उदयगिरीची साधी, तरीही सुंदर अशी गणेशमूर्ती म्हणजे श्रीगणेशाच्या भारतीय जनमानसातल्या स्थानाच्या स्थित्यंतराच्या काळातली आहे. तो अजून सणांचा देव झालेला नाही, तो अजून कहाण्यांचा देव झालेला नाही पण त्या मूर्तीमधले देवत्व मात्र आपल्याला अजूनही जाणवते, सतराशे वर्षांच्या काळानंतरही. आणि म्हणूनच, उदयगिरीच्या त्या प्राचीन गुंफांमधल्या या गणेशमूर्तीसमोर उभं राहिलं की, आपण केवळ श्रीगणेशाचं दर्शन घेत नाही तर आपण इतिहासाच्या उंबरठ्यावर उभे असतो.
शिल्पसंवाद ह्या माझ्या सदरातील हा दुसरा लेख. कुठल्याही शुभकार्याची सुरवात नेहमी गणेशवंदनेने करायची असा आपल्या संस्कृतीत संकेत आहे. त्यामुळे आज आपण जी मूर्ती समजून घेणार आहोत ती आहे विघ्नहर्त्या गजाननाची. विघ्नांचा नाश करून मांगल्याची, पावित्र्याची स्थापना करणारा देव म्हणून श्रीगणेशाला हिंदू धर्मात अग्रपूजेचा मान आहे. म्हणूनच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात केली की, आपण म्हणतो आपण त्या कार्याचा श्रीगणेशा केला. असा हा बुद्धीचा, मांगल्याचा देव श्रीगणेश. पण भारतीय शिल्पकलेत श्रीगणेशाच्या प्रतिमा तशा थोड्या उशिरानेच निर्माण व्हायला लागल्या. आज आपण जी गणेशमूर्ती पाहणार आहोत ती मध्य प्रदेशातील विदिशाजवळील उदयगिरी ह्या शैलगृहांमधली आहे. या गुंफा गुप्तकाळातल्या अत्यंत महत्त्वाच्या शिल्पस्थळांपैकी एक आहेत. सम्राट चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य यांच्या कारकिर्दीत साधारण कॉमन ईराच्या चौथ्या-पाचव्या शतकादरम्यान या गुहा कोरण्यात आल्या, हे आपल्याला तेथे सापडलेल्या संस्कृत शिलालेखांमुळे कळते.
गुप्त राजवंशाचा काळ हा प्राचीन भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. साहित्य, संगीत, नृत्य, शिल्प, मंदिरस्थापत्य ह्या सर्व अभिजात कलांना गुप्त काळात उदार राजाश्रय मिळाला. सुमारे सतराशे वर्षांपूर्वी खोदलेल्या ह्या उदयगिरीच्या गुंफांमधली शिल्पे आजही आपल्याला स्तिमित करतात. इथली महाकाय वराह मूर्ती तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. त्याच गुंफांमधली ही सुबक, सुंदर अशी श्रीगणेशाची मूर्ती भारतात सापडलेल्या प्राचीनतम् गणेशमूर्तींपैकी एक आहे.
श्रीगणेशाच्या जन्माची लोकप्रिय कथा तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेच. एक दिवस शिवपत्नी पार्वती आंघोळीला गेलेली असताना तिने आपल्या शरीराला लावलेल्या उटण्यापासून एक मुलगा बनवला आणि गंगाजलाने त्या मुलाला जिवंत करून त्याला द्वारपाल म्हणून उभा केला व पार्वती स्नान करायला गेली. तेवढ्यात भगवान शंकर घरात शिरायला लागले आणि पार्वतीच्या ह्या द्वारपालाने त्यांचा विरोध केला. चिडून भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचा शिरच्छेद केला. त्याचा देह मांडीवर घेऊन पार्वती शोक करू लागली. तेव्हा इतर देवांनी शोधाशोध करून एका हत्तीचे मस्तक शोधून आणले. शंकरांनी ते मस्तक त्या द्वारपालाच्या धडावर बसवून त्याला परत जिवंत केले व आपल्या गणांचा अधिपती नेमले.
