फेब्रुवारी 2019मध्ये दिल्ली-वाराणसी या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन धावल्यानंतर त्यांचे जाळे देशभर झपाट्याने विस्तारले आहे. आता देशभरात ब्याऐंशी मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. विविध राज्यांतील महत्त्वाची शहरे, धार्मिक केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि प्रशासकीय राजधानी या ट्रेन्सनी जोडली जात आहेत. या ट्रेनमुळे वेळेची बचतही होत आहे. यातील सोयीसुविधा पारंपरिक गाड्यांपेक्षा खूपच प्रगत आहेत. आजवर धावणार्या सर्व वंदे भारत ट्रेन या दिवसाच्या प्रवासासाठी असल्यामुळे त्यात केवळ बसण्याची सोय होती. दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी झोपता येण्याची गरज लक्षात घेऊन स्लीपर वंदे भारत ट्रेन विकसित करण्याचे ठरवले गेले. हावडा ते कामाख्या (गुवाहाटी) या मार्गावर अशी ट्रेन या महिन्यात धावू लागेल. एकंदरीतच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेची अभिमानास्पद कामगिरी सुरू आहे.
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत अवाढव्य रेल्वे व्यवस्थांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेची ओळख आजवर संथ गती, जुनाट डबे, मर्यादित सुविधा आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे होणारी गर्दी अशीच राहिली. जागतिक स्तरावर रेल्वे क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना भारतातही मूलभूत परिवर्तनाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. देशातला वेगवान प्रवास केवळ देशाच्या आणि काही राज्यांच्या राजधान्यांपुरता मर्यादित राहिला होता. नोव्हेंबर 2016मध्ये सुरजकुंड येथे आयोजित केल्या गेलेल्या रेल्वे विकास शिबिरात यावर विचारमंथन झाले आणि पूर्णपणे भारतीय बनावटीच्या जागतिक दर्जाच्या विजेवर चालणार्या ट्रेन्स बनवण्याची दिशा ठरवण्यात आली. त्यांच्या निर्मितीसाठी चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीची निवड झाली.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संकल्पना आणि उद्दिष्टे
वंदे भारत ट्रेन धावणे ही ‘नव्या प्रकारांमध्ये आणखी एकाची भर’ अशा स्वरूपाची नसून भारतीय रेल्वेच्या भविष्याची दिशादर्शक घटना आहे. देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या बळावर आधुनिक, वेगवान आणि प्रवासी-केंद्रित ट्रेनचे जाळे उभारण्याचा हा प्रकल्प आहे. वंदे भारत ट्रेनमागील उद्दिष्ट केवळ प्रवासाचा वेळ कमी करणे नसून प्रवासाच्या संपूर्ण अनुभवात आमूलाग्र सुधारणा घडवणे हे होते.
पूर्वी प्रवासी कार कंपन्या आपल्या आधीच्या मॉडेलमध्ये किरकोळ बदल करून नवी मॉडेल बाजारात आणत असत. बाह्य रचनेत थोडाफार बदल करणे, काही नवी वैशिष्ट्ये जोडणे आणि त्याला नवीन नाव देणे एवढ्यावरच समाधान मानले जाई. अनेक दशकांपर्यंत भारतीय रेल्वेचेही असेच चित्र होते. सुपरफास्ट म्हणवल्या जाणार्या ट्रेन्स सुरू केल्या जात, मात्र डब्यांची रचना, अंतर्गत सुविधा आणि तांत्रिक मांडणी फारशी बदलत नसे. वंदे भारत ट्रेनच्या निमित्ताने ही परंपरा मोडली गेली. डिझाइन, साहित्य, तंत्रज्ञान आणि प्रवासी सुविधा या सर्व पातळ्यांवर प्रथमच एकत्रित आणि व्यापक बदल करण्यात आला.
तांत्रिक वैशिष्ट्ये आणि रचनात्मक सुधारणा
पारंपरिक गाड्या एक किंवा दोन इंजिनांच्या सहाय्याने ओढल्या जातात; तर वंदे भारत ट्रेनच्या अनेक डब्यांखाली मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. स्वतंत्र इंजिन नसल्यामुळे दिशा बदलण्यासाठी गाडी उलटी फिरवण्याची गरज उरत नाही. वेग वाढवण्याची (त्वरण) क्षमता अधिक होते, ब्रेकिंग अधिक प्रभावी होते आणि ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षम होतो. हलके परंतु मजबूत साहित्य वापरून डबे तयार करण्यात आले आहेत. सुधारित सस्पेन्शन प्रणालीमुळे जलद प्रवासदेखील तुलनेने विनाधक्क्यांचा राहतो.
