जवळपास 40 महिन्यांहून अधिक काळ रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. पुतीन आणि झेलेन्स्की हे दोन्हीही नेते मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांच्यासाठी हे युद्ध आता आत्मप्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. त्यातच आता युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ या मोहिमेंतर्गत केलेल्या या हल्ल्यामुळे हे युद्ध नेमके कोणते वळण घेईल, हे सांगता येणार नाही. कारण व्लादीमिर पुतीन हे युक्रेनच्या महाभीषण हल्ल्यानंतर प्रचंड उद्विग्न झाले असून ते प्रत्युत्तरासाठी तयारीही करत आहेत आणि संधीही शोधत आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या संपूर्ण काळात रशियाचे पारडे जड असल्याचे दिसत असतानाच काही दिवसांपूर्वी युक्रेनने केलेल्या महाभीषण आणि घातक अशा हल्ल्याने या घनघोर संघर्षाला नवी कलाटणी मिळाली आहे. आपल्या शत्रूला कधीही कमी लेखू नये, हा धडा रशियाला या हल्ल्याने मिळाला आहे. रशियामध्ये हजारो किलोमीटर आतमध्ये घुसून टीयूसारखी लढाऊ विमाने उद्ध्वस्त करण्याची क्षमता आपल्यात असल्याचे झेलेन्स्कींनी या हल्ल्यातून दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे रशियाच्या एस-400 या क्षेपणास्रभेदी प्रणालीला, एअर बॉम्ब वॉर्निंग सिस्टीम, रडार सिस्टीमला आणि गुप्तचर यंत्रणेला चकवा देऊन युक्रेनने हा हल्ला घडवून आणला आहे. रशियाच्या 40 हून अधिक बॉम्बर्स विमानांचा चक्काचूर करण्यात युक्रेनला यश आले आहे.
‘ऑपरेशन स्पायडर वेब’ या मोहिमेंतर्गत केलेल्या या हल्ल्यामुळे युद्धनीतीची पारंपरिक समीकरणेच बदलून टाकली आहेत. दुसर्या महायुद्धानंतरच्या काळातील युद्धसंघर्षांमध्ये दोन देशांचे सैन्य समोरासमार येताना दिसत होते. परंतु युक्रेनच्या हल्ल्याने प्रतिरोधनाचे आयाम बदलून टाकले आहेत. युक्रेनने केलेला हा हल्ला म्हणजे युद्धनीतीतील नियोजनकौशल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्यांनी अत्यंत कमी पैशांमध्ये मिळणारे, वजनाला हलके असणारे, वाहतुकीसाठी सुलभ असणारे ड्रोन्स ट्रकच्या माध्यमातून रशियामध्ये चोरट्या मार्गाने नेऊन तेथील एअरबेसभोवती तैनात केले होते. त्यानंतर एकाच वेळी या ड्रोन्सच्या झुंडींनी हल्ले सुरू केले आणि पाहता पाहता रशियाची विनाशकारी लढाऊ विमाने उदध्वस्त केली. काही हजार डॉलर्स किमतीच्या या ड्रोन्स अॅटॅकने रशियाचे तब्बल 7 ते 9 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. भविष्यामध्ये ‘ड्रोन्स वॉरफेअर’ हाच युद्धतंत्राचा प्रभावी मार्ग बनून पुढे येणार आहे, याची झलक युक्रेनच्या या हल्ल्याने दाखवून दिली आहे. रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचे हे खूप मोठे अपयश आहे. रशिया हा इराण, चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांसारख्या जागतिक पटलावरच्या अमेरिकाविरोधी देशांच्या फळीचे नेतृत्व करणारा देश आहे. अशा देशाला युक्रेनसारखा छोटा देश तीन वर्षांपासून झुंजवत आहे आणि आता त्याने इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ला करून रशियाला तडाखा दिला आहे, ही बाब व्लादीमिर पुतीन यांच्या जागतिक प्रतिमेला धक्का देणारी आहे.
युक्रेनने केलेल्या या भीषण हल्ल्यांमागे एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे आपली क्षमता दाखवून देणे. तुर्कस्तानच्या इस्तंबूल येथे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धबंदीसाठी चर्चेच्या फेर्या पार पडत आहेत. या चर्चेमध्ये आपण कुठेही कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठीही हा हल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. अन्यथा आजवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची एकंदर भूमिका पाहिली असता, आमच्या हल्ल्यांमुळे युक्रेन जराजर्जर झाला असून युद्धबंदीसाठी व्याकूळ झाला आहे असे जगाला भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. युद्धात आमचे पारडे जड असल्याने युक्रेनने शस्रसंधीसंदर्भातील चर्चांदरम्यान आमच्या अटी व शर्थींचे पालन करायला हवे, असा त्यांचा एकूण सूर राहिला. परंतु स्पायडर वेब हल्ल्याच्या माध्यमातून झेलेन्स्की यांनी या आभासाला छेद दिला. अजूनही आमची तीन-चार वर्षे झुंज देण्याची ताकद आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने आम्ही लढा देऊन रशियालाच कमकुवत करू शकतो, याची खूप मोठी चुणूक या हल्ल्यातून त्यांनी दिली. त्यामुळे शांततेसाठीच्या चर्चांमध्ये झेलेन्स्की यांची सौदेबाजीची क्षमता आता वाढणार आहे.