उदयगिरी हा शैलगृह समूह प्रामुख्याने भगवान विष्णू आणि शिवांशी निगडित आहे. येथील विराट वराह शिल्प हे भारतीय शिल्पपरंपरेतील मैलाचा दगड मानले जाते. पण याच पवित्र परिसरात, एका कोनाड्यात बसलेला हा छोटासा दगडात कोरलेला श्रीगणेश आपल्याला एका वेगळ्याच ऐतिहासिक क्षणाकडे घेऊन जातो. उदयगिरी येथील ही गणेशमूर्ती भारतातील सर्वांत प्राचीन स्वतंत्र गणेशमूर्तींपैकी एक मानली जाते. येथे स्वतंत्र हा शब्द महत्त्वाचा आहे. यापूर्वी गणेश आपल्याला क्वचित ग्रंथांमधून, लहान मृत्तिकामूर्तींमधून किंवा इतर देवतांच्या संगतीत दिसतो. पण गुप्तकाळात प्रथमच श्रीगणेश स्वतंत्रपणे मूर्तीस्वरूपात साकार झालेले दिसतात.
नीट पाहा या गणेशमूर्तीकडे. ह्या मूर्तीचे हत्तीचे मस्तक अनलंकृत आहे. त्यावर मुकुट किंवा अन्य अलंकार दिसत नाहीत. हा गणपती डाव्या सोंडेचा आहे आणि त्याच्या एका हातात मोदकपात्र आहे. त्याचे वाहन जो उंदीरमामा तोही ह्या शिल्पात दिसत नाही. मूर्तीला फक्त दोनच हात आहेत. चतुर्भुज गणेश कोरायला गुप्त काळानंतरच सुरुवात झाली. ह्या मूर्तीचा देह जड आहे. पोट पुढे आलेले आहे. हातपाय मांसल, भारदस्त. चेहर्यावर प्रसन्न हास्य नाही, खेळकरपणा नाही. सोंड साधी आहे, फार वळणावळणांची नाही. कान मोठे आहेत, पण फार डौलदार नाहीत. हत्तीचे मस्तक असल्यामुळे ह्या श्रीगणेशाच्या शिल्पामध्ये त्याचे तुंदिलतनु पोट, हत्तीची सोंड, सुपासारखे कान आणि विशाल गंडस्थळ ही सर्व लक्षणे दिसून येतात. पण हा गणेश अजून घराघरांत विराजमान झालेला भक्तप्रिय देव झालेला नाही.
हा आहे विघ्नेश्वर, पार्वतीने घडवल्याप्रमाणे दाराशी बसणारा, येणार्या संकटांवर नजर ठेवणारा, अडथळ्यांचे नियंत्रण करणारा. स्टेला क्रॅमरिश यांनी गुप्तकाळातील शिल्पांविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. हा काळ अलंकारांचा नाही, तर देवतत्त्वाच्या मूर्तीरूपातल्या आविष्काराचा आहे. उदयगिरी गुंफांमधली सर्वच शिल्पे पुढच्या काळातल्या मूर्तींच्या मानाने अनलंकृत आणि साधी वाटतात. मूर्तींचे सौंदर्य थोडे कमी वाटत असले तरी आशय ठाम आहे. उदयगिरीचा गणेश याचेच मूर्त रूप आहे.
या गणेश मूर्तीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ह्या गुंफामधले स्थान. गणेश येथे प्रमुख देव नाही, पण गौणही नाही. तो उंबरठ्यावर आहे. गुप्तकाळात श्रीगणेशाकडे याच भूमिकेत पाहिले जात होते. ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया’ ही श्रीगणेशाची भक्तवत्सल ही संकल्पना अजून पूर्ण विकसित झालेली नव्हती, पण गणेशाकडे विघ्नहर्ता म्हणून पाहण्याची जाणीव स्पष्टपणे आकार घेत होती. छोटीशीच, अगदी साधी आणि अनलंकृत असली तरी ही गणेश मूर्ती अतिशय गोंडस आणि प्रमाणबद्ध आहे. विशेष म्हणजे ह्या मूर्तीच्या हातात कसलेच आयुध नाही. शिल्पकाराने टोकाशी किंचित दुमडलेले हत्तीचे कान मात्र फार सुंदर रीतीने दाखवले आहेत.
पुढील शतकांत गणेश कसा बदलत जातो, हे पाहिले की उदयगिरीचे महत्त्व अधिक ठळक होते. नंतरच्या काळात शिल्पांमधून श्रीगणेश मूर्तींचे हात वाढले, हातात आयुधे आली, देहावर, मस्तकावर अनेक अलंकार आले, एकाहून जास्त मुखेही आली. श्रीगणेशाचे अनेक विभ्रम, अनेक मुद्रा, अनेक आविष्कार आपल्या शिल्पकारांनी आपल्या कलेमधून समूर्त केले. गुप्तोत्तर काळात श्रीगणेशाच्या हातात आयुधे येतात, मुद्रांची संख्या वाढते. चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट काळात गणेश अधिक स्पष्टपणे संहिताबद्ध होतो. चोल कांस्यशिल्पांत तो लयबद्ध, नृत्यशील, सौम्य होतो. मध्ययुगात तर तो घराघरांत प्रवेश करतो, आपल्या सर्वांच्या ओळखीचा विघ्नहर्ता, मंगलकर्ता, लाडका गणपती.