वंदे भारत ट्रेनमधील सोयीसुविधा पारंपरिक गाड्यांपेक्षा खूपच प्रगत आहेत. स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे, डिजिटल माहिती फलक, प्रवासादरम्यान स्थानकांची माहिती देणारी प्रणाली, आरामदायी आणि प्रशस्त आसने, वैयक्तिक चार्जिंग पॉइंट्स, वायफाय, आधुनिक वातानुकूलन व्यवस्था, एकूणच ध्वनीची पातळी कमी असल्याचा साधलेला परिणाम आणि स्वच्छ जैवशौचालये अशा सुविधा प्रवाशांना अतिशय आल्हाददायक अनुभव देतात. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष जागा, रॅम्प आणि सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ट्रेन्सची समोरासमोर धडक होऊ नये याकरता देशातच विकसित केलेली ‘कवच’ ही प्रणाली वंदे भारत ट्रेन्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
फेब्रुवारी 2019मध्ये दिल्ली-वाराणसी या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन धावल्यानंतर त्यांचे जाळे देशभर झपाट्याने विस्तारले आहे. आता देशभरात ब्याऐंशी मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. विविध राज्यांतील महत्त्वाची शहरे, धार्मिक केंद्रे, औद्योगिक पट्टे आणि प्रशासकीय राजधानी या ट्रेन्सनी जोडली जात आहेत. या मार्गांची यादी देणे विस्तारभयास्तव टाळले आहे. वंदे भारत ट्रेनच्या जाळ्यामध्ये देशातील तिसर्या स्तरातील शहरेदेखील जोडली गेली आहेत. वंदे भारत ट्रेनमुळे अनेक मार्गांवर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
सुरुवातीचा दुष्प्रचार आणि वास्तव
वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार करण्यात आला. जनावरांशी धडक झाल्यावर या ट्रेनच्या बांधणीच्या भक्कमपणावर शंका उपस्थित करण्यात आल्या. प्रत्यक्षात अशा घटना इतर गाड्यांबाबतही नियमितपणे घडतात. मात्र भारत सरकारच्या कोणत्याही नव्या उपक्रमाचे स्वागत करण्याऐवजी त्यावर टीका करण्यासाटी वाटेल तशी खुसपटे काढण्याची 2014नंतर रूढ झालेली प्रथा या ट्रेनबाबतही पाळली गेली. वंदे भारत ट्रेनचे जाळे देशभरात पसरवण्याची योजना असल्यामुळे निव्वळ जळफळाटापोटी तिला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. सुरुवातीला आढळलेले दोष आणि काही वर्षांमध्ये आलेले अनुभव या आधारांवर आवश्यक त्या सुधारणा केल्या गेल्या. एव्हाना या ट्रेनबाबतचा दुष्प्रचार ओसरला आहे. उलट ही ट्रेन आतून आणि बाहेरून पाहिल्यावर भारतीय प्रवाशांच्या बरोबरीने परदेशी प्रवाशांच्यादेखील चेहर्यावर उमटणारे कौतुकयुक्त आश्चर्याचे भाव या प्रकल्पाची यशोगाथा सांगून जातात. एका जर्मन प्रवाशाने या ट्रेनच्या केलेल्या कौतुकाचा व्हिडिओ लोकप्रिय; म्हणजे व्हायरल झाला होता.
वंदे भारत स्लीपर ट्रेन - नवा टप्पा
आजवर धावणार्या सर्व वंदे भारत ट्रेन या दिवसाच्या प्रवासासाठी असल्यामुळे त्यात केवळ बसण्याची सोय होती. दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी झोपता येण्याची गरज लक्षात घेऊन स्लीपर वंदे भारत ट्रेन विकसित करण्याचे ठरवले गेले. हावडा ते कामाख्या (गुवाहाटी) या मार्गावर अशी ट्रेन या महिन्यात धावू लागेल. या ट्रेनच्या विविधांगी चाचण्यांपैकी कंपन (व्हायब्रेशन) चाचणीचा व्हिडिओ अतिशय लोकप्रिय झाला. पाण्याने काठोकाठ भरलेले तीन काचेचे ग्लास शेजारी ठेवून त्यांच्यावर पाण्याने काठोकाठ भरलेला आणखी एक काचेचा ग्लास ठेवल्यावर ताशी 180 किमी वेग असतानाही वरचा ग्लास पडला नाही की एकाही ग्लासमधील पाणी सांडले नाही हे दाखवणारा तो व्हिडिओे आहे. वेग एवढा असताना डब्यांमध्ये होणारे कंपन, बर्थला बसणारे हादरे, ध्वनीची पातळी आणि प्रवाशांच्या आरामावर होणारा परिणाम यांचा अभ्यास या चाचण्यांदरम्यान केला गेला. मुळात हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक मानला जातो. ताशी 180 किमी वेगासाठी चाचणी केलेल्या या ट्रेन प्रत्यक्षात ताशी 130 किमी वेगाने धावतील.
