असत. पण माधवराव पेशव्याचा अकाली मृत्यू आणि महादजी शिंद्यांचाही मृत्यू यामुळे मराठ्यांकडे समर्थ नेतृत्वच उरले नाही. सगळा देश क्रमाक्रमाने इंग्रजांच्या घशात गेला.
इंग्रजांनी जहागीरदार, जमीनदार, वतनदार, सरदार, यांचा त्यांच्या राजकीय सोईनुसार कधी संपवले, तर कधी शिल्लक ठेवले. त्यांना संस्थानिक असे म्हणू लागले. म्हणजे सार्वभौम सत्ता इंग्रजांची, पण या संस्थानिकांना त्यांच्या संस्थानाच्या प्रदेशात काही विशेष अधिकार असत. देशाचा जो भाग रीतसर इंग्रजी सत्तेखाली असे त्याला म्हणायचे ’खालसा प्रदेश’ किंवा
’ब्रिटिश इंडिया’ आणि स्थानिक सत्ताधीशांच्या प्रदेशाल म्हणायचे ’संस्थान’ किंवा ’प्रिन्सली स्टेट’. भारतभरात अशी सुमारे 599 संस्थाने होती. यात निजाम संस्थान हे सर्वात श्रीमंत होते. लक्षात घ्या, ज्या काळात एक रूपयाला पाच शेर धान्य मिळणे ही महागाईची हद्द झाली, असे लोकांना वाटत असे, त्या काळात निजाम संस्थानाचा वार्षिक महसूल 9 कोटी रुपये होता.
निजाम संस्थानची हद्द महाराष्ट्रातल्या म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांतातल्या धुळे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांना लागूनच होती. मराठी लोकांच्या मनात निजाम राज्य म्हणजे मोगलांचे राज्य ही संकल्पना इतकी दृढ झालेली होती की, उदा., सोलापूरहून निजाम राज्यातल्या श्रीक्षेत्र तुळजापूरला जायला निघालेला माणूस सहजपणे म्हणायचा, ’जरा मोगलाईत जाऊन येतो.’
निजामाने स्वतःचे सैन्य देखील ठेवले होते. यात मोगल, पठाण, सय्यद, शेख, बलुच अशा विविध जातींच्या मुसलमानांचा भरणा होता. अगदी अल्प प्रमाणात हिंदूसुद्धा होते. 1914 ते 1918 या कालखंडातल्या पहिल्या महायुद्धात भारतातल्या अनेक संस्थानिकांनी आपापली सैन्ये इंग्रजांच्या मदतीसाठी पाठवली. ही सर्व सैन्ये ’15 वी इंपीरियल सर्व्हिस कॅव्हलरी ब्रिगेड’ या नावाने ब्रिगेडिअर जनरल वॉटसन याच्या हाताखाली मध्यपूर्वेत पाठवण्यात आली. तिथे त्यांनी उत्तम लढाई केली. पुढे 1924 साली इंग्रज सरकारने दिल्लीत या संस्थानी सैनिकांच्या स्मरणार्थ एक खास स्मारक उभारले. हैद्राबाद, म्हैसूर आणि जोधपूर या संस्थानांच्या सैनिकांच्या पूर्णाकृती मूर्ती असणार्या या चौकाला ’तीन मूर्ती चौक’ म्हणतात.
इत्तेहाद
ब्रिटिश इंडियाच्या प्रदेशात स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळी जोरात सुरू झाल्यावर कोणतेच संस्थान त्यापासून अलिप्त रहाणे, शक्यच नव्हते. निजाम संस्थानातली 85 टक्के प्रजा हिंदू होती. यात तेलगू, मराठी आणि कन्नड अशा तीन भाषा बोलणारे लोक होते. पण राज्याची अधिकृत भाषा उर्दू असल्यामुळे यांच्यावर त्या भाषेची सक्ती होती. राज्यातली 40 टक्के जमीन निजाम आणि त्याच्या जहागिरदारांच्या ताब्यात होती. याविरुद्ध असणारा असंतोष हळूहळू वाढत चालला. त्याची धग मुसलमानांना जाणवू लागली. म्हणून संस्थानातला एक सरदार नबाब महमूद नवाजखान किलेदार याने 1927 साली ’मजहिले इत्तेहादुल मुसलमीन’ या संघटनेची स्थापना केली. मुसलमानांची आपसातली एकी वाढवून हैद्राबाद संस्थानावर मुसलमानांचीच पकड राहील याकडे लक्ष देणे, हे तिचे उद्दिष्ट होते. ते साध्य करण्यासाठी ’रझाकार’ या कृती दलाची स्थापना करण्यात आली. रझाकार या अरबी शब्दाचा अर्थ स्वयंसेवक.
