पंढरीचा पांडुरंग सर्वार्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा मूलाधार आहे, मूळ चैतन्य आहे हेच यातून प्रकर्षाने जाणवते. अंतर्गत भेदाभेद आणि जातीपातीच्या सामाजिक विघटनाने गलितगात्र झालेल्या समाजाला हे पंढरीचे दैवत केवढे आधारभूत ठरलेले आहे
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या समाजमानसाचे आणि भावजीवनाचे साक्षात प्रकटीकरण आहे. हा केवळ भावभक्तीचाच नव्हे तर एक महान सामाजिक सोहळा आहे. या सोहळ्याचा केंद्रबिंदू आहे, पंढरीचा पांडुरंग. ‘आकाशात पतितं तोयं’ या उक्तीप्रमाणे आषाढ मासात उभ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे भावभक्तीचे ओघ चंद्रभागेकडे धावू लागतात. मातीला भक्तीच्या जिव्हाळ्याचा गंध येतो. येथील प्रत्येक दगडा-दगडाला टाळचिपळीचा नाद येतो. पंढरीच्या वाटेने वाहणार्या वार्याच्या झुळकांवर भगव्या पताकांचं मोहरलेलं शिवार विमुक्तपणे सळसळू लागतो. सर्व काही एकाच भक्तिरसात एकजीव होते.
पंढरीचा पांडुरंग सर्वार्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा मूलाधार आहे, मूळ चैतन्य आहे हेच यातून प्रकर्षाने जाणवते. अंतर्गत भेदाभेद आणि जातीपातीच्या सामाजिक विघटनाने गलितगात्र झालेल्या समाजाला हे पंढरीचे दैवत केवढे आधारभूत ठरलेले आहे, हे प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर पंढरीची वारी अनुभवावी. संत ज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत या संतांच्या मांदियाळीने समाजातील सर्व प्रकारचे अवडंबर आणि इतर शूद्र देवतांचा बडिवार कमी करून सर्व प्रकारच्या सामाजिक श्रद्धांचे विठ्ठलाच्या माध्यमातून एकत्रीकरण केले. संपूर्ण समाजाची धार्मिक दिशा आणि गती एक केली. वारकरी संप्रदायाच्या रूपाने विखुरलेल्या सर्व धाग्यांना एका संघटन सूत्रात गुंफून त्याची जणू एक अभेद्य समाज संघटना निर्माण केली. सर्व प्रकारच्या सामाजिक आघातांना हा महाराष्ट्र जर पुरून उरला असेल तर त्याच्या शक्तीचा मूळ स्रोत आहे हा पंढरीचा वारकरी. कारण त्याला ‘विष्णुमय जग‘ हेच तत्त्व माहीत असते.
या वारीतील गोपाळकाला म्हणजे मूर्तिमंत समरसता, जी गोपाळकृष्णाने आपल्या सर्व सवंगड्यांना एकत्र आणून ‘काला वाटू एकमेका। वैष्णव निका संभ्रम॥‘ अशी दाखवून दिली. तेच तत्त्व वारकर्यांनी पंढरीच्या वाळवंटात अनुसरले आणि भेदाभेदभ्रम अमंगळ हे दाखवून दिले. ‘सांडूनिया वाळवंट। काय इच्छितोसी वैकुंठ॥‘ असे म्हणून ‘आजि ओस अमरावती। काला पाहावया येती॥‘ या शब्दांत काल्याचे महत्त्व व्यक्त झाले आहे. रूढ अर्थाने जे नास्तिक अथवा अभक्त आहेत त्यांनाही भक्तीचे सामर्थ्य दाखवून अंतर्मुख करते ती वारी. भारतीय संस्कृतीच्या उच्च आणि उदात्त नैतिक मूल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर ते वारीतच मिळते. ‘पाषाणा पाझर फुटती रे‘ असे उगाच म्हटलेले नाही.