वाढती मागणी आणि प्रवासभाडे
सध्या एका मार्गावर एकच वंदे भारत ट्रेन धावत आहे. काही मार्गांवर वंदे भारत ट्रेन्सच्या अधिक वारंवारितेची मागणी होत आहे.
वंदे भारत ट्रेनचे भाडे पारंपरिक एक्सप्रेस ट्रेन्सपेक्षा अधिक आहे. वेळेची बचत आणि सुविधा यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात, हे मान्य असले तरी देशातील मोठा मध्यमवर्ग आणि गरीब प्रवासी वर्ग अजूनही किफायतशीर प्रवासावर अवलंबून आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेन्सचे जाळे वाढवताना सामान्यांसाठी किफायतशीर प्रवासदर असलेल्या ट्रेन्सकडे दुर्लक्ष होता कामा नये. अशा गाड्यांमधून कोट्यवधी लोक दररोज प्रवास करतात. वंदे भारतसारख्या प्रगत सेवांसोबतच या किफायतशीर गाड्यांचे जाळे मजबूत ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रवासी तिकिटांवर अनेकदा असा उल्लेख असतो की, एकूण खर्चाच्या केवळ काही टक्के रक्कमच शुल्काद्वारे वसूल होते. उर्वरित खर्च मालवाहतुकीच्या महसुलातून भरून काढला जातो. या परिस्थितीत प्रवासी भाडे दीर्घकाळ कृत्रिमरित्या कमी ठेवणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. साधे उदाहरण द्यायचे तर सध्या पुणे-मुंबई रेल्वेप्रवास शंभर ते सातशे रूपये एवढ्या मोठ्या फरकात होतो. त्यातही सर्वाधिक प्रवासी कमी दराने प्रवास करणारे असतात हे लक्षात घेतले तर यातील आतबट्ट्याच्या व्यवहाराची कल्पना येऊ शकते. अर्थात सरकारला सामाजिक भान जपावे लागत असले तरी अशी सेवा रेल्वेखात्याला किमान तोट्यातून तरी बाहेर काढणारी हवी या अपेक्षेत काही गैर नाही.
भविष्यात सर्वच रेल्वेप्रवासासाठी अशा प्रकारच्या आधुनिक सोयी असलेल्या गाड्या उपलब्ध होतील आणि त्या अधिक ठिकाणी थांबतील की मोजक्या ठिकाणी एवढाच प्रश्न उरेल. वंदे भारत ट्रेन्सच्या बांधणीपूर्वी असे चित्र डोळ्यासमोर आणणेही अशक्य होते.