रझाकारांचा हैदोस
1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. हैद्राबाद संस्थानी सैन्याची 19 वी रेजिमेंट इंग्रजांच्या मदतीला गेली. मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, मलाया, सिंगापूर आणि ब्रह्मदेश आघाडीवर यांनी लढाईत भाग घेतला.
पण त्याचवेळी इकडे खुद्द संस्थानी भागात रझाकार या निमलष्करी दलाच्या घातक कारवाया वाढत चालल्या. हे एक प्रकारे गुंडच होते. ते सर्रास तलवारी, भाले, कट्यारी, पिस्तुले आणि ठासणीच्या बंदुका घेऊन फिरायचे. हिंदू प्रजेला छळणे, धमकावणे, लुटणे आणि धर्मांतर घडवून आणणे, ही त्यांची उद्दिष्टे होती.
जून 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटननी जाहीर केले की, इंग्रज भारत सोडून जात आहेत आणि संस्थानांनी भारत किंवा पाकिस्तानात विलीन व्हायचे की, स्वतंत्र रहायचे, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. मग तर या रझाकारांची संख्या वाढत वाढत दोन लाखांवर जाऊन पोचली. त्यातच त्यांना कासिम रझवी हा जहाल नेता मिळाला. हा कासिम रझवी मूळचा लखनौचा. अलिगड मुस्लीम विद्यापीठात शिक्षण पूर्ण करून तो हैद्राबाद संस्थानात आला. प्रथम त्याने लातूरमध्ये वकिली सुरू केली. 1946 साली तो इत्तेहादचा अध्यक्ष बनला. त्याची भाषणे कमालीची प्रक्षोभक असत. निजामाच्या मुसलमान प्रजेवर आणि खुद्द निजामावर त्याचा एवढा प्रभाव पडला की, निजामाचा पंतप्रधान लायक अली आणि सेनापती मेजर जनरल अल इद्रूस हे बाजूला पडले. निजाम कासिम रझवीच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला.
भारतात किंवा पाकिस्तानात सामील न होता निजामाने स्वतंत्र राष्ट्र बनण्याचे ठरवले, मात्र पाकिस्तानातून सतत संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती. भारताशी निजामाने ऑक्टोबर 1947 मध्ये ’जैसे थे’ करार केला. त्या करारानुसार भारत सरकारला सिकंदराबाद शहरातून आपले सैन्य काढून घ्यावे लागले. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात गव्हर्नर जनरल रिचर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेची योजना सुरू केली. ती सर्वात प्रथम निजामाने स्वीकारली. म्हणजे निजामाच्या रक्षणार्थ इंग्रजांचे सैन्य तैनात झाले. खर्च अर्थात निजाम देणार. हे सैन्य हैद्राबाद शहराजवळ अलवाल नामक खेड्यात छावणी करून राहिले. हळूहळू या छावणीचेच सिकंदराबाद हे शहर बनले. तेव्हापासून सिकंदराबाद ही इंग्रजी सैन्याची छावणी होतीच. आता ते सैन्य भारत सरकारचे झाले. पण ’जैसे थे’ करारान्वये निजामाने भारत सरकारला सिकंदराबाद कँटोन्मेंट रिकामे करायला लावले.
कासिम रझवीचा उन्माद वाढतच चालला. रझाकारांच्या टोळ्या हिंदू प्रजेवर अत्याचार करत गावोगाव हिंडू लागल्या. आजच्या कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातल्या वारावट्टी गावात त्यांनी अशीच एक हिंदू वस्ती पेटवून दिली, इतर असंख्य लोकांप्रमाणेच सईबाव्वा नावाची एक महिला आणि तिची मुलगी या आगीत जळून मरण पावल्या. तिचा सात वर्षाचा मुलगा मात्र कसाबसा बचावला. हा बचावलेला मुलगा म्हणजे सध्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे होत. म्हणजे माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणेच खरगे महाशयांनाही मुसलमानी अत्याचारांचा प्रत्यक्ष अनुभव आहे . (पुढील अंकात)