या संपूर्ण वारीचे समापन होते ते काल्याच्या कीर्तनाने व काल्याने... सर्वच अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होते. तो काला हेच अंतिम सत्य आहे आणि विठ्ठलदर्शनानंतर वारकर्याला आस असते गोपाळपुर्याची. कारण तो गोपाळ जेव्हा आपल्याला काला भरवेल तेव्हाच आपले पारणे सुटेल अशी त्याची धारणा असते. हे गोपाळपूर आणि भगवान कृष्ण यांचे अभिन्न नाते आहे. भगवान कृष्ण आपल्या गाईगोपाळांसहित येथे नांदतात. येथे आपल्या गोपाळांसहित ते गोपाळकाला करतात. त्यामुळे आपण त्यांना काला अर्पण करून तो प्रसादरूपाने सेवन केला पाहिजे ही भाविकांची भावना असते. ‘काला करिती संतजन। सवे त्यांच्या नारायण॥ वाटे आपुल्या निजहस्ते। भाग्याचा तो पावे तेथे॥‘ असे यामुळेच म्हटलेले आहे. श्रीकृष्णाने काल्याच्या निमित्ताने त्यावेळेच्या समाजास एकसूत्रात ओवले, त्यांच्यात बंधुत्व निर्माण केले. जातिभेदाला महत्त्व न देता गुणकर्माचा उत्कर्ष करून सर्वांना कर्तव्याची दीक्षा दिली. श्रीकृष्णाचा काला म्हणजे खरेखुरे समाजदर्शन व प्रेम-संघटन होते. काल्याला भक्त देवाचा प्रसाद मानतील आणि सुशिक्षित साधे सहभोजन समजतील. परंतु कृष्णाने सर्वांच्या शिदोर्यांमधून प्रत्येकांच्या घरची परिस्थिती लक्षात आणली, त्यांच्या मनांची मिळवणी केली आणि सर्वांनी सारखे खावे-प्यावे, समाजाच्या पुढार्यांनीही जनतेच्या जीवनात मिसळून जावे ही शिकवण त्यातून दिली.
या पंढरीच्या वारीला केवळ पारलौकिक सोहळा म्हणून संबोधून चालणार नाही. समाजसंघटनेच्या दृष्टीने ऐहिक जीवनालाही फार मोठे महत्त्व आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक आव्हाने समाजावर येऊन आदळत असतात आणि त्याला तोंड देताना समाज संघटनेला तडा देऊन चालत नाही. या वारीची परंपरा सुरू झाली तेव्हापासून संतांनी या भावभक्तीला समाजजागरणाची जोड दिली आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि कुरिती या उखडून टाकण्यासाठी आणि आपण सर्व समान आहोत, आपण सर्व एक आहोत ही भावना रूजविण्यासाठी समाजाचे प्रबोधन केले आहे. आज आपला समाज विविध आक्रमणांना पचवून उभा राहिलेला आहे त्यामागे याच संतकार्याची प्रेरणा आहे.
ही आव्हाने आज संपुष्टात आलेली नाहीत. समाजाला संघटित भावाची आणि एकतेची शिकवण देणार्या या सामाजिक विद्यापीठात आज शहरी नक्षलवादी आणि भोंगळ समाजविघातक तत्त्वे खोट्या भक्तीचा बुरखा पांघरून चंचुप्रवेश करू लागलेले आहेत. पण ही सामाजिक सद्भावाची पताका आपल्या खांद्यावर उंच उचलून धरलेले पंढरीरायाचे वारकरी या मायावी मारिचांची मनोरथे पूर्ण होऊ देणार नाहीत.
या पंढरीच्या वारीत चार पावले चालले आहेत तेसुद्धा दैवाचे आहेत. कारण महाराष्ट्राच्या लोकभावनेवर अधिराज्य गाजवणार्या एका एकरस आणि समरस निकोप समाजमन घडविणार्या प्रक्रियेचे दर्शन त्याला अवश्य घडते व जीवनातील विविध आव्हानांना पुरून उरण्याचा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. हे सारे जाणून घेण्याची संधी मानवमात्राला या वारीच्या निमित्ताने प्राप्त होत असते. साप्ताहिक विवेकची ही साहित्यवारी अक्षरधनाने आपल्या वाचकांना तेच दर्शन या भक्ती विशेषांकाच्या माध्यमातून घडवित आहे.