मालवाहतुकीचा मंद वेग आणि त्याचे परिणाम
भारतीय रेल्वेखात्याचा सर्वाधिक म्हणजे सुमारे 65% महसूल मालवाहतुकीतून मिळतो. तरीही देशातील मालगाड्यांचा सरासरी वेग ताशी 20-25 किमी इतका मंद असल्याचा विरोधाभास दिसतो. प्रवासी गाड्यांना प्राधान्य आणि खास मालवाहतुकीसाठीच्या आधुनिक सुविधांचा अभाव यामुळे मालवाहतूक संथ होते आणि एकूणच पुरवठा साखळीवर त्याचा विपरित परिणाम होतो. अनेक देशांमध्ये मालवाहतुकीचा सरासरी वेग ताशी साठ किमीपेक्षा अधिक असल्याचे पाहता वंदे भारत ट्रेनच्या स्वरूपात भारतातील प्रवासी वाहतूक कात टाकत असताना भारताला मालवाहतुकीच्या कार्यक्षमतेवर किती मोठे काम करावे लागणार आहे हे लक्षात येते. अवाढव्य प्रमाण असलेल्या औद्योगिक मालवाहतुकीबरोबरच सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत असलेल्या कृषीमालाच्या वाहतुकीच्या जाळ्याचा विस्तार करण्याचे कामदेखील मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. ’किसान रेल’सारख्या शेतीमालाच्या वेगवान, रेफ्रिजरेटेड वाहतुकीच्या जाळ्याची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. यातून केवळ शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे नाही; तर रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडेल. त्यामुळे एकूणच मालवाहतुकीच्या विस्ताराकडे आणि वेगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अभिनंदनीय धोरण सातत्य
पूर्वी भाजपेत्तर सरकारांच्या काळात अनेकदा रेल्वेमंत्री ज्या राज्यातून येत असे, त्या राज्यालाच नव्या ट्रेन्ससाठी आणि अन्य कारणांसाठी प्राधान्य मिळत असे. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील आजवर दुर्लक्षित असलेल्या प्रांतांसह संपूर्ण देशभर रेल्वे विकासाची घोडदौड सुरू आहे. पीयूष गोयल रेल्वेमंत्री असताना रेल्वेखात्याला स्पष्ट धोरणात्मक दिशा मिळाली. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनीही त्याच दिशेने सुसंगत वाटचाल सुरू ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर या वाटचालीचा वेग वाढवला आहे. मोदी सरकारमधील रेल्वेमंत्र्यांची कर्तबगारी हा एक महत्त्वाचा विषय आजवर दुर्लक्षित राहिला आहे. 2047पर्यंत भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा मिळवण्याचे जे उद्दिष्ट पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे, त्याअंतर्गत वंदे भारत ट्रेनच्या मार्गांची संख्या 4,500 इतकी वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठरवण्यात आले आहे. त्या दृष्टीने पायाभरणी करण्याचे काम चालू आहे.
वंदे भारत जाळ्याच्या मर्यादा आणि भविष्यातील योजना
वर उल्लेख केल्याप्रमाणे हावडा-गुवाहाटी या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी ताशी 180 किमी वेगासाठी केली गेली असली, तरी बहुतांश मार्गांवर वंदे भारत ट्रेनचा सरासरी वेग सुमारे ताशी 85 किमी इतका कमी आहे. काही मार्गांवर प्रवासाला लागणार्या वेळेत फार बचत न होण्याचे कारण ते आहे. हे पाहता विविध मार्गांवर संपूर्ण लोहमार्गाची नव्याने बांधणी करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हे काम अतिशय वेळखाऊ असते. वंदे भारत ट्रेनच्या जलदगती डिझाइनसाठी स्पेनच्या टॅल्गो ट्रेनच्या डिझाइनचा विचार करण्यात आला होता. या ट्रेन ताशी 230 किमीपेक्षा अधिक वेगाने धावू शकतात. मात्र ट्रेनचे जमिनीपासूनचे अंतर कमी असल्यामुळे ते भारतातील रेल्वे प्लॅटफॉर्मशी मेळ खाणारे नव्हते. या ट्रेन्सची किंमत आणि त्यांच्या देखभालीचा खर्चदेखील बराच अधिक असतो. या सर्व कारणांमुळे या परदेशी ट्रेन घेण्याऐवजी पूर्णपणे भारतात बनवलेल्या वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भविष्यात लोहमार्गांची संरचना नव्याने करण्यात आल्यानंतर या ट्रेन्स अधिक वेगाने धावू शकतील.
खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे आणि तेजस एक्सप्रेसच्या माध्यमातून ते अमलात आले असले तरी त्याचा अद्याप फारसा विस्तार झालेला नाही.
महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचे मार्ग सर्वस्वी वेगळे आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण करण्यासाठीचा खर्च अवाढव्य असला, तरी देशात सर्व स्तरांवरील रेल्वेवाहतूक उपलब्ध असण्याची गरज निर्विवाद आहे. पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीस लागणारा कालावधी पाहता पूर्णपणे भारतीय बनावटीचे वंदे भारत ट्रेनचे जाळेच देशभरात महत्त्वाचे ठरणार आहे. नजीकच्या भविष्यात हायड्रोजन इंधनावर चालणार्या ट्रेन प्रवासखर्चामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतील. हरयाणामध्ये जिंद-सोनिपत मार्गावर अशा गाडीचे प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षण लवकरच सुरू होईल. ही जगातील अशा पद्धतीची आठ प्रवासी डब्यांची; म्हणजे सर्वाधिक लांबीची गाडी असेल. देशातील बव्हंशी ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झालेले असताना हायड्रोजनवर चालणार्या ट्रेनचा वापर कसा केला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.