मुळातच पुतीन आणि झेलेन्स्की हे दोन्हीही नेते मागे हटण्यास तयार नाहीयेत. त्यांच्यासाठी हे युद्ध आता आत्मप्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. पण त्याच वेळी 40 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या संघर्षामुळे दोन्हीही नेते थकलेलेही आहेत. युद्धबंदीसाठीच्या चर्चांची दुसरी फेरी अलीकडेच पार पडली आणि त्यामध्ये दोन्ही देशांनी आपल्या ताब्यात असणार्या युद्धकैद्यांची मुक्तता केली. ही एक सकारात्मक सुरुवात होती. आता येणार्या काळात चर्चेची आणखी एक फेरी पार पडणार आहे. परंतु तोपर्यंत हे युद्ध नेमके कोणते वळण घेईल, हे सांगता येणार नाही. कारण व्लादीमिर पुतीन हे युक्रेनच्या महाभीषण हल्ल्यानंतर प्रचंड उद्विग्न झाले असून ते प्रत्युत्तरासाठी तयारीही करत आहेत आणि संधीही शोधत आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती पाहिल्यास रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव हा परमोच्च पातळीवर पोहोचलेला आहे. कोणत्याही क्षणी हे युद्ध धक्कादायक आणि विनाशकारी वळणावर जाऊ शकते, अशी स्थिती आहे.
रशिया-युक्रेन असो, इस्रायल-हमास संघर्ष असो किंवा पाकिस्तानच्या लष्करी कुरापती असोत, या सर्वांमधून बदलत्या काळातील जगामध्ये विकसित होत चाललेला, पण तितकाच घातक असा एक प्रवाह दिसून येतो. शीतयुद्ध संपले तेव्हा असे वाटले होते की, राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये व्यापार वाढीस लागेल, आर्थिक हितसंबंध महत्त्वाचे ठरतील आणि राजकीय स्वरूपाच्या संघर्षांना फारसे महत्त्व न दिले गेल्याने ते पिछाडीवर पडतील. याला दुसरे एक कारण ठरले ते म्हणजे, त्या काळात संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना, जी-7 यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था मजबूत बनल्या होत्या. युरोपियन महासंघ, आसियान, ब्रिक्स यांसारखे व्यापारसंघही महत्त्वाची भूमिका पार पाडत होते. त्यामुळे राष्ट्रा-राष्ट्रांमधील राजकीय तणावाच्या मुद्दयांचे निराकरण करणारी किंवा त्यांना मागे सारून आर्थिक-व्यापारी हितासाठी एकत्र आणणारी शाश्वत व प्रभावी यंत्रणा वैश्विक स्तरावर सदृढ होती. एकविसाव्या शतकाच्या दुसर्या दशकामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना कमकुवत आणि निष्प्रभ झाल्या आहेत. परिणामी, आज राष्ट्रे वरचढ ठरताना दिसताहेत. प्रत्येक राष्ट्र आपल्या हितसंबंधांनुसार वर्तणूक करताना दिसत आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाहीये. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यादरम्यान अशीच स्थिती जागतिक पटलावर तयार झालेली होती. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात होता; परंतु तो निष्प्रभ बनला होता. त्यामुळेच हिटलर, मुसोलिनी यांसारख्या हुकूमशहांचा उदय आणि प्राबल्य वाढत गेले. त्यातूनच जगाला दुसर्या महायुद्धाचा सामना करावा लागला. वर्तमानात तशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुतीन, झेलेन्स्की, जिनपिंग, नेत्यानाहू यांसारख्या नेत्यांचा वरचष्मा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांपेक्षा राष्ट्रे वरचढ ठरतात तेव्हा आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होण्यास सुरुवात होते. कारण अंतिमतः आंतरराष्ट्रीय कायद्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय संस्थांची आहे. त्याच जर गतप्राण झाल्या असतील, उदासीन बनल्या असतील किंवा भूमिकाहीन वागत असतील तर या कायद्यांचे रक्षण करणार कोण? रशिया-युक्रेन युद्धामध्ये हाच प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले या स्वरूपाचा जो संघर्ष सुरू आहे, तो पाहता कोणत्याही क्षणी हे युद्ध अणुयुद्धात रूपांतर होऊ शकते.
रशिया हा लष्करी साधनसामग्री आणि शस्रास्रांच्या बाजारपेठेतील एक मोठा जागतिक खेळाडू आहे. भारतासह अनेक देशांना संरक्षण साधनसामग्रीची, लढाऊ विमानांची निर्यात करण्यामध्ये रशिया आघाडीवर राहिलेला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरण्यात आलेली एस400 ही क्षेपणास्रभेदी प्रणाली काही अब्ज डॉलर्स किमतीला रशियाने भारताला विकलेली आहे. मात्र युक्रेनने केलेल्या ताज्या हल्ल्यामुळे रशियाची सामरिक पत खालावली आहे. रशियाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ती सावरण्यासाठी ब्लादीमिर पुतीन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकतात, असे दिसते.
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.