पण उदयगिरीतला हा गणेश त्या सगळ्याआधीचा आहे. मला ही मूर्ती आवडते ती तिच्या नैसर्गिक साधेपणामुळे. ही गणेशमूर्ती आपल्याला आठवण करून देते की, मूर्तिशास्त्र ही अनेक शतके विकसित होत गेलेली कला होती. आज आपल्या कल्पनेत जसे आपले देव नेहमीच गोड, ओळखीचे, सुंदर, सालंकृत असे दिसतात, ते स्वरूप शिल्पकलेमध्ये हळूहळू येत गेले. या गणेशमूर्तीचा विचार करताना तिच्याकडे केवळ पुराकथांच्या किंवा सौंदर्यशास्त्राच्या आधाराने नव्हे, तर भारतीय मूर्तिशास्त्राच्या विकासक्रमाच्या संदर्भात पाहणे आवश्यक आहे. भारतीय शिल्पपरंपरेत देवमूर्तींची निर्मिती ही केवळ कलाकाराच्या कल्पनेवर अवलंबून नसून, ती शिल्पसूत्र आणि वास्तुशास्त्र यांच्या चौकटीत बांधलेली होती. मानसार, मयमतम्, शिल्परत्न, विश्वकर्मप्रकाश आणि अपाराजितपृच्छा यांसारख्या ग्रंथांमध्ये देवमूर्तींचे प्रमाण, आसन, अवयवांची रचना, हस्तमुद्रा आणि भाव यांचे तपशीलवार निर्देश दिलेले आहेत. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, हे ग्रंथ ज्या संहिताबद्ध स्वरूपात आपल्याला आज उपलब्ध आहेत, ते मुख्यतः गुप्तोत्तर आणि प्रारंभिक मध्ययुगीन काळात निश्चित झाले.
उदयगिरीचा गणेश हा त्या आधीच्या संक्रमणकालाचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे येथे आपण पूर्णतः संहिताबद्ध अशी श्रीगणेशमूर्ती पाहात नाही, तर नियम आकार घेत असलेली देवप्रतिमा पाहतो. म्हणूनच या मूर्तीमध्ये नंतरच्या काळात अनिवार्य ठरलेली चतुर्भुज रचना, आयुधे, वाहन किंवा विस्तृत अलंकार अनुपस्थित आहेत. ही अनुपस्थिती मूर्तिशास्त्रीय अपूर्णता नसून, ऐतिहासिक विकासाचा एक टप्पा आहे.
भारतीय मूर्तिशास्त्राचे आद्य अभ्यासक टी. ए. गोपीनाथ राव यांनी स्पष्ट केले आहे की, गुप्तकाळातील देवमूर्ती या आलंकारिक सौंदर्यापेक्षा तत्त्वप्रधान अभिव्यक्तीवर भर देतात. उदयगिरीचा गणेश हीच प्रक्रिया मूर्त स्वरूपात दाखवतो, जिथे देवत्वाची संकल्पना आधी दृढ होते आणि तिचे दृश्य व्याकरण पुढील शतकांत क्रमाक्रमाने विकसित होते. म्हणून ही गणेशमूर्ती केवळ भक्तिभावाचा विषय न राहता, भारतीय धार्मिक कला आणि तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा ठरते.
उदयगिरीची ही साधी, तरीही सुंदर अशी गणेशमूर्ती म्हणजे श्रीगणेशाच्या भारतीय जनमानसातल्या स्थानाच्या स्थित्यंतराच्या काळातली आहे. तो अजून सणांचा देव झालेला नाही, तो अजून कहाण्यांचा देव झालेला नाही पण त्या मूर्तीमधले देवत्व मात्र आपल्याला अजूनही जाणवते, सतराशे वर्षांच्या काळानंतरही. आणि म्हणूनच, उदयगिरीच्या त्या प्राचीन गुंफांमधल्या या गणेशमूर्तीसमोर उभं राहिलं की, आपण केवळ श्रीगणेशाचं दर्शन घेत नाही तर आपण इतिहासाच्या उंबरठ्यावर उभे असतो.